Thursday, 5 September 2024

जलजीवन मिशन अंतर्गत राज्याच्या विविध तालुक्यातील कामांतील अडथळे दूर करणार

 जलजीवन मिशन अंतर्गत राज्याच्या विविध तालुक्यातील

 कामांतील अडथळे दूर करणार

-पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि.४ :-जलजीवन मिशन अंतर्गत विविध तालुक्यातील कामांतील अडथळे दूर करण्यात येतील असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह संयुक्त आढावा बैठकीत ते बोलत होते.

पाणीपुरवठा विभागातील विविध जिल्ह्यातील कामांचा आढावा मंत्री श्री.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी पाणीपुरवठा योजनानिहाय बैठकीस  नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, आमदार नितेश राणे, आमदार शहाजी बापू पाटील, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, सहसचिव अमन मित्तल, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या आयुक्त परमित कौर उपस्थित होते. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुकानिहाय पाणीपुरवठा योजनाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. या तालुकानिहाय झालेल्या बैठकीस संबंधित तालुक्यातील लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री.भुसे यांनी मालेगाव तालुक्यातील दाभाडी व बारा गाव पाणी योजनाचे जलजीवन अंतर्गत  सुधारित कामे तसेच तालुक्यातील पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या गावांबाबत भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या वतीने करण्यात येणाऱ्या कार्यवाही बाबत माहिती घेतली.

जलजीवन मिशन अंतर्गत 119 योजना 100% पूर्ण

कणकवली, देवगड व वैभववाडी तालुक्यातील 260 गावांसाठी 248 योजना मंजूर करण्यात आले आहे. 119 योजना 100% पूर्ण झाल्या असून 'हर घर नल से जल' म्हणून घोषित करणे बाकी आहे. यासाठी संबंधित ग्रामपंचायतीने ठराव घेणे गरजेचे आहे. आत्तापर्यंत 13 गावातील 8748 कुटुंबांना 'हर घर से जल' साठी घोषित करण्यात आले आहे. 248 पैकी काही कामाबाबत तक्रारी प्राप्त झाल्याने योजनेतील कामांचे सर्वेक्षण करून सुधारित कामाचे आदेश देण्यात येईल.

शिरभावी व 19 गावातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी सौर ऊर्जा

शिरभावी व 19 गावातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतर पंधरा वर्षे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडून चालविण्यात आली होती. त्यानंतर जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित होणे गरजेचे होते पण जिल्हा परिषदे कडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने सदर योजना चालू ठेवण्यासाठी अडचण निर्माण झाली. योजना कार्यान्वित ठेवण्यासाठी झालेल्या 41 कोटी रुपये खर्चाची मागणी शासनाकडे करण्यात येत आहे. सदर पाणीपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी विशेष बाब म्हणून या निधीस मान्यता देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे विनंती करण्यात येणार आहे. यातील 70 टक्के खर्च वीज बिलावर होत असल्याने पाणीपुरवठा योजनांवर सौरपंप वापरल्यास सौर ऊर्जेमुळे खर्च कमी होणार आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.

उद्योगासाठीच्या तांत्रिक प्रशिक्षणासाठी २० सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 उद्योगासाठीच्या तांत्रिक प्रशिक्षणासाठी

२० सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

 मुंबई, दि.४ : उद्योगांसाठी आवश्यक असलेले तांत्रिक प्रशिक्षण देणाऱ्या इंडो जर्मन टूल रूम (आय.जी.टी.आर.)(छत्रपती संभाजीनगर) या लघु सूक्ष्म आणि मध्यम मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या भारत सरकारच्या प्रशिक्षण संस्थेशी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) पुणे या संस्थेने सामंजस्य करार केला आहे. यानुसार उद्योगासाठीच्या तांत्रिक  प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना सहाय्य केले जाणार आहे. तसेच याअंतर्गत ७० हजार रुपयांपर्यंतचे तांत्रिक प्रशिक्षण मोफत मिळणार आहे. इच्छुक पात्रताधारक उमेदवारांनी या प्रशिक्षणासाठी २० सप्टेंबर २०२४ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले आहे.

या योजनेची सविस्तर माहिती www.mahaamrut.org.in किंवा  https://www.igtr-aur.org/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची मागणी लक्षात घेऊन, रोजगार व स्वयंरोजगाराच्या अनेक संधी देणाऱ्या अमृत संस्था प्रायोजित इंडो जर्मन टूल रूम (छत्रपती संभाजीनगर) संस्थेच्या विविध तांत्रिक अभ्यासक्रमांचे नि:शुल्क प्रशिक्षण 'अमृत' च्या लक्षित गटातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी घ्यावे. अधिक माहितीसाठी दीपक जगताप ९६७३७१४१७०, अनिकेत देशमुख ९६६५१६२४४१, आनंद निकाळजे ९३२५४८७०७३ किंवा अमृत कार्यालय ९७३०१५१४५० या क्रमांकावर संपर्क साधावा.

या योजनेंतर्गत १५ निवासी प्रशिक्षण अभ्यासक्रम तसेच ३० अनिवासी प्रशिक्षण अभ्यासक्रम हे आय.जी.टी.आर. (छत्रपती संभाजीनगर) संस्थेच्या छत्रपती संभाजीनगर, वाळूंज, पुणे, नागपूर, कोल्हापूर या उपकेंद्रात दिले जाईल.

ही योजना खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग/संस्था/महामंडळामार्फत योजनांचा लाभ मिळत नाही, अशा खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील १८ ते ४० वयोगटातील पात्रताधारक युवक, युवतीसाठी आहे. १० वी उत्तीर्ण तसेच आय.टी.आय., पदवीका, पदवी उत्तीर्ण किंवा अंतिम वर्षात शिकत असलेले उमेदवार या योजनेसाठी अर्ज करु शकतात. इच्छूक उमेदवाराचा महाराष्ट्र राज्यात अधिवास असणे अनिवार्य आहे.पात्रता निकषांची पूर्तता करत योजनेचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांना ६ ते १२ महिन्यांच्या कालावधीचे तांत्रिक अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण मिळेल. या प्रशिक्षणाचे संपूर्ण शुल्क 'अमृत' संस्था भरणार आहे. त्याचप्रमाणे निवासी अभ्यासक्रमासाठी भोजन आणि निवासाचा काही खर्च देखील 'अमृत' द्वारे अदा करण्यात येणार आहे.

या योजनेद्वारा 'अमृत' चे लक्षित गटातील उमेदवारांना खूप चांगली संधी उपलब्ध करून देण्यात आलेली असून विविध आकर्षक आणि उत्कृष्ट अशा निवडक IGTR कोर्सेस चे प्रशिक्षण शुल्क, निवास आणि भोजनाचा खर्च त्याचप्रमाणे हा कोर्स उत्तीर्ण झाल्यानंतर नोकरीची संधी देखील उपलब्ध होणार आहे.

विकसित भारत 2047 साठी ई गव्हर्नन्सचे योगदान महत्वाचेमुख

 वृत्त क्र. 1511

विकसित भारत 2047 साठी ई गव्हर्नन्सचे योगदान महत्वाचे

- मुख्य सचिव सुजाता सौनिक

मुंबई, दि. 4 : राष्ट्रासाठी सुरक्षित, शाश्वत आणि सर्वसमावेशक डिजिटल भविष्यासाठी आपण कार्यरत राहू. ई गव्हर्नन्स संदर्भात झालेल्या  राष्ट्रीय परिषदेतील  चर्चा आणि निर्णयांचा प्रशासनाच्या कामकाजावर भविष्यात कायमस्वरूपी प्रभाव पडेल. या परिषदेमुळे  2047 पर्यंत डिजिटली सशक्त आणि विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रवृत्त करेल. यासाठी ई  गव्हर्नन्सचे योगदान महत्वाचे असल्याचे मत मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी आज व्यक्त केले.

ई गव्हर्नन्स विषयक 27 व्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन मुंबई येथे करण्यात आले.  "विकसित भारत : सुरक्षित आणि शाश्वत ई सेवा वितरण" अशी संकल्पना असलेल्या या दोन दिवसीय परिषदेच्या समारोप प्रसंगी श्रीमती सौनिक यांनी मत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय सचिव व्ही.श्रीनिवास, आय.आय.पी

ए.चे महासंचालक एस.एन. त्रिपाठी, केंद्रीय अतिरिक्त सचिव पुनीत यादव, हरियाणाचे मुख्य माहिती आयुक्त टी.सी. गुप्ता आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नानुरीया उपस्थित होते. ई गव्हर्नन्स विषयक 27 व्या राष्ट्रीय परिषदेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 3 सप्टेंबर रोजी करण्यात आला होता.

मुख्य सचिव श्रीमती सौनिक म्हणाल्या की, 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' या योजनेमध्ये माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव पराग जैन यांची मोठी भूमिका आहे. या योजनेत आज 1 कोटी 57 लाख लाभार्थी केले असून 2 कोटी लाभार्थी होईल. या लाभार्थी महिलांचा डेटाबेस तयार करण्याचे काम सुरू असून भविष्यात या डेटाबेसवरून कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) आणि ब्लॉकचेनद्वारे ओळख पटविण्यासाठी होईल.  लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरणासाठी मजबूत डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करत असल्याचेही श्रीमती सौनिक यांनी सांगितले.

मुख्य सचिव श्रीमती सौनिक म्हणाल्या की, आज सर्वांनी आपले कार्य अतिशय गांभीर्याने घेणे खूप महत्त्वाचे आहे.  महाराष्ट्राने केंद्र सरकारच्या पाठिंब्याने उद्दिष्टे साध्य करण्याच्या दिशेने लक्षणीय प्रगती केली आहे. यापुढे धोरणात्मक सहभाग आणि सुधारणा घडवून आणण्यासाठी एक साधन म्हणून त्याचा वापर केला जाणार आहे. यासाठी  डेटा एकत्रीकरणाला प्राधान्य देण्यात येईल. केंद्रीय पोर्टल्सपासून राज्य स्तरापर्यंत माहितीचा  प्रवाह  सुनिश्चित करून लाभार्थी ओळख आणि त्यांच्या मॅपिंग करण्यावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

या समारोप प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंग यांचा रेकॉर्डेड संदेश दाखविण्यात आला. कार्यक्रमादरम्यान हरियाणा सरकारच्या सेवा हक्क आयोगाच्या 2023-24 च्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.

000

मराठी चित्रपट धोरण निर्मितीसाठी समिती गठित करणार

 मराठी चित्रपट धोरण निर्मितीसाठी समिती गठित करणार

-सांस्कृतिक कार्यमंत्री  सुधीर मुनगंटीवार

 

मुंबई, दि.४ : भारतीय चित्रपट सृष्टीचा पाया मराठी माणसाने रचलेला असून आशयसंपन्न चित्रपटांची परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. ही परंपरा अधिक समृद्ध करण्याच्या दृष्टीने तसेच मराठी चित्रपटांना व्यापक व्यावसायिक संधी मिळण्याच्या दृष्टीने सांस्कृतिक विभागाच्यावतीने मराठी चित्रपट धोरण तयार करण्यात यावे, त्यासाठीची  समिती गठित करुन या कामास गती  द्यावी. तसेच नागपूर येथे १०० एकरात भव्य चित्रानगरी निर्माण करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे दिल्या.

मराठी चित्रपट अनुदानासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी संबंधितांना  सूचित केले. यावेळी  विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, चित्रनगरी मुबंईच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील,  यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी, अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता संघटनेचे, पदाधिकारी, इतर संबंधित उपस्थित होते.

मराठी चित्रपटांच्या अधिक दर्जेदार निर्मितीसाठी पूरक वातावरण आणि  संधीची उपलब्धता वाढवण्याचा सांस्कृतिक विभागाचा प्रयत्न असून त्यादृष्टीने मुबंई आणि कोल्हापूर प्रमाणे नागपूर येथे फिल्मसिटी निर्माण करण्यासाठीची आवश्यक कार्यवाही सुरु करण्याचे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी या बैठकीत सूचित केले.

विविध पायाभूत सुविधा आणि अनेक महत्त्वपूर्ण बाबींसाठी प्रसिद्ध असलेल्या नागपूरच्या वैभवात आता भर पडणार आहे. अनेक प्रतिथयश साहित्यकार, लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते देणाऱ्या विदर्भाच्या भूमीत चित्रनगरी व्हावी , असे  श्री. मुनगंटीवार म्हणाले.

तसेच अनुदानास पात्र ठरलेल्या चित्रपटात महिला दिग्दर्शिका असलेल्या चित्रपटाला अतिरिक्त पाच लाख रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय ही यावेळी घेण्यात आला. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी झालेल्या मराठी चित्रपटांना विना परिक्षण  दुप्पट अनुदान देण्यात येईल. तसेच अनुदानासाठी चित्रपटांचे श्रेणीकरण अ, ब, क या तीन गटात करण्यात यावे, त्यासाठी श्रेणीकरण समिती गठित करण्याच्या सूचनाही मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या.

  कोवीड काळातील चित्रपटांच्या बाबतीत स्वतंत्रपणे विचार करुन निर्णय घेतला जाईल,असे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी यावेळी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदारांची वास्तू, वस्तू, पुराभिलेख, समाधी यांचे जतन संवर्धन होणार

 छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदारांची

वास्तू, वस्तू, पुराभिलेख, समाधी यांचे जतन संवर्धन होणार

- सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

 

मुंबई, दि. ४ : छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आणि स्वराज्याच्या इतिहासातील  "सोनेरी पान" आहेत . त्यामुळे प्रेरणादायी अशा तत्कालीन ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या, शिवकालीन वास्तू, वस्तू, पुराभिलेख, समाधी यांचे जतन संवर्धन केले गेले पाहिजे. या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांची सोबत करणाऱ्या सरदारांच्या शौर्याची, पराक्रमाची गाथा भविष्यातील पिढ्यांसाठी मार्गदर्शक, प्रेरक असल्याने हा ठेवा जपण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री  सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिले.

 पुरातन वारसा जतन-संवर्धन समिती सदस्य आणि अधिकाऱ्यांसोबत  मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री श्री.मुनगुंटीवार यांनी समितीच्या कामाचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्यासह पुरातत्व विभागाचे अधिकारी एस. उगले, समितीचे कार्याध्यक्ष इंद्रजित जेधे, सदस्य अनिकेत बांदल, श्रीनिवास इंदलकर, ऋषिकेश नाईक -निंबाळकर, निळकंठ बावडेकर, अभय राज शिरोळे, रवींद्र कंक, सचिन भोसले, गोरख करंजावणे आदी सदस्य, इतर अधिकारी  उपस्थित होते.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समवेत लढणारे मावळे आणि सरदार शूर वीर आणि धैर्यवान होते. रयतेच्या रक्षणासाठी लढणाऱ्या या सरदारांशी संबंधित पुराभिलेख, दस्तऐवज, त्यांनी युद्धकाळात वापरलेल्या वस्तू, शस्त्र, त्यांच्या निवासाचे वाडे शूरतेचा, वीरतेचा व समृद्धीचा वारसा सांगणारे आहेत. ज्यांनी आपल्यासाठी प्राण त्यागले त्यांच्यासाठी आपण वेळ खर्च करून येणाऱ्या  पिढीला सक्षम करणे ही आपली जबाबदारी आहे.

या पुरातन  बाबींचे  विभागाच्या माध्यमातून जतन केले जावे व महाराष्ट्राच्या नव्या पिढीसाठी ते मार्गदर्शक ठरावे, या दृष्टीने समिती सदस्यांनी चर्चा केली. समिती सदस्यांच्या सर्व मागण्यांचा व सूचनांची दखल घेऊन त्या दृष्टीने कार्यवाहीचे निर्देश मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी  दिले.

सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून  ऐतिहासिक वस्तूंच्या प्रदर्शनासाठी राज्यात अद्ययावत संग्रहालय उभारण्याचा विचार  असून ते देशातले सर्वोत्तम संग्रहालय ठरेल, अशा पद्धतीने त्याचे दर्जेदार काम उभारवयाचे आहे. राज्यातील शिवकालीन वस्तू, सरदारांचे वाडे तसेच त्यांनी वापरलेली शस्त्रे आणि वस्तू यांची यादी तयार करण्याचे निर्देश देखील मंत्री मुनगंटीवार यांनी या बैठकीत दिले. या विषयी क्यू आर कोड सह एक माहिती पुस्तिका व बदलत्या काळानुरूप डिजिटल डॉक्युमेंटेशन केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वाराचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले दर्शन

 तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वाराचे

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले दर्शन

 

नांदेड, दि. 4  : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नांदेड येथील दौऱ्यात सुप्रसिद्ध तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा येथे गुरुग्रंथ साहिब यांचे दर्शन घेतले. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनीही गुरुग्रंथ साहिब यांचे दर्शन घेतले.

            तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा बोर्डाच्यावतीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा पारंपारिक पद्धतीने शाल, श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रपती महोदयांच्या कन्या इतीश्री याही उपस्थित होत्या. त्यांचाही यावेळी गुरुद्वारा बोर्डाच्यावतीने सत्कार करण्यात आला.

            याप्रसंगी राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, सचखंड गुरुद्वाराचे प्रशासक डॉ. विजय सतबिरसिंगजी, सल्लागार जसवंतसिंग बॉबी, अधिक्षक राज देविंदरसिंगजी, पुजारी बाबा ज्योतिदरसिंगजी जत्थेदार, संत बाबा बलविंदरसिंगजी आदी उपस्थित होते.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची लंगरला भेट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुद्वारा येथील दर्शनानंतर तेथे असलेल्या लंगरला भेट देवून पाहणी केली व समाधान व्यक्त केले.

                                    पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांशी साधला संवाद

यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान स्वनिधी योजनेचे लाभार्थी कटलरी व किचन्स, खेळणी व्यवसायिक केतन लक्ष्मण कळसकर व फळे आणि ज्यूस व्यावसायिक समशेरसिंग लालसिंग राठोड यांच्या स्टॉलला भेट देवून त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.

0000


 


जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार शासन निर्णय प्रसिद्ध

  जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार शासन निर्णय प्रसिद्ध

 

मुंबई, दि. ०४ : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना गुरुवार दि. ५ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीत पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यासंबधीचा शासन निर्णय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर प्रसिद्ध करण्यात आला आहे. मुंबई – बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग, मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत लागू असणार आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफीसह अन्य सोई सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश  मुख्यमंत्र्यांनी दि.१४ ऑगस्ट रोजी झालेल्या गणेशोत्सव पूर्वतयारी आढावा बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते, त्यानुसार आज सार्वजनिक बांधकाम विभागाने पथकर सवलतीचा शासन निर्णय जारी केला आहे.

या टोलमाफी सवलतीसाठी ‘गणेशोत्सव २०२४, कोकण दर्शन’ अशा आशयाचे स्टीकर्स स्वरुपाचे पथकर माफी पास, त्यावर वाहन क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर लिहून ते स्टीकर्स आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग, वाहतूक पोलीस/पोलीस, संबंधित प्रादेशिक परिवहन विभाग (आर.टी.ओ.) यांनी समन्वय साधून पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ. कार्यालयांमध्ये उपलब्ध करुन द्यावेत, असे आदेश देण्यात आले आहेत. हाच पास परतीच्या प्रवासाकरीता देखील ग्राह्य धरण्यात येईल.

तसेच गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना ही टोल माफी लागू असणार आहे. गणेशोत्सवासाठी ज्या जिल्ह्यातून बसेस येथील त्या ठिकाणच्या पोलीस किंवा आरटीओ यांच्याकडून हे पास एसटी महामंडळाला उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पोलीस व परिवहन विभागाने गणेशोत्सवाच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती नागरिकांना देण्याच्या देखील सूचना आहेत.

0000

Featured post

Lakshvedhi