शेवगा
======
डॉ.जितेंद्र घोसाळकर
धन्वंतरी गोपियुश
८४८४९९१३८८
७७९८६१७२२२
शेवगा (शास्त्रीय नाव: मॉरिंगा ओलेफेरा) भारतातील वनस्पती असून उष्ण कटिबंधीय व समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशांत आढळणारा हा वृक्ष १० मी. उंचीपर्यंत वाढतो. शेवगा ही खाद्य भाजी आहे. शेवग्याच्या बियांपासून तेल काढले जाते. याची पानं, फुलं, फळं, बिया साल आणि मूळ अशा सर्वच गोष्टींचा उपयोग आयुर्वेदिक औषध तयार करण्यासाठी होतो. शेवग्यामध्ये दुधापेक्षा चार पट अधिक कॅल्शिअम आणि दोन पट अधिक प्रथिनं हे पोषकद्रव्य असतात.
उन्हाळ्याचे शेवटचे १५ दिवस आणि पावसाळ्याचे पहिले १५ दिवस असा १ महिन्याचा जो काळ असतो त्याला 'ऋतुसंधीकाळ' असे म्हणतात .हा कालावधी स्वास्थाच्या दृष्टीने खूप महत्वाचा असतो .या काळात शेवगा भाजी खाणे खूप चांगले असते .कोवळ्या पानांची भाजी आतड्यांना उतेज्जना देवून पोट साफ करते . त्यामुळे जठराचा कर्करोग टाळण्यासाठी फायदा होतो.पानात ''पीट्रीगोस्पेरमीन'' नावाचे तत्व असते.ते जीवाणू प्रतिबंधक म्हणून कार्य करते .ह्याच्या पुढे ''एचपायलोरी'' हा जीवाणू निष्प्रभ होतो . तसेच आतड्यातील जखमा व वरण बर्या करण्यास हि भाजी खूप उपयुक्त ठरते.
हाडे ठिसूळ होणे ,वजन जास्त वाढणे ,आळस, शारीरिक ,मानसिक थकवा असणार्यांनी हि भाजी मुबलक खावी .सर्व प्रकारच्या नेत्र रोगांमध्ये हि भाजी खावी.
फुलांची भाजी संधिवात व स्नायूंचे कमजोरी चे आजार साठी उपयोगी आहे तसेच उत्तम कृमिनाशक आहे .
अलीकडे असे ऐकले की शेवगा खाण्याने कावीळ होते पण ही चुकीची समजूत आहे. शेवगा हा उष्ण आहे हे खरेच पण त्याचा उपयोग विशेष करून वात किंवा कफ विकारावर होतो. याच्या कोवळ्या पानांची व फुलांची आणि शेंगांची भाजी करतात. याच्या शेंगा आमटीत वापरतात.
शेवगा तिखट, उष्ण आहे तसेच दीपक पाचक आहे. त्यमुळे आतड्यांचा क्षोभ होऊन त्याबाजूस रक्तप्रवाह अधिक होतो. पाचक रसाचा स्त्राव उत्तम होऊन अग्निमांद्यावर चांगला उपयोग होतो.
शेवगा दोन प्रकारचा आहे. पांढरा व काळा, यापैकी काळा जास्त उग्र आहे. याच्या मुळाच्या सालीची पावडर २ ते ३ ग्रॅम प्रमाणात अधून मधून येणारा ताप, फिट्स हिस्टेरिया, जुनाट संधिवात, सूज, जुलाब, खोकला, दमा आणि पंथारी वाढली असता वापरावी.
शेवग्याच्या सालीचा वास उग्र असतो.शेवग्याच्या सालीचा काढा हा रोगात वापरतात. अग्निदिपनासाठी शेवग्याच्या पानांचा किंवा शेवग्याच्या शेंगांचा वापर भाजीच्या स्वरूपात जेवणात करतात शेवग्यामुळे पोटात आग पडते. मिरे आणि मोहरी यांच्याप्रमाणे शेवग्यामुळे विदाह होतो. हे पदार्थ वारंवार खाण्याने पित्त व रक्त बिघडते आणि.(नाक, तोंड, गुद,मुत्र) शरीरातून रक्त बाहेर येते.
शोभांजन (शेवगा) शरीराच्या आतील व बाहेरील सूजेवर अतिशय प्रशस्त सांगितला आहे. शेवग्याच्या सालीचा काढा यकृतात आलेल्या सूजेवर देखील पिण्यास योग्य आहे. प्लीहा वाढली असता शिग्रत्वचेचा काडा, चित्रक, पिंपळी, यवक्षार यांचे सहित घ्यावा. मूतखडा झाला असता शेवगा हा उपयुक्त ठरतो. त्यामुळे लघवीवाटे तो बाहेर पडतो. शेवग्याचे बी (चूर्ण) नाकपुड्यात घातल्यास डोकेदुखी आणि डोक्याचा जडपणा नाहीसा होतो. नाकातून पू येत असल्यास शेवग्याच्या पानांच्या रसाने सिद्ध केलेले तेल नाकात घालण्यासाठी वापरावे.
शेवग्याचा पानांचा रस आणि मध मोतीबिंदू (कॅटरॅक्ट) झालेल्या रोग्यांसाठी प्रशस्त आहे. शेवग्याच्या शेंगांची भाजी पोटातील कृमी होऊ नयेत व झालेले नष्ट व्हावेत यासाठी खावी. शेवग्याच्या झाडाची पाने सुज कमी करणारी कृमिनाशक, डोळ्यांना हितकारक आणि व्हिटेमिन ए व सी भरपूर प्रमाणात असलेली आहेत.
याच्या पानांचा काढा करून दिल्यास उचकी व दम्यावर चांगला उपयोग होतो. जीभ लुळी पडल्यास शेवगा पोटात घ्यावा. कान वहात असेल तर याची फुले सावलीत वाळवून त्यावे वस्त्रगळ चूर्ण करून कानात घालावे. गळू झाले असल्यास त्यावर याची साल उगाळून लावल्यास गळू जिरते. असे अनेक औषधी उपयोग ह्या शेवग्याचे आहेत तेव्हा वैद्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने याचा जरूर उपयोग करा.
शेवग्यात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शिअम, पोटॅशिअम, आयर्न, मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन ए, सी आणि बी कॉम्पलॅक्स भरपूर प्रमाणात आढळून येते. शेवग्याच्या पानांची भाजी करतात. लोणच्यात, सॅलेडमध्ये, सूप करण्यासाठी त्याचा वापर करतात.
पचनक्रियेशी संबंधित आजार शेवगा सेवनाने नष्ट होतात. दस्त, कावीळ या आजारांमध्ये शेवग्याच्या पानांचा ताज रस, एक चमचा मध आणि नारळ पाणी एकत्र करून पिल्यास आराम मिळेल.
शेवग्याच्या पानांचे चूर्ण कॅन्सर आणि हृदय रुग्णांसाठी उपयुक्त औषध आहे. शेवग्याच्या सेवनाने ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. शेवग्याचा उपयोग पोटातील अल्सरच्या उपचारामध्ये केला जाऊ शकतो. यामुळे शरीरातील उर्जेचा स्तर वाढतो.
वाळलेल्या शेवग्याच्या बियांचे चूर्ण पाणी निर्जंतुक करण्यासाठी वापरले जाते.
कुपोषण पिडीत लोकांच्या आहारामध्ये शेवग्याचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो.
एक ते तीन वर्षांच्या लहान मुलांना आणि गर्भवती महिलांसाठी शेवग्याला वरदान मानले जाते. शेवग्याची मुळे जंतनाशक असतात.
शेवग्याचे ज्यूस गर्भवती महिलेला देण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे प्रसूती दरम्यान होणार्या त्रासामध्ये आराम मिळतो आणि प्रसूतीनंतर आईला वेदना कमी प्रमाणात होतात.
शेवग्यामध्ये व्हिटॅमिन 'ए' असते जे सौंदर्यवर्धक स्वरुपात काम करते, तसेच डोळ्यांसाठी हे लाभदायक आहे.
चेहऱ्यावर पिंपल्सची समस्या असेल तर शेवग्याचे सेवन करावे. शेवग्याचे सूप पिल्यास शरीरातील रक्त शुद्ध होते. चेहरा उजळतो आणि पिंपल्सची समस्या नष्ट होते.
शेवग्याच्या पानांपासून तयार केलेले सूप अस्थमा आजारामध्ये औषधाचे काम करते.
शेवग्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन 'बी' हे तत्त्व विपुल प्रमाणात असते. त्यामुळे 'तोंड येणे' या आजारात शेवग्याच्या पानांचे आहारातून सेवन लाभदायक आहे.
मधुमेह, मूतखडा यांपासून ते हृदयरोग, कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांमध्ये शेवग्याच्या प्रभावी उपयोग होतो.
बियांची पूड हा परिणामकारकरीत्या पाणी शुद्ध करण्यासाठी साधा व स्वस्त पर्याय आहे.
थोडक्यात ---
औषधी गुणधर्म -
शेवगा वनस्पतीचे मूळ, पाने, फुले, फळे आणि बिया औषधी गुणधर्माच्या आहेत.
- मूळाची ताजी साल कडू तिखट, उष्ण, रुचिकर, दीपन, पाचन, उत्तेजक, कोष्ठवात प्रशमन, वातहर, स्वेदजनन, कफहर व व्रणदोषनाशक आहे.
- शेवग्याच्या पाचक गुणधर्मामुळे अन्न पचते. आतड्यात उत्तेजन मिळते आणि शौचास साफ होते. शेवगा मज्जातंतू व हृदयास उत्तेजक आहे.
- शेवग्याची मूत्रपिंडावर उत्तेजक क्रिया घडते आणि लघवीचे प्रमाण वाढते.
- अग्निमांद्य, कुपचन, पोटशूळ या विकारात शेवग्याची साल देतात. ज्वरात शेवगा उपयुक्त आहे. कफज्वरात सालीचा रस द्यावा. व्रणशोथावर साल उगाळून लेप करतात, पोटातही देतात.
- घशाच्या शिथिलतेत फांटाने गुळण्या करतात. सांधेसूज व अंगदुखीमध्ये सालीचे कवळ बांधतात. बेशुद्ध माणसास शुद्धीवर आणण्यासाठी बियांची पूड नाकात घालतात. बियांचे चूर्ण कटू, तीक्ष्ण, उत्तेजक आणि दाहजनक आहे. मज्जातंतूव्युहाच्या रोगात सालीचा अंगरस देतात. पक्षघातातही सालीचा अंगरस देतात. बियांचे तेल आमवातात व वातरक्तांत चोळतात.
- मुळांचा रस किंवा मुळांच्या साली काढा दमा, संधिवात, प्लिहा व यकृतवृद्धी, आतील दाहशोथ आणि मूतखडा या उपयोगी आहे. मुळांच्या सालीचा रस कानदुखीत कानात घालतात. मुळांच्या सालीचा काढा अंगग्राहात शेक म्हणून वापरतात. साल नारूसाठी उपयुक्त आहे. पानांची पेस्ट लसूण, हळद, मीठ, मिऱ्याबरोबर कुत्रा चावण्यावर पोटातून व बाह्य उपाय म्हणून वापरतात.
- शेंगा आतड्याच्या कृमींना प्रतिबंधक आहेत. मानेतील क्षयज ग्रंथी आणि तोतरेपणा यावर शेवगा गुणकारी आहे. घशांचा, छातीच दाह, श्वासनलिका दाह, मूळव्याध या विकारावर शेवगा उपयुक्त आहे. शेवग्याची फुले आणि पाने कृमिनाशक, कफोत्सर्जक, वायूनाशी असून, पित्तप्रकोप आणि श्वासनलिका दाह यात गुणकारी आहेत.
शेवग्याची भाजी
शेवग्याच्या शेंगा घालून केलेली कढी, भाजी आमटी तसेच पिठले हे पदार्थ प्रसिद्ध आहेत; पण शेंगाबरोबरच शेवग्याच्या पानाची, कोवळ्या शेंड्यांच्या व फुलांची भाजीही करतात. शेवग्याच्या कोवळ्या पानांची भाजी मृग नक्षत्राच्या (सात जूनच्या) वेळी करण्याची प्रथा महाराष्ट्रामध्ये आहे. पावसाळ्याच्या आंरभी शरीरातील वातदोष वाढलेला असतो, त्याच्या नियमनासाठी जणू या भाजीची योजना आपल्या संस्कृतीमध्ये केलेली दिसते.
- शेवग्याच्या पानामध्ये अ, ब, क जीवनसत्त्वे, तसेच कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, आयोडिन ही खनिजद्रव्ये, प्रथिने, तंतूमय पदार्थ हे अन्नपदार्थ मुबलक प्रमाणात असतात. पानांच्या भाजीमुळे सूज, जंत, गळू हे आजार कमी होतात. या भाजीमुळे पचनसंस्थेचे विकार बरे होण्यास मदत होते.