Tuesday, 6 December 2022

नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी समन्वयाने नियोजन करावे

 नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी समन्वयाने नियोजन करावे


- सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण  .

            मुंबई, दि. ६ : ‘कोविड - १९’ मुळे नागपूर येथे दोन वर्षांच्या खंडानंतर विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १९ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनासाठी येणारे लोकप्रतिनिधी, अधिकारी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आदी सर्वांच्या निवासव्यवस्थेचे संबंधित सर्व विभागांनी काटेकोर आणि अचूकपणे नियोजन करावे. कोणाचीही कुठलीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी. हिवाळी अधिवेशनाच्या काळात केलेल्या सर्व व्यवस्थेची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होण्याच्यादृष्टीने मोबाईल अॅप तयार करावे, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले.


            मंत्रालयातील परिषद सभागृहात विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशन २०२२ च्या प्रस्तावित निवास व्यवस्था, स्वच्छता व्यवस्था, आहार व्यवस्था, वाय-फाय व्यवस्था, प्रसारमाध्यमांची व्यवस्था आदींचा सविस्तर आढावा मंत्री श्री. चव्हाण यांनी घेतला. यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सो. ना. बागूल, मृद व जलसंधारण विभागाचे सहसचिव सुभाष गावडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता दिनेश नंदनवार, कार्यकारी अभियंता अभिजित कुचेवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री आणि जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर नागपूर येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. 


मोबाईल ॲप निर्मितीच्याही दिल्या सूचना


            मंत्री श्री. चव्हाण यांनी म्हणाले की, दोन वर्षांच्या खंडानंतर अधिवेशन होत आहे. या पार्श्वभूमीवर निवास व्यवस्था तसेच अन्य सर्व व्यवस्था अद्ययावत करुन ते सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी. आवश्यक तेथे डागडुजी करावी. वीज, पाणी, स्वच्छता आदी सुविधा तत्काळ उपलब्ध होतील, असे नियोजन करावे. त्यासाठी पुरेशा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. तसेच शीघ्र प्रतिसाद दल कार्यान्वित करावे. निवास व्यवस्थेचे नियोजन करताना अद्ययावत तंत्रज्ञानाची मदत घ्यावी. मंत्री, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी आदींच्या वाहन व चालकांची व्यवस्था तसेच आवश्यक तेथे सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी. स्वच्छतेसाठी तैनात कर्मचाऱ्यांची माहिती दर्शनी फलकांवर लावावी. नियुक्त मनुष्यबळ योग्य गणवेशात राहील याची खबरदारी संबंधित यंत्रणांनी घ्यावी, असेही निर्देश मंत्री श्री. चव्हाण यांनी दिले. हिवाळी अधिवेशनाच्या काळात करण्यात येणाऱ्या सर्व सोयी-सुविधांची एकत्रित माहिती असणारे मोबाईल अॅप तयार करावे. जेणेकरून त्या अॅपवर सर्व माहिती उपलब्ध होऊ शकेल, अशा सूचना मंत्री श्री. चव्हाण यांनी दिल्या.


            अपर मुख्य सचिव सौनिक यांनीही विविध सूचना केल्या. अधीक्षक अभियंता नंदनवार, कार्यकारी अभियंता कुचेवार यांनी निवास व्यवस्थेबाबत सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.


०००


 

देवपूजा करीत आहात हे लक्षात ठेवा .

 देवपूजा करीत आहात हे लक्षात ठेवा . १) देवघरातील शंखाला अक्षता वाहू नये.


२) देव पुजेच्या वेळेस ईतरांशी बोलु नये.


३) तर्जनीने (अंगठ्याजवळच्या बोटाने) देवाला गंध वाहू नका. एका दिव्यावर दुसरा दिवा लावू नका.


४) भग्न मूर्तिची पूजा कधीही करू नये.


५) दिव्याची ज्योत कधीही दक्षिण दिशेस करू नये.


 ६) स्त्रियांनी कधीही. तुळस तोडू नये.


एकाच घरात दोन शिवलिंगे, दोन शाळिग्राम, दोन शंख, तीन गणपती कधीही ठेवू नयेत. भस्म लावल्याशिवाय व गळ्यात रुद्राक्षाची माळ धारण केल्याशिवाय, महादेवाची () पूजा करू नये. 


९) देवपूजेसाठी शिळे जल व शिळी फुले व्यर्ज होत, मात्र तुलसीपत्रे व तीर्थोदक, शिळी असली तरी चालतात. 


१०) संकल्पाशिवाय कोणतेही धार्मिक कृत्य करू नये. 


११) शिवमंदिरात झांज', सूर्यमंदिरात 'शंख' व देवीच्या मंदिरात बासरी वाजवू नये.


१२) बेला शुष्क पत्रेही पूजेला चालतात. तसेच शुष्क दवणाही देवाला प्रिय आहे. मात्र सोमवारचा बेल दुसऱ्या दिवशी चालत नाही. 


१३) द्वादशीस तुळस तोडू नये.


१४) जलकमळावाचून अन्य कोणत्याही फुलाच्या कळ्यांनी देवीची पूजा कधीही करू नये.


१५) बेलाचे पान नेहेमी पालथे वाहावे, 


१६) श्री गणेशाला गणेश चतुर्थीशिवाय, अन्य दिवशी तुळसवाहणे, व्यर्ज आहे.


१७) गायत्री किंवा नवार्णव मंत्र आसनावर बसूनच करावा. रस्त्याने जाता येता करू नये.


१८) आपली जपमाला व आसन, दुसऱ्यास वापरण्यास कधीही देऊ नये. १९) मारुतिच्या फोटोशिवाय अन्य कोणत्याही देवदेवतांच्या मूर्तिची व तसबीरींची कधीही दक्षिणेकडे करू नये. (अपवाद, मृतव्यकतींचे फोटो) 


२०) गंध उगाळून झाल्यानंतर ते तबकडीत काढूनच नंतर देवांना लावावे.


२१) गुरुचरित्र, दुर्गासप्तशती व अन्य प्रासादिक ग्रंथाची पाने उलटताना, कधीही बोटाला थुंकी लावू नये.


२२) देवपूजेच्या वेळी स्तोत्रे मोठ्याने एका लयीत म्हणावीत व मंत्र मनात जपावेत.


२३) देवाला नैवेद्य दाखविल्यानंतर तो लगेच खाऊ नये. 


२४) देवघरात देवांच्या तसबीरी लावताना, त्या एकमेकांसमोर लावू नये.


२५) आचमन करतेवेळी तोंडाने आवाज करू नये.


२६) देवाला, एका हाताने कधीही नमस्कार करू नये. 


२७) देवांची आरती करतांना, निरांजन देवाच्या मस्तकावरून नेऊ नये. 


२८) कांदा, लसूण. हे पदार्थ वापरलेले नैवेद्य, देवास दाखवू नये.


२९) देवीचे पूजन केवळ एका उपचाराने, म्हणजे 'कुंकवाने होते.


३०) देवांचे आसन, आपल्या आसनापेक्षा जास्त उंचीचे असावे.


३१) देवपूजेतील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आवश्यक आहे.

३२) देवाचा उजव्या बाजूस तुपाचा व डाव्या बाजूस तेलाचा दिवा लावावा.


३३) देवाला अर्पण करावयाच्या नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवून, नंतर अर्पण करावा.


(३४) शंख, घंटेशिवाय देवपूजा करू नये.


३५) देवघरातील देवमूर्तिवर विटाळशीची छाया पडणार नाही याची काळजी घ्यावी.


३६) नैवेद्य दाखवताना देवापुढे पाण्याने चौकोन काढून त्यावर तो नैवेद्य ठेवून मगच दाखवावा. ३७) तुलसीपत्र वाहताना ते पालथे व देवाकडे देठ करून वाहावे. दूर्वा वाहाताना दुर्वांची अग्रे आपल्याकडे ठेवावीत. फळे वाहताना फळांचे देठ देवांकडे करावेत.


(३८) देवाला प्रदक्षिणा, नेहमी विषम संख्येत घालावी. जागा नसल्यास स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे, असे गोल फिरावे.


(३९) देवघराला कळस करू नये.


४०) देवपूजा करण्यापूर्वी कपाळी गंध. कुंकुमतिलक, अवश्य लावावा. शरीर शुद्धीसाठी भस्मलेपन करावे.🙏

(ही पोस्ट मला एका व्हाट्सअप ग्रुप वरून आलेली आहे)

सत्य

 *आई वडिलांनी*

*लहानपणा पासून*

*मंत्र शिकवले.*

*"माणुस सुखात असेल*

 *तर आमंत्रणा शिवाय जाऊ नये.*

*आणि दुःखात असेल*

*तर निमंत्रणाची वाट बघु नये."*


     *||💐शुभ सकाळ💐||*

महाराष्ट्राच्या विकासासाठी उद्योगांकरिता उद्योगस्नेही धोरण

 महाराष्ट्राच्या विकासासाठी उद्योगांकरिता उद्योगस्नेही धोरण

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

          मुंबई, दि. 5 : सध्या अनेक कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. उद्योगांना एकाच छताखाली सर्व परवानग्या मिळण्यासाठी एक खिडकी योजना सुरू आहे. कंपन्यांना यातही काही अडचणी, समस्या येऊ नयेत म्हणून राज्यात नवीन उद्योगांकरिता उद्योगस्नेही धोरण आणले जाईल. त्याचबरोबर ‘रिअल सिंगल विंडो’द्वारे जलद परवानग्या दिल्या जातील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


              ‘रिइमेजिंग महाराष्ट्र’ या कार्यक्रमांतर्गत आयोजित परिषदेस उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी संबोधित केले.


               या परिषदेत सर्व उपस्थितांनी महाराष्ट्राच्या वेगवान विकासाबाबत चर्चा केली. राज्यात होणाऱ्या नवीन पायाभूत सुविधांमुळे उद्योगस्नेही वातावरण वृद्धिंगत होईल, अशी प्रतिक्रिया सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली असून ‘वॉर रुम’द्वारे गुंतवणुकीसंदर्भात करण्यात येणाऱ्या सुयोग्य नियोजनाबद्दल आणि गतिमानतेबद्दल त्यांनी प्रशंसोद्गार काढले. समृद्धी महामार्गामुळे महाराष्ट्राच्या विकासाचे चित्र बदलेल, अशा सदिच्छाही त्यांनी व्यक्त केल्या.


             उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी या परिषदेदरम्यान उपस्थित झालेल्या प्रत्येक समस्यांचे निराकरण करण्यात येईल, असे सांगितले. मुंबईचा झपाट्याने विकास होत असून आता तिसरी मुंबई निर्माण होत आहे. या तिसऱ्या मुंबईत दळणवळणाच्या पर्यायी सोयी पुरविण्यात येणार आहेत. त्यामुळे पूर्व द्रुतगती मार्ग, पश्चिम द्रुतगती मार्ग तसेच कोस्टल रोड एकमेकांशी संलग्न केले जातील, असेही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले.


               माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात नवनवीन संकल्पना राबविल्या जात असून उद्योगांना जलद आणि विनासायास परवानग्या दिल्या जातील. त्याचबरोबरच दळणवळण, ऊर्जा, फळ आणि फळ प्रक्रिया उद्योग, कृषी आदी क्षेत्रात नवीन धोरण तयार करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले. नवीन उद्योगांना वीज सवलत देण्यात येत आहे. फक्त नवीन उद्योगांनाच वीज सवलत मिळावी, यासाठी उद्योगासाठी नवीन ऊर्जा धोरण आणले जाईल. ऊर्जा क्षेत्रात अधिक दमदार कामगिरी व्हावी, यासाठी सौर ऊर्जेवर भर देण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.


               राज्यात नवनवीन उद्योग यावेत यासाठी उद्योग क्षेत्रांबरोबर चर्चा सुरू असल्याचे सांगत श्री.फडणवीस म्हणाले की, सेमीकंडक्टर या उद्योगात गुंतवणूक करून उद्योगांना सहकार्य करण्याचा मानस व्यक्त केला. गृहकर्जाच्या व्याजाचा दर कमी करण्यावर भर दिला जाईल. महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी सर्व क्षेत्र खुली केले जातील.


            यावेळी पीडब्ल्यूसीचे जागतिक अध्यक्ष बॉब मॉरित्झ, मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशी, मैत्रीचे उपाध्यक्ष अजय आशर, पीडब्ल्यूसीचे भारतीय अध्यक्ष संजीव क्रिष्णन, हिंदुस्थान युनिलिव्हरचे व्यवस्थापकीय संचालक संजीव मेहता, मुख्य कार्यकारी अधिकरी अरूंधती भट्टाचार्य, हिरानंदानी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक निरंजन हिरानंदानी, एनटीटीचे अध्यक्ष शरद संघवी, वॉरबर्ग पीनकसचे व्यवस्थापकीय संचालक विशाल महादेविया, वाडिया ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक नेस वाडिया, जेएम फायनॅन्सचे व्यवस्थापकीय संचालक विशाल कंपानी आदी उपस्थित होते.


000

महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२१

 महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२१


दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क या संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर.


            मुंबई, दि. ५ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दि. ०६ ऑगस्ट, २०२२ व दि. २० ऑगस्ट, २०२२ रोजी मुंबईसह औरंगाबाद, अमरावती, नागपूर, नाशिक व पुणे जिल्हा केंद्रांवर घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा - २०२१ मधील दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क या संवर्गाचा अंतिम निकाल दि. ०५ डिसेंबर, २०२२ रोजी जाहीर करण्यात आला आहे. एकूण ११४ उमेदवारांची प्रस्तुत पदाकरिता शिफारस करण्यात आली आहे.


            परीक्षेमध्ये पुणे जिल्ह्यातील श्री. आनंद नाना जावळे हे राज्यातून व मागासवर्गवारीतून प्रथम आले आहेत. महिला वर्गवारीतून सातारा जिल्ह्यातील अक्षता बाबासाहेब नाळे ह्या प्रथम आल्या आहेत.


             उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरिता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण (Cut-off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.


             अंतिम निकालातील ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे, अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलवर पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत, आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक असल्याचे आयोगाने प्रसिद्धीपत्राद्वारे कळविले आहे.


00000


महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा - २०२२

अंतिम उत्तरतालिका जाहीर.


            मुंबई, दि. ५ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ०५ नोव्हेंबर, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या "महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा- २०२२" (लिपिक-टंकलेखक, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, कर सहायक व उद्योग निरीक्षक उद्योग संचालनालय, गट-क) या परीक्षेची अंतिम उत्तरतालिका दि. ०५ डिसेंबर, २०२२ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिली आहे.

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन, डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन प्रशिक्षणास प्रवेश घेण्याचे आवाहन

 सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन, डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन प्रशिक्षणास प्रवेश घेण्याचे आवाहन


          मुंबई, दि. ५ : सन २०२३-२०२४ या वर्षातील १ जानेवारी २०२३ ते ३० जून २०२३ या सहा महिन्याच्या कालावधीसाठी, सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन या १२९ व्या सत्राच्या प्रशिक्षणास प्रवेश घेण्याचे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

            मत्स्यव्यवसायाचा विकास आणि विस्तार होण्याच्या दृष्टिकोनातून, मत्स्यव्यवसायातील इच्छूक प्रशिक्षणार्थीना सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानवन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन हे सहा महिन्याचे प्रशिक्षण मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र वर्सोवा येथे देण्यात येणार आहे. या प्रशिक्षण केंद्रातून मत्स्यव्यवसाय नौकानयनाची मूलतत्वे, सागरी डिझेल इंजिनाच्या निरनिराळ्या भागाची माहिती व दुरुस्ती, मासेमारीची आधुनिक साधने, प्रात्यक्षिक इत्यादीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.


            प्रशिक्षणासाठी दारिद्र्य रेषेवरील प्रशिक्षणार्थी यांचेकडून ४५०/- व दारिद्र्य रेषेखालील प्रशिक्षणार्थीकडून १००/- शुल्क आकारले जाते. या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थी क्रियाशील मच्छिमार व प्रकृतीने सुदृढ असणे आवश्यक आहे. तसेच प्रशिक्षणार्थी १८ ते ३५ वयोगटातील असावा. त्यास पोहता येणे आवश्यक आहे, किमान इयत्ता ४ थी उत्तीर्ण, मासेमारीचा किमान २ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थी बायोमेट्रिक कार्डधारक /आधारकार्ड धारक असावा. प्रशिक्षणार्थीचा विहित नमुन्यात परिपूर्ण अर्ज असावा व त्या अर्जावर संबंधीत मच्छिमार संस्थेची शिफारस असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थी दारिद्रय रेषेखालील असल्यास, अर्जासोबत त्याबाबतचे प्रमाणपत्र, संबंधीत गट विकास अधिकारी यांच्या दाखल्यांची साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.


             आयोजित प्रशिक्षणासाठी वरील निकषांची पुर्तता करणाऱ्या मच्छिमारांनी विहित अर्ज आपल्या मच्छिमार सहकारी संस्थेच्या शिफारशीसह मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पांडुरंग रामले मार्ग, तेरे गल्ली, वर्सोवा, मुंबई ६१ येथे दिनांक २० डिसेंबर २०२२ पर्यंत सादर करावीत.



वस्त्रोद्योग धोरणातून १० लाख रोजगार निर्मिती ;





 वस्त्रोद्योग धोरणातून १० लाख रोजगार निर्मिती ;

३६ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट

- वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील.

       मुंबई, दि. ५ : “वस्त्रोद्योगामध्ये भारताने पूर्वीपासूनच आपले स्थान निर्माण केले आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. पारंपरिक कापड निर्मितीपासून ते तांत्रिक वस्त्रोद्योगाकडे वाटचाल सुरु असून या क्षेत्रात रोजगार निर्मितीला मोठी संधी उपलब्ध आहे. राज्याच्या प्रस्तावित नवीन वस्त्रोद्योग धोरणात १० लाख रोजगार निर्मिती आणि ३६ हजार कोटी रुपयांची गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे”, अशी माहिती उच्च तंत्र शिक्षण व वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.


          टेक्नोटेक्स-२०२३ कर्टन रेझर सेरेमनीचे हॉटेल ट्रायडंट मुंबई येथे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्‌घाटन उच्च तंत्र शिक्षण व वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय वस्त्रोद्योग आयुक्त रुप राशी, केंद्रीय सहसचिव राजीव सक्सेना, फिक्कीचे चेअरमन मोहन कावरीय, एसआरटीईपीसीचे चेअरमन धीरज शहा, वस्त्रोद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


          मंत्री श्री. पाटील म्हणाले की, देशातील वस्त्रोद्योगात महाराष्ट्राचा महत्वाचा वाटा आहे. वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने वीज सवलत दिली आहे. वस्त्रोद्योगासाठी लागणारा कापूस सुरुवातीला कमी दरात उपलब्ध होतो. परंतु नंतरच्या काळात कापसाचे भाव खूप वाढलेले असतात. वस्त्रोद्योगासाठी नियमित योग्य दरात कापूस उपलब्ध व्हावा, यासाठी राज्यशासन मोठ्या प्रमाणात कापसाची थेट खरेदी करुन खरेदी केलेल्या भावामध्ये वस्त्रोद्योगासाठी कापूस पुरवठा करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. वस्त्रोद्योगातील संधी आणि त्यासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी कौशल्य आधारित अभ्यासक्रम तयार करण्यात येईल. जागतिक पातळीचे वस्त्रोद्योग महाराष्ट्रात प्रदर्शन भरविण्यासाठी सेंटर उभारण्यात येईल, असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.


          केंद्र शासनाच्या पीएम मित्र योजनेंतर्गत राज्य शासनाने अमरावती येथील ब्राऊनफिल्ड पार्क आणि औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रीनफिल्ड पार्क असे प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविले आहेत, असे सांगून केंद्र सरकारचे वस्त्रोद्योग मंत्रालय आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजच्या सहकार्याने राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग मिशन (NTTM) अंतर्गत मुंबईत दि. २२ ते २४ फेब्रुवारी २०२३ दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाने तांत्रिक वस्त्रोद्योग परिषद-टेक्नोटेक्स-2023 या परिषदेला राज्यशासन सहकार्य करेल, असेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.


वस्त्रोद्योग आत्मनिर्भर भारताच्या उभारणीतील महत्वाचे क्षेत्र


- केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश


            “भारत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे. यामध्ये वस्त्रोद्योग क्षेत्राचा महत्वाचा वाटा आहे. भारतीय वस्त्रोद्योग बाजारपेठेत तांत्रिक वस्त्रोद्योगाचा वाटा जवळपास 13 टक्के असून जागतिक पातळीवरील तांत्रिक वस्त्रोद्योगाची वाढती मागणी लक्षात घेता वस्त्रोद्योग क्षेत्रात गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीसाठी संधी उपलब्ध आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या पीएम मित्र या योजनेमुळे या क्षेत्राला अधिक प्रोत्साहन मिळत आहे”, असे प्रतिपादन केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री श्रीमती दर्शना जरदोश यांनी केले.


          “तांत्रिक वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी केंद्र शासन प्रयत्न करत आहे. जागतिक स्तरावर तांत्रिक वस्त्रोद्योग ही एक मोठी बाजारपेठ आहे. ती अधिक मजबूत करण्यासाठी देशांतर्गत वापर आणि निर्यात या दोन्ही घटकांवर अधिक भर देणे आवश्यक आहे, असे सांगून वस्त्रोद्योगासाठी महाराष्ट्रात उत्तम पायाभूत सुविधा आणि पोषक वातावरण असल्यामुळे वस्त्रोद्योग क्षेत्रात महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहीलेले राज्य आहे”, असेही केंदीय राज्यमंत्री दर्शना जरदोश यांनी यावेळी नमूद केले.


          यावेळी टेक्नोटेक्स-2023 महितीपुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करून ध्वनिचित्रफीत दाखविण्यात आली.


0000



 



 


          

Featured post

Lakshvedhi