Thursday, 5 January 2023

अमृत महाआवास अभियानाची गतिमानतेने वाटचाल प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) मधील सर्व घरकुले पूर्ण होणा

 अमृत महाआवास अभियानाची गतिमानतेने वाटचाल

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) मधील सर्व घरकुले पूर्ण होणार

- मंत्री गिरीश महाजन.

            मुंबई, दि. 4 : राज्यात अमृत महाआवास अभियानाद्वारे प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधील सर्व लाभार्थींना घरे मिळणार आहेत. या अभियानात नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून गतिमानतेने व गुणवत्तापूर्ण, दर्जेदार घरांची निर्मिती होणार असल्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. आतापर्यंत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व राज्य शासनाच्या योजनांतून 13.14 लाख घरकुले पूर्ण करण्यात आली असून 5.61 लाख घरे प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले.


            प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) मध्ये राज्याला आतापर्यंत 14.26 लाख उद्दिष्ट प्राप्त झाले असून त्यापैकी 13.60 लाख (95%) मंजुरी दिली आहे. उर्वरित लाभार्थींच्या मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून मंजूर घरकुलांपैकी 9.48 लाख घरकुले विविध योजनांच्या कृतीसंगमातून पूर्ण झाली आहेत. राज्य शासनाच्या आवास योजना जसे रमाई, शबरी, आदिम, पारधी, यशवंत, अटल यामधूनही घरकुलाचा लाभ देण्यात येतो. यामधील 5.15 लाख घरकुले मंजूर करण्यात आली असून 3.66 लाख घरकुले पूर्ण झाली आहेत.


            भूमिहीन लाभार्थींना जागा उपलब्ध करून देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य देशामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. आजअखेर 66 हजार पेक्षा अधिक भूमिहीन लाभार्थींना राज्यामध्ये जागा उपलब्ध करून देण्यात आली असून उर्वरित भूमिहीन लाभार्थींना जागा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच जागेची समस्या सोडविण्यासाठी बहुमजली इमारती, गृहसंकुले, अपार्टमेंट अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांनाही प्रोत्साहन देण्यात येत आहे, असेही मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.



जगातील विद्यापीठांचे आणि महाराष्ट्रातल्या विद्यापीठांचे नाते मराठीच्या अभ्यासक्रमातून मजबूत व्हावे

 जगातील विद्यापीठांचे आणि महाराष्ट्रातल्या विद्यापीठांचे नातेमराठीच्या अभ्यासक्रमातून मजबूत व्हावे


- डॉ. नीलम गोऱ्हे.

            मुंबई, दि. 4 : “विश्वातील विविध विद्यापीठांचे आणि महाराष्ट्रातील विद्यापीठांचे नाते मराठीच्या अभ्यासक्रमातून अधिक मजबूत होण्याची शक्यता यानिमित्ताने निर्माण झाली आहे”, असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.


            वरळी येथील नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया येथे ‘मराठी तितुका मिळवावा’ विश्व मराठी संमेलन 2023 या कार्यक्रमानिमित्त आयोजित ‘मराठी भाषा : काल, आज आणि उद्या’ या विषयी चर्चा सत्राच्या अध्यक्ष म्हणून डॉ. गोऱ्हे बोलत होत्या.


            श्रीमती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “जगातील ज्या विद्यापीठांमध्ये याआधीच समन्वय झालेला आहे, तिथे तो समन्वय अधिक मजबूत व्हावा आणि त्या विद्यापीठांमध्ये आपल्याकडील विद्यापीठ ही मराठी भाषेच्या बरोबरच इतिहास, विज्ञान, गणित, शेती या विषयी शिक्षणाच्या पद्धती अशा अनेक विषयांच्या अनुभवाची देवाणघेवाण आणि विचार मंथन होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे”.


            ज्याप्रमाणे आपण आपल्या आवडीनुसार कपडे खरेदी करतो, विविध उपहारगृहांत वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची चव चाखतो, त्याप्रमाणे आपण मराठी भाषेचा अधिकाधिक वापर होण्यासाठी नवनवीन लेखकांची पुस्तके खरेदी करुन वाचवीत. पालकांनी मुलांना वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत. जगातील अनेक देशांमध्ये मराठी जोपासण्यासाठी विविध उपक्रम राबविणारी मंडळे आहेत. मराठी वृध्दिंगत होण्यासाठी अमेरिका, रशिया, जर्मनी अशा विविध देशात काम सुरू आहे. आपल्या राज्यातही शासनाच्यावतीने उपक्रम राबविले जातात, असे डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.


            युरोपीय देशांतील महाराष्ट्रामध्ये यावे यासाठी प्रयत्न व्हावा, असे श्रीमती गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.


            केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी, या कार्यक्रमास जगभरातून मिळालेला प्रतिसाद पाहता मराठीचा प्रचार - प्रसार नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “पंचायत राज विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भारताचा संबंध येत असल्याने गाव समृद्ध झाले तर आपोआपच राज्य आणि देश समृद्ध होईल, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. गावातील माणूस आपल्या गरजा पूर्ण करू शकला तर शहरांवरचा ताणही वाढणार नाही”, असे ते म्हणाले. मराठीचा प्रचार आणि प्रसार करणे ही केवळ शासनाचीच नाही तर प्रत्येक मराठी माणसाची जबाबदारी असल्याचे सांगून यासाठी प्रत्येकाने मातृभाषेबाबत अभिमान बाळगावा, असे आवाहन त्यांनी केले.


            महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक श्रीकांत बोजेवार म्हणाले, “ज्याबद्दल आपल्याला प्रेम असते त्याबद्दलच चिंता व्यक्त होते. गेली अनेक दशके मराठी भाषेबद्दल अशीच चिंता व्यक्त केली जात असते, तथापि भाषा ही प्रवाही असल्याने शब्द येत - जात असतात. पण भाषा कधीच संपत नाही, ती टिकून राहते, मराठी ही ज्ञानाबरोबरच अर्थार्जनाची भाषा झाली पाहिजे, ही सामूहिक जबाबदारी असल्याचे ते म्हणाले. मराठीमध्ये दरवर्षी सुमारे चार हजार पुस्तके प्रकाशित होतात, वाचकांनी यातील बदल आत्मसात करून जुन्या पिढीतील लेखकांबरोबरच नवीन पिढी काय लिहिते तेसुद्धा वाचावे, असे आवाहन त्यांनी केले.


            पॉप्युलर प्रकाशनचे हर्ष भटकळ यांनी प्रकाशक म्हणून विचार व्यक्त करताना, “वाचन जितके जास्त तितका शब्द साठा वाढतो”, असा अनुभव असल्याचे सांगितले. जगात महाराष्ट्राबाहेर सुमारे नऊ कोटी मराठी वाचक आहेत, मराठी भाषा आपली वाटली नाही तर नवीन पिढी इंग्रजीकडे वळते, असे सांगून भाषेकडे व्यापक नजरेने पाहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. पॉप्युलरच्या मराठी प्रकाशनाच्या ७० वर्षांच्या कालावधीतील विविध अनुभव त्यांनी यावेळी कथन केले.


            पत्रकार आणि साहित्यिक असलेल्या संजीवनी खेर यांनी विश्व मराठी संमेलन हा मराठीचा जागर असल्याची भावना व्यक्त केली. मराठीचे वाचक मोठ्या संख्येने आहेत, पण ही भाषा पुढच्या पिढीत बोलती राहिली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. इंग्रजी ही कमावण्याची भाषा आहे हा समज दूर होणे गरजेचे असल्याचे सांगून मराठी भाषेप्रमाणेच इतर भारतीय भाषांचीही ही समस्या असल्याचे त्या म्हणाल्या. हा समज सर्वांनी मिळून बदलावा लागणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मराठीची प्राचीनता अनेक ग्रंथांमधून दिसून येते. मराठीत ४०० हून अधिक बोली असून त्यांची गोडी अलौकिक असल्याचे त्या म्हणाल्या. भाषेची शब्दसंपत्ती वाढत राहिली पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.


0000

नाखवा वल्हव रे

 



 वीज कर्मचाऱ्यांचा संप मागेवीज कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करू

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

खासगीकरण कोणत्याही परिस्थितीत नाही.

            मुंबई, दि. 4 :- संपकरी वीज कर्मचाऱ्यांशी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाल्यानंतर राज्य शासन मागण्यांसंदर्भात सकारात्मक विचार करणार असल्याने संपकरी वीज कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे घेत असल्याचे घोषित केले.


            सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे ऊर्जा विभागातील संपकरी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींशी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली. यावेळी आमदार भाई जगताप, ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, 'महावितरण'चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, 'महानिर्मिती'चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पी अन्बलगन तसेच ऊर्जा विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री श्री. फडणवीस म्हणाले, वीज कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांचा शासन सकारात्मकपणे विचार करत असून वीज कंपन्यांच्या खासगीकरणाचा कोणताही विचार नाही. सर्व कायदेशीर आयुधे वापरून पॅरलल लायसन्ससंदर्भात महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (MERC) मध्ये आक्षेप मांडण्यात येईल. कंपनीवर होणारा परिणाम व ग्राहकांचे हित यावेळी प्राधान्याने मांडण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, वीज कंपन्या अधिक बळकट करण्यावर भर देण्यात येत असून आर्थिक बळकटीकरणासाठीही ठोस उपाययोजना करण्यात येत आहेत. यासाठी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीही काही नावीन्यपूर्ण कल्पना मांडाव्यात त्यांचे नक्कीच स्वागत करण्यात येईल. फ्रॅन्चायजी कुठे करायच्या याचा विचार होणे गरजेचे असते. फ्रॅन्चायजीचा उपयोग झाला पाहिजे. त्याद्वारे काही नवीन पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या पाहिजेत, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.


कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा देणार


            कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. त्यांचे मानधन थेट त्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल. त्यांची सामाजिक सुरक्षितता जपण्यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, जास्तीची गुंतवणूक होऊन नव्याने पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या पाहिजेत यावर भर देण्यात येत आहे. जलविद्युत प्रकल्पांसंदर्भातही निर्णय घेण्यात येणार असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.


-----000-----

श्री जोतिबा मंदिर परिसर व पन्हाळा किल्ल्याच्या जतन, संवर्धनासाठी आराखडा तयार करावा


श्री जोतिबा मंदिर परिसर व पन्हाळा किल्ल्याच्या

जतन, संवर्धनासाठी आराखडा तयार करावा

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

            मुंबई, दि. 4 :- नव्या पिढीला आपला समृद्ध इतिहास माहिती होणे गरजेचे असून त्यादृष्टीने श्री जोतिबा मंदिर व परिसर तसेच पन्हाळा किल्ल्याच्या जतन व संवर्धनासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.


            सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे श्री जोतिबा मंदिर व परिसरातील विकासाबाबत तसेच किल्ले पन्हाळ्याच्या संवर्धनासंदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबत बैठक झाली. यावेळी आमदार विनय कोरे, प्रधान सचिव डॉ राजगोपाल देवरा, प्रधान सचिव विकास खारगे, पुरातत्व विभागाचे मुंबई परिमंडळ अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ.राजेन्द्र यादव, संचालक डॉ तेजस गर्गे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपला इतिहास अतिशय समृद्ध असून प्राचीन वारसास्थळांचे जतन व संवर्धन वेळीच होणे गरजेचे असते. त्यादृष्टीने श्री जोतिबा मंदिर व परिसर तसेच पन्हाळा किल्ल्याच्या जतन व संवर्धनासाठी एकात्मिक विकास आराखडा तयार करावा. यासंदर्भात कालबद्ध कार्यक्रम आखून ही कामे तात्काळ पूर्ण करण्यात यावीत.


            यापूर्वी परिसराचे तात्काळ सर्व्हेक्षण करून त्यांच्या परीपूर्ण नोंदी ठेवण्यात याव्यात. या कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असेही श्री फडणवीस यांनी सांगितले. प्राचीन स्थळांच्या जतन व संवर्धनाची कामे जलदगतीने पूर्ण करण्यावर भर द्यावा, जेणेकरून नव्या पिढीपर्यंत आपला समृद्ध इतिहास अधिक नेमकेपणाने पोहोचवता येईल, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.


            श्री जोतिबा मंदिर व परिसर तसेच पन्हाळा किल्ला आराखडा यामध्ये समाविष्ट करावयाच्या बाबींसंदर्भात आमदार विनय कोरे यांनी सूचना मांडल्या.


            श्री जोतिबा मंदिर व परिसर तसेच पन्हाळा किल्ला ही ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व असलेली महत्वपूर्ण ठिकाणे आहेत. श्री जोतिबा मंदिर परिसर वन्यजीव विविधतेमध्येही


वैशिष्ट्यपूर्ण आहे. येथे वर्षभर पर्यटकांची वर्दळ असते. येथील हरित पट्टयांचे जतन व संवर्धन केल्यास वन्यजीव अधिवासातच जपता येतील. भूमीगत विद्युत पुरवठा, पाणी पुरवठा, स्वच्छतागृहे तसेच दर्शन मंडपाची कामे हाती घेण्यात आली असून ही कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.


------000------

अंगणवाडी सेविकांच्या न्याय्य मागण्यांबाबत दिलासादायक निर्णय घेऊ

 अंगणवाडी सेविकांच्या न्याय्य मागण्यांबाबत दिलासादायक निर्णय घेऊ

– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


लवकरच बैठक घेण्याचे निर्देश, मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय.

            मुंबई, दि. 4 :- “अंगणवाडी सेविकांच्या न्याय्य मागण्यांबाबत सकारात्मक विचार केला जाईल. त्यांना दिलासा मिळेल असेच प्रयत्न केले जातील,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या या सकारात्मक प्रतिसादावर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने आंदोलन मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला.


            आंदोलकांच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची मंत्रालयात भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळातील प्रतिनिधींचे म्हणणे तपशीलवार ऐकून घेतले. या सर्व मुद्यांबाबत लवकरच व्यापक बैठक बोलावण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. या बैठकीत अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्याचे निश्चित करण्यात आले. यात अंगणवाडी केंद्रांसाठीची जागा, सेविका आणि मदतनीस यांचे मानधन, रिक्त जागा, ऑनलाईन डाटा भरण्यासाठी मोबाईलची उपलब्धता, पोषण आहार आदी मुद्यांचा समावेश असेल.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या सकारात्मक आणि दिलासादायक प्रतिसादामुळे आंदोलन मागे घेत असल्याचे संघाचे अध्यक्ष एम. एम. पाटील यांनी जाहीर केले. यावेळी शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांबाबतचे सविस्तर निवेदनही मुख्यमंत्र्यांना सादर केले.


०००००




 

ज्येष्ठांसाठी मार्गदर्शक सूचना


 

Featured post

Lakshvedhi