*मैत्रिणी कडील माहेरपण...*
ही कुठली नवीन कन्सेप्ट बुवा असं वाटेल नक्की तुम्हाला!
पण ही कन्सेप्ट नाही, हा स्नेह भाव आहे खर तर.
असे किती स्नेह भाव सांगू??
शुभा कडे जेवायला गेलं की पाण्याचं भांड सुद्धा उचलू देत नाही.
थेट पानावर बसायचं! कधी गरम पोळी, कधी ठरवून केलेला आवडीचा मेनू..माझ्या स्वभावाप्रमाणे मी काम करण्यासाठी चुळबुळ करू लागले की प्रेमळ ओरडा "काहीही करू नकोस कविता, मस्त आयतं जेव " नंतरचं सुद्धा आवरू देत नाही.
तीच कथा वैशु ची ..तिच्या हातचे गरम गरम डोसे असो की सँडविच असो
ही स्वतः हॉस्पिटलमधून दमून येऊन सगळं करणार आणि मी बसून खायचं ...तिचा ही हाच लटका ओरडा "तुझ्याकडे आम्ही येतो तेंव्हा तू उभीच असतेस ना ? मग आता इथे हे आयतं गरम जेवण ही एन्जॉय कर.."
तीच गोष्ट अनघा ची आणि वंदना ची .. अनघाच्या टेरेस मध्ये तिनं खपून केलेल्या छान गरम पावभाजीचा आयता आस्वाद, लेक टाटा ला ट्रेनिंगला जाणार म्हणून साग्रसंगीत उत्तम पदार्थ करून आयतं जेवायला घालणारी वंदना, समोर पूर्वी रहाणारी स्मिता ही तशीच ! रात्री मेसेज करायची ..उद्या मी पास्ता करणार आहे ग..इकडेच या जेवयला!
तू काही करत बसू नकोस !!
विशाखा कडे गेल्यावरही ती कितीही दमून आली असली तरी तिच्या हातचा मसाला घातलेला सुंदर आयता चहा !!कित्ती उदाहरणं देऊ !
अजून एक खास उदाहरण म्हणजे खुप कमी वेळात छान मैत्री झालेली शुचिता !तिच्या कडे गेल्यावर तिने करून घातलेली गरम गरम घावन ,चविष्ट ताज लोणचं ,गरम गरम कॉफी !!
तास दोन तासांच का होईना हे माहेरपण च की. काहीही न करता मिळालेला , प्रेमाने खाऊ घातलेला गरम गरम आयता घास .
मागचं पुढचं आवरणं नाही, वाढणं नाही की काही नाही ..आता हे सगळं हॉटेल मध्ये गेलं तरी होतच की पण तिथे चार्ज असतो ह्या सगळ्याचा. आणि इथे ह्या *अशा मैत्रिणींच्या माहेरपणात इन्व्हेस्टमेंट असते , दुपटीने रिटर्न्स देणारी. जिव्हाळा , माया, आपलेपणा , प्रेम हे सगळं सगळं इन्व्हेस्ट केलं की हे असं हक्काचं माहेरपण मिळतं आणि केलं ही जातं.* 50 शी ला तर ह्या मैत्रिणींच्या माहेरपणाची च गरज जास्त भासते .
*ठरवून माहेरी जाऊन राहणं तर सुखदायी असतच पण हे 2 तासाच माहेरपण , हा शॉर्ट ब्रेक ही खूप मोठी एनर्जी देऊन जातो.*
*पण ह्या शॉर्ट ब्रेक साठी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट लागते बरं,* शुभा काय किंवा वैशु काय किंवा माझ्या इतर मैत्रिणी काय मी आयतं जेवल्याचं समाधान माझ्यापेक्षा त्यांना जेव्हा जास्त समाधान देऊन जात तेंव्हा समजायचं ह्या गुंतवणुकीला मोल नाही.
No comments:
Post a Comment