Thursday, 1 December 2022

इन्सानी यात तो देखो

 


राज्यातील विद्यार्थ्यांना मिळणार आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण.

 राज्यातील विद्यार्थ्यांना मिळणार आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण.

            मुंबई दि. 30 : महाराष्ट्र राज्य स्कुल सेफ्टी कार्यक्रमांतर्गत राज्यातील 34 जिल्ह्यांतील 34 शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नागरी संरक्षण दल व होमगार्ड यांच्यामार्फत आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.


            राज्याच्या शिक्षण विभाग, युएनडीपी व महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्या पुढाकाराने आणि ‘रिका इंडिया’ या संस्थेच्या सहकार्याने 14 डिसेंबरपर्यंत आपत्ती व्यवस्थापन मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले आहे.


             नागरी संरक्षण दल व होमगार्ड विभागातील अधिकारी संबंधित शाळा अथवा महाविद्यालयातील शिक्षकांशी समन्वय साधून आपत्ती व्यवस्थापन मॉकड्रिल आयोजित करणार आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना आपत्ती अथवा धोक्याची सूचना, आग विमोचन, स्थलांतर, याची प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना नैसर्गिक आपत्ती व मानव निर्मित आपत्तीमध्ये धैर्याने संकटावर मात कशी करावी तसेच आपत्ती व्यवस्थापनाचे बहुमोल व उपयोगी प्राथमिक प्रशिक्षण या मॉकड्रिलच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

कामगार कल्याणासाठी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांमध्ये संवाद.

 कामगार कल्याणासाठी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांमध्ये संवाद.

            मुंबई, दि. ३० : राज्यातील कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र शासनाच्या सुरु असलेल्या तसेच नवीन योजनांवर राज्याचे कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे आणि उत्तर प्रदेशचे श्रम व रोजगार मंत्री अनिल राजभर यांच्यात चर्चात्मक संवाद झाला. यावेळी मंत्री श्री.राजभर यांनी महाराष्ट्र शासनाच्या कामगार कल्याण योजना अनुकरणीय आहेत असे कौतुक करून श्री. खाडे यांना उत्तर प्रदेश भेटीचे निमंत्रण दिले.


            मंत्रालयात मंगळवारी (दि.२९) झालेल्या या बैठकीत दोन्ही राज्यातील कामगारांसाठीच्या विविध कल्याणकारी योजनांच्या माहितीचे आदान-प्रदान करण्यात आले.


            यावेळी कामगार मंत्री डॉ.खाडे विभागाच्या महत्त्वाकांक्षी योजनांची माहिती देतांना म्हणाले, राज्यातील कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन विविध कल्याणकारी योजना राबवित आहे. कामगार विभागाची सर्व कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन आणि राज्य कामगार विमा योजना (ईएसआयसी) रुग्णालये उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. कामगारांना हक्काचे घर मिळावे यासाठी प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत नोंदणीकृत कामगारांना घरकुल देण्याबरोबरच कामगारांच्या मुलामुलींसाठी क्रीडा संकुल योजना राबविण्याचा मानस आहे. ५५ वर्षांवरील घरेलू नोंदणीकृत कामगारांना १० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, असे मंत्री डॉ.खाडे यांनी यावेळी सांगितले.


             असंघटित कामगारांच्या विकासासाठी योजना राबवितांना कामगारांची आकडेवारी आवश्यक असते. देशभरातील असंघटित कामगारांच्या आकडेवासाठी केंद्र सरकार काम करीत आहे. या कामगारांना सुविधा देण्यासाठी राज्य शासनाकडे निधी उपलब्ध आहे. यासोबतच सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) निधीच्या माध्यमातूनही कामगार कल्याणासाठी निधी उपलब्ध केला जात आहे. राज्याचा कामगार विभाग उत्तमरित्या काम करीत असल्याचे कामगार मंत्री श्री.खाडे यांनी सांगितले.


महाराष्ट्राच्या कामगार कल्याण योजना अनुकरणीय – मंत्री अनिल राजभर


            उत्तर प्रदेशचे श्रम व रोजगार मंत्री अनिल राजभर म्हणाले, कामगारांसाठी चांगले काम करणाऱ्या राज्यातील योजना, उपक्रमांच्या माहितीचे आदान-प्रदान, संवाद होणे गरजेचे आहे. उत्तर प्रदेश सरकारने श्रमिक कामगारांच्या मुलामुलींना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर अटल आवासी विद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. औद्योगिक विकासाकडे वाटचाल करीत असतांना श्रमिक कामगारांकडे दुर्लक्ष होणार नाही, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सध्या सर्वच क्षेत्रात व्यवसायानुकूल वातावरणाचा (ईज ऑफ डुईंग बिजनेस) वापर होत आहे. त्यामुळे श्रमिक कामगार दुर्लक्षित होता कामा नये. यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. इतर राज्य व देशांतील योजनांच्या माहितीचे आदान-प्रदान, संवाद होणे गरजेचे आहे. महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम कामगारांसाठीच्या घरकुल योजनेची स्तुती करुन याच धर्तीवर उत्तर प्रदेशात ही योजना राबविण्याचा मानस असल्याचे मंत्री श्री.राजभर यांनी यावेळी सांगितले.


            यावेळी असंघटित कामगार आयुक्तालय, कामगार आयुक्तालय, कामगार कल्याण मंडळ, घरेलू कामगार, आम आदमी विमा योजना, महाकल्याण क्रीडा प्रबोधिनी आदी योजना, उपक्रम आणि कामकाजाची सादरीकरणाद्वारे माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.


            या बैठकीला कामगार विभागाचे सह सचिव शशांक साठे, उपसचिव दादासाहेब खताळ, उपसचिव दीपक पोकळे, कामगार कल्याण मंडळाचे आयुक्त रविराज इलवे, उपायुक्त सुनिता म्हैसकर, उत्तर प्रदेशचे कामगार अतिरिक्त आयुक्त मधुर सिंह, उपायुक्त शमीम अख्तर, उपसंचालक ब्रिजेश सिंह आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


०००



.जे. आणि जीटी रूग्णालयांना आधुनिक वैद्यकीय उपकरणांसाठी

 जे.जे. आणि जीटी रूग्णालयांना आधुनिक वैद्यकीय उपकरणांसाठी19 कोटी रूपये मंजूर.

            मुंबई, दि. 30 :- जे.जे. आणि जीटी रूग्णालयांसाठी 19 कोटी रूपयांची आधुनिक वैद्यकीय उपकरणे घेण्यास मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मंजुरी दिली आहे.


            पालकमंत्री दीपक केसरकर यांनी 19 ऑक्टोबर रोजी जे.जे., कामा तसेच जीटी रूग्णालय येथे प्रत्यक्ष भेट देऊन वैद्यकीय यंत्रसामग्रीची पाहणी केली होती. जे.जे. रूग्णालयात हृदय शस्त्रक्रिया विभागातील ॲन्जिओग्राफी व ॲन्जिओप्लास्टी करणारी यंत्रे तसेच जीटी रूग्णालयात स्कॅनर मशीन व एमआरआय मशीन जुनी झाल्याने तातडीने नवीन मशीन खरेदीची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले होते.


            याची दखल घेऊन जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नवीन यंत्र उपलब्ध करून देण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. केसरकर यांनी दिल्या होत्या. ही यंत्रसामग्री तातडीने उपलब्ध होण्यासाठी मुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी नुकतीच प्रशासकीय मान्यता देऊन एकूण 19 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यापैकी जेजे रूग्णालयातील ॲन्जिओग्राफी उपकरणासाठी पाच कोटी 70 लक्ष रूपये तर जीटी रूग्णालयातील स्कॅनर व एमआरआय उपकरणासाठी 13 कोटी 56 लक्ष रूपये खर्च होणार आहेत.

माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ अभियानाच्यामाध्यमातून मुंबई अधिक सुंदर बनवू.

 माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ अभियानाच्यामाध्यमातून मुंबई अधिक सुंदर बनवू.

- पालकमंत्री मंगल प्रभात लोढा.

            मुंबई, दि. 1 : ‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ अभियानाच्या माध्यमातून आपण सर्वजण मिळून मुंबई अधिक सुंदर करुया, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले.


             मुंबई उपनगर जिल्ह्यातील वांद्रे व एच ईस्ट वॉर्ड येथे ‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ अभियान शुभारंभप्रसंगी मंत्री श्री. लोढा बोलत होते.


               ते पुढे म्हणाले की, आज पासून एक महिनाभर आपण हे अभियान राबवत आहोत. स्वच्छता ही सवय आहे, ती फक्त एक किंवा दोन दिवसांकरिता नाही तर रोजच आपल्याला आपला परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. रोगराई होऊ नये, यासाठी आपला परिसर अधिक स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया.


            पालकमंत्री श्री. लोढा म्हणाले की, पंधरा वॉर्डमधील स्थानिक लोकप्रतिनिधी, शासनाचे सर्व विभाग, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना तसेच नागरिकांनी या अभियानात श्रमदान करून ते यशस्वी करू या. प्रत्येकाला जेव्हा शक्य होईल तेव्हा सुट्टीच्या दिवशी शनिवार, रविवारी श्रमदान करा आपला परिसर, शाळा, महाविद्यालय, पोलीस स्टेशन, सार्वजनिक ठिकाणे, सागरी किनारे यांची स्वच्छता करा, असे आवाहन पालकमंत्री श्री. लोढा यांनी केले.


        यावेळी सर्वांनी मिळून स्वच्छतेची शपथ घेतली. एच ईस्ट वॉर्ड येथे आमदार पराग अळवणी, वांद्रे येथे मुंबई उपनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी विकास नाईक, जिल्हा नियोजन अधिकारी भूषण देशपांडे व अन्य शासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.


000

लोकसहभागाच्या माध्यमातून मुंबई भारतातील सर्वात सुंदर शहर बनविणार

 लोकसहभागाच्या माध्यमातून मुंबई भारतातील सर्वात सुंदर शहर बनविणार

- पालकमंत्री दीपक केसरकर.

            मुंबई, दि. 1 : मुंबईला सर्वात स्वच्छ, सुंदर आणि निरोगी शहर बनविण्याचा शासनाचा निर्धार आहे. हा निर्धार लोकसहभागाच्या माध्यमातून पूर्ण करणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.


            बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ उपक्रमाचे उद्घाटन मंत्री श्री.केसरकर यांच्या हस्ते जी-नॉर्थ कार्यालय परिसरात करण्यात आले. यावेळी स्थानिक आमदार सदा सरवणकर, मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त चंदा जाधव, उपायुक्त रमाकांत बिरादार, सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे आदी उपस्थित होते. हा उपक्रम 1 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत राबविण्यात येणार आहे.


            मंत्री श्री.केसरकर म्हणाले की, मुंबई आर्थिक राजधानीचे शहर असल्याने देशभरातून लोक येथे येतात. यामुळे सार्वजनिक व्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी महानगरपालिकेवर असून, ते ती पूर्ण करीत आहे. तथापि, हे शहर स्वच्छ राखण्याची जबाबदारी केवळ महानगरपालिकेची नसून यासाठी लोकसहभाग देखील महत्त्वाचा आहे. यासाठी शासनाचे सर्व विभाग याकामी सहकार्य करतील, असे त्यांनी सांगितले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी परिसरात येणाऱ्या नागरिकांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका दरवर्षी देत असलेल्या सुविधांचे तसेच महानगरपालिकेच्या कामगारांशी संवाद साधून त्यांच्या कामाचे कौतुक केले.


सर्वसामान्यांसाठी रोजगार निर्मितीवर भर


            मुंबई शहराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यात येणार आहे. याअंतर्गत कोळीवाडे, धार्मिक आणि सांस्कृतिक वैभव असलेल्या परिसरांचे सौंदर्यीकरण, पायाभूत सुविधांचा विकास यावर भर देण्यात येत आहे. मुंबईकरांना विविध प्रकारचे अन्नपदार्थ चाखायला मिळावेत तसेच सर्वसामान्यांना अधिक रोजगार मिळावा यासाठी दक्षिण मुंबईतील काही भागांत फूड कोर्ट निर्माण करण्यात येणार आहेत. हे करीत असताना स्वच्छतेला प्राधान्य देण्यात येणार असल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.


            आजारांचे मूळ अस्वच्छतेत असल्यामुळे प्रत्येकाने स्वच्छतेची सुरूवात स्वत:पासून करावी, असे आवाहन आमदार सदा सरवणकर यांनी केले. तर उपायुक्त श्री.बिरादार यांनी स्वच्छता अभियानाबाबत सविस्तर माहिती दिली. श्रीमती जाधव यांनी स्वच्छतेसाठी लोकप्रतिनिधींच्या सूचनेनुसार महानगरपालिकेमार्फत उपाययोजना केल्या जातील, याबाबत आश्वस्त केले. ‘सिटी ऑफ लॉस एंजेलिस’ या महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. एड्स नियंत्रण दिनाचे औचित्य साधून मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेमार्फत ‘मितवा’ या पुस्तिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने चैत्यभूमी परिसरात मद्य विक्रीस बंदी.

 महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने चैत्यभूमी परिसरात मद्य विक्रीस बंदी.

- जिल्हाधिकारी राजीव निवतकर.

            मुंबई, दि. 1 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने 6 डिसेंबर या दिवशी दादर परिसरातील सर्व किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्यात येणार असल्याचे आदेश मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी जारी केले.


            मुंबई शहर जिल्ह्यातील निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, एफ,जी,आय., विभाग, मुंबई शहर यांच्या कार्यक्षेत्रातील दादर, शिवाजीपार्क, माहिम, धारावी, सायन, करीरोड स्टेशन पर्यंतचा सर्व भाग, वरळी सी फेस, वरळी कोळीवाडा ते संगम नगर पर्यंत तसेच सायन कोळीवाडा, किंग्जसर्कल, वडाळा, शिवडी, काळाचौकी, भोईवाडा पर्यंत हद्दीमधील सर्व अनुज्ञप्त्या तसेच निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क ई- विभाग, मुंबई शहर याच्या कार्यक्षेत्रातील फक्त वरळी भागातील सर्व अनुज्ञप्त्या या मंगळवार 6 डिसेंबर 2022 रोजी पूर्णतः बंद ठेवण्यात याव्यात. या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे. आदेशाचे उल्लंघन करून मद्य विक्री इ. करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.


००

Featured post

Lakshvedhi