श्रीगुरूचरित्राध्याय एकोणतिसावा कथासार
॥ ब्रह्मराक्षसाचा उद्धार, भस्ममहात्म्य ॥
श्रीगणेशाय नमः ॥
श्रीगुरू नृसिंहसरस्वती त्रिविक्रमभारतीस म्हणाले, वत्सा, कृतयुगात वामदेव नावाचा एक ब्रह्मज्ञानी योगी भूलोकी संचार करीत असे. एकदा तो क्रौंचारण्यातून जात होता. तेथे एक नरभक्षक ब्रह्मराक्षस राहत असे. याने धावत येऊन वामदेवावर झडप घातली. तेव्हा त्याच्या अंगावरचे भस्म ब्रह्मराक्षसाच्या अंगाला लागताच त्याची सर्व पापे जळून गेली. त्याची क्षुधा, तृष्णा, उद्विग्नता, तगमग नाहीशी झाली. त्याला पूर्वजन्माचे स्मरण झाले. त्याने वामदेवाचे पाय धरले व म्हणाला, “हे मुनीश्वर, तू ईश्वर आहेस, तुझ्या अंगस्पर्शाने मी पावन झालो माझा उद्धार कर.” वामदेवाने विचारले, “तू कोण आहेस?” ब्रह्मराक्षस म्हणाला, “हे तपोनिधी, या क्षणी मला पूर्वीचे पंचवीस जन्म आठवत आहेत. प्रथम जन्मात मी यवन राजा होतो. उन्मत्त होऊन मी प्रजेला छळले, पतिव्रतांना भ्रष्ट केले. पुढे मला क्षयरोग झाला. शत्रूंनी माझे राज्य बळकावले. मृत्यूनंतर मी नरकात पडलो. त्यानंतर मी प्रेतयोनीत जन्मलो. मग मी क्रमाने वाघ, अजगर, लांडगा, डुक्कर, सरडा, कुत्रा, कोल्हा, हरीण, ससा, माकड, मुंगूस, कावळा, अस्वल, रानकोंबडा, गाढव, मांजर, बेडूक, कासव, मासा, उंदीर, घुबड, हत्ती व आता ब्रह्मराक्षस असे जन्म घेतले. हे प्रभु! आज तुमच्या अंगस्पर्शाने मला पूर्वजन्म आठवले, मन शांत झाले. तुमच्या अंगी एवढे सामर्थ्य कसे आले?”
वामदेव म्हणाला, “अरे, हा सर्व माझ्या अंगावरील भस्माचा प्रभाव आहे. त्याच्या स्पर्शामुळेच तुझ्या ठायी ज्ञान प्रकट झाले. मी तुला एक कथा सांगतो. यावरून भस्माचा प्रभाव किती श्रेष्ठ आहे हे तुझ्या लक्षात येईल. द्रविड देशात एका कर्मभ्रष्ट ब्राह्मणाचे शुद्र स्त्रीशी संबंध होते. त्याच्या कुटुंबीयांनी व ज्ञातिबांधवांनी त्याच्यावर बहिष्कार टाकला. चरितार्थाचे साधन नसल्याने तो चोऱ्या करू लागला. एकदा चोरी करत असताना एका शूद्राने त्याचा वध केला आणि त्याचे प्रेत गावाबाहेरील स्मशानापाशी टाकले. तेथे एक कुत्रा भस्मावर बसला होता. तो प्रेत खाण्यासाठी आला, तेंव्हा त्याच्या पोटाचे भस्म प्रेताच्या कपाळाला व अंगाला लागले. इकडे यमदूत त्या ब्राह्मणाच्या सूक्ष्म देहाला पीडा देत यमलोकी जात होते. शिवदूतांनी त्याच्या प्रेताला भस्म लागलेले पाहिले आणि यमदूतांना गाठले. ब्राह्मणाचा सूक्ष्म देह त्यांच्याकडून हिसकावून घेतला आणि पळवून लावले. हे वृत्त कळताच यम संतापाने शिवदूतांपाशी आला व म्हणाला, “तुम्ही माझ्या दूतांना का मारलेत? हा ब्राह्मण पापी आहे. याला तुम्ही शिवलोकी कसे नेता?” शिवदूत म्हणाले, “या ब्राह्मणाच्या सर्वांगावर भस्म लागले होते, त्यामुळे तो पावन झाला आहे. भस्मचर्चित देह असलेल्या प्रत्येकाला कैलासलोकीच आणले पाहिजे अशी आमच्या स्वामींची आज्ञा आहे.” ते ऐकून यमाचा राग शांत झाला, त्याने आपल्या दूतांना भस्म, त्रिपुंड्र व रुद्राक्ष धारण करणाऱ्या कोणालाही यमलोकी आणू नये असे बजावले, म्हणूनच मी भावभक्तीने भस्म धारण करतो.”
वामदेवाचे बोलणे ऐकून ब्रह्मराक्षस म्हणाला, “मी राजा असताना पांथस्थांची सोय व्हावी म्हणून रानात तळे बांधले होते, चरितार्थ चालण्यासाठी ब्राह्मणांना शेतजमिनी दान दिल्या होत्या. त्या पुण्याईनेच मला तुमची भेट झाली. आता मला भस्मधारणविधी समजावून सांगा.” वामदेव म्हणाला, “पूर्वी मंदार पर्वतावर देवसभा चालली असताना सनत्कुमारांनी शंकराला विनंती केली “प्रभू, पापक्षय होऊन मोक्षप्राप्ती साध्य होईल असे एखादे साधन मानवांच्या कल्याणासाठी सांगा.” शिव म्हणाले, “सुकलेले गोमय जाळून जी राख मिळते तेच भस्म होय. ‘सद्योजात’ मंत्राने ते तळहातावर घ्यावे. ‘अग्निरीति’ मंत्राने अभिमंत्रित करावे. ‘मानस्तोके मंत्राने अंगठ्याने मळावे. ‘त्र्यंबक’ मंत्राने भाळी लावावे. ‘त्र्यायूषे’ मंत्राने कपाळास, भुजांस व शरीरावर अन्य स्थानी लावावे. मध्यमा, अनामिका व अंगुली या तीन बोटांनी त्याच मंत्रोच्चारात भुवयांना समांतर तीन आडव्या रेषा काढून अंगठ्याने मध्यरेषा काढावी. यालाच त्रिपुंड्रक म्हणतात. सर्व आश्रमधर्माच्या व वर्णांच्या लोकांनी भस्मत्रिपुंड्र लावावा. त्यायोगे पूर्वपापांचे निरसन होऊन तो पुण्यात्मा होतो. त्याला सर्व तीर्थस्नानांचे, यात्रांचे व जपानुष्ठानांचे पुण्य मिळते, आयुरारोग्य, यश, कीर्ती, ज्ञान व सौख्य लाभते, कुळांचा उद्धार होतो, त्याला चारी पुरुषार्थ साध्य होतात. तो स्वर्ग, ब्रह्म आणि वैकुंठलोकी दीर्घकाळ वास्तव्य करून शिवसायुज्यता प्राप्त करतो. ज्याला मंत्रोच्चार येत नाहीत त्याने ‘ॐ नमः शिवाय’ असे म्हणून भस्म भक्तिभावाने धारण करावे. त्यालाही तेच पुण्यफल मिळते.” ते ऐकून सनत्कुमार, देव आणि ऋषींना मोठे समाधान वाटले.”
भस्ममहात्म्य श्रवण केल्यावर ब्रह्मराक्षसाने वामदेवाला उद्धार करण्याची काकुळतीने प्रार्थना केली. वामदेवाने त्याला अभिमंत्रित भस्म दिले. त्याने त्या भस्माने स्वतःच्या भाळी त्रिपुंड्रक लावला. त्याच्या प्रभावाने त्याला दिव्य देह प्राप्त झाला. वामदेवाच्या कृपाप्रसादाने त्याला दिव्यलोकी परमगती मिळाली. त्रिविक्रमा, वामदेव हे शिवावतार होते, योगियांचे ईश्वर होते, जगत्कल्याणासाठी संचार करायचे, त्यांनी ब्रह्मराक्षसाचा उद्धार केला. गुरुसेवेची आवड हेच सर्व साधनामागचे सार आहे.” ते ऐकून त्रिविक्रमाला परमानंद झाला. श्रीगुरुंना वंदन करून तो कुमसी ग्रामी परतला.
इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे भस्ममहिमावर्णन नाम एकोनत्रिंशोऽध्यायः ॥
॥ श्रीगुरुदेव दत्त ॥
॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥