Sunday, 6 August 2023

केंद्रीय सहकारी संस्था निबंधक कार्यालयाच्या डिजीटल पोर्टलचे केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन

 केंद्रीय सहकारी संस्था निबंधक कार्यालयाच्या डिजीटल पोर्टलचे केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन


गरीबांचे प्रगतीचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम सहकार क्षेत्राने केले- केंद्रीय गृह व सहकारमंत्री


महाराष्ट्राच्या विकासात सहकार क्षेत्राचे मोठे योगदान- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


       पुणे दि.६: छोट्या स्वरुपातील गुंतवणूकीच्या आधारे मोठे कार्य उभारण्याचे काम सहकाराच्या माध्यमातून झाले असून गरीबांचे प्रगतीचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम सहकार क्षेत्राने केले, असे प्रतिपादन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी केंद्रीय सहकारी संस्था निबंधक कार्यालयाच्या डिजीटल पोर्टलच्या उद्घाटन कार्यक्रमात केले. डिजिटल पोर्टलचा सर्वाधिक लाभ देशात सर्वात जास्त बहुराज्य सहकारी संस्था असलेल्या महाराष्ट्राला होईल, असेही श्री. शाह यावेळी म्हणाले.


            चिंचवड येथे आयोजित या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील,पालकमंत्री मंत्री चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय सहकार सचिव ज्ञानेश कुमार, विशेष सचिव तथा केंद्रीय निबंधक विजय कुमार, राज्याचे सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार आदी उपस्थित होते.


महाराष्ट्र सहकाराची राजधानी


            महाराष्ट्राचा ‘देशाच्या सहकार क्षेत्राची राजधानी’ असा उल्लेख करुन श्री. शाह म्हणाले, महाराष्ट्रातूनच सहकाराचे संस्कार देशात पोहोचले. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, धनंजय गाडगीळ, वैकुंठभाई मेहता अनेकांनी सहकार क्षेत्राला पुढे नेले. गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यात सहकार क्षेत्राने चांगली प्रगती केली आहे. म्हणूनच केंद्रीय निबंधक कार्यालयाच्या डिजीटायझेशनच्या कार्यक्रमाचा शुभारंभ पुणे येथून करण्यात येत आहे. बहुराज्य सहकारी संस्थांचे कामकाज पाहणाऱ्या केंद्रीय सहकार निबंधकाचे कामकाज पूर्णत: डिजीटल होत आहे. संस्थांना आपल्या कार्यालयातूनच निबंधक कार्यालयाशी संपर्क साधता येणार आहे. सहकारी संस्थांशी संबंधित सर्व कामकाज लक्षात घेऊन हे पोर्टल बनविण्यात आले आहे.


            सहकारात छोट्या गुंतवणुकीतून मोठे उद्योग उभे राहिले. १०० रुपये गुंतवणूक करणाऱ्या ३६ लाख महिलांच्या गुंतवणूकीमुळे ६० हजार कोटी लाभ मिळवणारी अमूल सारखी संस्था उभी राहिली आहे. सहकाराचा अर्थ छोटी गुंतवणूक करणाऱ्यांना एकत्र करून मोठा उद्योग स्थापित करणे आहे. लहान लहान व्यक्तीला आपले जीवन उन्नत करण्याची संधी देणे, देशाच्या आर्थिक प्रगतीत योगदान देण्यासाठी त्याला एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि सहकाराच्या माध्यमातून त्याच्या जीवनाचा उद्धार करणे हीच ‘सहकारातून समृद्धी’ आहे. यासाठीच दोन वर्षापूर्वी केंद्रामध्ये सहकार मंत्रालयाची स्थापना करण्यात आली. नव्याने सुरू करण्यात आलेल्या पोर्टलमुळे १ हजार ५५५ बहुराज्य सहकारी संस्थांना याचा लाभ होईल. यातील सर्वाधिक ४२ टक्के संस्था केवळ महाराष्ट्रातील आहेत. या संस्थांची सर्व कामे पोर्टलद्वारे होतील. 


 पुढील टप्प्यात विविध राज्यातील ८ लाख सहकारी संस्थांचे संगणकीकरणही करण्यात येणार आहे. त्यामुळे कामकाजात गती येईल. पारदर्शकता, जबाबदारीचे तत्व आणि आधुनिकतेच्या आधारे सहकार चळवळ पुढे जाईल. पारदर्शकता वाढवून जबाबदारी निश्चित केल्यास समाजाच्या सर्व घटकांना सहकाराशी जोडता येईल. सहकारी संस्थांच्या क्षमतांचा उपयोग करून विकासाला गती देण्याचे कार्य करावे लागेल. बहुराज्य सहकारी संस्था कायद्यात सहकार क्षेत्राच्यादृष्टीने अनेक चांगल्या तरतूदी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पारदर्शकतेसह संस्थांची कार्यक्षमताही वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. युवकांना सहकार चळवळीशी जोडल्यास सहकार क्षेत्राचा वेगाने विकास होईल, असेही ते म्हणाले.


सहकाराच्या माध्यमातून नैसर्गिक शेतीला चालना


            नैसर्गिक शेती करण्यासाठी अनेक शेतकरी पुढे येत आहे. त्यांना आपल्या उत्पादनाचे मूल्य मिळत नाही. त्यांच्यासाठी बहुराज्य सहकारी संस्था उभारण्यात येईल. ही संस्था नैसर्गिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना सोबत घेण्यासोबत ‘भारत’ ब्रँण्डच्या माध्यमातून उत्पादनाचे मार्केटींग करून त्याचा फायदा शेतकऱ्याच्या खात्यात पाठविण्याचे काम होईल. शेतकरी आपल्या चांगल्या उत्पादनांना निर्यात करू शकतील. बहुराज्यीय निर्यात समिती शेतकऱ्यांकडून उत्पादन खरेदी करून त्याचे निर्यात करेल आणि त्याचा लाभ शेतकऱ्यांच्या खात्यात जाईल.


महाराष्ट्राच्या विकासात सहकार क्षेत्राचे मोठे योगदान- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            महाराष्ट्राच्या विकासात सहकार क्षेत्राचे मोठे योगदान आहे, असे सांगून मुख्यमंत्री एकनाश शिंदे म्हणाले, विशेषत: पश्चिम महाराष्ट्राच्या विकासात सहकार क्षेत्राचे योगदान मोठे आहे. राज्यात २ लाख २० हजार सहकारी संस्था असून ६०० पेक्षा अधिक बहुराज्य संस्था आणि सोसायट्या कार्यरत आहेत. केंद्र शासनाचे नवे पोर्टल सहकार क्षेत्राच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरेल.


            ते पुढे म्हणाले, केंद्राच्या सहकार विभागाने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. केंद्र सरकार सहकार क्षेत्राच्या विकासाकडे अत्यंत सकारात्मकतेने लक्ष देत आहे. नव्या पोर्टलमुळे नोंदणीची स्थिती, नोंदणी, आदेश, सोसायटीचे प्रमाणपत्र, विवरण सामान्य शेतकऱ्यांना उपलब्ध होतील. 


            राज्यात सहकारी संस्थांमध्ये ५ कोटी २८ लाख सदस्य आहेत. सहकारी बँकेमधील ठेवी २ लाख ३१ हजार कोटीपेक्षा जास्त आणि खेळते भांडवल साडेचार लाख कोटींपेक्षा जास्त आहेत. या चळवळींचा मोठा आधार प्राथमिक कृषी सहकारी संस्था (पॅक्स) आहेत. देशातील सर्वाधिक २१ हजार पॅक्स महाराष्ट्रात आहेत ही अभिमानास्पद बाब आहे. या संस्थांना बळकटी देण्याचे कार्य केंद्राच्या सहकार मंत्रालयाने केले आहे.


            शेतकऱ्यांला केंद्र बिंदू मानून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे कार्य केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून केले. सहकार क्षेत्र कठीण काळातून जात असतांना ‘सहकार से समृद्धी’ या उद्देशाने सहकार विभागात अनेक सकारात्मक बदल करण्यात येत आहेत. सहकार क्षेत्रात पारदर्शकता येत आहे. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा १० हजार कोटी रुपयांचा आयकर माफ करण्याचा मोठा निर्णय घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे कार्य त्यांनी केले. यामुळे साखर उद्योगालाही नवसंजीवनी मिळाली आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. पॅक्सच्या संगणकीकरणामुळे राज्यातील १२ हजार सहकारी संस्थांना याचा फायदा होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.


देशात बहुउद्देशीय कृषी व्यवसाय संस्थेचे आदर्श प्रारूप महाराष्ट्रात तयार होईल- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, केंद्राच्या आणि राज्य शासनाच्या योजनांचे एकत्रिकरण करुन राज्यात सहकारी संस्थांच्या विकासाला चालना देण्यात येईल. महाराष्ट्राने जागतिक बँकेच्या सहकार्याने स्मार्ट प्रकल्प सुरू केला आहे. १० हजार गावात पॅक्सला कृषी व्यवसाय संस्थात परिवर्तीत करण्यात येत आहे. त्यांना प्रशिक्षण देऊन, वितरण साखळीचा भाग करून सक्षम करण्याचा प्रयत्न आहे. महात्मा गांधी तसेच संत तुकडोजी महाराजांच्या ग्रामस्वराज्याचे स्वप्न यामुळे साकार होईल. या माध्यमातून देशात पहिले बहुउद्देशीय कृषी व्यवसाय संस्थेचे आदर्श प्रारूप महाराष्ट्रात तयार होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


            श्री. फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात सहकाराची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि त्यानंतर देशात. सर्वाधिक ग्रामपातळीपर्यंत सहकार महाराष्ट्रात पोहोचला. सहकारातून समृद्धी येऊ शकते अशी व्यवस्था महाराष्ट्राने उभी केली. त्यातून मोठे सहकारक्षेत्र महाराष्ट्रात निर्माण झाले. याचमुळे केंद्राने सहकार क्षेत्रासाठी नवा कायदा केला आणि कायद्याच्या अंतर्गत गावपातळीवर सहकार नेण्यासाठी व्यवस्था उभी केली. ही व्यवस्था डिजिटल पोर्टलच्या माध्यमातून सुलभतेने सर्वांना उपलब्ध करून देण्यासाठी आधुनिक, सुलभ पोर्टल तयार केले. या पोर्टलचे उद्घाटन सहकार पंढरी असलेल्या महाराष्ट्रात होत आहे. 


            केंद्रात सहकार मंत्रालय स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांना जास्त पैसे दिले म्हणून साखर कारखान्यांना आयकर लावण्याचे धोरण मंत्री अमित शाह यांनी बदलले आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले. स्वत: सहकार क्षेत्रात चांगले काम केले असल्याने या क्षेत्राविषयी त्यांना तंतोतंत माहिती असल्याने वर्षानुवर्षे रखडलेला प्रश्न त्यांनी सोडविला. एनसीडीसीच्या माध्यमातून साखर कारखान्यांना मदत करण्याचे आणि साखर उद्योगाच्या संदर्भातील चांगले निर्णय घेतले. सहकार विभागाची संवेदनशीलता यानिमित्ताने बघायला मिळाली, असेही ते म्हणाले. 


            सहकारी संस्थेला मजबूत करण्याचा कार्यक्रम केंद्र सरकारने हाती घेतला आहे.नवीन कायद्याच्या माध्यमातून बहुराज्य सहकारी संस्थांना पारदर्शक कारभाराला मदत होणार आहे. सामान्य माणसाचा पैसा बुडणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. गावापर्यंत समृद्धी पोहोचण्यासाठी सहकार क्षेत्र मजबूत होणे आवश्यक आहे, असेही श्री. फडणवीस म्हणाले.


आयकराचा प्रश्न सोडविल्याने सहकारी साखर कारखान्यांना मोठा दिलासा- उपमुख्यमंत्री अजित पवार


            उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, साखर उद्योग आयकर संदर्भातील समस्येचा गेल्या २२ वर्षात सामना करत होते. यामुळे सहकारी साखर कारखाने बंद होण्याची शक्यता होती. राज्यातील कारखान्यांना वारंवार आयकर विभागाच्या नोटीसा येत होत्या. केंद्र सरकारने सहकार क्षेत्राला पुढे नेण्यासाठी सहकार विभागाची स्थापना केल्यानंतर ऊस उत्पादक आणि साखर कारखान्यांना समस्येपासून सोडविण्यासाठी अमित शाह यांनी आयकराचा हा प्रश्न सोडविल्याने साखर उद्योगाला मोठा दिलासा मिळाला आहे, असेही त्यांनी सांगितले.


            ते पुढे म्हणाले, ‘सहकारातून समृद्धी’ या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या उद्दीष्टांच्या पूर्ततेसाठी सहकार मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार क्षेत्रात अनेक चांगले बदल होत आहेत. सहकार क्षेत्रातील सदस्यांच्या सहमतीने देशाचे व्यापक हीत लक्षात घेऊन हे बदल करण्यात येत आहेत. देशाच्या सहकाराचा १२० वर्षाचा इतिहास आहे. या कालावधीत सहकार ग्रामीण भागातील घराघरात पोहोचला आहे.


            सहकाराने ग्रामीण भागाच्या विकासात योगदान दिले आहे. प्रथमच केंद्र स्तरावर सहकार मंत्रालयाची स्थापना करण्याचा निर्णय होणे स्वागतार्ह आहे. सहकार मंत्रालयाच्या प्रत्येक प्रयत्नांना राज्याची साथ राहील. सहकाराच्या क्षेत्रात महाराष्ट्र आणि गुजरातची चांगली कामगिरी झाली आहे. बहुराज्य सहकारी संस्थांसाठी तयार करण्यात आलेल्या पोर्टल उपयुक्त ठरेल आणि सहकार क्षेत्रातील समस्या दूर होण्यास मदत होईल. सहकार क्षेत्र विश्वासाने पुढे जाईल आणि नागरिकांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  


            विशेष सचिव श्री. विजय कुमार प्रास्ताविक भाषणात म्हणाले, बहुराज्य सहकारी संस्थांसाठी आजचा कार्यक्रम महत्वाचा आहे. बऱ्याच दिवसापासून प्रलंबित बहुराज्य सहकारी संस्था कायदा (एमएससीएस ॲक्ट) हा २ ऑगस्टपासून लागू झाला आहे. या अधिनियमाशी निगडीत नियम ४ ऑगस्टपासून लागू करण्यात आले असून आज त्याविषयीच्या पोर्टलचे उद्घाटन करण्यात येत आहे. यामुळे बहुराज्यीय सहकारी संस्थांचे कामकाज अधिक सुरळीत होईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


यावेळी राष्ट्रीय साखर महासंघाच्या वतीने सहकार मंत्री अमित शाह यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच या डिजिटल पोर्टल साठी योगदान दिलेल्या विद्यार्थ्यांनाही मंत्रिमहोदयांच्या हस्ते विशेष प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमास सहकार क्षेत्रातील मान्य

वर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0000


पंतप्रधानांच्या हस्ते ‘अमृत भारत स्थानक’ योजनेचा शुभारंभ

 पंतप्रधानांच्या हस्ते ‘अमृत भारत स्थानक’ योजनेचा शुभारंभमहाराष्ट्रातील ४४ रेल्वे स्थानकांचा समावेश


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे मानले आभार


            मुंबई, दि. ६ – देशातील रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘अमृत भारत स्थानक’ योजनेचा शुभारंभ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. या योजनेत महाराष्ट्रातील ४४ रेल्वे स्थानकांचा समावेश केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत. 


            यापूर्वीच केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या रेल्वे प्रकल्पांसाठी १३ हजार ५३९ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे, त्यातून राज्यातील १२३ रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येत असून या स्थानकांमध्ये मुलभूत पायाभूत तसेच अद्ययावत सुविधा आणि रेल्वे मार्गांची कामे सुरू आहेत, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


            देशातील रेल्वे स्थानकांच्यादृष्टीने आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. देशातील ५०८ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यासाठी ‘अमृत भारत स्थानक’ योजनेचा शुभारंभ झाला आहे. या योजनेतून निर्माण होणाऱ्या सुविधांमुळे रेल्वे स्थानकांचा चेहरामोहरा बदलणार आहे, शिवाय प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळणार आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 


            ‘अमृत भारत स्थानक’ योजनेमुळे रेल्वे स्थानकांचे पुनरुज्जीवन होईल, शिवाय रेल्वे स्थानकातील प्रवेशाची ठिकाणे आणि स्थानक परिसराचा विकास, प्रतिक्षालये, स्वच्छतागृहे, लिफ्ट, एस्कलेटर, मोफत वायफाय, स्थानिक उत्पादनांच्या विक्रीसाठी स्वतंत्र केंद्रे, प्रवाशांना माहिती देण्यासाठी उद्घोषणा प्रणाली, दिव्यांगासाठी सुविधा आदी सुविधा टप्प्या-टप्प्याने करण्यात येणार आहेत, असे सांगून या विविध पायाभूत सुविधांच्या नव्या अध्यायाची नोंद रेल्वेच्या इतिहासात होईल, असा विश्वासही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केला आहे.


 


'अमृत भारत स्थानक योजने’त समाविष्ट महाराष्ट्रातील रेल्वे स्थानके :


सोलापूर रेल्वे विभाग – अहमदनगर, दौंड, कोपरगाव, कुर्डुवाडी जंक्शन, लातूर, उस्मानाबाद, पंढरपूर, सोलापूर


पुणे रेल्वे विभाग - आकुर्डी, कोल्हापूर, तळेगाव


भुसावळ रेल्वे विभाग – बडनेरा, मलकापूर, चाळीसगाव, मनमाड, शेगाव 


नागपूर रेल्वे विभाग – वडसा, गोंदिया, चांदाफोर्ट, बल्लारशाह, चंद्रपूर, धामणगाव, गोधनी, हिंगणघाट, काटोल, सेवाग्राम, नरखेड, पुलगाव


मुंबई रेल्वे विभाग – कांजुरमार्ग, परळ, विक्रोळी


नांदेड रेल्वे विभाग – औरंगाबाद, गंगाखेड, हिंगोली डेकन, जालना, किनवट, मुदखेड, नगरसोल, परभणी, परतूर, पूर्णा, सेलू, वाशिम


सिकंदराबाद रेल्वे विभाग – परळी वैजनाथ


00000


 


 


 

नीलमाधव हॉस्पिटलचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज

 नीलमाधव हॉस्पिटलचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज उदघाटन


image.png


 

परळी / प्रतिनिधी



                 परळी शहरात प्रथमच सर्व सोयिनीं अद्यावत असलेल्या नीलमाधव हॉस्पिटलचे उदघाटन राज्याचे कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज रविवार दि ६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता होणार असून या उदघाटन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान डॉ.रवीकुमार नारायणराव फड व डॉ.स्वप्नीत रवीकुमार फड आदींनी केले आहे.



                 छत्रपती शिवाजी चौक येथील सुभाष कॉम्प्लेक्स,पहिला मजला या ठिकाणी नीलमाधव हॉस्पिटल, बालरुग्णालय,सर्जिकल व ट्रॉमा केअर सेंटर चा उदघाटन सोहळा आज रविवार दि. ६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते होणार असून या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे माजी आ. संजय दौंड,न.प. गटनेते वाल्मिक अण्णा कराड,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे-बीड,बाजीराव भैया धर्माधिकारी -शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस परळी, चंदुलाल बियाणी -जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस,अजय मुंडे - गटनेते जिल्हापरिषद बीड, बाळासाहेब देशमुख - जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस बीड, शिवाजी सिरसाट - जेष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस बीड तर प्रमुख उपस्थिती डॉ.बी.ए.सेवेकर,डॉ.हरिश्चंद्र वंगे,डॉ.सुरेश चौधरी,डॉ.सूर्यकांत मुंडे,डॉ.राजाराम मुंडे, डॉ.मधुसूदन काळे,डॉ. बालासाहेब कराड, डॉ.शालिनीताई कराड, डॉ. ज्ञानेश्वर घुगे, डॉ. रंजना घुगे, डॉ.अजित केंद्रे, डॉ. श्याम काळे, डॉ. दिनेश कुरमे,डॉ.संतोष ए. मुंडे, डॉ. सतीश गुट्टे , तर शुभाशीर्वाद प. पु. श्री ब्रह्मऋषि डॉ.सु.ब.काळे,ह.भ.प.श्री भागवताचार्य केशव महाराज उखळीकर,ह.भ.प.श्री रामायणाचार्य भरत महाराज गुट्टे यांच्या शुभ आशीर्वादाने नीलमाधव हॉस्पिटलचा उदघाटन सोहळा मोठया उत्साहात होत असून या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशे आव्हान डॉ. रवीकुमार नारायणराव फड व डॉ.स्वप्नीत रवीकुमार फड,मा.दिलीप गुट्टे - मा.अप्पर जिल्हाधिकारी, डॉ.अरुण गुट्टे - वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय परळी वै, विश्वम्भर फड - चेअरमन से.स.सो.लाडझरी मूर्ती वाकडी, नाथराव माणिकराव फड - नि.रसायन शाश्त्रज्ञ टीपीएस परळी,रत्नेश्वर फड - मॅनेजर जेबील कंपनी,गिरीश कंकाळ ,गोपाळ कंकाळ - संचालक रिद्धी मेडिकल, पवनराज सूर्यकर - संचालक श्री क्लीनिकल लॅबोरेटरी आदींनी केले आ

हे. 

भारत- बेलारुस व्यापार वृद्धीची महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांचेसोबत चर्चा

 भारत- बेलारुस व्यापार वृद्धीची महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांचेसोबत चर्चा



मुंबई : बेलारूस चे कॉन्सुलेट जनरल श्री अंतोन पाश्कोह यांनी "महाराष्ट्र चेंबर"च्या फोर्ट, काळा घोडा, ओरिकॉन हाऊस या मुख्यालयास भेट दिली. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, ॲण्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी "महाराष्ट्र चेंबर" तर्फे त्यांचा सन्मान केला. भारत आणि बेलारुस या दोन्ही देशातील व्यापार वृद्धीसंदर्भात महत्वपूर्ण चर्चा या भेटीच्या दरम्यान झाली. तसेच 'महाराष्ट्र चेंबर' तर्फे शिष्टमंडळाने `बेलारूस `ला भेट देण्यासाठी त्यांनी निमंत्रण दिले.


            यावेळी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी निर्यात संदर्भातील महाराष्ट्र चेंबरतर्फे सुरु असलेल्या प्रयत्नांची माहिती देताना म्हणाले, महाराष्ट्र चेंबरतर्फे निर्यात प्रोत्साहन योजना राबविली जात आहे. शेजारील देशासह आखाती देश, आफ्रिकन देशात भारतीय उत्पादनांना मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे.


            दरम्यान भारत व 'बेलारूस' दरम्यान द्विपक्षीय व्यापार वाढवण्यासंबंधी विविध विषयावर सविस्तर चर्चा झाली. विशेषत: भारतातून ऑटोमोबाईल कंपोनंट्स, फार्मा व फळांच्या निर्यातीच्या मोठ्या संधी असल्याचे बेलारूस चे कॉन्सुलेट जनरल अंतोन पाश्कोह यांनी सांगितले. 'बेलारूस' मधून उच्च दर्जाचे टेक्स्टाईल व त्यासाठी लागणारे सिंथेटिक यार्न, मायनिंग साठीचे विशेष उपकरण इत्यादी विषयावर उभय देशांमधील व्यापार वाढवण्यासंबंधी चर्चा झाली.


            यावेळी `बेलारूस`चे कॉन्सुलेट जनरल श्री अंतोन पाश्कोह यांनी दिलेल्या प्रस्तावावर महाराष्ट्र चेंबरतर्फे निश्चितच पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, ॲण्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले. या भेटीप्रसंगी महाराष्ट्र चेंबरचे सहकार्यवाह सागर नागरे उपस्थित होते.

 पंतप्रधानांच्या हस्ते देशातील ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कार्याचा शुभारंभ संपन्न


रेल्वे स्टेशन पुनर्विकासामुळे ग्रामीण व शहरी भारत समृद्धी निर्माण होईल : राज्यपाल रमेश बैस

            मुंबई दि. 06 : अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत देशभरातील ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रमाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरस्थ उपस्थितीत करण्यात आला. यामध्ये राज्यातील ४४ व मुंबईतील परळ, विक्रोळी व कांजूरमार्ग रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.  

            या अनुषंगाने मध्य रेल्वे तर्फे रेल्वे कॉलनी मैदान परळ येथे आयोजित कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्री मंगलप्रभात लोढा, उद्योग मंत्री उदय सामंत, ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर, ज्येष्ठ पत्रकार पद्मश्री रमेश पतंगे, स्वातंत्र्य संग्राम सैनिक अनंत लक्ष्मण गुरव व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी उपस्थित होते.    


            भारतीय रेल्वे हे गरीब आणि श्रीमंत दोन्ही वर्गांना विकास आणि प्रगतीची समान संधी देणारे प्रवासाचे साधन असून रेल्वे स्टेशन पुनर्विकासामुळे शहरी आणि ग्रामीण भागात आर्थिक संपन्नता निर्माण होईल व विकास सर्वसमावेशक होईल, असे राज्यपालांनी यावेळी बोलताना सांगितले. 

            एखाद्या संस्थेची प्रतिमा तिचे व्यवस्थापन करणाऱ्या लोकांकडून निर्माण होते असे सांगून रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानके पर्यावरण-स्नेही व दिव्यांग-सुलभ करावीत तसेच नैतिक व मानवी मूल्ये जपावी, असे राज्यपालांनी सांगितले.   

            रेल्वे सेवांमध्ये आमूलाग्र परिवर्तन झाले असून रेल्वे प्रवास अधिक सुखकर झाला असल्याचे सांगून आपण विमानापेक्षा शक्यतोवर रेल्वे प्रवासाला पसंती देतो असे राज्यपालांनी सांगितले.

            रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचा राष्ट्रव्यापी प्रकल्प हाती घेऊन केंद्र शासनाने सामान्य माणसाच्या स्वागतासाठी एक प्रकारे लाल गालिचा अंथरला आहे असे सांगून राज्यातील स्थानकांच्या विकासासाठी केंद्राने १६०० कोटी रुपयांची तरतूद केल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. महाराष्ट्र शासन भारतीय रेल्वेच्या सहकार्याने कोकण रेल्वेच्या विकासासाठी देखील चांगले काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. कौशल्य विकास मंत्री यांनी देखील रेल्वे स्थानक पुनर्विकास कार्याबद्दल आनंद व्यक्त केला. 


0000

PM launches Amrit Bharat Station Scheme;Governor attends

 programme in Mumbai


     Prime Minister Narendra Modi laid the Foundation Stone for the work of revamp and re-development of 508 railway stations in the country under the Amrit Bharat Station Scheme, through online mode on Sunday (6 Aug). This includes 44 railway stations from Maharashtra. Redevelopment of three stations in Mumbai, namely Parel, Vikhroli and Kanjurmarg stations was also announced

     Maharashtra Governor Ramesh Bais, Minister of Skill Development and Entrepreneurship Mangal Prabhat Lodha, Minister of Industry Uday Samant, MLA Kalidas Kolambkar, veteran journalist Ramesh Patange, Freedom Fighter Anant Laxman Gurav and General Manager of Central Railway Naresh Lalwani attended the program organized by Central Railway at Railway Colony Ground in Parel.


     Speaking on the occasion, Governor Bais said railways create a level playing field for the rich and the poor. Stating that Indian railways represents the unity in diversity of India, he expressed the hope that the railway station upgradation project will create prosperity in 

rural and urban areas and make development inclusive.

00000


राज्यातील नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध होणार-उपमुख्यमंत्री अजित पवार

 महाआरोग्य शिबिराचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उदघाटन


राज्यातील नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध होणार-उपमुख्यमंत्री अजित पवार



            पुणे, दि.6: महाराष्ट्र शासन, सोमेश्वर फाऊंडेशन आणि निरामय फाऊंडेशन मुंबई यांच्यावतीने कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. शासकीय रुग्णालयात मोफत आरोग्यसेवा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून निर्णयाचा लाभ गरीब आणि गरजू रुग्णांना होणार आहे, असे मत श्री.पवार यांनी यावेळी व्यक्त केले.


            स्व. आमदार विनायक निम्हण यांच्या जयंती निमित्त आयोजित या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री सुरेश नवले, अर्जुन खोतकर, आमदार प्रसाद लाड, सिद्धार्थ शिरोळे, सनी निम्हण, आरोग्य संचालक डॉ.अजय चंदनवाले आणि राज्यातील तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, कोविड काळाने आरोग्यसेवा सर्वात जास्त महत्वाची असल्याचे दाखवून दिले. राज्य शासनानेदेखील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महत्वाचे निर्णय घेतले आहेत. आरोग्यसेवेसाठी पुरवणी मागण्यांमध्ये 210 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्यात 700 ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 2 हजार 418 संस्थांमध्ये नि:शुल्क उपचार होणार आहेत. राज्यात ॲडेनो व्हायरसमुळे डोळ्यांची साथ मोठ्या प्रमाणात पसरली असून पुण्यात साथीचे प्रमाण अधिक आहे. नागरिकांनी डोळ्यांची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.


            पावसाळ्याचे दिवस असल्याने आरोग्य विभागामार्फत साथजन्य आजारांपासून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. साथीच्या आजारावर नियंत्रण करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज आहे. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून प्राथमिक टप्प्यातच अशा आजाराचे निदान झाल्यास रुग्णांचा त्रास कमी होतो. मात्र उपचारासोबत आजार होऊ नये यासाठी दररोज व्यायाम करणे, व्यसनापासून दूर राहणे, सकस आहार घेणे, वेळेवर आरोग्य तपासण्या करणे, तणावमुक्त जीवन जगणे गरजेचे आहे. प्रकृतीची काळजी घेताना जीवनशैलीत बदल आणायला हवा. आरोग्य शिबिरात मोफत वैद्यकीय चाचण्या करण्यात येणार असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. स्व. विनायक निम्हण यांनी सामाजिक कार्य करताना चांगल्या प्रकारची मैत्री जोपासली असेही श्री.पवार म्हणाले.


            अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री.भुजबळ म्हणाले, महाआरोग्य शिबिरात तज्ज्ञ डॉक्टर्स सहकार्य करण्यासाठी येतात हे कौतुकास्पद आहे. या माध्यमातून अनेक गोरगरिबांना आरोग्यसेवा मिळणार आहे. 'जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले' ही संतांची शिकवण आहे. अशा पद्धतीने विविध व्याधीने त्रस्त असलेल्या नागरिकांवर शिबिराच्या माध्यमातून विनामूल्य उपचार करण्यात येणार आहे. म्हणून या शिबिराला विशेष महत्व आहे, असे त्यांनी सांगितले. स्व. आमदार विनायक निम्हण यांनी सर्वसामान्य जनतेसाठी कार्य केले, असेही श्री.भुजबळ म्हणाले.


 


            पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, कोविडच्या निमित्ताने आरोग्यसेवेचे महत्व लक्षात आले. आरोग्याच्या अनेक समस्या समोर येत असताना उपचाराला बऱ्याचदा मर्यादा येतात. अशावेळी आरोग्य शिबिराच्या माध्यमातून चांगली सेवा घडते आणि नागरिकांना फायदाही होतो, असे त्यांनी सांगितले. स्व. आमदार विनायक निम्हण यांनी जात, धर्म पलीकडे नाती जपली असेही श्री.पाटील म्हणाले.


            श्री.वडेट्टीवार म्हणाले, माणसात आणि सेवेत देव आहे असे समजून या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. डॉक्टर अनेकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे कार्य करत असल्याने त्यांची सेवा महत्वाची आहे. शिबिराचे सूक्ष्म नियोजन करण्यात आल्याने त्याचा अनेकांना लाभ होईल, असे त्यांनी सांगितले.


            आमदार सिद्धार्थ शिरोळे, निरामय फाऊंडेशनचे रामेश्वर नाईक, सनी निम्हण यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. प्रारंभी उपमुख्यमंत्री श्री. पवार आणि पालकमंत्री श्री. पाटील यांनी शिबिरांची पाहणी केली. उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिबिरासाठी आलेल्या राज्यातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. मंत्री श्री.महाजन यांनीदेखील शिबिराला भेट देऊन नियोजनाची माहिती घेतली व वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संवाध साधला.


            महाआरोग्य शिबिरात विविध प्रकारच्या तपासणीसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले होते. तपासणीनंतर मोफत औषध देण्याची व्यवस्थादेखील करण्यात आली होती. तपासणी नंतर आवश्यकता असल्यास गरजू रुग्णांवर मोफत शस्त्रक्रियेची व्यवस्था करण्यात येणार आहे.


 


0000

Featured post

Lakshvedhi