Tuesday, 3 September 2024

जल विद्युत ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी सात कंपन्यांमध्ये सामंजस्य करार ऊर्जा निर्मितीसाठीच्या सामंजस्य करारामुळे अर्थव्यवस्था वाढीस गती ; ऊर्जा निर्मिती करारामुळे 72 हजाराहून अधिक रोजगार निर्मिती;

 जल विद्युत ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी सात कंपन्यांमध्ये सामंजस्य करार

ऊर्जा निर्मितीसाठीच्या सामंजस्य करारामुळे अर्थव्यवस्था वाढीस गती ;

ऊर्जा निर्मिती करारामुळे 72  हजाराहून अधिक रोजगार निर्मिती;

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

            मुंबई दि. 3 :  जल विद्युत ऊर्जा निर्मितीसाठीच्या पंम्प्ड स्टोरेज प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन आणि विविध सात ऊर्जा कंपन्यांमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे 40 हजार 870 मेगावॅट ऊर्जा निर्मिती होणार असून, राज्यात दोन लाख 14 हजार कोटींची गुंतवणूक आणि 72 हजाराहून अधिक रोजगार निर्मिती होणार आहे. राज्याची अर्थव्यवस्था तीन ट्रिलीयन करण्याच्या उद्देशास या करारामुळे गती मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

आज सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र शासन आणि एन टी पी सी, वेलस्पन न्यू एनर्जी, एन एच पी सी, रीन्यू हायड्रो पावर, टी एच डी सी इंडिया, टोरंट पॉवर, अदानी ग्रीन एनर्जी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय अधिकारी आणि खाजगी कंपन्यांचे प्रतिनिधी यांचे अभिनंदन केले. गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इकबाल सिंह चहल, जलसंपदा प्रकल्प व विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.दीपक कपूर, जलसंपदा विभागाचे सचिव डॉ. संजय बेलसरे, उपमुख्यमंत्री यांचे सचिव श्रीकर परदेशी यांच्यासह अधिकारी आणि खाजगी कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, राज्यात 46 हजार मेगावॉट ऊर्जा निर्मिती होते या कराराच्या माध्यमातून अधिकची 40 हजार 870 मेगाव्हॅट वीजनिर्मिती होणार आहे. या करारांमुळे दोन लाख 14 हजार कोटींची गुंतवणूक राज्यात होणार असून, तीन ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे राज्याचे जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण करण्यास गती प्राप्त होणार आहे. या सामंजस्य कराराची गतीने होऊन अंमलबजावणी होणार आहे. यामुळे 72 हजार पेक्षा जास्त  नवीन रोजगार निर्मिती होणार आहे.

नैसर्गिक संसाधनांचा वापर करून ऊर्जा शाश्वत पद्धतीने निर्माण करू शकतो. राज्यात पश्चिम घाटात विशेष जैवविविधता आहे. तेथे अनेक ठिकाणी शीतगृहांसाठी ऊर्जेचा वापर होणार आहे. शासकीय आणि खाजगी क्षेत्राने उत्सुकतेने हे करार पूर्णत्वास नेण्यास सहकार्य केले आहे. यामुळे राज्यासाठी शाश्वत वीजनिर्मिती आणि अर्थव्यवस्था वाढीस सहकार्य लाभणार असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

डॉ.दीपक कपूर यांनी विविध सात कंपन्यांअंतर्गत होणाऱ्या करारासंदर्भात अधिक माहिती दिली. नॅशनल थर्मल पॉवर कंपनीअंतर्गत ९०७८ काटी इतकी गुंतवणूक होणार आहे तर १४०० रोजगार निर्मिती , एक हजार ८०० मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. वेल्सपन न्यु एनर्जी कंपनी अंतर्गत्‍ पाच हजार कोटी गुंतवणूक तर १५०० रोजगार निर्मिती, एक हजार २०० मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे.

            एनएचपीसी लिमिटेड अंतर्गत्‍ ४४ हजार १०० कोटी इतकी गुंतवणूक, ७ हजार ३५० रोजगार निर्मिती आणि ७ हजार ३५० मेगा वॅट वीज निर्मिती होणार आहे. रिन्यु हायड्रो पावर लिमिटेड अंतर्गत १३ हजार १०० कोटी गुंतवणूक, पाच हजार रोजगार निर्मिती, दोन हजार ६०० मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे.

टेहेरी हायड्रो डेव्हलपमेंट कार्पोरेशन इंडिया लिमिटेड अंतर्गत ३३ हजार ६२२ कोटी गुंतवणूक, ६ हजार ३०० रोजगार निर्मिती तर ६ हजार ७९० मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. टोरन्ट पावर लिमिटेड अंतर्गत २८ हजार कोटी गुंतवणूक १३ हजार ५०० रोजगार निर्मिती, ५ हजार ६०० मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड अंतर्गत ५४ हजार ४५० कोटी इतकी गुंतवणूक, ३० हजार रोजगार आणि ९ हजार ९०० मेगा वॅट इतकी वीज निर्मिती केली जाणार असल्याची माहिती अपर मुख्य सचिव डॉ.कपूर यांनी दिली.

०००

सुंदर आपले जग

 🌹 *माणुसकी* 🌹

          (साभार)

भर पावसात रस्त्याच्या कडेला भिजत ऊभ्या असलेल्या तरूणास विचारले , "नुसताच भिजतो कश्याला?"

 तो उत्तरला "नही साब".. त्याच्या डाव्या बाजूला जमिनीकडे बोट दाखवतं तो म्हणाला,

"इधर निचे बडा पाईपलाईन है. ढक्कन निकल गयेला है"

*तो त्या मॅनहोलमध्ये कोणी पडू नये, म्हणून तिथे ऊभा होता!*

रस्त्याखालचा पाईप पूर्ण भरला असावा, अन्यथा पाणी चक्राकार आत घुसताना दिसले असते. फुटभर ऊंचीचे पाणी वरून वेगाने जात होते. पायी चालणाऱ्याला वा दुचाकीवरून जाणाऱ्या कोणाला जाणवलेही नसते, की खाली खोल सांडपाण्याचा पाईप आहे!

मी अवाक झालो!


 कोण होता हा? कोणासाठी हा असा पाण्यात ऊभा राहिलायं?

मी भरं पावसात खाली ऊतरलो. त्याला म्हटले, "बहोत बढिया, भाई!"

तो फक्त कसनूसं हसला आणि म्हणाला,

"बस, कोई गिरना नै मंगता इधर".

"कबसे खडा है?"

"दो बजे से"

घड्याळात पाच वाजले होते..!

३ तास तसेचं ऊभे राहून याला भूक लागली असणार. दुर्दैवाने माझ्याकडे काहीच नव्हते. सगळी दुकानेही बंद. हा भूक लागल्यामुळे जागा सोडेल असे काहीच चिन्ह नव्हते!

*कुठल्या प्रेरणेने तो हे करतं होता?* त्या घाण गुडघाभर ऊंचीच्या पाण्यात उभे राहून तो तीन तासांपासून कोणाला वाचवतं होता? आणि का? दोन वाजल्यापासून त्याने कित्येक  जणांना वाचवले असणार. कोणाला त्याची जाणीवही नव्हती. खुद्द याला तरी त्याची कुठे पर्वा होती?


*ही अशी छोटी छोटी माणसे हे जग सुंदर करून जातात!*


मागच्या डिसेंबरमध्ये दादरला फुटपाथवर एक आंधळा म्हातारा 'कालनिर्णय' विकत बसलेला दिसला.

दुकानातून घेण्याऐवजी याच्याकडून घेतलेले काय वाईट असा विचार करून थबकलो.

"केवढ्याला 'कालनिर्णय', काका?"

"फक्त बत्तीस रूपये, साहेब" केविलवाणे तो म्हणाला. सकाळपासून एकही विकले  गेलेले दिसतं नव्हते. मी एक घेतले. पन्नासची नोट होती. ती त्याला दिली. हाताने चाचपडत तो ती नोट तपासतच होता तोपर्यंत अचानक उंच भरजरी कपडे घातलेला साठीतला एक देखणा गृहस्थ खाली वाकला.

"कितने का है ये?"

"बत्तीस रुपया"

"कितने है?"

"चौदा रहेंगे, साब"

ज्याला मराठी येत नाही असा हा माणूस मराठीतले कालनिर्णय कशासाठी विकत घेतोयं?

त्या माणसाने खिशातून साडेचारशे रुपये काढून त्याला दिले आणि ते सगळे कालनिर्णय बखोटीला मारले! 

मी आश्चर्यचकित..! छापील किंमतीत विकतं घेतोय, म्हणजे पुनर्विक्रीसाठी निश्चितच घेतं नाहीये. तसाही, कपड्यांवरूनही हा असले किरकोळ धंदा करणाऱ्यातला वाटतं नव्हता.

तो गृहस्थ थोडा पुढे गेला असेल. मला राहवलेचं नाही. मी थांबवून त्यांना विचारलेच!

हे मुळचें लखनौचे महोदय एअर इंडियातल्या मोठ्या पदावरून नुकतेच निवृत्त झाले होते. शिवाजी पार्कात स्वत:चे घर होते. एकुलता एक मुलगा अमेरिकेत स्थायिक झाला होता. लठ्ठ पेन्शन येत होती.

"वो बेचारा पंधरा कालनिर्णय बेचके कितना कमाता होगा? सौ, डेढसौ? वैसे भी बेचारे को सौ रुपये के लिए दिन भर ऐसे ही धुप मे बैठना पडता था. मैने ऊसका काम थोडा हलका करं दिया, बस इतनाही!"

मला काही बोलणेचं सुचले नाही! पण एवढ्या चौदा कालनिर्णयांचे तो करणारं काय होता?

"सोसायटी मे बहोत मराठी फ्रेंडस है, उन को बांट दूंगा!"

मी दिग्मूढ!

"तू एक मिनीट लेट आता, तो तुझे भी फोकट मे देता!" मला डोळा मारत, हसत तो लखनवी देवदूत रस्ता पार करून गेला सुद्धा!

*माणूसकी याहून काय वेगळी असते?* 


एखाद्या हॉस्पिटलबाहेर 'तात्काळ रक्त हवे' असा फलक वाचून, ऑफिसला वा घरात जायला ऊशीर होईल, याची तमा न बाळगतां रक्त देणारे कोण असतात? तेही रांग लावून! 

*कोण असतात हे? कुठल्या जातीचे? कोणत्या धर्माचे? 'भैये' असतात की 'आपले' मराठी?*


मुंबईत रस्त्यावर चहा विकणारे लाखो 'चायवाले' आहेत. 

बहुतांश उत्तरेकडले. सकाळी चहा बनवल्यावर पहिला कपभर चहा ते रस्त्यावर फेकतात.

दिवसाचा पहिला चहा रस्त्यावर न फेकता भिकाऱ्याला पाजणारा बांद्र्याचा एक 'चायवाला' मला माहिती आहे! सकाळी सकाळी भिकारी आलाचं नाही तर एका भांड्यात तेवढा चहा बाजूला काढून धंद्याला सुरूवात करतो!

"बर्कत आती है" एवढीच कारणमिमांसा त्याने दिली होती.


*डोळे ऊघडून पाहिले, तर असे असंख्य अज्ञात देवदूत आपल्याला ठायीठायी आढळतात, पण आपली नजरच मेलेली असते.*


      परवा थायलंडमध्ये गुहेत अडकलेल्या मुलांना बाहेर काढण्यासाठी हजारो अनामिक हात मदतीस आले. 

गुहेतले पाणी पंपाने बाहेर काढावे लागले. ते पाणी कुठे फेकले?

ज्याच्या शेतातं ते पाणी फेकावे लागले, त्या शेतातलें तीन एकरातले ऊभे पिक या पाण्याने अक्षरशः वाहून गेले. एका छोट्या शेतकऱ्यासाठी हे प्रचंड नुकसान.

एका पत्रकाराने त्या शेतकऱ्याला या नुकसानीविषयी खोदून खोदून विचारले.

 *"नुकसानीचे काय एवढं? मुले वाचली ना? पेरणी परतं करता येईल. मुलांचे प्राण परतं आणता आले असते का?"* 

हे ऊत्तर ऐकून डोळ्यात पाणीच आले!

*हे जग सुंदर आहे. ते सुंदर करणारे अनामिक देवदूत आजही या जगात आहेत आणि पुढेही राहतील.*

 *फक्त तो तिरस्काराचा, आत्मकेंद्री स्वार्थाच्या काळ्या काचांचा गॉगल डोळ्यावरून काढला पाहिजे!* 

◆ *देवाला एकच प्रार्थना आहे की  मी मरेपर्यंत माझे वाटेत येणाऱ्या दुसऱ्या प्रत्येकाचे जगणे सोपे होईल यासाठी त्याला  माझी काही  मदत होईल एवढी ताकद दे!* 

 * 🙏

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण' योजनेअंतर्गत १.१० लाखाहून अधिक विद्यार्थ्यांची निवड साठ हजाराहून अधिक युवा प्रशिक्षणासाठी रुजू

 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण' योजनेअंतर्गत १.१० लाखाहून अधिक विद्यार्थ्यांची निवड

साठ हजाराहून अधिक युवा प्रशिक्षणासाठी रुजू

- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

 

मुंबई, दि. 2 : शासनाच्या महत्वाकांक्षी 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या घोषणेपासून आजपर्यंत राज्यात एक लाख 10 हजार प्रशिक्षणार्थांना प्रशिक्षणासाठी रुजु होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापैकी ६० हजाराहून अधिक युवा राज्यातील खाजगी तसेच शासकीय संस्थांमधे प्रशिक्षणासाठी रुजू झाले आहेत, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. या योजनेमार्फत १० लाख युवकांना प्रशिक्षणातून रोजगार देण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.

      मंत्री श्री. लोढा म्हणाले की, भविष्यातील रोजगाराची आव्हाने ओळखून आजच कार्य प्रशिक्षण देऊन, रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून युवक-युवतींना रोजगारक्षम बनविणारी, 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना' ही राज्य शासनाने सुरू केली आहे. या योजनेमध्ये सरकारी तसेच खासगी आस्थापनांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. अधिकाधिक युवकांना प्रशिक्षणाबरोबर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. या योजनेंतर्गत सहभागी होण्यासाठी 8 हजार 170 आस्थापनांनी नोंदणी केली आहे. तसेच 2 लाख 21 हजार 244 प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षणासाठी नोंदणी केलेली आहे.

'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आली आहे. या योजनेला फक्त शहरी विभागातच नाही तर ग्रामीण भागातही चांगला प्रतिसाद मिळत आहे. विभागवार या योजनेचा आढावा घेताना छत्रपती संभाजीनगर आणि त्यानंतर अमरावती विभागाने यामध्ये चांगली कामगिरी केली आहे. जिल्हावार विचार करता धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक पाच हजार युवा रुजू झाले आहेत. पहिल्या टप्प्यात जुलै आणि ऑगस्टमध्ये रुजू झालेल्या युवांना डीबीटीद्वारे विद्यावेतन १० सप्टेंबरपर्यंत त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर मिळणार आहे, असे मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.

या योजनेतून महाराष्ट्रातील युवकांना फक्त रोजगारच मिळणार नसून उद्योगांना लागणारे मनुष्यबळ सहज उपलब्ध होऊन महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत होणार आहे. ही योजना वर्षभर सुरु राहणार असून या योजनेमार्फत १० लाख युवकांना प्रशिक्षणातून रोजगार देण्याचे उद्दिष्ट आहे. सर्वसमावेशक अशी ही योजना शासनाने युवकांसाठी आणली असून युवकांनी आणि उद्योगांनी देखील याचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री श्री. लोढा यांनी केले आहे.

oooo

नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित ; २५ जनावरे मृत्यूमुखी,एक जण वाहून गेला पालकमंत्र्यांकडून पूर परिस्थितीचा आढावा

 नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित ;

२५ जनावरे मृत्यूमुखी,एक जण वाहून गेला

पालकमंत्र्यांकडून पूर परिस्थितीचा आढावा

 

नांदेड दि. २ : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. तर शनिवारी 26 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली होती. यामध्ये शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून लागवडीखालील दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.

एक जण वाहून गेला    

      तथापि, नांदेड तालुक्यात दुपारी ४ वाजताच्या दरम्यान पासदगाव पुलावरून पाणी जात होते. प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी वारंवार सांगून सुद्धा एका व्यक्तीने प्रशासनाचे काहीच न ऐकता पुल ओलांडण्याच्या प्रयत्नात तो वाहून गेला आहे. त्याचा शोध सुरु आहे.

२५ जणांची सुटका

उंचाडा येथे गावाजवळ कयाधु नदीच्या परीसरात जवळपास २५ लोक अडकले होते. जिल्‍हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड कडून राज्य आपत्ती प्रतिसाद दल ची तुकडी त्या ठिकाणी पाठवून शोध व बचाव कार्य करुन २५ जणांना पुरातुन सुखरुप बाहेर काढले.

२५ जनावरे मृत्युमूखी

    २५ जनावरे मृत्युमुखी पडली असून काही प्रमाणात घरांचेही नुकसान झाले आहे. उद्या पाऊस थांबल्यास नुकसानीचे पंचनामे सुरू होतील असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

गोदावरी नदीची नांदेड शहरातील धोक्याची पातळी ३५४ मीटर आहे. संध्याकाळी ८ वाजता ही पातळी ३५२.७५ होती. या परिसरात सतर्कतेचा इशारा दिला आहे. बचाव पथक तैनात असून नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या संपर्कात राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नांदेड, अर्धापूर सर्वाधिक पाऊस

आज नांदेड शहर, अर्धापूर, हदगाव, देगलूर, मुखेड, कंधार, लोहा, नायगाव, या तालुक्यांमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. अर्धापूर तालुक्यातील अर्धापूर,दभाद, भरड, मालेगाव या मंडळामध्ये सर्वाधिक पाऊस झाला अर्धापूर मध्ये 170 मिलिमीटर पाऊस बारा तासात झाला आहे. तर नांदेड उत्तर व नांदेड दक्षिण दोन्ही भागात सरासरी 125 मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे शहरात सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. दुपारी नांदेड शहरात अनेक भाग जलमय झाले होते. गोदावरी नदी काठावरील अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले. वसरणी पंचवटीनगर साईबाबा कमान जवळ एका इमारतीमध्‍ये दुस-या मजल्यापर्यंत पाणी गेले होते. या इमारतीमध्ये अडकलेल्या दोन व्यक्तिंना बचाव पथकाने सुखरुप बाहेर काढले.

 पावसाने जिल्ह्यातील २८ कच्च्या घरांचे अंशतः नुकसान झाले असून सखल भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. जिल्ह्यातील अनेक नाल्यांना दुपारी पूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता.

धरणांमध्ये मुबलक साठा

नांदेड जिल्ह्यातील २ सप्टेबर रोजी दुपारी ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्प- ईसापूर धरणामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात आले असले तरी धरणाची दारे मात्र उघडलेली नाही. शंकरराव चव्हाण विष्णूपरी प्रकल्प नांदेडची १४ उघडण्यात आली होती.

अपर मानार लिंबोटी धरणाची पंधरा पैकी ९ दरवाजे उघडलेले आहेत.लोअर मानार बारुळ  धरणाला अॅटोमॅटीक गेट आहेत. त्यामुळे येणारा विसर्ग जशाला तसा पुढे  जातो आहे. बळेगाव हाय लेव्‍हल बॅरेजचे एकूण १४ दरवाजे उघडलेले आहेत. आमदुरा हाय लेव्‍हल बॅरेजचे सर्व १६ दरवाजे उघडलेले आहेत. बाभळी हाय लेव्‍हल बॅरेजचे सर्व १४ दरवाजे उघडलेले आहेत. दिग्रस धरणाचे १४ दरवाजे उघडलेले आहे. जायकवाडी पासून बाभळीपर्यत सर्व गोदावरी वरील बंधाऱ्यांचे दार उघडे आहेत.

पालकमंत्र्यांकडून आढावा

 ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दुपारी जिल्हाधिकारी व अन्य प्रमुख अधिकाऱ्यांशी संपर्क साधून जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेतला शक्य तेवढ्या लवकर नुकसानीचे पंचनामे सुरू करण्याबाबतचे निर्देश त्यांनी दिले.

००००

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहिर

  

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहिर

 

मुंबई, दि. २ : सन २०२३-२४ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी १०९ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. येत्या ५ सप्टेंबर रोजी मुंबईत आयोजित होणाऱ्या कार्यक्रमात या शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी अभिनंदन केले आहे.

समाजाची निःस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येतात. यानुसार राज्य निवड समितीने केलेल्या शिफारशीनुसार शासनाने शालेय शिक्षण व क्रीडा विभाग स्तरावर शिक्षकांची निवड केली आहे.

पुरस्कारासाठी प्रवर्गनिहाय प्राथमिक- ३८, माध्यमिक- ३९, आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे शिक्षक (प्राथमिक)- १९, थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार- ८, विशेष शिक्षक कला/क्रीडा (१+१)- २, दिव्यांग शिक्षक / दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक- १, स्काऊट/गाईड (१+१)-२ अशा एकूण १०९ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे वर्धा जिल्ह्यातील प्राथमिक प्रवर्गातील (१) न्यायालयाच्या आदेशानुसार विचारात घेण्यात आलेला सन (२०२२-२३) चा एक पुरस्कार देखील जाहीर करण्यात आला आहे.

00000

देशाच्या विकासात सहकारी संस्थांचे योगदान अतुलनीय -राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू श्री वारणा महिला सहकारी उद्योग समूह सुवर्ण सोहळा, वारणा विद्यापीठ उद्घाटन

 देशाच्या विकासात सहकारी संस्थांचे योगदान अतुलनीय

 -राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

श्री वारणा महिला सहकारी उद्योग समूह सुवर्ण सोहळा, वारणा विद्यापीठ उद्घाटन

कोल्हापूर, दि.२ : देशाच्या आर्थिक विकासात खाजगी उद्योग आणि व्यापार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, त्याचप्रमाणे देशाच्या विकासात सहकारी संस्थांचे योगदान अतुलनीय असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. वारणानगर येथे आयोजित श्री वारणा महिला सहकारी उद्योग समुह सुवर्ण सोहळा आणि वारणा विद्यापीठ उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, केंद्रीय युवा व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  पालकमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार डॉ.विनय कोरे, वारणा बँकेचे संचालक निपुण कोरे, सावित्री महिला सहकारी संस्थेच्या संचालक शुभलक्ष्मी कोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

दारिद्र्य निर्मूलन, अन्न सुरक्षा आणि नैसर्गिक साधन संपत्तीचे व्यवस्थापन यामध्ये सहकारी संस्थांचे महत्वपूर्ण योगदान असल्याचे सांगून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, काळानुरूप सहकार संस्थांनीही स्वत: ला बदलण्याची गरज असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवस्थापनाला व्यावसायिक बनवले  पाहिजे. सहकारी संस्थांमध्ये त्यांच्या सभासदांचे हित सर्वोच्च असले पाहिजे. कोणतीही सहकारी संस्था कुणाच्या वैयक्तिक स्वार्थाचे आणि फायद्याचे साधन बनू नये, अन्यथा सहकाराचा उद्देशच नष्ट होईल, हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. सहकारात खरे सहकार्य हवे, व्यक्तीहित नको असेही त्यांनी सांगितले. वारणा उद्योगाच्या सर्वांगीण विकासात योगदान दिल्याबद्दल उपस्थित महिलांचे कौतुक केले.

देशात साडेआठ लाखांहून अधिक सहकारी संस्था कार्यरत आहेत. परंतु अनेक सहकारी संस्था भांडवल, संसाधनांचा अभाव, व्यवस्थापन अशा समस्यांना सामोरे जात आहेत. तरुणांना सहकारात सहभागी करून प्रशासन आणि व्यवस्थापनात तंत्रज्ञानाचा समावेश केल्यास तरुण त्या संस्थांना नवसंजीवनी देऊ शकतात. सहकारी संस्थांनीही सेंद्रिय शेती, साठवण क्षमता निर्माण करुन, इको-टुरिझम यांसारख्या नवीन क्षेत्रात पुढे येण्यासाठी प्रयत्न करावेत. सहकारामुळे देशात येत्या काळात अजून समृद्धी येईल. सहकार चळवळ बळकट करण्यासाठी 2021 मध्ये सहकार मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातही सहकार क्षेत्राच्या सुव्यवस्थित आणि सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय सहकार धोरण आणण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. सहकार चळवळ बळकट करण्यासाठी प्राथमिक ते उच्चस्तरीय सहकारी संस्थांपर्यंत अनेक प्रयत्न केले जात आहेत. सहकारी संस्थांना विविध योजनांतर्गत आर्थिक, तांत्रिक व प्रशिक्षण संबंधित सहाय्य दिले जात आहे. सर्व संस्थांनी या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी या कार्यक्रमात केले.

राष्ट्रपतींनी केले उपस्थितांना आवाहन

शिक्षणाचे महत्त्व समजून घ्या आणि तुमच्या मुलांना सर्वोत्तम शिक्षण देण्याचा प्रयत्न करा. चांगले आणि नैतिक शिक्षण जीवनात सकारात्मक बदल घडवून आणेल. नवीन तंत्रज्ञान शिकण्यात आणि स्वीकारण्यात पुढे रहा. हे तुमचे जीवन केवळ सोयीस्कर बनवणार नाही तर तुम्हाला त्याच्या गैरवापराबद्दल जागरूक करतील. आपल्या दैनंदिन जीवनात पर्यावरण संरक्षणाला महत्त्वाचे स्थान द्यावे. कारण पृथ्वी माता आणि तिची मुले वाचवण्यासाठी तुमचे छोटे प्रयत्न महत्त्वाचे ठरतील. तुमच्यापेक्षा दुर्बल लोकांना शक्य तितकी मदत करा आणि त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न करा. देशाच्या विकासात योगदान देण्यासाठी नेहमी तयार राहा. आमचे वैयक्तिक आणि सामूहिक प्रयत्न भारताला जागतिक स्तरावर उच्च स्थान मिळवून देतील, असे आवाहन राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांनी केले.

स्व.तात्यासाहेब कोरे यांना पद्म पुरस्कार मिळावा यासाठी पाठपुरावा करणार

 - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकासामध्ये जोपर्यंत महिलांची भागीदारी वाढत नाही तोपर्यंत आपल्याला विकास करता येणार नाही.  सहकारातून क्रांती घडू शकते. याचे खरं मॉडेल वारणानगरमध्ये येवून लोकांनी पहावं म्हणूनच येथील झालेल्या कामाबद्दल सहकार महर्षी स्व.तात्यासाहेब कोरे यांना पद्म पुरस्कार मिळावा यासाठी शासनाकडून पाठपुरावा करण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते म्हणाले, वारणा समूहामध्ये साखर कारखाना, दुग्ध उत्पादन, शिक्षण मंडळ, वीज निर्माण संस्था, सहकारी बँक, महिलांची बँक, शेती प्रशिक्षण संस्था, सहकारी बँक, महिलांची पतसंस्था, व्यायाम मंडळ, भगिनी मंडळ, सहकारी ग्राहक चळवळ, महिला औद्योगिक सहकार चळवळ, वारणा बाजार इ. विविध क्षेत्रामध्ये झालेली क्रांती थक्क करणारी आहे. आज वारणा समूहात तीन हजार कोटींच्या घरात उलाढाल होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महिला जोपर्यंत अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू होणार नाहीत तो पर्यंत विकसित भारताचेही स्वप्न पूर्ण करता येणार नाही. महिलांना सक्षम करण्यासाठी केंद्र व राज्य शासन पाठिंबा देत असून लखपती योजना, लेक लाडकी योजना, मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना, मोफत शिक्षण, मोफत एसटी प्रवास या योजनेतून त्या अधिक सक्षम होत आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.

वारणा समूहाचे प्रमुख तथा आमदार डॉ.विनय कोरे यांनी प्रास्ताविक करताना भारताचे राष्ट्रपती सार्वजनिक कार्यक्रमात पहिल्यांदाच कोल्हापूर जिल्ह्यात आल्याने त्यांचे आभार मानले. तसेच त्यांनी वारणा विद्यापीठास मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्याबद्दल राज्य शासनाचे आभार मानले. त्यांनी प्रास्ताविकामध्ये वारणा समूहाबद्दल उपस्थितांना माहिती दिली.वारणा समूहातील कार्यरत महिलांनी राष्ट्रपतींना शिवराज्याभिषेक तेलचित्र भेट म्हणून दिले. तर सावित्री महिला सहकारी संस्थेच्या संचालक शुभलक्ष्मी कोरे यांनी राष्ट्रपती महोदयांचे कोल्हापुरी अलंकार व साडी देवून स्वागत केले. राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेसाठी आता सप्टेंबरमध्येही नोंदणी सुरू राहणार

 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेसाठी

 आता सप्टेंबरमध्येही नोंदणी सुरू राहणार

-महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

 

मुंबई, दि. २ : 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' या योजनेसाठी राज्यातील पात्र महिलांना आता  सप्टेंबर २०२४ मध्येही नोंदणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

 

मंत्री कु.तटकरे म्हणाल्या की, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजना  सुरू करण्यात आली आहे.  या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.  यापूर्वी दि. ३१ ऑगस्ट २०२४ पर्यत नोंदणी करण्यास मुदत देण्यात आली होती. आता ही नोंदणी  सप्टेंबर २०२४ मध्येही सुरू राहणारआहे. तरी अधिकाधिक महिलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन  मंत्री  आदिती तटकरे यांनी केले आहे.

Featured post

Lakshvedhi