सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Tuesday, 1 November 2022
पोलीस स्टेशन आणि निवासस्थान बांधकामांसाठी
पोलीस स्टेशन आणि निवासस्थान बांधकामांसाठी आवश्यक निधी देणार.
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंबई, दि. 1 : राज्यातील पोलीस स्टेशन आणि पोलीस निवासस्थानांची कामे ही प्राथमिकता असून ती कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाला दिले आहेत. या कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मंत्रालयात आज उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस गृहनिर्माण संदर्भात महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाची आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. अपर मुख्य सचिव (गृह) आनंद लिमये, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, बृहन्मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अर्चना त्यागी आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, सुरुवातीच्या टप्प्यात अत्यावश्यक असलेली कामे हाती घ्या. ती वेळेवर आणि गतीने पूर्ण होतील, यासाठी प्राधान्य द्या. पोलीस स्टेशनच्या ठिकाणीच पोलीस निवासस्थानांसाठी जागा उपलब्ध असेल तर तिथेच ती बांधली जावीत. त्या जागेचा पुरेपूर उपयोग पोलीसांसाठी होईल, अशा पद्धतीने आराखडा तयार करण्याची सूचना त्यांनी केली. पोलीसांच्या निवासस्थान बांधकामांसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस स्टेशन बांधकामांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातूनही निधी देण्याचा विचार केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कामे वेळेवर आणि दर्जेदार करा
महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाने प्राधान्यक्रमानुसार ज्या कामांची यादी तयार केली आहे. ती पुन्हा एकदा तपासून सादर करावी. कामे वेळेवर आणि दर्जेदार व्हावीत, याकडे लक्ष द्यावे. याबरोबरच पाच वर्ष पूर्ण झालेल्या इमारतींची देखभाल व दुरुस्ती महामंडळाने स्वत:कडे घ्यावी. त्यासाठी एखादी यंत्रणा आऊटसोर्सिंगद्वारे नेमून त्याचे संनियंत्रण महामंडळाने करावे आणि या इमारतींची देखभाल व दुरुस्ती तात़डीने व्हावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केल्या.
सध्या राज्यातील पोलीस स्टेशन आणि पोलीस निवासस्थानांची कामे प्रगतीपथावर आहेत. यातील 15 प्रकल्पांचे लवकरच हस्तांतरण होणार आहे तर 10 प्रकल्प आगामी सहा महिन्यांत पूर्ण होतील. उर्वरित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कामांची गती वाढवा, असे स्पष्ट निर्देश त्यांनी महामंडळाला दिले.
मुंबईमध्ये आता नव्या कारागृहाची गरज आहे. त्यासाठी किमान 10 एकर जागेची आवश्यकता आहे. महामंडळाने यासंदर्भात जागेची निश्चिती करुन कारागृह निर्मितीचा विचार करावा. याशिवाय, नागपूर आणि पुणे येथेही कारागृहाची गरज असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. नागपूर येथील न्याय वैद्यक प्रयोगशाळेची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
वरळी येथील पोलीस वसाहतीच्या पुनर्विकास कामांना गती देण्यात यावी. याठिकाणी मार्केट ॲनालिसीस करण्यात आलेले आहे. महत्वाच्या जागेवर असणारा हा प्रकल्प वेळेवर पूर्ण होणे आवश्यक असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी स्पष्ट केले. इमारतीबरोबर परिसरही स्वच्छ ठेवावा, असे निर्देशही त्यांनी दिले.
यावेळी पोलीस महासंचालक श्री. सेठ आणि महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती त्यागी यांनी राज्यातील पोलीस स्टेशन आणि पोलीस निवासस्थानांची बांधकामे आणि सद्यस्थिती, या बांधकामांसाठी उपलब्ध तरतूद आणि आवश्यक निधी आदींची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.
युवकांचे सक्षमीकरण व कौशल्य विकास
कौशल्य विद्यापीठाच्या माध्यमातून
युवकांचे सक्षमीकरण व कौशल्य विकास
सर्वांच्या सहभागातून विद्यापीठाला आदर्श विद्यापीठ बनवू
- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
मुंबई, दि. 1 : “महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या माध्यमातून राज्यातील युवकांचे सक्षमीकरण आणि त्यांचा कौशल्य विकास होईल, त्यामाध्यमातून राज्यात कुशल रोजगार आणि स्वयंरोजगार निर्मितीच्या चळवळीला मोठी गती प्राप्त होईल. सर्वांच्या सहभागातून या विद्यापीठाला आदर्श विद्यापीठ बनवू”, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
राज्यात विशेषत: शहरी भागात केंद्रीत झालेली कौशल्य विकासाची चळवळ ग्रामीण भागात पोहोचविण्यासाठी येत्या सहा महिन्यात राज्यातील ग्रामीण भागात एक हजार कौशल्य केंद्र सुरु करण्यात येतील, अशी घोषणा यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली.
आज एलफिस्टन टेक्निकल महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांचा प्रारंभ करण्यात आला, त्यावेळी राज्यपाल बोलत होते. यावेळी नोबेल पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ रिचर्ड जे. रॉबर्टस्, कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन., विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. अपूर्वा पालकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
कौशल्य विकासाच्या कार्यक्रमाला अधिक बळकटी देण्यासाठी राज्यात महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. या विद्यापीठात नवनवीन अभ्यासक्रम सुरु होत आहेत. यामध्ये प्रामुख्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी, मशीन लर्निंग, बिझनेस इंटेलिजन्स आणि इनोव्हेशन, बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (BBA), न्यू व्हेंचर मॅनेजमेंटमधील टेक्नॉलॉजी डोमेनमधील अभ्यासक्रम यांचा समावेश आहे. अशा विविध अभ्यासक्रमांचा प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी राज्यपालांच्या हस्ते विद्यापीठाच्या बोधचिन्हाचेही अनावरण करण्यात आले.
राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात कौशल्य विकासासाठी स्वतंत्र मंत्रालयाची सुरुवात झाली. महाराष्ट्र शासनानेही कौशल्य विकासाच्या कामात चांगली आघाडी घेतली आहे. कौशल्य विद्यापीठाच्या माध्यमातून आता युवकांसाठी एक नवे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. हे विद्यापीठ राज्यातील कौशल्य विकासाच्या चळवळीला नवा आयाम प्राप्त करुन देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
येत्या 6 महिन्यात ग्रामीण भागात 1 हजार कौशल्य केंद्र सुरु करणार
- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा
विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांचा शुभारंभ होत आहे. लवकरच याच्या इमारतीच्या बांधकामाचे भूमीपूजन केले जाईल आणि २०२४ पूर्वी नव्या इमारतीत विद्यापीठाचे कामकाज आणि अभ्यासक्रम सुरु होतील. विद्यापाठातील अभ्यासक्रम मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत शिकविण्यात येतील. राज्यात येत्या वर्षभरात ५ लाख युवकांना रोजगार देण्यात येईल. त्यादृष्टीने कौशल्य विकास विभागामार्फत व्यापक कार्यवाही करण्यात येत असल्याचे मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.
कौशल्य विद्यापीठ हे शहर केंद्रीत राहणार नाही, ग्रामीण भागातही विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांना चालना देण्यात येईल. त्याचबरोबर येत्या सहा महिन्यांत राज्यातील ग्रामीण भागात १ हजार कौशल्य केंद्र उभारण्यात येतील. या कामामध्ये राज्यातील उद्योगांनीही सहकार्य करावे, त्यांच्या उद्योगाला आवश्यक असलेल्या कौशल्यांचे प्रशिक्षण देणारी कौशल्य केंद्रे उभी करावीत, यासाठी राज्य शासनामार्फत उद्योगांना संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असेही मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.
नोबेल पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ रिचर्ड जे. रॉबर्टस् यांनी यावेळी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, जीवनामध्ये मार्गदर्शकाची (Mentor) भूमिका अत्यंत महत्वाची असते. एक चांगला मार्गदर्शक हा विचार करायला तसेच सत्याचा आदर करायला शिकवतो. अपयश हा सर्वोत्तम शिक्षक आहे. अपयशाचे तसेच त्याच्या कारणांचे विश्लेषण करा आणि अपयशातून शिका, असे आवाहन त्यांनी केले.
कुलगुरु डॉ. पालकर यांनी सादरीकरणाद्वारे विद्यापीठाच्या भावी वाटचालीची माहिती दिली. विद्यापीठ मुंबई केंद्रीत न ठेवता राज्यातील सहा भागांमध्ये त्याचा विस्तार करण्यात येईल. त्याचबरोबर येत्या ४ वर्षात २ लाखांहून अधिक रोजगार निर्मितीसाठी विद्यापीठामार्फत कौशल्य विकासाचे विविध अभ्यासक्रम राबविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. विद्यापीठाचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी विक्रमसिंह यादव यांनी आभार प्रदर्शन केले.
००००
जूनपासून बल्लारपूर येथे सुरू होणार एसएनडीटी विद्यापीठाचे केंद्र
जूनपासून बल्लारपूर येथे सुरू होणार एसएनडीटी विद्यापीठाचे केंद्र
मुंबई, दि. 1 : महिलांना शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात एसएनडीटी विद्यापीठाचा मोठा वाटा आहे. शंभर वर्षांहून अधिक काळ झालेल्या एसएनडीटी विद्यापीठाचे केंद्र येत्या जूनपासून चंद्रपूर जिल्हयातील बल्लारपूर येथे सुरु करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याविषयी सातत्याने पाठपुरावा केला होता. येणाऱ्या शैक्षणिक वर्षांपासून येथे रोजगारभिमुख आणि कौशल्यधारित अभ्यासक्रम सुरु करण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. श्री पाटील यांच्या निवासस्थानी मंगळवारी यासंदर्भात झालेल्या बैठक झाली व निर्णय घेण्यात आला.
एस.एन.डी.टी.अर्थात श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाचे केंद्र चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे सुरु करण्यासंदर्भात सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आज आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरु प्रा. उज्ज्वला चक्रदेव, उच्च व तंत्रशिक्षण संचालक धनराज माने यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
श्री. मुनगंटीवार म्हणाले की, एसएनडीटी विद्यापीठाचा आतापर्यंत 7 राज्यांमध्ये विस्तार झालेला आहे. वेगवेगळे शैक्षणिक, रोजगारभिमुख आणि कौशल्यधारित अभ्यासक्रमांना आज मागणी आहे. त्यामुळे चंद्रपूर आणि येथील परिसरातील विद्यार्थीनीना आवश्यक असणारे साधारण 10 अभ्यासक्रम या विद्यापीठातून शिकविण्यात येतील. एसएनडीटी विद्यापीठाचे केंद्र बल्लारपूर येथे सुरु करण्यासाठी आवश्यक असणारी जागेची पाहणी, साधनसामुग्री तसेच केंद्र सुरु झाल्यानंतर आवश्यक असणारे मनुष्यबळ, शिक्षित प्राध्यापक याबाबतचा आढावा प्रत्यक्ष घेण्यात येईल.
नवीन शैक्षणिक वर्ष जूनपासून सुरु होत असल्याने प्राथमिक टप्प्यात चंद्रपूर येथे असलेल्या अत्याधुनिक दोन शाळांमध्ये अभ्यासक्रम सुरु करण्यात येतील. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि एसएनडीटी विद्यापीठाने पार केलेली शताब्दी याचा मेळ घालून काही नवीन उपक्रमही विद्यापीठामार्फत सुरु करण्यावर भर देण्यात येईल असेही श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
श्री. पाटील म्हणाले की, चंद्रपूर येथील बल्लारपूर येथे एसएनडीटी केंद्र सुरु करण्यासाठी आवश्यक निधीबाबत सविस्तर प्रस्ताव करावा. तसेच सध्या पहिल्या टप्प्यात आवश्यक निधी सामाजिक उत्तरदायित्व निधी, जिल्हा नियोजन निधी याव्यतिरिक्त कसा उभा करता येईल याबाबतही सविस्तर प्रस्ताव उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे तातडीने सादर करण्यात यावा. आवश्यक पदभरती होईपर्यंत करार पध्दतीवर नेमणूका करुन काम सुरु करण्यात यावे. स्थानिक रहिवाशांना भरतीमध्ये प्राधान्य देण्यात यावे. दुर्गम भागातील हे केंद्र महिलांना आर्थिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महत्वाचे ठरेल, असा विश्वास श्री. पाटील यांनी व्यक्त केला.
शारीरिक शिक्षक, ग्रंथपाल पदभरती
शारीरिक शिक्षक, ग्रंथपाल पदभरतीसाठी कार्यवाही करावी
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 1 : उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत अनुदानित महाविद्यालयात शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल व प्रयोगशाळा सहायक पदांचा आढावा घेऊन संबंधित पदे भरण्यासंदर्भातील कार्यवाही करावी. राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या प्रलंबित अनुदान दरात 60 टक्के वाढ करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण विभागातील रिक्त पदांचा तसेच वस्त्रोद्योग विभागातील सुतगिरण्यांच्या पुनर्वसनाबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, नियोजन विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ.पी. गुप्ता, वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव पराग जैन,उच्च शिक्षण संचालक धनराज माने,तंत्र शिक्षण संचालक अभय वाघ उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सहायक प्राध्यापक पदाबरोबरच शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल व प्रयोगशाळा सहायक पदे भरण्यासंदर्भात पदांचा आढावा घेऊन पदभरतीची कार्यवाही करावी. तसेच, राज्यातील अभिमत विद्यापीठातील आर्थिक व सामाजिक मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासनाची प्रचलित शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना लागू करण्यासाठी अभिमत विद्यापीठांचा शुल्क नियंत्रण समितीच्या अंतर्गत कार्यवाही करणे बंधनकारक असणार आहे. तसेच, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वितरीत करण्यास विलंब होऊ नये, यासाठी उपाययोजना आखण्याच्या सूचनाही संबंधित विभागास देण्यात याव्यात.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, “महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आवश्यक असलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्यादृष्टीने विद्यापीठ अनुदान आयोगाने शिक्षकीय पदांची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या आणि विद्यार्थ्यांचे हीत विभागाची निकड विचारात घेता वित्त विभागाकडे सादर केलेल्या रिक्त जागा पैकी 2 हजार 88 पदांच्या पदभरतीस मान्यता दिली आहे. याची कारवाही सुरू आहे. परंतु शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल व प्रयोगशाळा सहायक पदभरण्यास मान्यता देणे गरजे असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि गोंडवाना विद्यापीठातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे वेतन थकित राहू नये यासाठी उपाययोजना आखण्यात याव्यात व प्रलंबित वेतन तातडीने वितरीत करण्यात यावे. डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना निर्वाह भत्त्यात वाढ तसेच, राज्यातील विधी विद्यापीठाच्या बांधकाम व दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. बैठकीत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासाठी संपादित केलेल्या जमिनीसंदर्भात, नवीन अध्यासन, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अत्याधुनिक उपकरणांचा समावेश करण्यासदंर्भात चर्चा करण्यात आली.
सूतगिरण्यांच्या पुनर्वसनासाठी नव्याने प्रस्ताव सादर करावे
सहकारी सूत गिरण्यांना राष्ट्रीय सहकारी विकास निगमच्या योजनेअंतर्गत आधुनीकीकरण, विस्तारीकरण आणि पुनर्वसन करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. सूतगिरण्यांचे पुनर्वसन करताना प्रत्येकी सूतगिरणीचे पुनर्वसन होत आहे का, अर्थसहाय केल्यानंतर सूतगिरण्या नव्याने सुरू होत आहेत का, यासदंर्भातील अहवाल सादर करावा. त्यानंतर त्यांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया राबवावी, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मानसशास्त्र
वर्गात प्राध्यापकांनी मानसशास्त्राचा तास घ्यायला सुरुवात केली होती.
तेवढ्यात मागून एका मुलाने शिट्टी वाजवली...
प्राध्यापकांनी शिट्टी कोणी वाजवली असं विचारल्यावर संपूर्ण वर्ग शांत बसला मात्र कोणीच नाव सांगितलं नाही...
सरांनी हातातला खडू खाली ठेवला
आणि म्हणाले : "आपला आजचा तास इथेच संपतो आहे,
पण राहिलेला वेळ सार्थकी लावण्यासाठी मी तुम्हाला कालच रात्री घडलेला एक किस्सा सांगतो...!"
किस्सा ऐकण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी कान टवकारले...
"काल रात्री उशिरापर्यंत मला झोप येत नव्हती.
वेळ काढायचा म्हणून गाडीत पेट्रोल भरून येऊ असा विचार माझ्या मनात आला म्हणून गाडी काढून मी पेट्रोल भरून घेतलं.
पेट्रोल भरल्यावर सहजच मी एका शांत रस्त्यावर गाडी वळवली.
रस्त्याच्या कोपऱ्यावर एक अतिशय सुंदर मुलगी उभी होती.
मी गाडी तिच्याजवळ थांबवून तिला विचारलं : "मॅडम,
मी आपली काही मदत करू शकतो का...?"
"हो ,मला घरापर्यंत सोडू शकलात तर फार बरं होईल...!"
गाडीचा दरवाजा उघडून मी तिला आत घेतलं,आणि तिच्या घराच्या दिशेने गाडी वळवली.
वाटेत आम्ही विविध विषयांवर चर्चा करत होतो . सौन्दर्यासोबतच बुद्धिमत्तेची देणगी लाभलेल्या निवडक स्त्रियांमध्ये मी तिचा समावेश करेन...
तिच्या घराशी पोहचल्यावर तिने लाजत लाजत कबूल केले की माझ्या सहृदय वागण्यामुळे ती माझ्या प्रेमात पडली आहे...
मी ही तिच्या सौन्दर्याची आणि बुद्धिमत्तेची तारीफ करत तिच्या प्रेमात पडल्याची कबुली तिला दिली.
एकमेकांशी बोलताना मी तिला माझ्या पेशाबद्दल सांगितलं..
निरोप घेताना आम्ही फोन नंबरची अदलाबदल केली.
अगदी शेवटच्या क्षणी तिने मला सांगितलं की तिचा भाऊ मी शिकवत असलेल्याच महाविद्यालयात शिकतो ,त्यामुळे होणारा दाजी या नात्याने मी त्याची काळजी घ्यावी.
मी तिला त्याचं नाव विचारलं त्यावर तिने उत्तर दिलं की तुम्ही त्याला त्याच्या खास सवयीवरून लगेच ओळखाल...
'तो अतिशय उत्तम शिट्टी वाजवतो’ 😘
प्राध्यापकांच्या या वाक्यावर अख्खा वर्ग मगाशी शिट्टी वाजवलेल्या विद्यार्थ्यांकडे बघायला लागला...😉
प्राध्यापक महाशय त्या विद्यार्थ्याकडे बघून हसून म्हणाले: 😊
" माझी मानसशास्त्राची पदवी व ज्ञान मी विकत घेतलेलं नाही तर स्वकष्टाने प्राप्त केलं आहे...
निघ बाहेर वर्गाच्या...!
😄 😅 😃
🙏🙏
Featured post
-
सहा वेगवेगळ्या पर्यायातून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायावर सहमती सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर , एमएमआरडीएने सवि...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
-
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार मोक drill म्हणजे संकटकाळी बचाव प्रशिक्षण प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की , अश...