Sunday, 5 March 2023

दिलखुलास' कार्यक्रमात 'कॉर्नेल महा-60' उपक्रमातील नवउद्योजकांची मुलाखत

 दिलखुलास' कार्यक्रमात 'कॉर्नेल महा-60' उपक्रमातील

नवउद्योजकांची मुलाखत.

            मुंबई, दि. 3 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात 'कॉर्नेल महा-60' उपक्रमातील नवउद्योजक कीर्ती दातार, मेघा फणसळकर, आशिष गोडघाटे, सुजाता पवार यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सोमवार दि. 6 आणि मंगळवार दि. 7 मार्च 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल.


            राज्यशासनाच्या उद्योग विभाग आणि अमेरिकेच्या कॉर्नेल विद्यापीठात एक सामंजस्य करार झाला असून याचा फायदा राज्यातील नवउद्योजकांना होणार आहे. अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठ, न्यूयॉर्क यांच्या सहयोगाने उद्योजकांसाठी मुंबईत जागतिक दर्जाचे बिझनेस अॅक्सिलेटर स्थापन करण्यात आले आहे. भारतातील हा पहिलाच अॅक्सिलेटर उपक्रम आहे. या माध्यमातून 'कॉर्नेल महा-60' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत वर्षभर राज्यातील 60 निवडक तरूण उद्योजकांना याअंतर्गत प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षण पूर्ण केलेल्या नवउद्योजकांशी 'दिलखुलास' कार्यक्रमातून संवाद साधला आहे. कीर्ती दातार, मेघा फणसळकर, आशिष गोडघाटे, सुजाता पवार या नवउद्योजकांनी 'दिलखुलास' कार्यक्रमातून उपयुक्त माहिती दिली आहे. वरिष्ठ सहायक संचालक अर्चना शंभरकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.


0000

गिर्यारोहण. धाडसी उपक्रम





 

बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आणि अनुसंधान केंद्राच्या विस्तारीकरणाचे काम लवकरच

 . बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आणि अनुसंधान

 केंद्राच्या विस्तारीकरणाचे काम लवकरच


                               - वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन


             मुंबई, दि. 3 : नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आणि अनुसंधान केंद्र विस्तारीकरणाच्या प्रकल्पास निधी मंजूर झालेला आहे. या दोन्ही प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या जागेसंदर्भातील प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने याबाबत लवकरच बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत सांगितले.


            उत्तर नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आणि अनुसंधान केंद्राच्या विस्तारीकरणाच्या प्रकल्पाबाबतचा प्रश्न विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानसभा सदस्य सर्वश्री विकास ठाकरे, नितीन राऊत यांनी उपस्थित केला होता.


               मंत्री श्री. महाजन म्हणाले, हा प्रकल्प पूर्ण करण्याकरिता आवश्यक असलेल्या जागेपैकी १५०० चौ.मी. जागेवर न्यू ग्रँट एज्युकेशन संस्थेची इमारत असून या संस्थेच्या जागेचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक जागेसंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींसमवेत प्रत्यक्ष पाहणी करून बैठक घेण्यात येईल.

अनुसूचित जमातीच्या जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी नवीन धोरण आणणार

 अनुसूचित जमातीच्या जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी नवीन धोरण आणणार.


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            मुंबई, दि. 3 : राज्यात अनुसूचित जमातीच्या जात वैधता प्रमाणपत्रांबाबत आलेल्या तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेता राज्यात जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी नवीन धोरण आणणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


        अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र मिळवताना येणाऱ्या अडचणींबाबत सदस्य रमेश पाटील यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. याचे उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, जात वैधता प्रमाणपत्र देताना जाणीवपूर्वक विलंब लावला जात असल्याच्या तक्रारी येत असतात. लोकांना त्रास होऊ नये या अनुषंगाने जात पडताळणी समित्यांचे काम पारदर्शकपणे पार पडावे यासाठी नवीन धोरण आणणार असून जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांची संख्या वाढविणे, कामकाज अधिक गतिमान करण्यावर भर देण्यात येईल. वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी असणाऱ्या अधिकाऱ्यांना कसे बदलता येईल याबाबतीतही निर्णय घेण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.


         या तारांकित प्रश्नावरील चर्चेत सदस्य भाई जगताप यांनी सहभाग घेतला.


***

राज्यात ३७ कुटुंब न्यायालये कार्यरत

 राज्यात ३७ कुटुंब न्यायालये कार्यरत

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

            मुंबई, दि. 3 : राज्य शासनाने राज्यात एकूण 41 कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. सद्य:स्थितीत राज्यात ३७ कुटुंब न्यायालये कार्यरत आहेत. मा. उच्च न्यायालयाकडून प्राप्त माहितीनुसार सहा अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्याबाबत शासन स्तरावर कार्यवाही सुरु असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.                      


        राज्यात कुटुंब न्यायालयांची संख्या वाढविण्याबाबत विधान परिषद सदस्य विलास पोतनीस यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.


         उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, राज्यात कौटुंबिक न्यायालयांची संख्या गरजेनुसार वाढविण्यात येत आहे. कौटुंबिक न्यायालयांच्या गरजेनुसार पायाभूत सोयी सुविधांचे बळकटीकरण केले जाईल. तसेच एकाच विषयाचे खटले तीन ठिकाणी असतील त्यांचे एकत्रीकरण केले जाईल. मुंबईमध्ये प्रलंबित खटल्यांची संख्या लक्षात घेता मुंबईसाठी नव्याने कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्यात येतील.  


            या तारांकित प्रश्नाच्या चर्चेत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सहभाग घेतला.



राज्यात श्वान दत्तक योजना सुरु करणार

 राज्यात श्वान दत्तक योजना सुरु करणार

- पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील.

            मुंबई, दि. 3 : शहरात भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून वारंवार होत आहे. श्वानांचे संगोपन करण्यासाठी राज्यात श्वान दत्तक योजना सुरु करणार असल्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत सांगितले.


            सदस्य सर्वश्री प्रताप सरनाईक, अतुल भातखळकर, सुनील टिंगरे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे शहरातील भटक्या कुत्र्यांच्या समस्यांबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.


                 मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, प्राणी प्रेमी किंवा दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीला दत्तक योजनेच्या माध्यमातून श्वान दत्तक दिले जाईल. याबाबत विहीत धोरण ठरविण्यासाठी एक समिती गठित करण्यात येईल. समितीत या विषयाबाबत काम करणाऱ्या सामाजिक संस्थांचाही सहभाग करून घेण्यात येईल, असेही मंत्री श्री. विखे पाटील यांनी सभागृहात स्पष्ट केले.

पालखी, भाव स्पर्शी

 पालखी 

"ह्या वर्षी तरी पालखीक नेतयस ना.....?? थरथरत्या आवाजात भिकू पेडणेकरानी दशरथला विचारले . तसा तो वैतागला."ओ तात्यानु पडून रवा हो ..?? या वयात खय पालखी ….पालखी करताव. ..हयसूर वेळ कोणाक हा ...?? तुमचो नातू दोन वर्षांनी घरी इलोय . त्याच्याबरोबर राहू की चार दिवस... गेलो की पुन्हा दोन वर्षा येऊचो नाय…." 

भिकू तात्यांच्या डोळ्यात पाणी आले . "तसा नाय रे झिला .... पण बरीच वर्षे झाली पालखी खांद्यावर घेऊन . आता लय वाटता रे जाण्यापूर्वी बघूची." बोलता बोलता त्यांच्या डोळ्यातून कधी पाणी वाहू लागले ते कळलेच नाही.

भिकू पेडणेकर वय वर्षे 85 .. सध्या सर्व काही बिछान्यावर . बाहेर पडले तर व्हीलचेयरवरच . मुलगा दशरथ पेडणेकर सध्या मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर...पण आता निवृत्तीच्या वाटेवर . तर नातू निशिकांत पेडणेकर इंजिनियर ...सध्या परदेशात वास्तव्य . आला तरी केवळ दहा दिवसासाठी भारतात येतो.


भिकू तात्या कोकणातून मुंबईत कामासाठी आले आणि पक्के चाकरमानी बनले .पण सणासुदीला कोकणात जाणे काही थांबले नाही . दरवर्षी होळीला जायचे.... पालखी नाचावयाची….. कुटुंबासाठी नवस बोलायचं आणि तो फेडण्यासाठी पुन्हा पालखीला हजर राहायचे. दशरथ लहानपणी त्यांच्याबरोबर जायचा पण लग्न झाल्यावर बायकोला घेऊन गेला आणि त्यानंतर गावाचे तोंड पाहिले नाही.


 पुढे पत्नी गेल्या नंतर त्यांनीही गावी जाणे सोडले . गेल्या चार वर्षांपासून ते अंथरुणावर खिळून आहेत . दरवर्षी होळी आली की केविलवाण्या चेहऱ्याने दशरथला पालखीला नेण्यासाठी विनवतात. पण कोणालाच त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. मुकाटपणे डोळे पुसत ते शांतपणे बसले .इतक्यात निशी आत आला .."काय झाले पपा..?? आजोबा का असे बसलेत ...?? 

"अरे काही नाही रे ...?? गावी जाऊ म्हणतात पालखीला .. बरीच वर्षे गेलो नाही म्हणतात. आता घेऊन चल ... पण आता जमेल का ह्यांना प्रवास .. ती धावपळ ... त्यात कोकणातले रस्ते खराब ..."

 निशीने नुसतीच हम्म...!! करीत मान डोलावली . "पालखीबद्दल बरेच काही ऐकलं आहे मी .. त्यांची इच्छा असेल तर चार दिवस जाऊया पपा ... "तो सहज स्वरात म्हणाला.

"अरे काय ....?? सोपे वाटते का तुला गावी जाणे . तिथे प्रवास बारा तासाचा ...पाण्याचा प्रॉब्लेम.टॉयलेटचा प्रॉब्लेम.." दशरथ चिडून बोलले.

"तरीही माणसे राहतात ना तिथे ...?? पपा जगात इथल्यापेक्षाही भयानक परिस्थितीत लोक राहतात . मलाही काम करताना मनासारखे काही मिळत नाही . चला यावर्षी जाऊच सगळे चार दिवस .. मी गाडीची सोय करतो "असे बोलून वळला पण नजरेच्या कोपऱ्यातून आजोबांच्या डोळ्यातील चमक त्याला सुखावून गेलीच.


नातवाच्या तोंडातून सर्व ऐकताना भिकू तात्याचे मन प्रसन्न होत होते . अंगात नवचैतन्य आले .दुसऱ्या दिवशी पहाटे ते निघाले . आपल्या मुलाचे आणि नातवाचे मन पालटू नये म्हणून भिकूतात्या स्वतःला फिट दाखविण्याचा प्रयत्न करीत होता . दशरथलाही वडिलांचे हे रूप नवीनच होते . जसजसे गाव जवळ येऊ लागले तसतसे भिकुतात्याच्या चेहऱ्यावर उत्साह दिसू लागला .एखाद्या लहान मुलाच्या कुतूहलाने तो सारा गाव नजरेत साठवून घेत होता . मध्येच नातवाला जुन्या आठवणी सांगत होता . निशीही कौतुकाने सगळे ऐकत होता.

 घरी पोचताच एखाद्या राजाप्रमाणे त्याचे स्वागत झाले . चुलतभावाने तर डोळ्यात पाणी आणून मिठी मारली. दोघांच्या डोळ्यातील अश्रू काही थांबत नव्हते . रात्री दशरथ आणि निशी होळी पेटवायला गेले तेव्हा सर्वजण त्यांची मायेने विचारपूस करीत होते.

निशीने वडिलांना विचारलेही ..की ओळख नसताना देखील ही माणसे कशी आपलेपणाने बोलतात ….??दशरथ हसून म्हणाला "अरे ...हीच तर खरी कोकणाची ओळख आहे . परक्याशी देखील आपलेपणाने वागतात . आज ती आपल्याला भिकूची पोर म्हणजेच आपली माणसे म्हणून ओळखतात.

दुसऱ्या दिवशी पालखी येणार म्हणून रात्रभर भिकू झोपलाच नाही . सकाळी लवकर उठून ठेवणीतले कपडे घालून तो पालखीची वाट पाहत बसला . चुलत भावाला जवळ बोलावून त्याने कानात काही सांगितले तसे त्याने हसत मान डोलावली . मग दशरथ जवळ येऊन म्हणाला "तात्या बोलतत पालखी तुझ्या खांद्यावरून घरात घेऊन ये ."काही न बोलता दशरथने मान डोलावली . पालखी घराजवळ आली आणि दशरथने ती एक बाजूने खांद्यावर घेतली त्याच क्षणी त्याला भरून आले . एक वेगळीच सुखाची अनुभूती त्याच्या शरीरातून वाहू लागली.त्याच्या डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागले . प्रत्यक्ष देवाला घेऊन आपल्या घरी चाललोय ही भावनाच त्याचा उर भरून येण्यास पुरेशी होती . दाटल्या डोळ्यांनी त्याने अंगणात प्रवेश केला . समोर व्हीलचेयरवर वडील बसले होते . त्यांच्या चेहऱ्याकडे पाहूनच त्याला कळले आपण आयुष्यात कोणते सुख कमाविले आहे . वडील आश्चर्याने मागे का पाहताय..?? म्हणून त्याने मागे नजर वळवली आणि आश्चर्याचा अजून एक धक्का त्याला मिळाला .दुसऱ्या बाजूने निशी पालखी घेऊन उभा होता . अतीव आनंदाने सर्वांनी पालखीची पूजा केली आणि निरोप दिला.

दुसऱ्या दिवशी सर्व परत निघाले . प्रवासात दशरथ थट्टेत भिकूतात्याला म्हणाला .."ओ तात्यानु.. देवाकडे काय मागीतलाव ...?? 

"अरे ..त्या देवाकडे काय सारखासारखा मागूचा .. आपला काय ता आपल्या नशिबात .. उगाच देवावर लोड कित्याक ..? काय मागूचा हवा म्हणून खांद्यावरून घेवून येताव की काय ..?? सर्व हसले.

 दुसऱ्या दिवशी सर्व मुबंईला माघारी निघाले .रात्री घरी येऊन सर्व झोपी गेले. पण दुसऱ्या दिवशी भिकूतात्या उठलाच नाही . मेल्यावरही त्याच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसत होते . बातमी कळविण्यासाठी दशरथने गावी फोन केला .फोनवर रडत रडत म्हणाला "पालखीला जायची त्यांची अंतिम इच्छा होती ती पूर्ण झाली आणि समाधानाने गेले..

 पलीकडून चुलते म्हणाले "शेवटची पालखी त्यांनी खांद्यावर घेऊन घरात आणली तेव्हाच म्हणाले होते जो पर्यंत माझा मुलगा पालखी स्वतःच्या खांद्यावर घेत नाही तोपर्यंत मला मरण देऊ नकोस.त्यांनी तुला खांद्यावर घेतलेले बघायचे आहे मला . काल तुम्ही दोघांनी पालखी खांद्यावर घेतलीत तेव्हाच त्याचे जाणे नक्की झाले होते.


© श्री. किरण कृष्णा बोरकर

Featured post

Lakshvedhi