Thursday, 5 October 2023

राज्यात हेलिपॅड उभारणीसाठी एमएडीसी नोडल एजन्सी,एअर ॲम्ब्युलन्सचा मार्गही सुकर

 राज्यात हेलिपॅड उभारणीसाठी एमएडीसी नोडल एजन्सी,एअर ॲम्ब्युलन्सचा मार्गही सुकर


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एमएडीसीच्या संचालक मंडळाची बैठक


            मुंबई, दि.४ : - राज्यात आवश्यक तेथे हेलिपॅड उभारणीसाठी तसेच हवाई रुग्णवाहिका (एअर ॲम्ब्युलन्स) सुविधा सुरु करण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेडला नोडल एजन्सी म्हणून काम करता येईल, असा निर्णय महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कंपनीचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.


            कंपनीच्या संचालक मंडळाची ८५ वी बैठक मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी झाली. या बैठकीत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शिर्डी, अमरावती तसेच कराड यांच्यासह विविध विमानतळ विकासांच्या कामांचा आढावाही घेतला. राज्यात शक्य असेल, त्या ठिकाणी विमानतळ किंवा धावपट्ट्यांच्या ठिकाणी नाईट लॅण्ड‍िग सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे याठिकाणी अपघात झाल्यास तत्काळ मदत व बचावासाठी हेलिकॉप्टरची सुविधा उपयुक्त ठरते. याशिवाय रुग्णांच्या सेवेसाठी एअर ॲम्ब्युलन्स सेवा आवश्यक ठरते. अशा सुविधा पुरवणाऱ्या कंपन्याशी समन्वय साधण्यात यावा.


            बैठकीत कंपनीच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांनी विषयांची मांडणी केली. बैठकीस वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, विमानचालन संचालनालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, तसेच एमआयडीसी, सिडको आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी प्रसन्न, नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर दृकश्राव्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.


            राज्यात विमानचालन संचालनालयाकडे हेलिपॅड उभारणीचे अधिकार आहेत. हे अधिकार विमानतळ विकास कंपनीस नोडल एजन्सी म्हणून प्रदान करण्यावर एकमत झाले. जेणेकरून यातून तालुकास्तरावरही हेलिपॅड उभारता येणार आहेत. यात शक्य तिथे राज्यातील प्रत्येक पोलीस वसाहतींच्या परिसरात अशा हेलिपॅडची उभारणी करण्यात यावी. जेणेकरून या मैदानांचा पोलिस कवायतींसाठी वापर होईल. त्यांची देखभाल दुरुस्तीही होईल, तसेच आवश्यक त्यावेळी या हेलिपॅडचा वापर करणेही शक्य होईल, अशा सूचना करण्यात आल्या.


            शिर्डी विमानतळाच्या सभोवतालचा परिसर (आशा- एरिया अराऊंड शिर्डी हब एअरपोर्ट) विकसित करण्यासाठीचे अधिकारही कंपनीला देण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय शिर्डी येथे नवीन इंटिग्रेटेड टर्मिनल उभारणीच्या ५२७ कोटी रुपयांच्या प्रस्तावासही मान्यता देण्यात आली. तसेच आता वापरात असलेल्या विमानतळाच्या धावपट्टीच्या नुतनीकरणास आणि त्यासाठीच्या ६२ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. अमरावती येथील बेलोरा विमानतळाच्या विकासासाठी तिथे देशातील सर्वात मोठे, असे हवाई प्रशिक्षण केंद्र सुरू व्हावे असे प्रयत्न आहेत. याठिकाणी टाटा समुहाची एअर-विस्तारा ही कंपनी केंद्र सुरु करणार असल्याचे सांगण्यात आले. यामुळे या परिसरात रोजगार संधीही उपलब्ध होणार आहे.


            राज्यातील एमआयडीसीकडील लातूर, नांदेड, बारामती, धाराशिव आणि यवतमाळ हे पाच विमानतळ हे एका खासगी कंपनीस देण्यात आले होते. त्यापैकी धाराशिव आणि यवतमाळ हे विमानतळ सुरु नाहीत. त्यांच्यासह हे पाचही विमानतळ परत घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. त्यासाठी कायदेशीर सर्व त्या विहीत पद्धतीने कार्यवाही करण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्या.


            बैठकीत विविध प्रकल्पग्रस्तांसाठीच्या वाढीव अनुदान खर्चास मंजुरी देण्यात आली. यात मिहान प्रकल्पाकडून 'सीएसआर'अंतर्गत महिला सबलीकरणासाठी महिलांना शिलाई मशीन आणि मुलींना सायकलचे वाटप करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. 


0000

महिला सक्षमीकरणासाठी ‘उमेद’ च्या माध्यमातून कृतीशील प्रयत्न

 महिला सक्षमीकरणासाठी ‘उमेद’ च्या माध्यमातून कृतीशील प्रयत्न


- प्रधान सचिव एकनाथ डवले


            मुंबई, दि. 4 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील (उमेद) स्वयंसहायता गटाच्या महिलांच्या कृषी व बिगर कृषी उत्पादनांना शाश्वत बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. ‘उमेद’च्या महिलांचा उत्पादित माल मोठ्या कंपन्या आणि खरेदीदार यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ‘बायर - सेलर मीट’ हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम मैलाचा दगड ठरणार असल्याचे प्रतिपादन ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी केले.


             देशभरातील प्रमुख 41 साखळी व्यवसाय कंपन्यांचे प्रतिनिधींसह राज्यभरातून स्वयंसहाय्यता गटाच्या आणि शेतकरी महिला उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये 28 करार या कार्यक्रमात करण्यात आले. नवी मुंबई येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांनी बेसिक्सच्या सहाय्याने राज्यस्तरीय ‘बायर - सेलर मीट’ चे आयोजन केले होते. कार्यक्रमासाठी उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य परिचालन अधिकारी परमेश्वर राऊत, अवर सचिव धनवंत माळी, उपसंचालक शीतल कदम उपस्थित होते.


             प्रधान सचिव श्री. डवले म्हणाले की, “ग्रामविकास विभाग ‘उमेद’ अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वायत्त होण्यासाठी विविध प्रकारे मदत करत आहे. महिलांची उत्पादने दर्जेदार आहेत, गुणवत्तापूर्ण आहेत. आता त्यांना शाश्वत बाजारपेठ मिळवून देणे आवश्यक आहे. साखळी व्यावसायिक आणि मोठमोठ्या कंपन्यांनी पुढे येऊन या महिलांना सक्षम बनण्यासाठी हातभार लावावा.  


            अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जयवंशी यांनी ‘उमेद’च्या उत्पादक महिलांना सातत्याने विक्रीसाठी वेगवेगळे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर खरेदीदार कंपन्यांना उत्तम प्रतीचा आणि शुद्धता असलेला शेतमाल आणि इतर उत्पादने उपलब्ध करून देण्यासाठी समन्वय ठेवण्यासाठी यंत्रणेला जिल्हा आणि राज्यस्तरावरून कार्यरत करण्यात आलेले असल्याचे त्यांनी सांगितले.


            राज्यभरातील 34 जिल्ह्यातून ‘उमेद’ अंतर्गत कार्य करत असलेल्या महिलांच्या प्रतिनिधी उत्पादन किंवा शेतमालाच्या नमुन्यांसह उपस्थित होत्या. त्यात सोयाबीन, मिरची, हळद, तूर, हरभरा, मका, बाजरी, नाचणी, ज्वारी यासारखे दर्जेदार धान्य आणि कडधान्य तसेच मसाले, गूळ, मध, फळे, वनौषधी, तेलबिया इत्यादी उत्पादने नमुना स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आले होते. खरेदीदार म्हणून 30 पेक्षा जास्त संस्था आणि कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सेंद्रिय आणि शुद्धता असलेले उत्पादने महिलांनी उपलब्ध करून दिल्यामुळे खरेदीदार संस्था आणि कंपन्यांच्या प्रतिनिधी यांनी करार करण्यासाठी उत्साह दाखवला. या कार्यक्रमात खरेदीदार यांनी दाखविलेल्या रुचीमुळे भविष्यात महिलांना शाश्वत बाजारपेठ मिळण्यास मदत होणार आहे.


00


 


घटस्थापना नवरात्र नऊ रंगाची पाऊले 👌👌👌


 घटस्थापना नवरात्र नऊ रंगाची पाऊले 👌👌👌

मानवी तस्करी रोखण्यासाठी ‘यंग इंडिया अनचेन्ड’ चा

 मानवी तस्करी रोखण्यासाठी ‘यंग इंडिया अनचेन्ड’ चा


महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते गुरुवारी शुभारंभ


            मुंबई दि. 4 : मानवी तस्करी रोखण्यासाठी महाविद्यालयीन मुलांना गुन्हेगारी विश्वाबाबत जागरुक करत महाविद्यालयस्तरावर तस्करीविरोधी क्लबची स्थापना करण्याचा ‘यंग इंडिया अनचेन्ड’ उपक्रम राज्य महिला आयोग आणि अलायन्स अगेन्स्ट सेंटर ऑफ ट्राफिकिंग (अॅक्ट) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते याचा शुभारंभ होणार आहे. दि. ५ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे होणार्या या कार्यक्रमास महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, आयोगाच्या सदस्य, महिला व बाल विकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव, आयोगाच्या सदस्य सचिव श्रद्धा जोशी यांचेसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


            राज्यातील महाविद्यालयीन तरुणांना समाज प्रबोधनात सहभागी करुन घेत महिलांविषयक गुन्हेगारीला, तस्करीला आळा घालण्याचा प्रयत्न राज्य महिला आयोग ‘यंग इंडिया अनच्नेड’ या उपक्रमाद्वारे करत आहे.


            या उपक्रमाद्वारे महाविद्यालयात मानवी तस्करी विरोधी क्लबची स्थापना करण्यात येणार आहे. विद्यार्थ्याना महिलांच्या बाबतीत घडणाऱ्या गुन्ह्यांबाबत जागरुक करत त्यांचा समाज प्रबोधनात सहभाग वाढवणे, महिला व बालकांविरोधात होणाऱ्या विविध प्रकारच्या गुन्ह्यांबाबत अवगत करणे, महाविद्यालयीन कॅम्पस तरुणींसाठी सुरक्षित असेल या दृष्टीने प्रयत्न करणे, गुन्हा घडल्यास तरुणांनी त्याबाबत आवाज उठवावा, तरुणांच्या धोरण निश्चितीमध्ये मुलांचा सहभाग वाढवणे, विविध समाज घटकांशी तरुणांचा संवाद घडवून आणणे अशी विविध उदिष्ट या उपक्रमाद्वारे पुर्ण करण्यावर भर राहणार आहे.


            अलायन्स अगेन्स्ट सेंटर्स ऑफ ट्राफिकिंग (अॅक्ट) या अंतर्गत प्रकृती ट्रस्ट, युवा रुरल असोसिएशन, प्रथम, विप्ला फाउंडेशन अशा विविध संस्था मानवी तस्करी रोखण्यासाठी एकत्रित काम करत आहेत. ॲक्ट आणि राज्य महिला आयोगाच्या वतीने होणाऱ्या ‘यंग इंडिया अनचेन्ड’ शुभारंभ प्रसंगी महिला व बाल विकास मंत्री, आयोगाच्या अध्यक्षा यांच्यासह एनडीआरएफचे माजी महासंचालक डॉ. पी. एम. नायर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.


०००

छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा लंडनमध्ये उभारणार

 छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा लंडनमध्ये उभारणार


- मंत्री सुधीर मुनगंटीवार

            लंडन, दि. 4 : छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा लंडनच्या भूमीत उभारण्यासाठी आपण व्यक्तिशः आणि महाराष्ट्र सरकार पूर्ण सहकार्य करेल, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.


            ब्रिटनच्या व्हिक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट संग्रहालयाशी यशस्वी करार केल्यानंतर मंत्री श्री. मुनगंटीवार यांचा लंडनच्या स्थानिक मराठी बांधवांनी सत्कार केला. या सोहळ्यात ते बोलत होते.


            मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, मला जेव्हा सूचना केली की लंडन येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा एक सुंदर पुतळा उभा करावा, तेव्हा मला आनंद झाला; मी लगेच संमती दिली. यासाठी महाराष्ट्र सरकार पूर्ण शक्तीने तुमच्या पाठिशी उभे राहील. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जगात सर्वत्र पोहचविण्याचा संकल्प शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या ३५० व्या वर्षपूर्तीनिमित्त महाराष्ट्र शासनाने केला आहॆ. यासाठी सर्वांचा सहभाग अपेक्षित आहे, असेही ते म्हणाले.


            सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षी काम करण्याची संधी मिळाली. राज्यात ठिकठिकाणी जाणता राजा महानाट्याचे प्रयोग, असे विविध उपक्रम राबविण्याची संधी मिळाली, असे ते म्हणाले.


            दरम्यान, सामंजस्य करार झाल्यानंतर अतिशय देखणा सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आला; स्फूर्ती गीत, पोवाडा, पारंपरिक नृत्य, छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रसंग अशा विविध छटांचा हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.


000

सकारात्मक विचारांचे सामर्थ्य*

 *सकारात्मक विचारांचे सामर्थ्य*

*मनासारखा नवरा नाही मिळाला. करायचा म्हणून संसार करते, जगण्यात काही मजाच नाही सर, खूप नैराश्य येते, रोजचीच भांडणं, हेवे-दावे-तूतू मैं-मैं जीवन नकोसे वाटतंय, झोप येत नाही, जेवण जात नाही अस उदास व रडक्या आवाजत रडगाणं गाणार्‍या महिलेला पाहून वाटलं. त्या स्त्रीला कसा का होईना – नवरा बरोबर आहे. ज्यांच्या आयुष्यात पतीच नाही त्या बाईने काय करायचे? त्याच वेळी एक गाणं आठवलं.*


*‘‘चाँद मिलता नही – सबाके संसार मे ।है दिया ही बहोत रोशनी के लिए.’’*


*खरोखरच मित्रांनो आपलं संपूर्ण आयुष्य हे आपण कसा विचार करतो यावर अवलंबून आहे. मनात दररोज (24 तासांत) 60 हजार विचार येतात. यातील 60 ते 70% विचार हे नकारात्मक असतात. दर 15 ते 20 सेकंदाला नवीन विचार हे चक्र अव्हयातपणे चालू असतं.*


*ज्यावेळेस आपण नकारात्मक विचार करतो त्यावेळेस विश्‍वात जेवढी नकारात्मक तरंग आहेत त्याच्याशी आपण जोडले जाऊन नकारात्मक विचारांची गर्दी आपल्या भोवती उरते व उदासी – भय – यातून नैराश्याकडे वाटचाल सुरू होते. रेडिओ किंवा वाहिन्या ज्या ब्रँडवर आपण लावतो तेच प्रक्षेपण लगेच चालू होते. म्हणून नकारात्मक विचारांना – सकारात्मक करणे गरजेचे असते.*


*सकारात्मक विचार आपली शक्ती, आत्मविश्‍वास, मनोबल वाढवतात. नकारात्मक विचारांना – सकारात्मक करणे म्हणजे मनाचेच – मनाशी युध्द करणे होय. यालाच तुकाराम महाराज म्हणतात. ‘‘रात्रं दिनं आम्हां युदधाचा प्रसंग’’!*


*थॉमस् अल्वा एडिसनने 999 प्रयोग केले – हजाराव्या प्रयोगाच्या वेळेला विजेचा दिवा लागला. थॉमसला ज्यावेळेस पत्रकारांनी मुलाखतीत विचारलं. – थॉमस 999 प्रमाणे फसले याबाबत तुला काय वाटले ?*


*थॉमस म्हणाला – 999 प्रयोग फसले असे म्हणू नका. 999 वेळा मी हे सिध्द केलं, या मार्गाने विजेचा दिवा लागू शकत नाही.*


*नेपोलियन समुद्र किनार्‍यावर सैन्यासमोर जहाजातून उतरताना पाय चिखलावर घसरून छातीवर आडवा पडला, छाती चिखलाने माखली. तेव्हा अंधश्रध्दाळू सैनिकांना वाटलं. आपला सेनापती आडवा झाला म्हणजे आज आपला पराभव होणार, आपली मुंडकी उडणार – सैनिक भयभत झाले. नेपोलियनने ही बाब हेरली. तो उठताना छातीत झटकत म्हणाला, ‘मित्रांनो आजचे युध्द आपणच जिंकणार, जिथे जिथे आपण जाऊ तेथे – तेथे आपला विजय होणार’ कारण आल्या आल्या या भूमीने मला अलिंगन दिले आहे – मी तुझी आहे, मी तुझी आहे….*

*मित्रांनो सैनिकांचे मनोबल वाढले व सगळीकडे मोठी विजयश्री त्यांनी खेचून आणली. हे घडलं सकारात्मक दृष्टीकोनामुळे.*

   ,🙏 *धन्यवाद* 🙏,

Wednesday, 4 October 2023

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला मुंबई विद्यापीठाच्या कामकाजाचा आढावा

 उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला

मुंबई विद्यापीठाच्या कामकाजाचा आढावा


      

             मुंबई, दि. ३ : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबई विद्यापीठाच्या विविध अडचणी आणि कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र कुलगुरू अजय भामरे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.


            मंत्री श्री. पाटील म्हणाले की, मुंबई विद्यापीठाची विद्यार्थी संख्या जास्त आहे. परीक्षेचे नियोजन, निकाल वेळेत जाहीर करणे. याबाबत कालबद्ध पद्धतीने नियोजन करावे. यासाठी खासगी कंपन्यांची मदत लागली, तर त्या बाबतही आराखडा तयार करावा आणि वेळेत परीक्षेचे निकाल जाहीर करावेत. तसेच प्राध्यापक भरती प्रक्रियेला गती देऊन तातडीने याबाबत जाहिरात प्रसिद्ध करावी. बैठकीत शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या अडचणी, विद्यार्थी डेटा, डॅशबोर्ड, नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.


0000

Featured post

Lakshvedhi