Wednesday, 3 May 2023

दिलखुलास’ कार्यक्रमात सुनीता नेराळे यांची मुलाखत

 दिलखुलास’ कार्यक्रमात सुनीता नेराळे यांची मुलाखत


 


            मुंबई, दि. 2 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात 'सखी कॅराव्हॅन आणि पर्यटन' संदर्भात सुनीता नेराळे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर' या ॲपवर बुधवार दि. 3 मे, गुरुवार दि. 4 मे 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 यावेळेत प्रसारित होईल.


            'सखी कॅराव्हॅन आणि पर्यटन' संदर्भातील सविस्तर माहिती 'दिलखुलास' कार्यक्रमातून श्रीमती नेराळे यांनी दिली आहे. वरिष्ठ सहायक संचालक वर्षा आंधळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.



0000


२०२१-२२ वर्षाचे गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर

 २०२१-२२ वर्षाचे गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर


 


            मुंबई, दि. २ : महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधत राज्याचे कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी सन २०२१-२२ च्या गुणवंत कामगार पुरस्कारांची घोषणा केली आहे. यात कामगार भूषण पुरस्कारासाठी टाटा मोटर्स लिमिटेड, पिंपरी, पुणे येथील कर्मचारी मोहन गोपाळ गायकवाड यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.


            गुणवंत कामगार कल्याण पुरस्कारासाठी ५१ कामगारांची निवड करण्यात आली आहे. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड, पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय कामगार सन्मान सोहळ्याप्रसंगी या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.


            नोकरी करत असतानाच सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, संघटन आदी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कामगारांना प्रोत्साहन देण्यासाठी मंडळातर्फे १९७९ पासून गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार देऊन गौरविले जात आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडे नोंदीत असलेल्या आणि आस्थापनेत कमीत कमी ५ वर्षे सेवा झालेल्या ५१ कामगारांना दरवर्षी हा पुरस्कार देऊन गौरविले जाते. रु.२५ हजार, मानपत्र, स्मृतीचिन्ह आणि पदक असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार मिळाल्यानंतर पुढील किमान १० वर्षे विविध क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या एका कामगाराची दरवर्षी कामगार भूषण पुरस्कारासाठी निवड केली जाते. रु.५० हजार, मानपत्र, स्मृतीचिन्ह आणि पदक असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.


            गुणवंत पुरस्कारांची घोषणा कामगार दिनी करण्याचे निर्देश कामगार मंत्र्यांनी प्रशासनास दिले होते. त्यानुषंगाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन इतर आवश्यक प्रक्रिया तातडीने पार पाडत या पुरस्कार्थीची नावे जाहीर करण्यात आली आहेत. पुरस्कार वितरण सोहळा मुंबई येथे लवकरच आयोजित करण्यात येणार आहे.


अर्धवेळ कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ


            महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळात कार्यरत अर्धवेळ कर्मचाऱ्यांच्या मानधनात एक हजार रुपयांची वाढ करण्याचे कामगार मंत्री डॉ. खाडे यांनी जाहीर केले. मंडळाच्या शिवण वर्ग, शिशुमंदिर, ग्रंथालय आदी उपक्रमांत कार्यरत सुमारे ३९५ अर्धवेळ कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे.


            यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार श्रीमती उमा खापरे, श्रीमती अश्विनी जगताप, कामगार विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती विनिता वेद - सिंगल, कामगार आयुक्त सतीश देशमुख, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव विवेक कुंभार, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे, पुणे विभागाचे अपर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ, कोकण विभागाचे अपर कामगार आयुक्त श्रीमती शिरीन लोखंडे, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे संचालक एम. आर. पाटील, बाष्पके संचालनालयाचे संचालक डी. पी. अंतापूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.


0000



 मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वन्यजीव मंडळाची 20 वी बैठक संपन्न


राज्यामध्ये वन्यजीव व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करावे


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश


व्याघ्र प्रकल्पांच्या व्यवस्थापन प्रभावी मूल्यांकनात


महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्प देशातील पहिल्या दहा प्रकल्पांत


मुख्यमंत्र्यांनी केले वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन


            मुंबई, दि. २ : राज्यामध्ये वन्यजीव व्यवस्थापन प्रभावीपणे करण्यात येत असल्याने राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्प, संरक्षित क्षेत्र व संरक्षित क्षेत्राच्या बाहेर वाघासह वन्यप्राण्यांची वाढ झाली आहे. भारतीय व्याघ्र प्रगणना २०२२ साठी करण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघांची संख्या ३१२ वरून ३९० झाली आहे. व्याघ्र प्रकल्पांच्या व्यवस्थापन प्रभावी मूल्यांकनात पेंच व्याघ्र प्रकल्प देशातील पहिल्या दहा प्रकल्पांमध्ये आहे. त्याबद्दल आज झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वन्यजीव मंडळाची २० वी बैठक झाली. वनमंत्री सुधीर मुगंटीवार नागपूर येथून दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. मंत्रालयातील मुख्यमंत्री समिती कक्षामध्ये झालेल्या या बैठकीस मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महीप गुप्ता आदींसह वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


            राष्ट्रीय स्तरावर गेल्या चार वर्षांत वाघांची संख्या २,९६७ वरून ३,१६७ झाली आहे. ही वाढ ६.७४ टक्के असून त्या तुलनेत महाराष्ट्रात वाघांच्या संख्येत गेल्या चार वर्षांत २५ टक्के वाढ झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. दर चार वर्षांनी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणामार्फत व्याघ्र प्रकल्पांचे व्यवस्थापन प्रभावी मूल्यांकन केले जाते. २०२२ मध्ये झालेल्या या मूल्यांकनात पेंच व्याघ्र प्रकल्प देशात आठव्या क्रमांकावर आला आहे. अन्य व्याघ्र प्रकल्पांचा मूल्यांकन दर्जा देखील वाढला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


            आज झालेल्या बैठकीत अभयारण्यातील व पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातील, व्याघ्र भ्रमण मार्गातील विकास प्रकल्पांच्या प्रस्तावांवर चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्याने ब्रॉडबॅण्ड कनेक्टीव्हीटीसाठी भूमिगत ऑप्ट‍िकल फायबर केबलचे प्रस्ताव, रस्ते प्रकल्पांचे प्रस्ताव तसेच अन्य विकास कामांच्या प्रस्तावांचा समावेश होता. आजच्या बैठकीत १९ प्रस्ताव राष्ट्रीय वन्यजीव मंडळास शिफारशीसाठी सादर करण्यात आले.


            यावेळी महाडाटा वेब पोर्टलचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. महाराष्ट्रात सुरू असणाऱ्या संशोधन प्रकल्पांच्या परिणामांसाठी एक प्रसार मंच म्हणून हे वेब पोर्टल विकसित करण्यात आले आहे. त्यावरील संशोधन प्रकल्पांमधून भारतीय वन्यजीव संस्था, डेहराडूनद्वारे पुस्तके, जर्नल लेख, तांत्रिक अहवाल, एमएससी प्रबंध, पीएचडी शोध प्रबंध, इंटर्नशिप प्रबंध आणि लोकप्रिय लेख यांचा समावेश असणार आहे.

कल्याण-डोंबिवली मनपात समाविष्ट २७ गावांतील मालमत्ता कर,बांधकांमांबाबत धोरण निश्चित करा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 कल्याण-डोंबिवली मनपात समाविष्ट २७ गावांतील मालमत्ता कर,बांधकांमांबाबत धोरण निश्चित करा


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


 


            मुंबई, दि. २ :- कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांतील मालमत्ता करांबाबत, गावठाण व त्याबाहेरील बांधकामांबाबत सर्वंकष धोरण ठरवण्याबाबत सर्व्हेक्षण करा. आवश्यकतेनुसार समिती स्थापन करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.


            या २७ गावांतील विविध प्रश्नांसंदर्भात सर्वपक्षीय संघर्ष समितीने आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची भेट घेतली. यावेळी श्री संत सावळाराम महाराज स्मारक, तसेच भिंवडी – कल्याण - शीळफाटा रुंदीकरणातील बाधितांना मोबदला याबाबत ही चर्चा झाली. त्याबाबत विविध शिष्टमंडळांनी आपले म्हणणे मुख्यमंत्र्यांकडे सादर केले.


            मंत्रालयात समिती सभागृहात झालेल्या या बैठकीस खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजू पाटील, एमएमआरडीएचे आयुक्त एस. व्हि.आर. श्रीनिवासन, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, कल्याण - डोंबिवली महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. भाऊसाहेब दांगडे, एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड, कैलास जाधव यांच्यासह सर्वपक्षीय संघर्ष समितीचे राजेश मोरे, दिपेश म्हात्रे, राजेश कदम, चंद्रकांत पाटील, गजानन पाटील, महेश पाटील, गजानन मंगरूळकर आदींसह जयेश भाग्यवंत महाराज, आर्किटेक्ट राजीव तायशेटे आदी उपस्थित होते.


            बैठकीत उपस्थित झालेल्या विविध मुद्यांबाबत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी निर्देश दिले.


            ते म्हणाले की, श्री. संत सावळाराम यांचे यथोचित स्मारक व्हावे ही ग्रामस्थांची भावना महत्वाची आहे. त्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेची नवीन प्रशासकीय इमारत आणि हे स्मारक यासाठीचा संयुक्त भूखंडही निश्चित करण्यात आला आहे. इमारत व स्मारकाबाबतचा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावा. हे स्मारक भव्य आणि उत्तम दर्जाचे व्हावे यासाठी नियोजन करा.


            कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट झालेल्या २७ गावांच्या विविध मागण्यांबाबत त्यांच्या नागरी समस्या सोडविण्याकरिता सर्वंकष धोरण आखण्याची आवश्यकता आहे. या गावांच्या मालमत्ता कराबाबत आणि या गावातील बांधकामांबाबत एक धोरण निश्चित करावे लागेल. त्यासाठी सर्वेक्षण करणे, आवश्यकता भासल्यास समिती स्थापन करणे याबाबत कार्यवाही करण्यात यावी.


             भिवंडी-कल्याण-शिळफाटा रस्त्याच्या रुंदीकरणात काही गावांतील जमीनींचे भूसंपादन झाले, पण त्यांचा मोबदला योग्यदराने देण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळ आणि जिल्हाधिकारी यांनी संयुक्तपणे पाहणी करावी आणि त्याबाबतचे धोरण आणि दर निश्चित करावे. जेणेकरून या गावांना वारंवार मोबादल्यासाठी संघर्ष करावा लागणार नाही. हा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी कार्यवाही करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.


            या बैठकीत खासदार डॉ. शिंदे, आमदार श्री. पाटील यांनीही सहभाग घेतला. या २७ गावांना मालमत्ता करात सवलत मिळावी, बांधकामांबाबत धोरण निश्चित व्हावे यासाठी त्यांनी भूमिका मांडली. या २७ गावांतील रस्त्यांसाठी ३५० कोटी रुपये, तसेच पाणी पुरवठा योजनांसाठी २०० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आल्याची माहितीही यावेळी खासदार डॉ. शिंदे यांनी दिली.


0000



 


वृत्त क्र.

Tuesday, 2 May 2023

मान्सूनच्या स्वागताला, चला केरळला !

 मान्सूनच्या स्वागताला, चला केरळला !

- Welcoming Monsoon @Kerala


भारताची ओळख मान्सून

अन् त्याचं प्रवेशद्वार केरळ,

तो तिथं अनुभवाइतकं

रोमांचक दुसरं काय असू शकतं?


मान्सून अनुभवण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी...


विशेष आकर्षण:

• केरळमधील चिंब मान्सूनचा अनुभव

• १८५ वर्षे जुनी वेधशाळा पाहणे

• मान्सून-मॉडेल बनवणाऱ्या वैज्ञानिकाशी गप्पा

• थिरूअनंतपूरम, कोच्ची परिसराला भेटी

• कोवालम, वरकला समुद्रकिनाऱ्यांचा अनुभव

• गर्भश्रीमंत पद्मनाभस्वामी मंदिराला भेट

• कडमकुडी बेट व बॅकवॉटर्सचा अनुभव

• कोच्ची फोर्ट, एलिफंड ट्रेनिंग कॅम्प भेट

• आणि बरेच काही...


३ जून ते ९ जून २०२३

(सहा दिवस, सहा मुक्काम)


शुल्क:

रु. ४१,५०० / प्रति व्यक्ती

(विमानप्रवास, मुक्काम, नाश्ता-जेवण, स्थळ भेटी यांसह सर्वसमावेशक)


तपशील व नावनोंदणीसाठी लिंक:

https://bhavatal.com/Ecotour/Kerala



संपर्क:

९५४५३५०८६२

९४२०६९६४२३

तुपात तळलेले लसूण खाल्ल्याने आरोग्याला होतात आश्चर्यकारक फायदे

 *तुपात तळलेले लसूण खाल्ल्याने आरोग्याला होतात आश्चर्यकारक फायदे !!* 


लसूण हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे, परंतु त्याचे फायदे खाण्याच्या पद्धतीवर देखील अवलंबून असतात. तुपात तळलेल्या लसणाच्या पाकळ्या खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात.


या दोघांमध्ये अनेक पोषक तत्व असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. लसणात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात, तर तुपात जीवनसत्त्वे आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड आढळतात. ते अनेक रोगांशी लढण्याचे काम करतात.


*हृदयासाठी चांगले आहे* 


लसूण हृदयासाठी चांगले मानले जाते. तुपात तळलेले लसूण खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. तुपात तळलेला लसूण देखील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतो. अशा प्रकारे लसणाचे सेवन केल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.


*श्वसनासंबंधित रोग चांगले होतात* 


लसणाचा प्रभाव हा गरम असतो. हिवाळ्यात लसूण तुपासोबत खाल्ल्यास श्वासासंबंधीच्या समस्या टाळता येतात. अशा प्रकारे लसूण खाल्ल्याने श्वसनसंस्था मजबूत होते. दम्यासारख्या आजारातही हे फायदेशीर आहे.


*पचनासाठी चांगले* 


लसूण हे चांगले पाचक मानले जाते. तुपात लसूण तळून खाल्ल्यास बद्धकोष्ठता, अपचन आणि ॲसिडिटी सारख्या पचनाच्या समस्या दूर होतात. लसणाच्या पाकळ्या खाल्ल्याने अन्न पचायला सोपे जाते.


*प्रतिकारशक्ती वाढते* 


तुपात तळलेला लसूण रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतो. लसणात असलेले औषधी गुणधर्म सर्दी आणि फ्लूमध्ये फायदेशीर आहेत. यामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी व्हायरल गुणधर्म असतात जे शरीराला संसर्गापासून वाचवतात. तुपात भाजून लसूण खाल्ल्याने सर्दी-खोकला यांसारख्या समस्या दूर होतात.


*हाडे मजबूत होतात* 


लसणात कॅल्शियमसारखे खनिजे आढळतात जे हाडे मजबूत करण्याचे काम करतात. तुपात तळलेला लसूण खाल्ल्याने हाडे मजबूत होतात, सूज आणि दुखण्याची समस्याही दूर होते.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

*डॉ. प्रमोद ढेरे,*


*सर्व ग्रुप मेंबर ना विनंती,* 

*तुम्ही ज्या दुसऱ्या इतर ग्रुप वर कार्यरत आसाल,* 

 *त्या सर्व ग्रुप वर आरोग्य विषयक माहिती फॉरवर्ड करा 🙏🏻

राज्यात 6 मेपासून छत्रपती शाहू महाराज युवाशक्तीकरिअर शिबीरांचे आयोजन

 राज्यात 6 मेपासून छत्रपती शाहू महाराज युवाशक्तीकरिअर शिबीरांचे आयोजन


- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा


 


            मुंबई, दि. 2 : कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र घडविण्याच्या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत विद्यार्थी, युवक-युवतींसाठी राज्यातील 36 जिल्ह्यांत जिल्हास्तरावर तसेच राज्यातील सर्व 288 मतदारसंघांत 6 मे ते 6 जून 2023 या कालावधीत छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. नवीन शैक्षणिक वर्ष आता सुरु होत असून त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या करिअरविषयक विविध संधींची माहिती या शिबिरांमधून दिली जाणार आहे. यामध्ये विद्यार्थी, युवक-युवतींसह पालकांचेही करिअरविषयक विविध संधींसंदर्भात समुपदेशन केले जाणार आहे, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.


            राज्यातील ग्रामीण, शहरी अशा सर्व भागातील विद्यार्थी, युवक-युवती व पालकांनी या शिबिरांमध्ये सहभागी व्हावे व बदलत्या काळास अनुसुरुन ठिकठिकाणी सुरु झालेल्या विविध शैक्षणिक, व्यावसायिक इत्यादी अभ्यासक्रमांची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन मंत्री श्री. लोढा यांनी केले.


            राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये नियोजित ठिकाणी शिबीरांचे उद्घाटन जिल्ह्यांचे पालकमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. या करिअर शिबीरांच्या माध्यमातून विद्यार्थी, युवक-युवती व पालकांना विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळणार आहे. करियर शिबीराच्या ठिकाणी विविध स्टॉलच्या माध्यमातून विविध अभ्यासक्रमांची तसेच इतर माहिती देण्यात येणार आहे. इयत्ता दहावीनंतर करिअर कसे निवडावे, दहावी नंतरच्या शिक्षणाच्या विविध संधी, बारावी नंतरच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा, व्यक्तिमत्व विकास यासोबतच इतर विविध विषयांबाबत मार्गदर्शन देण्यात येणार आहे. आयटीआय व्यवसाय अभ्यासक्रम, इंजीनियरिंग व तंत्रनिकेतन ( पॉलिटेक्निक ) अभ्यासक्रम, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ व त्यातील विविध अभ्यासक्रम, शैक्षणिक कर्ज व शिष्यवृत्तीविषयक विविध योजना, रोजगार व स्वयंरोजगारविषयक विविध योजना, स्थानिक शैक्षणिक संस्था आदींविषयी या शिबिरांमधून सविस्तर मार्गदर्शन देण्यात येणार आहे. परदेशातील उच्च शिक्षणासंबंधीही मार्गदर्शन देण्यात येणार आहे.


            या संधीचा लाभ घेण्यासाठी स्थानिक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेशी (आयटीआय) संपर्क साधावा, तसेच सोबत जोडलेल्या क्यूआर कोड ( QR CODE ) च्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, युवक-युवतींनी नोंदणी करून शिबीरात सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन., व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगांबर दळवी यांनी केले आहे.

Featured post

Lakshvedhi