Tuesday, 12 September 2023

तणावमुक्त जीवनासाठी विश्वशांती आवश्यक

 तणावमुक्त जीवनासाठी विश्वशांती आवश्यक


- राज्यपाल


            पुणे दि. १२ : जगात आज युद्ध, विविध समूहांत तणावाची स्थिती आढळत असून अशा परिस्थितीत माणसाला तणावमुक्त आणि आनंदी जीवन जगता यावे, यासाठी जागतिक शांतता गरजेची आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.


            साधु वासवानी मिशन, पुणे द्वारा दादा जे. पी. वासवानी यांच्या स्मरणार्थ काढण्यात आलेल्या टपाल तिकिटाचे प्रकाशन राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय दळण-वळण राज्य मंत्री देवूसिंह चौहान, आमदार सुनील कांबळे, इंदूरचे आमदार शंकर लालवाणी, महाराष्ट्र आणि गोवा क्षेत्राचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल किसनकुमार शर्मा, साधू वासवानी मिशनच्या अध्यक्षा श्रीमती आर. ए. वासवानी, कार्यकारी प्रमुख कृष्णाकुमारी, डॉ. वसंत आहुजा, पुणे क्षेत्राचे पोस्ट मास्टर जनरल रामचंद्र जायभाय, डाक सेवा संचालक सिमरन कौर आदी उपस्थित होते.


            राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, व्यक्तीची आंतरिक शांती, राष्ट्रांमधील शांततापूर्ण संबंध आणि निसर्गासोबत शांततापूर्ण सहअस्तित्व या तीन पैलूंवर जागतिक शांतता आधारित आहे. आज वैयक्तिक, सामाजिक आणि आंतरराष्ट्रीयस्तरावर तणावाची स्थिती असताना आपल्याला अंतर्गत, बाह्य तसेच निसर्गासोबत शांतता गरजेची आहे. गौरवशाली इतिहास असणारा आपला भारत देश शांततापूर्ण सहअस्तित्वाचे मार्गदर्शन करू शकतो.


            महाराष्ट्र ही संत आणि महापुरुषांची भूमी आहे. दादा जशन वासवानी यांच्यातही संत आणि समाज सुधारकांचा समन्वय पहायला मिळतो. ते विचारवंत, लेखक आणि तत्वचिंतक होते. त्यांचे जीवन बंधूभाव, शांती, सद्भावना, करुणा आणि शांतीपूर्ण सहअस्तित्व या मूल्यांवर आधारित होते. नैतिक मूल्य निकोप समाजासाठी आवश्यक आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात या पैलूंवर भर देण्यात आला आहे, असे राज्यपाल म्हणाले.


            साधू वासवानी यांच्या प्रमाणेच त्यांचे विद्वान शिष्य आणि उत्कृष्ट वक्ता असलेल्या दादा वासवानी यांनी आपल्या प्रवचन आणि लेखांद्वारे देश - विदेशातील लाखो लोकांना आदर्श जीवन जगण्यासाठी प्रेरित केले. ते महाराष्ट्रातील शांती आणि सद्भावनेचे दूत होते. साधू वासवानी मिशनच्या माध्यमातून दादा जे. पी. वासवानी यांनी शैक्षणिक संस्था, रुग्णालय आणि अन्य सेवाकार्य उभे केले. जात, धर्म, पंथाचा विचार न करता समाजातील सर्व घटकांची सेवा मिशनच्या माध्यमातून होत आहे, अशा शब्दात त्यांनी मिशन आणि दादा वासवानी यांच्या कार्याचा गौरव केला.


            केंद्रीय राज्यमंत्री श्री. चौहान म्हणाले की, भारताला संताची परंपरा असल्याचा आपल्याला अभिमान आहे. संत दादा वासवानी सहज आणि सरळ व्यक्त‍िमत्व होते. त्यांचे कार्य नेहमीच समाजाला प्रेरणादायी ठरेल, असे होते. त्यांच्या आध्यात्मिक ज्ञानाचे पालन करणे आणि ते आचरणात आणणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे, असेही ते म्हणाले. 


            यावेळी श्रीमती वासवानी यांनी साधू वासवानी मिशनच्या कार्याची माहिती दिली. दादा वासवानी यांचा एकात्मता, बंधूभाव, शांतता आणि अध्यात्माचा संदेश आचरणात आणणे हेच त्यांचे खऱ्या अर्थाने स्मरण आहे, असे त्या म्हणाल्या.


            यावेळी 'नर्क से स्वर्ग तक' या हिंदी आणि 'स्वतः सक्षम बना' या मराठीतील पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते करण्यात आले.


0000

महाराष्ट्राने मतदार जागृतीबाबतदेशापुढे आदर्श मॉडेल निर्माण करावे

 महाराष्ट्राने मतदार जागृतीबाबतदेशापुढे आदर्श मॉडेल निर्माण करावे


- राज्यपाल रमेश बैस


            मुंबई, दि. 11 : मतदानाकडे लोकशाहीतील उत्सव म्हणून पहिले पाहिजे. 'अगोदर मतदान, नंतर बाकीचे काम' हे तत्व लोकशाहीत सर्वांनी पाळले पाहिजे. महाराष्ट्रात मतदानाबाबत जनजागृतीचे कार्य चांगले होत आहे. बहुमाध्यमांच्या मदतीने प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून राज्याने मतदार जनजागृतीबाबत देशापुढे आदर्श मॉडेल निर्माण करावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केले.


            किशोरवयीन मुले व युवकांमध्ये मतदार जनजागृती करुन लोकशाही प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या 'मी द सुपर हिरो भारताचा नागरिक' या कॉमिक पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते सोमवारी (दि. ११) राजभवन येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. 


            गरीब लोक मतदानाला आवर्जून जातात. गरिबांपेक्षा श्रीमंतांमध्ये मतदार जागृतीची अधिक गरज आहे.


            इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशातील मतदार अधिक सुज्ञ असून गावपातळीवर एकाच वेळी तीन निवडणूक असल्या आणि उमेदवारांना निवडणूक चिन्ह नसले, तरी देखील लोक पाहिजे त्याच उमेदवाराला मतदान करतात, असे राज्यपालांनी सांगितले.


            आपल्या देशात संविधान स्वीकारल्याच्या पहिल्या दिवसापासून महिलांना देखील मतदानाचा समान हक्क देण्यात आला. आज देश जगातील सर्वात युवा देश झाला असून लोकशाहीचे भवितव्य युवकांच्या हाती आहे. त्यामुळे युवकांनी लोकशाही, शासन व प्रशासनाच्या कामकाजात रुची घेणे आवश्यक आहे. मतदार यादीत नाव जोडणे व काढण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करावी, अशीही सूचना राज्यपालांनी केली.


            'आगम' संस्थेच्या कामाचे कौतुक करुन मतदार जागृतीची पुस्तके व साहित्य स्थानिक भाषेत असावे, असे राज्यपालांनी सांगितले.


            यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी निवडणूक आयोगाच्या मतदार जागृती कार्यक्रमाची माहिती दिली. विमुक्त व भटक्या जमाती, दिव्यांग, तृतीयपंथी, बेघर अशा सर्व समाज घटकांपर्यंत पोहोचण्याचा मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. महाविद्यालयांमध्ये 'मतदार साक्षरता क्लब' सुरु केले असल्याची माहिती त्यांनी दिली.   


            पुस्तक प्रकाशन सोहळ्याला सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, 'आगम' संस्थेच्या संस्थापक व पुस्तकाच्या लेखिका भारती दासगुप्ता, अनुराधा सेनगुप्ता तसेच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय व 'आगम' संस्थेशी निगडित निमंत्रित उपस्थित होते.


००००


Maharashtra Governor releases comic book on Youth Voter Awareness


 


      Maharashtra Governor Ramesh Bais released the Comic book 'Me The Superhero Indian Citizen' prepared to create awareness among the youth voters about election process and democracy at Raj Bhavan Mumbai on Mon (11 Sept).


      The book has been prepared by an organisation 'Aagam' at the instance of the Chief Electoral Officer, Maharashtra.


      Chief Electoral Officer, Maharashtra Shrikant Deshpande, Joint Chief Electoral Officer Manohar Parkar, Founder of 'Aagam' and author of the book Bharati Dasgupta, Anuradha Sengupta and officials of Chief Electoral Officer, Maharashtra and 'Aagam' were present.


0000

लोकायुक्तांकडून राज्यपालांना वार्षिक अहवाल सादर

 लोकायुक्तांकडून राज्यपालांना वार्षिक अहवाल सादर

 

            मुंबई, दि. 11 : राज्याचे लोकायुक्त न्या. विद्यासागर कानडे (निवृत्त) यांनी राज्यपाल रमेश बैस यांची आज राजभवन येथे भेट घेऊन त्यांना लोकायुक्त व उपलोकायुक्त यांच्या कामकाजासंबंधीचा ४९ वा वार्षिक एकत्रित अहवाल सादर केला.   

            सन २०२१ या अहवालाधीन वर्षात लोकायुक्त कार्यालयात एकूण ६,६१७ प्रकरणे कार्यवाहीकरिता उपलब्ध होती. यापैकी ३,२०२ प्रकरणे अहवालाधीन वर्षात निकाली काढण्यात आली आणि सन २०२१ च्या वर्ष अखेरीस ३,४१५ प्रकरणे प्रलंबित राहिलीअशी माहिती लोकायुक्त कार्यालयाने दिली.    

            महाराष्ट्रातील लोक आयुक्त संस्था गेल्या पाच दशकांमध्ये अनेक तक्रारदारांची गाऱ्हाणी दूर करण्यात यशस्वी ठरली आहे. चौकशीसाठी हाती घेण्यात आलेल्या तक्रारींपैकी जवळ-जवळ ७५ टक्क्यांपेक्षा जास्त तक्रारींमधील गाऱ्हाण्यांचे समाधानकारक निवारण झालेअसल्याचे लोकायुक्त कार्यालयाने नमूद केले आहे.

**

Maharashtra Lokyukta Justice Kanade presents report to the Governor

 

      The Lokayukta of Maharashtra Justice V. M. Kanade (retd.) met Maharashtra Governor Ramesh Bais and presented to him the report of the performance of Lokayukta and Upa Lokayukta for the year 2021 at Raj Bhavan Mumbai on Mon (11 Sept).

      According to the information provided by the Lokayukta office, in all 6,617 cases were available to Lokayukta for disposal during the year 2021. Out of this 3,202 cases were disposed of, leaving behind a balance of 3,415 cases at the end of the year 2021.

      The office has further stated that the institution of Lokayukta has succeeded in redressing the grievances of many complianants during the last decades. It has mentioned that out of the total complaints taken up for enquiry, grievances in more than 75 complaints, have been redressed to the satisfaction of the complainants. 

००००


मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याचीसर्वपक्षीय बैठकीत एकमुखी विनंती आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घेणे सुरू

 मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याचीसर्वपक्षीय बैठकीत एकमुखी विनंती

आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घेणे सुरू


– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            मुंबई, दि. 11 : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात राज्यातील सर्व पक्ष एक आहेत आणि त्यादृष्टीने ठोस पाऊले टाकण्यात येत आहेत. त्यामुळे आपले उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती आज सर्व पक्षांच्या प्रतिनिधींनी मनोज जरांगे पाटील यांना केली आहे. सह्याद्री अतिथिगृह येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मराठा समाजास आरक्षणासंदर्भातील सर्वपक्षीय बैठकीत हा निर्णय झाला. यावेळी या आंदोलनादरम्यान नागरिकांवर झालेले गुन्हे तत्काळ मागे घेण्याची कार्यवाही सुरु झाली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.       


            सर्व पक्षीय बैठकीत सर्वांचे आभार मानून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी सरकार अतिशय गांभीर्याने प्रयत्न करत असून काही तरी थातूरमातूर न करता न्यायालयात टिकणारे आरक्षण कसे देता येईल हे पाहिले जाईल. हे करतांना इतर समाजावरही अन्याय होऊ देणार नाही, त्यामुळे इतर समाजाने सुद्धा आंदोलनाचा मार्ग अवलंबवू नये, अशी विनंतीही या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी केली.


            बैठकीत उपस्थित नेत्यांनी देखील यावेळी राज्य शासन करीत असलेल्या प्रयत्नांना सहमती दर्शविली व आपल्या सूचना मांडल्या.


संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई


            उपोषणाच्या वेळी परिस्थिती योग्य पध्दतीने न हाताळल्याबद्दल संबधित उपविभागीय अधिकारी आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्यावर कार्यवाही करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.


समितीत जरांगे पाटील यांचा प्रतिनिधी


            न्यायमूर्ती श्री. शिंदे समितीमध्ये मनोज जरांगे पाटील किंवा त्यांच्या प्रतिनिधीची नियुक्ती करण्यात येईल, असेही यावेळी ठरले. सर्व पक्षाच्या नेत्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य शासन करीत असलेल्या प्रयत्नांना पाठिंबा दिला, त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले.


            मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील, छगन भुजबळ, गिरीश महाजन, दादाजी भुसे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, विविध पक्षांचे निमंत्रित सर्वश्री छत्रपती संभाजीराजे भोसले, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अनिल परब, राजेश टोपे, चंद्रशेखर बावनकुळे, राजू पाटील, विनोद निकोले, सदाभाऊ खोत, राजेंद्र गवई, सुनील तटकरे, गौतम सोनवणे, मुख्य सचिव मनोज सौनिक, तसेच विविध विभागांचे सचिव, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आदी उपस्थित होते.


            यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांनी मांडलेले प्रश्न कायद्याच्या चौकटीत राहून सोडवावेत, असे सांगून राज्य शासनाने यासाठी पाऊले टाकली आहेत, असे सांगितले.


            प्रारंभी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी प्रास्ताविक करून मराठा आरक्षणविषयक आजपर्यंत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.


००००

Monday, 11 September 2023

कर्मचारी व कामगार संघटना यांच्यात सुसंवाद वाढवा - विश्वास पाठक



 कर्मचारी व कामगार संघटना यांच्यात सुसंवाद वाढवा


- विश्वास पाठक


वीज कंपन्यांतील मानव संसाधन व कामगार विभागाच्या

अधिकाऱ्यांची सक्षमीकरण परिषद (मल्हार-२०२३)

            मुंबई, दि. ११ : अन्न, वस्त्र व निवारा या माणसाच्या मूलभूत गरजांप्रमाणेच वीज ही मानवाची अत्यावश्यक मुलभूत गरज बनली आहे. या महत्त्वाच्या सेवा क्षेत्रात काम करताना वीज कंपन्यांतील मानव संसाधन व कामगार विभागाने सातत्याने कर्मचारी व कामगार संघटना यांच्यात सुसंवाद वाढविला पाहिजे, असे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी सांगितले.


            महापारेषणच्या वतीने महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या तीनही वीज कंपन्यांतील मानव संसाधन व कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांची दोन दिवसीय सक्षमीकरण परिषद (मल्हार-२०२३) रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, भाईंदर येथे आयोजित केली आहे. त्या परिषदेत श्री. पाठक बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महापारेषणचे संचालक (मानव संसाधन) सुगत गमरे, महावितरणचे संचालक (मानव संसाधन) अरविंद भादीकर, महानिर्मितीचे कार्यकारी संचालक (मानव संसाधन) धनंजय सावळकर, महापारेषणचे मुख्य व्यवस्थापक सुधीर वानखेडे, महावितरणचे मुख्य महाव्यवस्थापक (मा.सं.) भूषण कुलकर्णी उपस्थित होते.


            श्री. पाठक म्हणाले की, भारताचा वेगाने विकास होत आहे. वीज क्षेत्रातही आमुलाग्र बदल होत आहेत. महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या तीनही कंपन्या महत्त्वाच्या आहेत. यामध्ये मानव संसाधन विभागाची भूमिका खूप मोठी व व्यापक आहे. त्यासाठी त्यांनी वेगळा विचार केला पाहिजे. खासगी वीज कंपन्यांशी स्पर्धा करताना आपण अधिकारी, कर्मचारी व कामगार संघटनेमध्ये सुसंवाद ठेऊन पारदर्शी कारभार ठेवला पाहिजे.


            परिषदेच्या सुरूवातीला महापारेषणचे संचालक श्री. गमरे यांनी प्रास्ताविकातून परिषदेमागची भूमिका विषद केली. तीनही कंपन्यांमध्ये मानव संसाधन व कामगार अधिकाऱ्यांशी समन्वय रहावा, यासाठी ही परिषद आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले.


            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार व्यवस्थापक महेश आंबेकर यांनी मानले.

बळीराजावरचे संकट दूर कर, राज्यभर समाधानकारक पाऊस पडू दे

 बळीराजावरचे संकट दूर कर, राज्यभर समाधानकारक पाऊस पडू दे


- मुख्यमंत्री यांची भीमाशंकराकडे प्रार्थना


            पुणे दि. 11 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. “बळीराजावरचे संकट दूर कर, राज्यभर समाधानकारक पाऊस पडू दे. राज्यावरचे संकट दूर होऊन राज्य सुजलाम - सुफलाम होऊ दे; राज्यातील सर्व घटकांना सुख, समाधान आणि आनंद मिळू दे”, अशी प्रार्थना भगवान भीमाशंकराकडे केल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.


            पूजेनंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा भीमाशंकर देवस्थान ट्रस्टच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, देवस्थानचे अध्यक्ष ॲड. सुरेश कौदरे आदी उपस्थित होते.


        भाविकांच्या दर्शनात कोणताही खंड न पडता मुख्यमंत्री महोदयांची पूजा संपन्न झाली. मुख्यमंत्री महोदयांकडून पूजा सुरू असताना भाविकांचे दर्शनही अखंडपणे सुरू होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, “भाविक श्रद्धेने आणि भक्तीभावाने येथे दर्शनाला येत असतात. मी दरवर्षाप्रमाणे यावर्षीही श्रावणी सोमवारी दर्शनासाठी आलो आहे. येथे लाखो भक्त येत असल्याने शासनाने १४८ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे. आतापर्यंत त्यातील ६८ कोटी रुपये विविध सुविधांवर खर्च करण्यात आला आहे. येथे येणाऱ्या भाविकांची कुठलीही गैरसोय होणार नाही, अशा सर्व मूलभूत सुविधा शासनाच्या माध्यमातून दिल्या जातील. परिसरात स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि स्नानगृहाची व्यवस्था करण्याचे तसेच परिसरातील आदिवासी पाड्यात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत”, असेही ते म्हणाले.


------

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळविणे आणखी झाले सोपे; सीएमएमआरएफ अॅप्लिकेशनवर अर्ज भरून मदत मिळविता येणार

 मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळविणे आणखी झाले सोपे;

सीएमएमआरएफ अॅप्लिकेशनवर अर्ज भरून मदत मिळविता येणार


14 महिन्यात 13 हजाराहून अधिक रुग्णांना 112 कोटी 12 लाखांची मदत वितरित

            मुंबई, दि.10 : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत अवघ्या 14 महिन्यात 13 हजाराहून अधिक गोरगरीब -गरजू रुग्णांना एकूण 112 कोटी 12 लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित केली आहे. आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळविणे आणखी सोपे झाले असून यासाठी मंत्रालयात येण्याची आवश्यकता भासणार नाही. सीएमएमआरएफ या अँप्लिकेशनवर अर्ज भरुन मदत मिळविता येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली आहे.


            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मागील वर्षी पहिल्याच जुलै महिन्यात १७८ रुग्णांना ७६ लाखांची मदत देण्यात आली. नंतर ऑगस्ट महिन्यात २४४ रुग्णांना १ कोटी १ लाख, सप्टेंबर महिन्यात ३१९ रुग्णांना १ कोटी ८६ लाख, ऑक्टोबर महिन्यात २७६ रुग्णांना २ कोटी ३५ लाख, नोव्हेंबर महिन्यात ५२७ रुग्णांना ४ कोटी ५० लाख, डिसेंबर महिन्यात १०३१ रुग्णांना ८ कोटी ५२ लाख, जानेवारी २०२३ मध्ये १०३२ रुग्णांना ८ कोटी ९० लाख तर फेब्रुवारी २०२३ मध्ये १२७४ रुग्णांना १० कोटी ५९ लाख, मार्च २०२३ मध्ये १४६९ रुग्णांना ११ कोटी ९३ लाख, एप्रिल मध्ये ११९० रुग्णांना ९ कोटी ९१ लाख, मे मध्ये १३२९ रुग्णांना ११ कोटी २५ लाख, तर जून मध्ये १७२८ रुग्णांना १४ कोटी ६२ लाख, जुलै १४८८ रुग्णांना १२ कोटी ७२ लाख, तर ऑगस्ट मध्ये विक्रमी १५६७ रुग्णांना १३ कोटी १४ लाख, रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.


            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशीलतेमुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये अनेक-विविध आजारांचा समावेश देखील करण्यात आला आहे. यामध्ये अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, कर्करोगावरील शस्त्रक्रिया, केमोथेरपी, डायलिसिस, जन्मतः मूकबधिर लहान मुलांच्यासाठी अत्यावश्यक असणारी कॉकलीयर इनप्लांट शस्त्रक्रिया, सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, विद्युत अपघात, भाजलेले रुग्ण, जन्मतः लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया आदींचा समावेश आहे.


            मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांचे प्राण वाचविण्यात यश मिळविले आहे. यामुळे अनेक रुग्णांना अक्षरशः जीवनदान मिळाले आहे. गोरगरीब गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून अर्थसहाय्य केले जाते. या निधीचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी केले आहे

.


00000


 


 


Featured post

Lakshvedhi