🍁 *तरुणाई अशी हवी* 🍁
कर्नाटकातल्या अगुंबे घाटाच्या वाटेवर असलेलं सीतानदी नावाचं छोटंसं गांव. त्या वाटेवर असलेलं एक छोटंसं हॉटेल कम स्थानिक पदार्थ विकण्याचं दुकान श्रीसत्यनारायण नावाचं. मेनू अगदी मर्यादित, मोजकेच, अगदी घरगुती चवीचे पदार्थ, तेही तिथले खास स्थानिक, म्हणजे शहाळ्याची मलई आणि पाणी वापरून बनवलेला सायीसारखा मऊसूत, तलम नीरडोसा, फणसाच्या पानांच्या द्रोणात वाफवलेली खोट्टे इडली, गोडसर मंगळूर बन्स आणि गोल गोळे भज्जी, प्यायला चहा, कॉफी आणि खास लोकल मसाला घालून बनवलेला कषाय. दुकान चालवणारं शेणॉय आडनावाचं चौकोनी कुटुंब. गल्ल्याच्या मागच्या बाजूच्या स्वयंपाकघरात पदार्थ बनवणारे बाबा, गल्ल्यावर बसलेली आई, आलेल्या लोकांना पदार्थ सर्व करणारी अकरावी-बारावीतली मुलगी आणि दुकान सांभाळणारा आठवी-नववीतला चटपटीत, गोड, हसरा मुलगा. त्याची सेल्स पीच इतकी प्रभावी की मार्केटिंगच्या प्राध्यापकांनी त्याच्याकडून धडे घ्यावेत.
आम्ही त्या हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी थांबलो तेव्हा सकाळचे साडे-आठ वाजले होते. हॉटेलमध्ये त्या वेळी सुद्धा बऱ्यापैकी गर्दी होती. आई-वडील आणि बहीण त्यांच्या त्यांच्या कामात गुंग होते आणि मुलगा उत्साहाने आलेल्या लोकांना दुकानातले वेगवेगळे पदार्थ दाखवायचं, त्यांच्या किंमती सांगायचं काम करत होता, तेही अंगावर पडलंय म्हणून अनिच्छेने नव्हे तर मनापासून.
काही लोक ऑर्डर देऊन पदार्थ टेबलावर येईपर्यंत दुकानात विक्रीला ठेवलेले पदार्थ बघत होते आणि त्यातला प्रत्येक गिऱ्हाईकाचा, त्याला कुठली भाषा समजते ह्याचा अंदाज घेऊन तो मुलगा, अद्वैत त्याचं नाव, त्या त्या भाषेत त्यांच्याशी संवाद साधत होता. इंग्रजी, हिंदी, कन्नड आणि मधूनच आई-वडिलांशी कोकणी असा त्याचा चार भाषांमधून सफाईदारपणे संवाद सुरु होता आणि तोही इतक्या लाघवीपणे की एक वस्तू बघायला आलेली व्यक्ती केवळ त्याच्या बोलण्याच्या हातोटीमुळे चार जिन्नस जास्त विकत घेत होती.
माझ्या मैत्रिणीने तिथे विकायला ठेवलेली खोबरेल तेलाची बाटली बघितली आणि ती मला कोकणीत सहज म्हणाली, ‘घेऊ गो हे? कशे आसतले? बरे आसतले?’ म्हणजे ’मी हे घेऊ का ग, कसं असेल’? तर अद्वैतने लगेच तिला कोकणीत परस्पर उत्तर दिलं, ‘छान आहे हे तेल, अगदी प्यूअर, आम्ही पण हेच वापरतो, तुम्ही एकदा वापरून बघा’, आणि इतकंच म्हणुन तो थांबला नाही तर ’तुमका वास घेवका?’ असं म्हणून पटदिशी स्वयंपाकघरात जाऊन उघडी बाटली घेऊन आला तिला दाखवायला. माझ्या मैत्रिणीने तेल घेतलं.
मी फक्त फणसाचे पापड बघायला मागितले तर ह्या मुलाने मला फणसाचे पापड, पोह्याचे पापड, उडदाचे तिखट पापड, उडदाचे कमी तिखट पापड, लसणाचे सांडगे, ताकातल्या मिरच्या, फणसाचे तळलेले गरे वगैरे दहा जिन्नस आणून दाखवले. बरोबर तोंडाची टकळी चालू, तीही मला कोकणी येतं हे कळल्यामुळे कोंकणीत. नव्वद रुपयाचे पापड घ्यायला गेलेली मी तब्बल नऊशे रुपयांची खरेदी करून परत टेबलवर परतले!
बाजूलाच एक हिंदी भाषी कुटुंब लोणचं बघत होतं. त्यांना ह्याने लोणच्याचे आठ प्रकार दाखवले तेही हिंदीत बोलून, ’आप ये ट्राय करो, होम-मेड हैं’. त्यांनी चार वेगवेगळ्या प्रकारची लोणची घेतली. मला अद्वैतचं खूप कौतुक वाटलं. तसं मी त्याच्या आईला सांगितलं सुद्धा. ती हसली, म्हणाली, ‘लॉकडाऊन मध्ये शाळा आता बंद आहेत ना, तेव्हापासून सकाळ-संध्याकाळ दोन-दोन तास हाच करतो दुकान मॅनेज, तेसुद्धा स्वतःहून, हौसेने’.
माझ्या ओळखीची कितितरी त्या वयातली शहरी मुलं सर्व सुविधा हाताशी असताना ’आय एम सो बोरड’ म्हणुन सतत आई-वडिलांच्या मागे भुणभुण लावताना मी बघितली आहेत, त्या पार्श्वभूमीवर मला अद्वैतचं वागणं, त्याची जबाबदारीची जाणीव, त्याचा उत्साही, सकारात्मक ऊर्जेने भरलेला दुकानातला वावर हे सगळंच खूप अपूर्वाईचं वाटलं. देशाच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या पर्यटकांशी बोलता-बोलता, वेगवेगळ्या भाषा शिकता शिकता, मनुष्य स्वभाव जाणून घेऊन किती अनुभव संपन्न बनत होता तो. पुढे कसलेही शिक्षण घेताना हा अनुभव त्याला मोलाची साथ करेल.
आजकाल जेव्हा मी पेपर मध्ये बातम्या वाचते की पबजी हा गेम खेळू दिला नाही म्हणून पंधरा वर्षांच्या मुलाने आत्महत्या केली किंवा शाळेत दिसण्यावरून कुणी काहीतरी बोललं म्हणून दहावीतली मुलगी डिप्रेशन मध्ये गेली वगैरे तेव्हा मला अद्वैत सारखी मुलं आठवतात.
असाच अजुन एक तरुण मुलगा मी बरेचदा जिथे भाजी घेते त्या दुकानावर बसलेला असतो, त्याच्या आईला मदत करायला. साधेच पण स्वच्छ, नीटनेटके कपडे, नीट विंचरलेले केस, भुवयांच्या मधोमध शेंदराचा छोटा ठिपका आणि निर्मळ मोकळं हास्य असलेला तो मुलगा दुकानात गर्दी असेल तेव्हा भराभर गिऱ्हाइकांना भाजी वजन करून देत असतो आणि दुकानात कुणी नसताना पुस्तकात डोकं खुपसून अभ्यास करत असलेला दिसतो. एक दिवस मी त्याला विचारलं, ‘कितवीत आहेस’? तर तो हसून म्हणाला ‘बारावी कॉमर्स, बाहेरून देतोय परीक्षा’. मी विचारलं, ‘पुढे काय करणार, कॉलेज?’ तर हसून म्हणाला. ’डिग्री करेन, पण बाहेरून’. मी विचारलं ’का रे’? तर पांढरेशुभ्र दांत दाखवत तो निर्मळ हसला आणि मला म्हणाला, ‘ताई, नुसतं बी कॉम करून मला काय मिळणार आहे? सांगा ना तुम्ही? कुठल्यातरी खासगी कंपनीत पाच -दहा हजारांची नोकरी? तशी तर आता सुद्धा ह्या दुकानातून मला महिना २५-३० हजारांची कमाई सहज होते. मी कॉमर्स शिकतोय कारण मला कम्प्युटर घेऊन दुकानाचा सगळा हिशेब ऑटोमेटेड करायचाय आणि पुढे-मागे लोन घेऊन मोठं भाजी आणि फळांचं दुकान उघडायचंय. पक्क्या इमारतीत. चांगल्या लोकेशनवर.’
त्याच्या आवाजातच नव्हे तर पूर्ण देहबोलीतच कमालीचा आत्मविश्वास होता. आपल्याला काय करायचंय आणि काय नाही ह्याची पूर्ण जाणीव होती. ’वय काय रे तुझं’? मी न राहवून विचारलं, ‘ह्या वर्षी १९ पूर्ण होतील’ तो म्हणाला. कितीतरी श्रीमंत घरातली ह्या वयातली मुलं पब, डिस्को, फोन गेम्स आणि महागडे मोबाईल ह्यातच गुंतून जाऊन अर्थहीन आयुष्य घालवत असताना ह्या मुलाचा आत्मविश्वास आणि त्याची जिद्द पाहून मी थक्कच झाले.
तरुणाई अशी हवी.
*©️ शेफाली वैद्य*