Wednesday, 1 February 2023

स्त्री समानतेच्या चळवळीला नवा आयाम प्राप्त व्हावा..."

 स्त्री समानतेच्या चळवळीला नवा आयाम प्राप्त व्हावा..."


फ्रान्सचे मुंबईतील महावाणिज्यदूत श्री. जाँ मार्क सेरे शार्ले यांचीउप सभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे समवेत सदिच्छा भेट

            मुंबई, दि. 31 : भारत आणि फ्रान्सचे मैत्रीसंबंध दृढ असून फ्रेंच राज्यक्रांतीने स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांना जागतिक अधिष्ठान दिले. भारताच्या राज्यघटनेवर या मूल्यांचा प्रभाव आहे. महिला सबलीकरण संदर्भात फ्रान्स येथील स्वयंसेवी आणि शासकीय संस्था यांतील प्रतिनिधींनी मुंबईस अवश्य भेट द्यावी. उभयपक्षी माहिती आणि अनुभवांचे आदान-प्रदान स्त्री समानतेच्या चळवळीला नवा आयाम प्राप्त करुन देईल, असा विश्वास महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.


            फ्रान्सचे मुंबईतील महावाणिज्यदूत श्री. जाँ मार्क सेरे शार्ले यांनी उप सभापती डॉ. गोऱ्हे यांची विधान भवनातील त्यांच्या दालनात सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी जागतिक स्तरावर सुरु असलेले स्त्री समानता विषयक कार्यक्रम, उपक्रम, परिषदा याबाबत उभयतांमध्ये सविस्तर चर्चा झाली. फ्रान्समधील स्त्री समानता विषयक उपक्रमातील सहभागी गटनेत्यांना यावेळी मुंबई भेटीचे आमंत्रण देण्यात आले.


            फ्रान्स, जर्मनी, कॅनडा, स्पेन आणि स्वित्झर्लंड या देशातील स्त्री समानता विषयक कार्यक्रमांचे अभ्यासगट फ्रान्स वकिलातीच्या माध्यमातून परस्परांशी संपर्क आणि समन्वय साधून आहेत. त्‍यांची एक परिषद मुंबई येथे आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे, अशी माहिती यावेळी महावाणिज्यदूत श्री. शार्ले यांनी दिली. या परिषदेत आपणही सहभागी व्हावे, असे आग्रहाचे निमंत्रण त्यांनी दिले. स्त्री आधार केंद्र त्याचप्रमाणे विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्रात सुरु असलेल्या स्त्री समानता आणि महिला सबलीकरण उपक्रमांची माहिती उप सभापती डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी दिली. "समानतेकडून विकासाकडे: शाश्वत विकास उद्दिष्टांची ओळख आणि आव्हाने" ही आपली पुस्तिका आणि राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांचा चरित्रग्रंथ यावेळी उप सभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी त्यांना भेट दिला. या सदिच्छाभेटीप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, उप सचिव राजेश तारवी, जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने हे उपस्थित होते.


००००



नीरा-देवघर प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता

 नीरा-देवघर प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता


देशातील पहिला कॅनाल जोड प्रकल्प साकारणार, केंद्राकडेही निधीसाठी प्रस्ताव.

माढा लोकसभा मतदारसंघासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अनेक निर्णय.

            मुंबई, दि. 31 : नीरा-देवघर प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पातून बंदिस्त जलवाहिनीतून पाणीपुरवठ्याचे नियोजन निश्चित यशस्वी होईल. उर्वरित निधीकरीता केंद्र सरकारला प्रस्ताव सादर करण्यात येईल. यामुळे माळशिरस तालुक्यातील दुष्काळी 22 गावांना पाणी मिळणार आहे. याबरोबरच फलटण आणि माळशिरस तालुक्यातील सुमारे 24 हजार 520 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या सर्व कामांना गती द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.


            लोकसभेच्या माढा मतदारसंघातील प्रलंबित उपसा सिंचन योजना, महावितरण कंपनीसंबंधित विविध कामे यासह विविध योजनांची आढावा बैठक आज उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार शहाजी पाटील, जयकुमार गोरे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, नियोजन विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव नीरज धोटे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले आदी उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प दुष्काळी तालुक्यांसाठी महत्वपूर्ण आहे. त्यासाठी जागतिक बँक अर्थसहाय करणार आहे.

आग प्रतिबंधक, जीवसंरक्षक उपाययोजनेच्या अधिनियमात सुधारणा.

 आग प्रतिबंधक, जीवसंरक्षक उपाययोजनेच्या अधिनियमात सुधारणा.

            राज्यातील वाढते नागरिकरण व औद्योगिकरण लक्षात घेता, अग्निसुरक्षा विषयक बाबींसाठी असलेल्या महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम, 2006 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत खालील सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. 


            कार पार्किंगची समस्या लक्षात घेता, स्वयंचलित पार्किंगची उंची 45 मीटर वरुन 100 मीटर पर्यंत त्याचबरोबर शैक्षणिक इमारतींची उंची 30 मीटर वरुन 45 मीटर पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.


            आगीच्या संभाव्य धोक्यांचे मूल्यमापन करुन, उपलब्ध अग्निप्रतिबंधक उपाययोजना यांचे त्रयस्थ संस्थेमार्फत मूल्यमापन करण्यात येईल. गोदामे व शितगृहे यांची उंची 15 मीटर वरुन 24 मीटर पर्यंत वाढविण्यात येणार आहे. अग्निशमन अधिनियमातील अनुसूची-1 मध्ये विविध प्रकारच्या इमारतींसाठी किमान अग्निशमन उपाययोजना या राष्ट्रीय बांधकाम संहिता, 2016 प्रमाणे सुधारीत करण्याचा निर्णय यावेळी झाला. अग्निशमन शुल्कात बदल करुन ते बांधकामाच्या रेडी रेकनरवर आधारीत करुन, एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (UDCPR) प्रमाणे लागू होणारे अग्निशमन पायाभूत शुल्क एकत्रित करुन अनुसूची-2 मध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

निरा देवघर पाटबंधारे प्रकल्पाच्या 3 हजार 976 कोटी 8

 निरा देवघर पाटबंधारे प्रकल्पाच्या 3 हजार 976 कोटी 83 लाखांच्यातरतुदीस सुधारित प्रशासकीय मान्यता


पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील सिंचनास लाभ


            निरा देवघर पाटबंधारे प्रकल्पाच्या 3 हजार 976 कोटी 83 लाख रुपयांच्या खर्चाच्या तरतुदीस तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या प्रकल्पामुळे पुण्यासह, सातारा, सोलापूर या तीन जिल्ह्यातील ४३ हजार ५० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.


            निरा देवघर पाटबंधारे प्रकल्पांतर्गत पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील मौजे देवघर येथे कृष्णा खोऱ्यातील भीमा उप खोऱ्यातील निरा नदीवर मातीचे धरण बांधण्यात आले आहे. सन 2008 पासुन धरणामध्ये पूर्ण क्षमतेने 337.39 दलघमी इतका पाणी साठा होत आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे अंतर्गत “उर्वरीत महाराष्ट्र” या प्रदेशात आहे. या प्रकल्पामुळे भोर तालुक्यातील 6 हजार 670 हेक्टर, सातारा जिल्हातील अवर्षण प्रवण खंडाळा तालुक्यातील 11 हजार 860 हेक्टर व फलटण तालुक्यातील 13 हजार 550 हेक्टर तसेच सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील 10 हजार 970 हेक्टर असे एकूण 43 हजार 50 हेक्टर क्षेत्रास प्रवाही व उपसा पद्धतीने सिंचन सुविधा उपलब्ध होणार आहे.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार आता २५ लाख रुपयांचा

 महाराष्ट्र भूषण पुरस्कार आता २५ लाख रुपयांचा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय.

            मुंबई, दि. 31 :- महाराष्ट्र शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सन्मानदर्शक महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम दहा लाख रुपयांवरून २५ लाख रुपये करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. तसेच हा पुरस्कार नव्या स्वरुपात, आणखी दिमाखदार ठरावा यासाठी प्रयत्न व्हावेत असा निर्णय घेण्यात आला.


            मंत्रिमंडळ बैठकीनंतर महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या अनुषंगाने बैठक झाली. बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे तसेच पुरस्कार समितीचे सदस्य ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. उज्ज्वल निकम, प्रा. शशिकला वंजारी, ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत आदी दृकश्राव्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.


            बैठकीत पुरस्काराच्या स्वरुपाबाबत तपशीलवार चर्चा झाली. पुरस्कारासाठी सुमारे २७ नावांचा प्रस्ताव सरकारकडे आला होता, त्याबाबतही चर्चा झाली. काहींनी आणखी नवी नावेही सुचविली. त्यांचाही नव्याने विचार करण्याचे ठरले. तसेच पुरस्कारच्या रकमेत भरीव वाढ करण्याच्या सूचनेवरही चर्चा झाली. आतापर्यंत पुरस्कारात दहा लाख रुपये देण्यात येत होते. या पुरस्काराच्या रकमेत वाढ करून ती २५ लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा पुरस्कार आणखी दिमाखदार ठरावा, यासाठी नव्या स्वरुपातील नियमावली निश्चित करण्यात यावी असेही ठरले. महाराष्ट्रात अनेक कर्तबगार व्यक्तिमत्व आहेत. अनेकांनी विविध क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. अशा अनेक व्यक्तिमत्वांच्या या पुरस्कारासाठी विचार व्हावा. याकरिता सर्वंकष अशी नियमावली करण्याचे निर्देश देण्यात आले. 


०००००

राष्ट्रीय छात्रसेनेच्या माध्यमातून विद्यार्थी दशेत राष्ट्रभक्ती दृढ होण्यास मदत

 राष्ट्रीय छात्रसेनेच्या माध्यमातून विद्यार्थी दशेत राष्ट्रभक्ती दृढ होण्यास मदत

                                            - क्रीडा मंत्री गिरीश महाजन

            मुंबई, दि. 1 : विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. राष्ट्रीय छात्रसेनेच्या मध्यामातून विद्यार्थी दशेत एकता, शिस्त व राष्ट्रभक्ती दृढ होण्यास मदत होत असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.


            प्रजासत्ताक दिनाच्या नवी दिल्ली येथील संचलनात सहभागी झालेल्या महाराष्ट्राच्या 125 छात्रसेनेच्या चमूचा सन्मान आज मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी केला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आरोग्य मंत्री प्रा.तानाजी सावंत, जामनेर नगराध्यक्ष साधना महाजन, सिनियर अंडर ऑफिसर देवेंद्र बडगुजर, संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल वाय.पी.खंडुरी हे उपस्थित होते.


            मंत्री श्री महाजन म्हणाले की, छात्रसेना संचालनालयाने प्रतिष्ठेच्या ‘प्रधानमंत्री बॅनर’चे विजेतेपद पटकावून देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान पटकविला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्राला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून महाराष्ट्राच्या एनसीसी पथकाने केलेली कामगिरी अतिशय दिमाखदार आहे. भविष्यातही अशीच कामगिरी करावी अशी अपेक्षा व्यक्त करत शासनाच्यावतीने सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. मी सुद्धा एनसीसीच्या माध्यमांतून विद्यार्थी दशेत सहभागी होतो, अशी आठवण या निमित्ताने मंत्री श्री.महाजन यांनी विद्यार्थ्यांना सांगितली.


            यावेळी आरडीसी कन्टिजंट अधिकारी म्हणून फर्ग्युसन महाविद्यालयातील एनसीसी आधिकारी लेफ्टनंट डॉ.नंदकुमार बोराडे तसेच आरडीसी कन्टिजंट कमांडर कर्नल निलेश पाथरकर यांचा सत्कार मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला.


 

मला तुमचा चेहरा आठवायचा आहे जेणेकरून मी तुम्हाला स्वर्गात भेटेन तेव्हा मी तुम्हाला ओळखू शकेन

 *“मला तुमचा चेहरा आठवायचा आहे जेणेकरून मी तुम्हाला स्वर्गात भेटेन तेव्हा मी तुम्हाला ओळखू शकेन आणि पुन्हा एकदा धन्यवाद देऊ शकेन."*


जेव्हा भारतीय अब्जाधीश रतनजी टाटा यांना एका रेडिओ प्रेजेंटरने टेलिफोन मुलाखतीत विचारले: "सर, तुम्हाला जीवनात सर्वात जास्त आनंद झाला , ती आठवण सांगाल का"?


रतनजी टाटा म्हणाले: "मी जीवनात आनंदाच्या चार टप्प्यांतून गेलो आणि शेवटी मला खऱ्या आनंदाचा अर्थ समजला."


पहिला टप्पा संपत्ती आणि संसाधने जमा करण्याचा होता. पण या टप्प्यावर मला हवा तसा आनंद मिळाला नाही.


मग मौल्यवान वस्तू गोळा करण्याचा दुसरा टप्पा आला. पण या गोष्टीचा परिणामही तात्पुरता असतो आणि मौल्यवान वस्तूंची चमक फार काळ टिकत नाही हे मला जाणवलं.


त्यानंतर महत्वाचा तिसरा टप्पा आला. तेव्हा भारत आणि आफ्रिका या देशातील 95% डिझेलचा पुरवठा माझ्याकडे होता. भारत आणि आशियातील सर्वात मोठ्या स्टील कारखान्याचा मी मालकही होतो. पण इथेही मला कल्पनेतला आनंद मिळाला नाही.


चौथा टप्पा होता जेव्हा माझ्या एका मित्राने मला काही अपंग मुलांसाठी व्हील चेअर विकत घेण्यास सांगितले. सुमारे 200 मुले होती. मित्राच्या सांगण्यावरून मी लगेच व्हील चेअर घेतली.


पण मित्राने आग्रह धरला की मी त्याच्यासोबत जाऊन मुलांना व्हील चेअर स्वहस्ते द्यावी . मी त्यांच्यासोबत गेलो. तिथे सर्व पात्र मुलांना मी स्वतःच्या हाताने व्हीलचेअर दिल्या. या मुलांच्या चेहऱ्यावर मला आनंदाची विचित्र चमक दिसली. मी त्या सगळ्यांना व्हील चेअरवर बसून इकडे तिकडे फिरताना आणि मजा करताना पाहत होतो..जणू ती सगळी मुलं पिकनिक स्पॉटवर पोहोचली होती, जणु काही कसलातरी विजयोत्सवच होता तो. त्या दिवशी मला माझ्या आत खरा आनंद जाणवला. मी तिथून परत जायला निघालो तेव्हा त्या मुलांपैकी एकाने माझा पाय धरला. मी हळूवारपणे माझा पाय सोडण्याचा प्रयत्न केला, परंतु मुलाने सोडले नाही आणि त्याने माझ्या चेहऱ्याकडे पाहिले आणि माझे पाय घट्ट धरले. मी झुकलो आणि मुलाला विचारले: “तुला आणखी काही हवे आहे का?”


मग मुलाने मला जे उत्तर दिले, त्याने मला धक्काच दिला नाही तर आयुष्याकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन पूर्णपणे बदलून टाकला.


मुलाने म्हटले: "मला तुमचा चेहरा लक्षात ठेवायचा आहे जेणेकरून मी तुम्हाला स्वर्गात भेटेन तेव्हा मी तुम्हाला ओळखू शकेन आणि पुन्हा एकदा धन्यवाद देऊ शकेन."


वरील विस्मयकारक कथेचे सार हे आहे की आपण सर्वांनी आपल्या अंतरंगात डोकावून विचार केला पाहिजे की, हे जीवन, संसार आणि सर्व ऐहिक कार्ये सोडल्यानंतर आपली आठवण राहील का?


*कोणीतरी तुमचा चेहरा पुन्हा पाहू इच्छित आहे, ही भावना सगळ्यात जास्त आनंद देणारी असते.*

Featured post

Lakshvedhi