Tuesday, 5 September 2023

शिक्षण, कृषी क्षेत्रांतील विकासासाठीऑस्ट्रेलियाचे सहकार्य घेणार

 शिक्षण, कृषी क्षेत्रांतील विकासासाठीऑस्ट्रेलियाचे सहकार्य घेणार


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


 


          मुंबई, दि. ४ :- उच्च शिक्षण आणि कृषी क्षेत्रांतील विकासासाठी ऑस्ट्रेलियाचे सहकार्य घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


          भारतातील ऑस्ट्रेलियाचे राजदूत फिलीप ग्रीन यांनी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी शिक्षण, कृषी आणि पर्यटन या विषयांवर चर्चा करताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या मुंबईतील उच्चायुक्त मॅजेल हिंद तसेच उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ श्रीकर परदेशी उपस्थित होते.


          उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, मुंबई, पुणे, नागपूर येथे विद्यार्थी मोठ्या संख्येने उच्च शिक्षणासाठी येत असतात. पुणे शैक्षणिक केंद्र असून, व्यावसायिक व तंत्रज्ञान शिक्षणक्रमांबरोबरच उच्च कौशल्याधिष्ठित शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही अधिक आहे. ऑस्ट्रेलियातील तज्ज्ञांद्वारे तयार करण्यात आलेल्या कौशल्य विकास अभ्यासक्रमाच्या साहाय्याने राज्यातील विद्यापीठात नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी करार करण्यासंदर्भात विचार करण्यात येईल.


          विविध क्षेत्रांतील उत्पादन, कृषी आणि सेवा या क्षेत्रांत मनुष्य बळाची मागणी जास्त आहे. तसेच, कृषी क्षेत्रात सौर ऊर्जा आणि त्यासंदर्भातील उत्पादनांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. ऑस्ट्रेलियातील अक्षय ऊर्जा निर्मिती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा कृषी उद्योगात सहभाग करून अर्थव्यवस्था वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.


          भारतातील विविधता, पर्यटन, व्यावसायिक आणि कौशल्य विकास संदर्भात चर्चा करून, शिक्षण, कृषी, उत्पादन क्षेत्रांत ऑस्ट्रेलियाचा सहभाग वाढवून, ‘मेक इन इंडिया’मध्ये योगदान द्यायला ऑस्ट्रेलियाला आवडेल, असे श्री. ग्रीन यांनी सांगितले.


-----०००----


श्रद्धा मेश्राम/ससं/

अमृत कलश' यात्रेतून घरा-घरांत राष्ट्रभक्तीची भावना होईल जागृत

 अमृत कलश' यात्रेतून घरा-घरांत राष्ट्रभक्तीची भावना होईल जागृत


– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


राज्यातून ३८७ अमृत कलश दिल्लीतील अमृत वाटीकेत पाठवणार


            मुंबई दि. ४ :- 'माझी माती माझा देश' अभियान अंतर्गत 'अमृत कलश' यात्रा कर्तव्य भावनेतून यशस्वी करावी. या यात्रेतून राज्यातील प्रत्येक कुटुंबात,घरा-घरांत राष्ट्रभक्तीची भावना जागृत होईल, असे नियोजन करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.


            भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या समारोपासाठी आयोजित नवी दिल्लीतील कार्यक्रमासाठी ग्रामीण भागातून ३५१ आणि नागरी क्षेत्रातून प्रत्येक जिल्ह्याचे ३६ असे राज्यातून एकूण ३८७ कलश पाठवण्यात येणार आहेत.


            या कलशासाठी माती किंवा तांदूळ संकलनाची मोहीम ३० सप्टेंबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. या अमृत कलश यात्रेबाबत बैठकीत माहिती देण्यात आली. बैठकीस मुख्य सचिव मनोज सौनिक, यांच्यासह विविध विभागांचे सचिव उपस्थित होते. सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव तथा मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी या अमृत कलश यात्रेच्या नियोजनाबाबत सादरीकरण केले. तसेच यात्रेतील विविध टप्प्यांची माहिती दिली.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आपण माझी माती –माझा देशमधील पहिला टप्पा यशस्वी केला आहे. यात वीरांची नावे असलेले शिलाफलक लावले, वसुधा वंदन अंतर्गत वृक्षारोपण केले, पंचप्रण शपथही घेतली आहे. अमृत कलश यात्रा चार टप्प्यांत पार पडणार आहे. चारही टप्पे आपल्यासाठी महत्वाचे आहेत हे लक्षात घ्यावे व त्यादृष्टीने सर्व प्रशासनातील सर्व यंत्रणांनी नियोजन करावे. हा कार्यक्रम केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नाही, तर अतिशय गांभीर्याने आणि देशभक्तीची भावना घेऊन अमृत कलश यात्रेत आपला सहभाग द्यायचा आहे. आपला विभाग, जिल्हा, तालुका आणि अगदी ग्रामपंचायत पातळीपर्यंत या यात्रेत मनापासून आणि उत्स्फूर्तपणे आपल्याला काम करायचे आहे. ग्रामीण असो किंवा शहरी असो, आपल्या भागातील प्रशासनातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अमृत कलश यात्रेबाबत व्यवस्थित जबाबदारी द्या. प्रत्येक घर, प्रत्येक नागरिक, विद्यार्थी या सगळ्यांचा सहभाग कसा मिळेल यासाठी नियोजन करावे. मंत्रालयात सांस्कृतिक कार्य विभाग तसेच माझ्या सचिवालयातून सुद्धा यावर सनियंत्रण ठेवण्यात येणार आहे.


            आता उत्सव आणि सणवारांचे दिवस येणार आहेत. त्यांचा उपयोग करून लोकसहभाग वाढविण्याचा प्रयत्न करण्यात यावा, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाची ही संकल्पना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने राबवण्यात येत आहे. प्रधानमंत्र्यांनी जागतिकस्तरावरीही आपल्या देशाचा नावलौकीक वाढेल, असे काम केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता आपल्या स्वातंत्र्यसंग्रामातील हुतात्म्यांना, स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादनाची ही संधी आहे. त्यामुळे अमृत कलश यात्रेच्या नियोजनातही महाराष्ट्राचे नाव अग्रक्रमाने घेतले पाहिजे, अशा पद्धतीने नियोजन करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.


            बैठकीस मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉ. आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव के. एच. गोविंदराज, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल आदी उपस्थित होते. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका आयुक्त, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी आदी दृकश्राव्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.


अमृत कलश यात्रेविषयी...


            अमृत कलश यात्रेचा शुभारंभ केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आला आहे.


            पहिला टप्पा: १ ते ३० सप्टेंबरपर्यंत प्रत्येक घर, वॉर्ड आणि गावातून माती किंवा तांदूळ कलशांमध्ये गोळा करायचा आहे. हे करताना आनंदी आणि उत्साहाचे वातावरण हवे. वाजत-गाजत ही माती गोळा करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातून माती आणि शहरी भागातून तांदूळ या कलशात एकत्र करण्यात येईल.


            १ ते १३ ऑक्टोबरपर्यंत तालुकास्तरावर आणि पालिका, नगरपंचायती, नगरपरिषदा यांच्या स्तरावर ही सर्व गोळा केलेली माती आणि तांदूळ एकत्र आणून एका मोठ्या कलशामध्ये एकत्र करण्यात येईल. यावेळी सुद्धा आपल्या जिल्हा किंवा शहरातल्या सांस्कृतिक संस्था, एनसीसी, एनएसएस, स्काउट गाइडच्या विद्यार्थ्यांना एकत्र करून कार्यक्रम केले जातील. यात या संबंधित परिसरातील देशासाठी लढलेले आणि उल्लेखनीय कामगिरी केलेले जवान, पोलीस, स्वातंत्र्य सैनिक किंवा हुतात्म्यांचे कुटुंबीय यांना बोलवून त्यांचा गौरव करण्यात येईल.


            २२ ते २७ ऑक्टोबर या कालावधीत तालुका पातळीवरचे हे कलश मुंबईत एकत्र आणण्यात येतील. २७ ऑक्टोंबरला मुंबईतून विशेष रेल्वेने हे कलश दिल्लीकडे रवाना करण्यात येतील. त्यावेळीही मोठा सांस्कृतिक आणि देशभक्तीपर कार्यक्रम आयोजित करण्यात येईल.


            28 ते 30 ऑक्टोंबरपर्यंत देशाच्या राजधानीत रेल्वेद्वारे हे कलश वाजत गाजत पाठविण्यात येतील. १ नोव्हेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकाजवळ देशाच्या वीरांच्या स्मरणार्थ उभारलेल्या "अमृत वाटिके"त या कलशांमधील मा

ती विसर्जित करण्यात येईल.


दहीहंडी, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडून आढावा

 दहीहंडी, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडून आढावा

राज्यभरातील आगमन, विसर्जन मार्गांची डागडुजी तातडीने करावी


सण - उत्सव शांततेने साजरे करतानाच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


 


          मुंबई, दि. ४ : आगामी दहीहंडी, गणेशोत्सव उत्साहाने, शांततेने जल्लोषात साजरे करतानाच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. राज्यातील सर्व आगमन आणि विसर्जन मार्गांची डागडुजी करण्यासाठी जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्तांनी तातडीने कार्यवाही करावी. समाज प्रबोधनाचा संदेश देतानाच पर्यावरणपूरक सण साजरे करण्यासाठी मंडळांनी सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.


          सह्याद्री अतिथीगृह येथे दहीहंडी व सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्तची आढावा बैठक मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनोज सौनिक, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव यांच्यासह मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती, दहीहंडी असोशिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. सर्व जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, जिल्हा पोलीस प्रमुख दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.


          जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस अधिकाऱ्यांनी दहीहंडी, गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात. त्यावर सकारात्मक पद्धतीने मार्ग काढावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.


          राज्यातील सर्वच ठिकाणच्या आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजविण्यात यावेत, रस्त्यांची डागडुजी करुन घ्यावी. गणेश मंडळांना वीज जोडण्यांमध्ये अडचण येता कामा नये. त्याचबरोबर आगमन व विसर्जन मार्गावर येणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करावी, रस्त्यात केबल येणार नाही, याची दक्षती घ्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. मुंबईमधील सर्व रस्ते, गल्ली बोळांमध्ये स्वच्छता ठेवण्याची मुंबई महापालिका आयुक्तांना यावेळी सूचना देण्यात आल्या. 


          यंदा सुमारे ७५ हजार गोविंदांना राज्य शासनाच्या माध्यमातून विम्याचे सुरक्षा कवच देण्यात आले असून उर्वरित गोविंदानाही विम्याचे सुरक्षा कवच देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. अनेक वर्ष सातत्याने गणेशोत्सवाचे आयोजन करीत असलेल्या मंडळांना एकाचवेळी पाच वर्षांसाठी परवानगी देण्याबाबत कार्यवाही करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या. यावेळी पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, ठाणे येथील अधिकाऱ्यांकडून माहि

ती घेतली.


००००


मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत प्रक्रिया गतिमान करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

 मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतप्रक्रिया गतिमान करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश


अपर मुख्य सचिवांच्या समितीने प्राधान्याने महिन्याभरात अहवाल सादर करावा


 


          मुंबई, दि. ४ : मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रक्रिया करण्याकरिता नेमलेल्या अपर मुख्य सचिवांच्या समितीने तातडीने कार्यवाही करून महिनाभरात अंतिम अहवाल द्यावा, या कामी सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.


          मराठा आरक्षण व समाजाला सुविधा देण्यासाठी नेमलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक आज सह्याद्री अतिथगृह येथे झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपसमितीचे अध्यक्ष उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, समितीचे इतर सदस्य महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खा. उदयनराजे भोसले, आ. आशिष शेलार, महाधिवक्ता बिरेंद्र सराफ, विशेष सल्लागार समितीचे सदस्य नरेंद्र पाटील, योगेश कदम, प्रवीण दरेकर, मुख्य सचिव मनोज सौनिक, मंत्रालयीन सचिव, वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.


          मराठवाड्यातले महसूल आणि शैक्षणिक रेकॉर्ड तपासण्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. या समितीकडे मराठवाड्यातल्या पाच जिल्ह्यातून कुणबी समाजाची माहिती संकलित झाली आहे. याशिवाय हैदराबाद येथून निझामाचे जुने रेकॉर्ड तातडीने तपासण्यात येत आहे अशी माहिती यावेळी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांनी दिली. कुणबी नोंद असलेल्यांची वंशावळी तपासण्यात येणार आहेत. प्रारंभी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी प्रास्ताविकात मराठा आरक्षणासंदर्भात शासनाने केलेल्या कार्यवाहीची विस्तृत माहिती दिली.


मराठा समाजासाठी विविध निर्णय


          मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून आम्ही युवकांना नोकऱ्या, शिक्षण, शिष्यवृत्ती तसेच उद्योग व्यवसायांसाठी कर्ज, आर्थिक सहाय या माध्यमातून मदत केली आहे. मराठा समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आमचे प्रामाणिक प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी दिली. 


          मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ओबीसीप्रमाणे शैक्षणिक सवलती, सुविधा दिल्या जातात असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, ‘सारथी’ संस्थेमार्फत उच्च शिक्षणासाठी फेलोशीप, स्कॉलरशीप, एमपीएससी व यूपीएससी व इतर स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जातो. आतापर्यंत सुमारे १२ हजार विद्यार्थ्यांना ४४. ५८ कोटी रुपये खर्च करून स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण देण्यात आले.


‘सारथी’ला मजबूत केले


          रोजगार व स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवून २७ हजार ३४७ मराठा समाजातील विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला. राज्यात ‘सारथी’चे ८ विभागीय कार्यालयासाठी कोल्हापूर, पुणे, नाशिक, खारघर, औरंगाबाद, लातूर, अमरावती, नागपूर येथे शासनाने विनामूल्य जमिनी ‘सारथी’च्या ताब्यात दिल्या आहेत. ‘सारथी’ मुख्यालयासाठी पुणे येथे जमीन उपलब्ध करून दिली. ४२ कोटी अनुदान उपलब्ध करून दिले. मुख्यालय इमारतीचे बांधकाम पाचव्या माळ्यापर्यंत झाले आहे. नाशिक येथे विभागीय कार्यालयाची जी प्लस २० मजल्याची इमारत प्रस्तावित आहे. शासनाने सात विभागीय कार्यालयांसाठी १०१५ कोटी रकमेच्या कामांना मान्यता दिली आहे, असेही ते म्हणाले. 


          पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना, परदेशी विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशीप दिली जाते. छत्रपती शिवाजी महाराज संकुल अंतर्गत विभागीय कार्यालय, ३०० विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, ५०० मुले व ५०० मुली यांच्यासाठी वसतिगृह, शेतकरी समुपदेशन केंद्र व कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र बांधण्यात येत आहे.


३५०० पेक्षा जास्त नोकऱ्या


          १५५३ अधिसंख्य पदे निर्माण करून उमेदवारांना रुजू करून घेण्यात आले. तसेच २००० विद्यार्थ्यांना रखडलेली नोकरभरती कार्यवाही पूर्ण करून सेवेत रुजू करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. असे एकूण ३५५३ जणांना शासकीय सेवेत सामावून घेण्यात आले. आतापर्यंत वर्ग १ (७४), वर्ग २ (२३०) असे एकूण ३०४ मराठा समाजातील विद्यार्थ्यांची एमपीएससीमार्फत निवड झाली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.


          मराठा समाजातील १२ आयएएस, १८ आयपीएस, ८ आयआरएस, १ आयएफएस व १२ इतर सेवांमध्ये असे एकूण ५१ जणांची निवड यूपीएससीमार्फत झालेली आहे. एम.फील व पीएच.डीसाठी २१०९ विद्यार्थ्यांना लाभ दिला आहे. प्रति विद्यार्थी २० लाख रुपये पाच वर्षांसाठी फेलोशीपसाठी अनुदान दिले जाते, अशीही माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. 


स्पर्धा परीक्षेसाठी प्रोत्साहन, प्रशिक्षण


          मुख्यमंत्री म्हणाले की, परदेशी शिक्षणासाठी ७५ गुणवंत विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप दिली जाते. एमएससाठी प्रति वर्ष ३० लाख याप्रमाणे दोन वर्षांसाठी ६० लाख, जर विद्यार्थी पीएच.डी करत असेल तर १ कोटी ६० लाख अनुदान दिले जाते. ‘सारथी’ मार्फत छत्रपती शिवाजी महाराष्ट्र स्मृती ग्रंथाच्या ५० हजार प्रती प्रकाशित करून विविध ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका, माध्यमिक शाळा, शासकीय कार्यालयात वितरित करण्यात आल्या आहेत. यूपीएससीच्या तयारीसाठी मराठा समाजातील ५०० मुलांसाठी दरवर्षी दिल्ली व पुणे येथे प्रशिक्षण देण्यात येते. त्याचबरोबर एमपीएससीसाठी ७५० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. आयबीपीएस, नेट-सेट परीक्षेसाठी प्रशिक्षण दिले जाते. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ओबीसीप्रमाणे देण्यात आलेल्या सवलती, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुविधा, शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती, शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षांमध्ये वयात सवलत व परीक्षा शुल्क सवलत, याप्रमाणे फायदे दिले जातात.


स्वयंरोजगार व रोजगार आणि उद्योगांसाठी मोठे अर्थसहाय


          अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत स्वयंरोजगार व रोजगार आणि उद्योगांसाठी बॅंकामार्फत घेतलेल्या कर्जावरील व्याजाचा परतावा केला जातो. एकूण ६७ हजार १४८ बॅंक कर्ज लाभार्थींना ४८५० कोटींचे कर्ज वितरीत करण्यात आलेले आहे. ५५ हजार ५१७ लाभार्थींचा व्याज परतावा सुरू झालेला आहे. आतापर्यंत व्याज परताव्यापोटी लाभार्थींना ५१६ कोटींचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळास आणि ‘सारथी’स ३०० कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला जातो. मनुष्यबळ व निधीमध्ये कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.


0000



 

Monday, 4 September 2023

क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरवपुरस्कारांचे मंगळवारी वितरण

 क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरवपुरस्कारांचे मंगळवारी वितरण

          मुंबई, दि. 4 - शालेय शिक्षण विभागामार्फत सन 2022-23 च्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांचे मंगळवार दि. 5 सप्टेंबर 2023 रोजी शिक्षक दिनी वितरण करण्यात येणार आहे. हा समारंभ दि. 5 सप्टेंबर, 2023 रोजी दुपारी 4 वाजता टाटा थिएटर, नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिग आर्ट्स (एनसीपीए), नरीमन पॉईंट, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.


          या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण व मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार अरविंद सावंत, राहुल शेवाळे, आमदार कपिल पाटील, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल, शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे आदी उपस्थित राहतील.


          समाजाची निःस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतात. यामध्ये प्राथमिक प्रवर्गात 37, माध्यमिक प्रवर्गात 39, आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे शिक्षक (प्राथमिक) 19, थोर समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार आठ, विशेष शिक्षक कला/ क्रीडा दोन, दिव्यांग शिक्षक / दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक एक आणि स्काऊट – गाइड साठी दोन असे एकूण 108 पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सपत्निक सत्कार करण्यात येणार आहे.


          सदर राज्य पुरस्कृत शिक्षकांना एक लाख दहा हजार रुपये रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागामार्फत कळविण्यात आले आहे.


0000

रांजणगाव येथे 'इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर';केंद्राकडून पहिल्या टप्प्यात ६२ कोटींचा निधी वर्ग

 रांजणगाव येथे 'इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर';केंद्राकडून पहिल्या टप्प्यात ६२ कोटींचा निधी वर्ग


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्र शासनाचे मुख्यमंत्र्यांनी मानले आभार


 


            मुंबई, दि. ४ : राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणानुसार पुण्याजवळील रांजणगाव येथे महाराष्ट्रातील पहिला 'इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर (EMC) प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यातील ६२ कोटी ३९ लाख रुपयांचा निधी एमआयडीसीकडे वर्ग केला आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्र शासनाचे आभार मानले आहेत.


            देशात इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या उत्पादनांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारने देशात सुधारित इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर (ईएमसी २.०) अंमलबजावणी सुरु केली आहे. देशात नोएडा, कर्नाटक, तमिळनाडू या राज्यात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन केंद्रे असून तेथे विविध बहुराष्ट्रीय कंपन्या आणि भारतीय यांनी स्टार्ट अप्स युनिट सुरू केले आहेत. रांजणगाव येथे २९७.११ एकर जागेवर 'इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर' उभारणीस ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी केंद्राने मान्यता दिली आहे. या प्रकल्पाची किंमत ४९२ कोटी ८५ लाख १९ हजार रुपये असून त्यात केंद्र शासनाकडून २०७ कोटी ९८ लाख रुपये वित्तीय सहाय्य उपलब्ध होणार आहे. यातील ६२ कोटी ३९ लाख रुपयांचा पहिला हप्ता केंद्र शासनाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने एमआयडीसीकडे वर्ग केला आहे.


            रांजणगाव येथे उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पात आयएफबी. एलजी आणि गोगोरो ईव्ही स्कूटर यासारख्या कंपन्यांचा सहभाग असेल. या प्रकल्पामुळे हा परिसर 'इलेक्ट्रॉनिक क्लस्टर' म्हणून नावारूपास येईल, अधिक उद्योजक, कंपन्या तेथे आकर्षित होऊन त्यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केला आहे. हा इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत आणि एमआयडीसीने विशेष परिश्रम घेतले असून त्यांचेही मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे.


0000

शिक्षण, कृषी क्षेत्रांतील विकासासाठी ऑस्ट्रेलियाचे सहकार्य घेणार -

 शिक्षणकृषी क्षेत्रांतील विकासासाठीऑस्ट्रेलियाचे सहकार्य घेणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

          मुंबईदि. ४ :- उच्च शिक्षण आणि कृषी क्षेत्रांतील विकासासाठी ऑस्ट्रेलियाचे सहकार्य घेण्यात येईलअसे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

          भारतातील ऑस्ट्रेलियाचे राजदूत फिलीप ग्रीन यांनी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी शिक्षणकृषी आणि पर्यटन या विषयांवर चर्चा करताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या मुंबईतील उच्चायुक्त मॅजेल हिंद तसेच उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ श्रीकर परदेशी उपस्थित होते.

          उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीमुंबईपुणेनागपूर येथे विद्यार्थी मोठ्या संख्येने उच्च शिक्षणासाठी येत असतात. पुणे शैक्षणिक केंद्र असूनव्यावसायिक व तंत्रज्ञान शिक्षणक्रमांबरोबरच उच्च कौशल्याधिष्ठित शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही अधिक आहे. ऑस्ट्रेलियातील तज्ज्ञांद्वारे तयार करण्यात आलेल्या कौशल्य विकास अभ्यासक्रमाच्या साहाय्याने राज्यातील विद्यापीठात नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी करार करण्यासंदर्भात विचार करण्यात येईल.

          विविध क्षेत्रांतील उत्पादनकृषी आणि सेवा या क्षेत्रांत मनुष्य बळाची मागणी जास्त आहे.  तसेचकृषी क्षेत्रात सौर ऊर्जा आणि त्यासंदर्भातील उत्पादनांची  मागणी मोठ्या प्रमाणात आहे. ऑस्ट्रेलियातील अक्षय ऊर्जा निर्मिती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा कृषी उद्योगात सहभाग करून अर्थव्यवस्था वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

          भारतातील विविधतापर्यटनव्यावसायिक आणि कौशल्य विकास संदर्भात चर्चा करूनशिक्षणकृषीउत्पादन क्षेत्रांत ऑस्ट्रेलियाचा सहभाग वाढवून, ‘मेक इन इंडियामध्ये योगदान द्यायला ऑस्ट्रेलियाला आवडेलअसे श्री. ग्रीन यांनी सांगितले.

-----०००----

Featured post

Lakshvedhi