Thursday, 1 December 2022

रोजगार हमी योजनेची कामे ग्रामसेवकांनी

 रोजगार हमी योजनेची कामे ग्रामसेवकांनी अधिक गतीने करावी

- संदिपान भुमरे.

            मुंबई दि. 30 : राज्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत ग्रामसेवकांची भूमिका महत्त्वाची आहे. या योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांची गती वाढवावी, असे निर्देश रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी दिले.


            रोहयो मंत्री श्री. भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या शासकीय निवासस्थानी ग्रामसेवक संघटनेच्या निवेदनाच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार संजय बनसोड, रोहयोचे अपर मुख्य सचिव नंदकुमार, फलोत्पादन विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, फलोत्पादन विभागाचे संचालक डॉ. के.पी.मोते,परिमल सिंह यांच्यासह रोहयो आणि फलोत्पादन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


            मंत्री श्री. भुमरे म्हणाले की, ग्रामसेवकांच्या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक विचार करण्यात येईल. ग्रामसेवकांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची सोपविण्यात आलेली कामे गुणवत्तापूर्ण आणि अधिक गतीने करावीत. इतर राज्यात ज्याप्रमाणे उपलब्ध निधी पूर्ण खर्च होईल अशा पद्धतीने कामे करतात त्याप्रमाणे आपल्या राज्यातील कामे करण्यासाठी अभ्यास करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.


            या बैठकीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करणे आणि सर्व कामगारांच्या हजेरीपत्रकावरील प्रतिस्वाक्षरी करणेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.


            राज्यात अधुनिक कांदाचाळ निर्माण करण्यासाठी सादरीकरण करण्यात आले. मंत्री श्री. भुमरे म्हणाले की, ज्या ज्या ठिकाणी खाजगी आधुनिक कांदाचाळ निर्माण करण्यात आली आहे. त्याठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन अभ्यास करण्यात यावा. फलोत्पादन विभागामार्फत प्रायोगिक तत्त्वावर एक आधुनिक कांदाचाळ निर्माण करुन त्याचा खर्च, कांद्याची सुरक्षितता, शेतकऱ्यांना होणारा फायदा - तोटा आदी अभ्यास करण्याच्या सूचना मंत्री श्री.भुमरे यांनी दिले.


००००




मूव्हिंग अ‍ॅस्पिरेशन्स’ पुस्तकांचे रविवारी

 मूव्हिंग अ‍ॅस्पिरेशन्स’ पुस्तकांचे रविवारीराज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते प्रकाशन


महाराष्ट्रातील 25 ‘नेक्स्टजेन’ उद्यमींचा सहभाग, 

दत्ता जोशी यांचे 40 वे पुस्तक


महाराष्ट्रातील ‘नेक्स्टजेन’ उद्योजकांच्या वाटचालीचा, त्यांच्या कार्यकर्तृत्त्वाचा आणि स्वप्नांचा वेध घेणार्‍या ‘मूव्हिंग अ‍ॅस्पिरेशन्स’ या मराठी व इंग्रजीत लिहिलेल्या 2 पुस्तकांचे प्रकाशन रविवार, दि. 4 डिसेंबर रोजी मुंबईत राजभवन येथे महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांच्या शुभहस्ते होत आहे.


मुक्त पत्रकार व प्रेरक लेखक श्री. दत्ता जोशी यांनी महाराष्ट्रभर भ्रमंती करून 25 निवडक उद्योजक घराण्यांचा वेध या पुस्तकांतून घेतला आहे. उल्लेखनीय बाब ही आहे, की श्री. दत्ता जोशी यांचे हे 40 वे पुस्तक आहे. ‘द कॅटालिस्ट’ या प्रकाशन संस्थेद्वारे ही पुस्तके प्रकाशित होत आहेत.


‘मालकाचा मुलगा’ ते ‘मालक’ या प्रवासात जनरेशन गॅप, कम्युनिकेशन गॅप, इंट्रापर्सनल रिलेशनशिप्समधील वेगवेगळे पैलू समाविष्ट असतात. या प्रत्येक आघाडीवर ही पिढी कशा पद्धतीने समन्वय साधते या पैलूवरही यात प्रकाश टाकलेला आहे. फॅमिली बिझनेसमधील ताणतणाव, वर्क कल्चरमधील बदल, ऑटोमेशनचे आव्हान, कामगारांतील बदलती वृत्ती या बरोबरच आर्थिक नियोजन आणि मूल्ये यांवरही यात चर्चा केली आहे.


महाराष्ट्राच्या सर्व विभागांतून दुसर्‍या वा तिसर्‍या पिढीतील उद्योजकतेचा वेध घेतानाच या पुस्तकात महाराष्ट्राबाहेर सूरत येथे कार्यरत असलेल्या आगळ्या उद्योगाचीही पुढच्या पिढीची गाथा उलगडली गेली आहे.


मराठी व इंग्रजीतून एकाच वेळी प्रकाशित होत असलेल्या या पुस्तकांत अथांग व अभेद्य जैन (जैन इरिगेशन, जळगाव), अमित घैसास (यशप्रभा ग्रुप, पुणे), निखिल व अभिजित राऊत (अभिजित ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, नायगाव, वसई), परीक्षित प्रभुदेसाई (पितांबरी उद्योगसमूह, ठाणे), मिहीर वैद्य ( श्री गणेश प्रेस अँड कोट्स, औरंगाबाद), स्वराली सावे (एनिकार फार्मास्युटिकल्स, बोईसर), कौस्तुभ फडतरे (कवित्सु रोबोट्रॉनिक्स, सातारा), अंकित काळे (काळे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, औरंगाबाद), कुशल ठक्कर (महाराष्ट्र बायो फर्टिलायझर्स, लातूर), रवी जैन (रवी मसाले, औरंगाबाद), अनुप व अतुल कोगटा (दाल परिवार, जळगाव), अनिकेत व निमिष पाटील (वेगा केमिकल्स, जळगाव), श्रुती अहिरे (आनंद अ‍ॅग्रो, नाशिक), अनुराग मोराणकर (एलमेक इंजिनियर्स, धुळे), अभिजित गव्हाणे (मेधावी सिमेंट प्रॉडक्ट्स, नांदेड), चेतन व दीपक पाटील (कृष्णा पेक्टिन्स, जळगाव), मल्हार मुतालिक (पॉझिटीव्ह मिटरिंग पंप्स, नाशिक), सिद्धार्थ कुलकर्णी (हरमन चहावाला, सांगली), क्षितिज महाशब्दे व जान्हवी म्हात्रे (वैदिक संस्कार आर्किटेक्ट्रॉनिक्स, मुंबई), आदित्य कुलकर्णी (निर्मिती ग्रुप, नाशिक), केतकी कोकीळ (संजय ग्रुप, औरंगाबाद), मयांक व वेदांती शर्मा (मयांक अ‍ॅक्वाकल्चर, सूरत), पियुष देसले (पियुष लाईफस्पेसेस, धुळे), सुमीत धूत व कपिल राठी (तुलसी पेन्ट्स प्रा. लि., नांदेड) आणि सौरभ व गौरव भोगले आणि मिहिर सौंदलगेकर (एआयटीजी ग्रुप, औरंगाबाद) या नेक्स्टजेन उद्यमींचा समावेश आहे.


उल्लेखनीय बाब ही आहे की हे सर्व 25 उद्योग परस्परांपासून भिन्न असून या निमित्ताने 25 वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगांचा गाभा समजून घेण्याची संधी या पुस्तकातून वाचकांना मिळणार आहे. सप्तरंगी छपाई असलेले २३२ पृष्ठांचे क्राऊन आकाराचे प्रत्येकी 500 रुपये मूल्याचे हे पुस्तक ‘फ्लिपकार्ट’वर खरेदीसाठी वाचकांना सवलतीत उपलब्ध आहे.


dattajoshis@gmail.com



अदभुत संजीवनी बुटी

 


जगणं 🌸*आमचा नका विचारू

 एक सुरेख कविता...


              *🌸जगणं 🌸*

           

        येईल *साठी,* येईल *सत्तरी*

        करायची नाही कुणीच *चिंता,*

        प्रत्येक दिवस *मजेत* जगायचा

        वाढवायचा नाही अपेक्षांचा *गुंता.* 


       वय झालं *म्हातारपण* आलं,

       उगाच *कोकलत* बसायचं नाही.

       विनाकारण *बाम* लावून,

       चादरीत *तोंड* खुपसायचं नाही.


       तुम्हीच सांगा *छंद* जोपासायला,

       *वयाचा संबंध* असतो कां ?

        रिकामटेकडं *घरात* बसून

        माणूस *आनंदी* दिसतो कां ?


        पोटा-पाण्यासाठी *पोरं-सुना*

        *घर* सोडून जाणारच, 

         प्रत्येकाच्या *आयुष्या* मध्ये

         असे *रितेपण* येणारच. 


         *करमत* नाही *करमत* नाही

         सारखे-सारखे *म्हणायचे* नाही,

         आवडत्या कामात *दिवस* घालवायचा

         उगाचच *कुढत* बसायचं नाही.


         घरातल्या *घरात* वा *बागेत*

         *हिंडाय-फिरायला* जायचं,

         वय जरी *वाढलं* असलं तरी

         मनपसंत *गाणं* मनमोकळं गायचं.


          *गुडघे* गेले, *कंबर* गेली

          नेहमी नेहमी *कण्हायचं* नाही,

          आता आपलं *काय राहिलं?*

          हे फालतू वाक्य कधीच *म्हणायचं* नाही.


         पिढी दर पिढी *चालीरीतीत*

         थोडे फार *बदल* होणारच, 

         पोरं-पोरी त्यांच्या *संसारात* 

         कळत नकळत *गुंतणारच.* 


         तू-तू, मै-मै, जास्त *अपेक्षा*

         कुणाकडूनही *करायची* नाही,

         मस्तपैकी *जगायचं* सोडून

         रोज थोडं थोडं *मरायचं* नाही.


          स्वत:च स्वत:ला *समजवायचं* असतं

          पुढे पुढे *चालत* राहायचं असतं,

          वास्तू *तथास्तू* म्हणत असते

          हे उमजून निरामय *जगायचं* असतं.


  पन्नाशी-साठी आणि सत्तरी तील सर्व मित्र मैत्रिणींना समर्पित.

*संकलन:-*

www.sakalmarathasoyrik.com

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी 2 डिसेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्र ऑफलाईन सादर

 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी 2 डिसेंबरपर्यंत

नामनिर्देशनपत्र ऑफलाईन सादर करण्याची मुभा

                                                     - राज्य निवडणूक आयुक्त


          मुंबईदि. 1 (रानिआ) : विविध जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने (ऑफलाईन) नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहेतसेच नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुदत 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत वाढविण्यात आली आहेअशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी आज दिली.

          श्री. मदान यांनी सांगितले कीराज्य निवडणूक आयोगाने 9 नोव्हेंबर 2022 रोजी राज्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 (दुपारी 3 वाजेपर्यंत) या कालावधीत संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यात आता अंशत: दुरूस्ती करून नामनिर्देशनपत्र पारंपरिक (ऑफलाईन) पद्धतीने 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत सादर करता येतील.

००००

लोकराज्य चा “चला जाणूया नदीला” विशेषांक प्रकाशित

 लोकराज्य चा “चला जाणूया नदीला” विशेषांक प्रकाशित

मुंबई, दि. ३० : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या 'लोकराज्य' मासिकाच्या नोव्हेंबर २०२२ च्या “चला जाणूया नदीला” या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.


'लोकराज्य' च्या या विशेषांकामध्ये राज्यभर राबविण्यात येत असलेल्या 'चला जाणूया नदीला' या उपक्रमासंदर्भात विशेष लेखांचा समावेश करण्यात आला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ नद्यांच्या परिक्रमेचा उपक्रम राज्य शासनाने लोकसहभागातून हाती घेतला आहे. या अनुषंगाने राज्यात ७५ नद्यांचे संवर्धन करणे, नद्या समजून घेणे, नद्यांची जपणूक कशी करावी, पावसाच्या पाण्याचे नियोजन, तसेच भूशास्त्रीय रचना, वर्षा चक्र, पीकचक्र, नद्यांशी संवाद इत्यादी विषयांचा या अंकात सविस्तर उहापोह करण्यात आला आहे. याबरोबरच मंत्रिमंडळ निर्णय व महत्त्वपूर्ण घडामोडी, नेहमीची सदरेही अंकात समाविष्ट आहेत.


हा अंक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या https://dgipr.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर तसेच https://mahasamvad.in/ या पोर्टलवर वाचण्यासाठी मोफत उपलब्ध आहे.

लम्पी चर्मरोग : नुकसान भरपाईपोटी राज्यात १०४३४ पशुपालकांच्या खात्यांवर२६ कोटी रुपये जमा

 लम्पी चर्मरोग : नुकसान भरपाईपोटी राज्यात १०४३४ पशुपालकांच्या खात्यांवर२६ कोटी रुपये जमा

- सचिंद्र प्रताप सिंह

            मुंबई, दि. 30 : राज्यात लम्पी चर्मरोगामुळे ज्या पशुपालकांचे गोवंशीय पशुधन मृत्युमुखी पडले, अशा १० हजार ४३४ पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाई म्हणून रु. २६.५६ कोटी रुपये जमा करण्यात आली असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.


            श्री.सिंह म्हणाले की, राज्यामध्ये 30 नोव्हेंबर २०२२ अखेर 35 जिल्ह्यांमधील एकूण 3857 संसर्गकेंद्रांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण 327246 बाधित पशुधनापैकी एकूण 247202 पशुधन उपचाराने बरे झालेले आहे. उर्वरीत बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर एकूण 144.12 लक्ष लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून एकूण 139.03 लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांची आकडेवारी नुसार महाराष्ट्रात सुमारे 99.79 % गोवंशीय पशुधनाला लसीकरण झाले आहे.


            रोग प्रादुर्भाव नियंत्रणासाठी “माझा गोठा, स्वच्छ गोठा” अभियान राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्वसाधारणपणे गोधनास कळपामध्ये चरण्यासाठी पाठविणे आणि सार्वजनिक पाणवठ्यावर त्यांना पाणी पाजण्यासाठी कळपाने नेण्याच्या गावांमधील दोन्ही पद्धती देखील लम्पी चर्मरोगाच्या प्रादुर्भावास कारणीभूत असल्याचे मत राज्यस्तरीय कार्यदलाने व्यक्त केले असल्यामुळे आयुक्त पशुसंवर्धन यांनी या दोन्ही पद्धती लम्पी चर्मरोग नियंत्रणात येईपर्यंत बंद ठेवण्याबाबत गोपालकांमध्ये जागृती करण्याच्या सूचना श्री सिंह यांनी दिल्या.


            महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठाने 23 नोव्हेंबर रोजी कीटकांच्या नियंत्रणासाठी प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून राज्यात गोठ्यातील कीटक नियंत्रण, निर्जंतुकीकरण या महत्त्वपूर्ण बाबी पशुपालक व ग्रामपंचायती यांनी मोहीम स्वरूपात राबवण्यात याव्यात. शासकीय आणि खाजगी पशुवैद्यकांनी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने दि. 28 नोव्हेंबर रोजी दिलेल्या सुधारीत उपचार मार्गदर्शक सूचनांप्रमाणे उपचार करावेत. शासनाकडून मोफत औषधोपचार व लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असल्यामुळे सर्व पशुपालकांना विशेष आवाहन करण्यात येते की, त्यांनी स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या पशुधनावर उपचार करून घेण्यासाठी सहकार्य करावे.


             28 ऑक्टोबर रोजीच्या क्षेत्रिय अधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय कृती दलासमवेत झालेल्या दृकश्राव्य माध्यमाद्वारे आढावा बैठकीमध्ये लसीकरण न केलेल्या आणि लम्पी चर्म रोगाने बाधीत नसलेल्या गायींच्या कुठल्याही वयाच्या वासरांना, तसेच अद्यापही लसीकरण न झालेल्या गोवंशीय पशुधनास लसीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले. यानुसार, गोपालकांनी त्यांच्या उक्त नमूद वासरे व गोवंशीय पशुधनास क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यकक्षेतील गावांमध्ये अशा लसीकरणासाठी मोहीम स्वरूपात पुर्वनिर्धारीत केलेल्या दिवशी लसीकरण करून घेण्याचे आवाहन आयुक्त श्री. सिंह यांनी केले आहे.

Featured post

Lakshvedhi