Tuesday, 4 April 2023

जर्मनीला कुशल मनुष्यबळाची गरज भागविण्यासाठी महाराष्ट्राकडून अपेक्षा

 जर्मनीला कुशल मनुष्यबळाची गरज भागविण्यासाठी महाराष्ट्राकडून अपेक्षा

- एकिम फॅबिग

            मुंबई, दि. 4 : जर्मनीला दरवर्षी विविध कौशल्य असलेल्या किमान ४ लाख प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता भासत असून ही गरज भागविण्यासाठी युवा लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राकडून जर्मनीला मोठी अपेक्षा असल्याचे जर्मनीचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत एकिम फॅबिग यांनी आज येथे सांगितले. 


            यापूर्वी चेन्नई येथे वाणिज्यदूत म्हणून काम केलेल्या एकिम फॅबिग यांची जर्मनीच्या मुंबईतील वाणिज्यदूत पदी नियुक्ती झाली असून सोमवारी (दि. ३) त्यांनी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.


            जर्मनीला नर्सेस, इलेक्ट्रिशिअन, आदरातिथ्य क्षेत्र व्यावसायिक, सोलर युटिलिटी तंत्रज्ञ आदींची तातडीने आवश्यकता असून आपल्या मुंबईतील कार्यकाळात जर्मनीची कौशल्याची गरज व भारताकडील मनुष्यबळाची उपलब्धता याची सांगड घालण्यावर आपला भर असेल असे फॅबिग यांनी सांगितले. 


            जर्मनीच्या ८०० कंपन्या आज भारतात काम करत असून त्यापैकी किमान ३०० कंपन्या पुणे येथे असून जर्मनीतून येणाऱ्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी एक तृतीयांश गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात येत असल्याचे त्यांनी सांगितले. जर्मनीतील महाराष्ट्रात काम करीत असलेल्या कंपन्या समाधानी असल्याचे फॅबिग यांनी सांगितले. जर्मनीने मुंबई तसेच नागपूर येथील मेट्रो प्रकल्पासाठी ५०० दशलक्ष युरो गुंतवणूक केली आहे.


            आज ३५००० भारतीय विद्यार्थी जर्मनी मध्ये शिकत असून आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीयांची मोठी संख्या आहे. एकट्या बर्लिनमध्ये १७००० भारतीय आयटी तंत्रज्ञ राहत आहेत. यावर्षी जर्मनीला २०० नर्सेसची आवश्यकता असून त्या दृष्टीने केरळ येथील एका नर्सिंग कॉलेजशी करार करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.


            भारताशी आर्थिक व राजकीय संबंध वृद्धिंगत करण्याशिवाय जर्मनी भारतीयांसाठी प्रवास सुलभीकरण, सांस्कृतिक सहकार्य व विशेषतः चित्रपट सृष्टीशी सहकार्य वाढविण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.


            जर्मनीचा मुंबईतील व्हिजा सेक्शन जगातील तिसरा मोठा असून लवकरच तो जगातील सर्वात मोठा व्हिजा सेक्शन होणार असल्याचे त्यांनी सांगितले.


बायर्न म्युनिक फुटबॉलचा प्रचार प्रसार करणार


            भारतात फुटबॉल प्रचलित करण्यासाठी जर्मनीचा प्रसिद्ध फुटबॉल क्लब बायर्न म्युनिक देशाच्या ग्रामीण भागात फुटबॉल प्रशिक्षण शिबिरे व स्पर्धांचे आयोजन करणार असून जर्मनी येथील विविध विद्यापीठांमध्ये संस्कृत शिवाय मराठी, तामिळ भाषा शिकविणारे विभाग देखील असल्याचे त्यांनी सांगितले.


            जर्मनीच्या वाणिज्यदूतांचे महाराष्ट्रात स्वागत करताना राज्यपालांनी दोन देशांच्या विश्वासाच्या संबंधांना उजाळा दिला. शाळेत शिकत असताना आपल्या शाईच्या पेनाची निब 'मेड इन जर्मनी' असायची अशी आठवण सांगून जर्मनीची सध्याची कौशल्याची गरज पुरविण्यासाठी महाराष्ट्र निश्चितच मदत करेल, असे राज्यपालांनी सांगितले.


            महाराष्ट्रात नव्यानेच राज्य कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यात आले असून जर्मनीने विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणात सहकार्य केल्यास त्यांची प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज पूर्ण होईल, असे राज्यपालांनी सांगितले.

तुपात तळलेले लसूण खाल्ल्याने आरोग्याला होतात आश्चर्यकारक फायदे !!*

 *तुपात तळलेले लसूण खाल्ल्याने आरोग्याला होतात आश्चर्यकारक फायदे !!* 


लसूण हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे, परंतु त्याचे फायदे खाण्याच्या पद्धतीवर देखील अवलंबून असतात. तुपात तळलेल्या लसणाच्या पाकळ्या खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात.


या दोघांमध्ये अनेक पोषक तत्व असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. लसणात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात, तर तुपात जीवनसत्त्वे आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड आढळतात. ते अनेक रोगांशी लढण्याचे काम करतात.


*हृदयासाठी चांगले आहे* 


लसूण हृदयासाठी चांगले मानले जाते. तुपात तळलेले लसूण खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. तुपात तळलेला लसूण देखील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतो. अशा प्रकारे लसणाचे सेवन केल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.


*श्वसनासंबंधित रोग चांगले होतात* 


लसणाचा प्रभाव हा गरम असतो. हिवाळ्यात लसूण तुपासोबत खाल्ल्यास श्वासासंबंधीच्या समस्या टाळता येतात. अशा प्रकारे लसूण खाल्ल्याने श्वसनसंस्था मजबूत होते. दम्यासारख्या आजारातही हे फायदेशीर आहे.


*पचनासाठी चांगले* 


लसूण हे चांगले पाचक मानले जाते. तुपात लसूण तळून खाल्ल्यास बद्धकोष्ठता, अपचन आणि ॲसिडिटी सारख्या पचनाच्या समस्या दूर होतात. लसणाच्या पाकळ्या खाल्ल्याने अन्न पचायला सोपे जाते.


*प्रतिकारशक्ती वाढते* 


तुपात तळलेला लसूण रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतो. लसणात असलेले औषधी गुणधर्म सर्दी आणि फ्लूमध्ये फायदेशीर आहेत. यामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी व्हायरल गुणधर्म असतात जे शरीराला संसर्गापासून वाचवतात. तुपात भाजून लसूण खाल्ल्याने सर्दी-खोकला यांसारख्या समस्या दूर होतात.


*हाडे मजबूत होतात* 


लसणात कॅल्शियमसारखे खनिजे आढळतात जे हाडे मजबूत करण्याचे काम करतात. तुपात तळलेला लसूण खाल्ल्याने हाडे मजबूत होतात, सूज आणि दुखण्याची समस्याही दूर होते.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

*डॉ. प्रमोद ढेरे,*


*सर्व ग्रुप मेंबर ना विनंती,* 

*तुम्ही ज्या दुसऱ्या इतर ग्रुप वर कार्यरत आसाल,* 

 *त्या सर्व ग्रुप वर आरोग्य विषयक माहिती फॉरवर्ड करा 🙏🏻*


_*

बृहन्मुंबई शहरात 8 एप्रिलपर्यंतजमावबंदी आदेश जारी

 बृहन्मुंबई शहरात 8 एप्रिलपर्यंतजमावबंदी आदेश जारी


            मुंबई, दि. 3 : बृहन्मुंबई शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी बृहन्मुंबई शहरात 8 एप्रिल 2023 पर्यंत जमावबंदी आदेश जारी केला आहे.


           या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तिंचा जमाव करणे, मोर्चा काढणे, जमाव करुन ध्वनीवर्धकाचा, सांगितीय बँड, फटाके फोडणे यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. विवाह समारंभ आणि विवाहप्रथेशी संबंधित अन्य समारंभ, अत्यंविधी कार्यक्रम, कंपन्या, सहकारी संस्था आणि अन्य संस्था व संघटनांच्या वैधानिक बैठका, क्लबमध्ये होणारे कार्यक्रम, सहकारी संस्था तसेच अन्य संस्थांच्या नियमित कामकाजाचा भाग म्हणून होणारे कार्यक्रम यांना या बंदी आदेशातून वगळण्यात आले आहे.


            चित्रपटगृहे, नाट्यगृहे तसेच सार्वजनिक मनोरंजनाची अन्य ठिकाणे, न्यायालये, शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच अन्य शैक्षणिक संस्था, कंपन्या, कारखाने, दुकाने तसेच अन्य आस्थापनांमध्ये नियमित व्यापार, व्यवसाय या कारणांनी होणाऱ्या जमावास या जमावबंदी आदेशातून वगळण्यात आले आहे, असे आदेश पोलीस उप आयुक्त (अभियान) विशाल ठाकूर यांनी काढले आहे.


0000

भूकंप धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातदळण-वळणाच्या सुविधा कराव्यात

 भूकंप धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातदळण-वळणाच्या सुविधा कराव्यात


- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे


            मुंबई, दि. 3 : ठाणे जिल्ह्यातील शहापूर परिसरातील शहापूर, डहाणू, पालघरमधील काही गावांमध्ये भूकंपाचे धक्के बसले होते. मोबाईल नेटवर्क नसल्याने स्थानिकांना मदतीसाठी अडथळे येत होते. या पार्श्वभूमीवर संबंधित गावांमध्ये मोबाईल नेटवर्क उपलब्ध होण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.


            शहापूर परिसरातील गावांमध्ये भूकंपाचे धक्के बसल्यानंतर उद्भवलेल्या समस्यांबाबत उपाययोजना कराव्यात. तसेच हॅम रेडिओ, वॉकी-टॉकी सारखी यंत्रणा उपलब्‍ध करून द्यावी, एनडीआरएफ व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांच्या माध्यमातून गावकऱ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचे आयोजन करावे. आपत्ती व्यवस्थापन आराखड्यानुसार तयारी करण्याचे निर्देश दिले असून, यामुळे गावकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.


०००



 



कृषी संशोधक डॉ. सुनील कराड यांचे'दिलखुलास' कार्यक्रमात मार्गदर्शन

 कृषी संशोधक डॉ. सुनील कराड यांचे'दिलखुलास' कार्यक्रमात मार्गदर्शन


 


            मुंबई, दि. 3 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात कृषी संशोधन क्षेत्रात योगदान देणारे डॉ. सुनील कराड यांनी केलेले मार्गदर्शन प्रसारित होणार आहे. आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरुन व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर बुधवार दि. 5 आणि गुरुवार दि. 6 एप्रिल 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत हा कार्यक्रम प्रसारित होईल.


            अन्न सुरक्षेचे आहारातील महत्व सर्वसामान्य जनतेला समजावे म्हणून देशभरात आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्ताने विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. या निमित्ताने मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात ‘मिलेट महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कृषी संशोधक डॉ. कराड यांनी मिलेटविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी केलेले हे मार्गदर्शन ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून प्रसारित होणार आहे.



वन आरक्षित जमिनीच्या तक्रारी सोडविण्यासाठीएक खिडकी पद्धत आणणार

 वन आरक्षित जमिनीच्या तक्रारी सोडविण्यासाठीएक खिडकी पद्धत आणणार


— वन मंत्री सुधीर मुनगंटीवार


विधानसभेतील आश्वासनासंदर्भात बैठकीत निर्णय


 


            मुंबई, दि. 3 : खासगी वनांबाबत येणाऱ्या अडचणी सोडविणे, वन आरक्षित जमीन याबाबतच्या तक्रारी सोडविण्यासाठी आणि यामध्ये सुलभता आणण्यासाठी एक खिडकी पद्धत वन विभागामार्फत आणण्यात येईल, असे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.


            विधानसभेत दिलेल्या आश्वासनानुसार, खासगी वनांबाबत येणाऱ्या अडचणी व त्याबाबत कायद्यात करावी लागणारी सुधारणा याबाबतची आढावा बैठक आज वन मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार किसन कथोरे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.


            मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, मा. सर्वोच्च न्यायालयाचे निर्बंध विचारात घेऊन या विषयामध्ये सुलभता येण्यासाठी, तसेच शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा राज्य शासनाचा पूर्ण प्रयत्न असणार आहे. यासाठीच एक खिडकी पद्धत तयार करण्यात येईल.


            महाराष्ट्र खासगी वने (संपादन) अधिनियम, १९७५ च्या तरतुदींच्या अनुषंगाने कार्यवाही करताना मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय आणि याबाबत राज्यात करावयाची कार्यवाही याचा पूर्ण अभ्यास करण्यात येईल. यानंतर या विषयाबाबत केंद्र सरकारशी चर्चा करुन याबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही मंत्री श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले.


            या बैठकीमध्ये महाराष्ट्र खासगी वने (संपादन) अधिनियमाचे कलम २२ (अ), कलम ६, मा.सर्वोच्च न्यायालयाचे विविध आदेश, शासनाची परिपत्रके व शासन निर्णयांच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली.


००००



 



 

वन विभागामार्फत होणाऱ्या प्रत्येक कामाचेजिओ टॅगिंग आवश्यक

 वन विभागामार्फत होणाऱ्या प्रत्येक कामाचेजिओ टॅगिंग आवश्यक


- वन मंत्री सुधीर मुनगंटीवार


• चांदोली अभयारण्याचा विकास गतीने करणार


• दत्तटेकडी परिसरही विकसित करणार


 


            मुंबई, दि. 3 : वन विभागामार्फत आगामी काळात होणाऱ्या प्रत्येक कामांबाबत जिओ टॅगिंग करणे आवश्यक असल्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. तसेच येणाऱ्या काळात प्रत्येक व्याघ्र प्रकल्पाने पर्यटकाना आकर्षित करण्यासाठी फेसबुक पेज सुरु करावे, अशी सूचना यावेळी केली.


            सांगली येथील चांदोली अभयारण्य आणि दत्त टेकडी विकसित करण्याबाबतची बैठक आज वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार जयंत पाटील, आमदार मानसिंहराव नाईक, माजी आमदार शिवाजीराव नाईक, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.


            मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, वन विभागांतर्गत करण्यात येणाऱ्या कामाची माहिती स्थानिक लोकप्रतिनिधी आणि तेथील नागरिकांना होणे गरजेचे आहे. त्यामुळे वन विभागातर्फे करण्यात येणाऱ्या कामाचे टॅगिंग करणे बंधनकारक करण्यात येईल.


            सांगली जिल्ह्यातील चांदोली अभयारण्य येथे झोलंबी पठार आहे. कास पठार सारखे हे पठार आणखी विकसित कसे करता येईल, जेणेकरुन येथे अधिक पर्यटक येऊ शकतील याचा अभ्यास करावा. चांदोली अभयारण्यात येत्या काळात वाघाची जोडी सोडता येऊ शकेल का हे सुद्धा तपासून घ्यावे, असे मंत्री श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले.


            आगामी काळात येथे क्रोकोडाइल पार्क, सर्प उद्यान, बिबट सफारी, मत्स्यालय यासारखे प्रकल्प उभे करताना याबाबतचा अभ्यास करावा. चांदोली अभयारण्य परिसरास कुंपण कसे घालता येईल यासाठी निधीचे नियोजन करुन याबाबत विस्तृत नियोजन करावे, असेही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.


            इस्लामपूर येथील दत्त टेकडी विकसित करण्याच्या कामाला गती द्यावी. यासाठी येत्या दोन महिन्यांत याबाबतचा आराखडा तयार करुन स्थानिक लोकप्रतिनिधींना दाखवून सादर करावा. वन विभागामार्फत या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर दत्त टेकडी विकसित करण्याचे काम सुरु करावे. आगामी दत्तजयंतीपर्यंत हे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात यावे, असे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

Featured post

Lakshvedhi