सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Tuesday, 1 November 2022
धर्मादाय रुग्णालयात निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांसाठी मोफत व सवलतीच्या दराने वैद्यकीय उपचार
प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांचात्वरित निपटाऱ्यासाठी आराखडा करावा
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 31 : राज्यातील न्यायालयीन प्रकरणांचा लवकर निपटारा व्हावा आणि जनतेला न्याय मिळावा यासाठी या प्रलंबित प्रकरणांचा जिल्हानिहाय आराखडा तयार करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
मंत्रालयात विधी व न्याय विभागाची आढावा बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव नीरज धोटे, प्रधान सचिव (विधी सल्लागार विधी न्याय) राजेंद्र सावंत, धर्मादाय आयुक्त महेंद्र महाजन, उपमुख्यमंत्री यांचे सचिव श्रीकर परदेशी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, जिल्ह्यातील प्रलंबित प्रकरणांचे टप्यानुसार नियोजन करुन सूची तयार करावी. याचा निपटारा लवकर होण्यासाठी कालबद्ध नियोजन करण्यात यावे.
धर्मादाय रुग्णालयात निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांसाठी मोफत व सवलतीच्या दराने वैद्यकीय उपचार देण्यात येतात. रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी ऑनलाईन डॅशबोर्ड तयार करुन मंत्रालय स्तरावर नियंत्रण करण्यात येईल, असे सांगून धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे कामकाज ऑनलाईन करण्यासाठी गती देण्यात यावी, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.
बैठकीमध्ये विधी व न्याय विभागातील कामकाज, रिक्त पदे, ऑनलाईन कामकाज, भागीदारी संस्था या विषयांचा आढावा घेण्यात आला.
लम्पी रोगामुळे नुकसान भरपाईपोटी
लम्पी रोगामुळे नुकसान भरपाईपोटी राज्यात ३०९१ पशुपालकांच्या
खात्यावर ८.०५ कोटी रुपये जमा
- सचिंद्र प्रताप सिंह
मुंबई, दि.३१ : राज्यात लम्पी चर्मरोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या गोवंशीय पशुधनाच्या 3091 पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाई पोटी रु. 8.05 कोटी रक्कम जमा करण्यात आली असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.
श्री. सिंह म्हणाले, राज्यामध्ये दि. 31 ऑक्टोबर २०२२ अखेर 33 जिल्ह्यांमधील एकूण 3204 गावांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण 172528 बाधित पशुधनापैकी एकूण 112683 पशुधन उपचाराने बरे झालेले आहे. उर्वरीत बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एकूण 140.97 लक्ष लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून एकूण 136.48 लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे व जळगांव, अहमदनगर, धुळे, अकोला, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, वाशिम, जालना, हिंगोली, नंदुरबार आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेल्या लसीकरणानुसार महाराष्ट्रात सुमारे 97.54 % गोवंशीय पशुधनाला लसीकरण झाले आहे.
लम्पी चर्मरोगाच्या विषाणुच्या जनुकीय परिक्षणांतर्गत जिनोम क्रमवारीता तपासणीसाठी (Genome sequencing) आवश्यक नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणे (National Institute of Virology (NIV) येथे पाठविण्यात आले आहेत. या तपासणीमुळे विषाणूमधील जनुकीय स्तरावरील बदलांबाबतची माहिती नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात अपेक्षित आहेत. तसेच लसीमुळे निर्माण होणाऱ्या प्रतिकारशक्तीचे मूल्यमापन करण्यासाठी आवश्यक नमूने ७ विभागांमधून प्रतिविभाग दोन गावातील पशुधनातील लसीकरणापुर्वीचे नमुने व लसीकरणानंतरचे ७, १४, २१ व २८ दिवसांचे रक्तजल नमुने संकलित करुन ते बेंगलुरु येथील राष्ट्रीय रोगपरिस्थिती विज्ञान व रोगमाहिती संस्था (National Institute Of Veterinary Epidemiology And Disease Informatics (NIVEDI) येथे पाठविण्यात आले आहेत. त्यांचे निष्कर्ष देखील नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात अपेक्षीत असल्याचे श्री सिंह यांनी सांगितले.
दि. 28 ऑक्टोबर 2022 रोजीच्या क्षेत्रिय अधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय कृतीदलासमवेत झालेल्या दृकश्राव्य माध्यमाद्वारे आढावा बैठकीमध्ये लसीकरण न केलेल्या आणि लम्पी चर्मरोगाने बाधीत नसलेल्या गायींच्या कुठल्याही वयाच्या वासरांना, तसेच अद्यापही लसीकरण न झालेल्या गोवंशीय पशुधनास लसीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले. यानुसार, गोपालकांनी त्यांच्या वासरे व गोवंशीय पशुधनास क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यकक्षेतील गावांमध्ये अशा लसीकरणासाठी मोहीम स्वरूपात पुर्वनिर्धारीत केलेल्या दिवशी लसीकरण करून घेण्याचे आवाहन श्री. सिंह यांनी यावेळी केले.
इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरसाठी केंद्राची मान्यता
इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरसाठी केंद्राची मान्यता
- उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मानले आभार.
मुंबई, दि. 31 : राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणातंर्गत रांजणगाव (पुणे) येथे २९७.११ एकरमध्ये इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरसाठी केंद्र सरकारने आज मान्यता दिली आहे. या माध्यमातून ५००० तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहेत. हा प्रकल्प राज्यात आणल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आभार मानले आहेत.
तसेच पुण्यामध्ये CDAC हाही प्रकल्प लवकरच येणार असून या दोन्ही प्रकल्पांच्या माध्यमातून सुमारे ₹ २००० कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. युती सरकारने हे प्रकल्प राज्यात येण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केलेला आहे. यास्तव समितीची १९ जुलै २०२२ रोजी बैठक घेण्यात आली होती.
या क्लस्टरसाठी ₹ ४९२.८५ कोटी खर्च होणार असून हा प्रकल्प ३२ महिन्यात पूर्ण होणार आहे. तसेच या प्रकल्पाच्या माध्यमातून उद्योजकांना प्रोत्साहन मिळणार असून इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स, कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, सोलार पीव्ही मॅन्युफॅक्चरिंग, ई मोबिलिटी उत्पादक असे अनेक उद्योग येणार आहेत, अशी माहिती मंत्री श्री. सामंत यांनी दिली आहे.
भारत एकसंघ
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्यामुळे भारत एकसंघ
- जिल्हाधिकारी निधी चौधरी
मुंबई उपनगर, दि. ३१ : "सरदार वल्लभभाई पटेल यांनी एकसंघ भारताचे स्वप्न बघितले होते आणि त्यांच्या कार्यामुळेच ते स्वप्न सत्यात उतरले. त्याचबरोबर भारतात प्रशासकीय सेवा सुरू करण्याचे श्रेय देखील सरदार वल्लभभाई पटेल यांनाच जाते. त्यांचे हे कार्य देश नेहमीच लक्षात ठेवेल आणि त्यांच्या कार्यामुळे युवा पिढीला सातत्याने प्रेरणा मिळेल", असा विश्वास मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी आज व्यक्त केला.
नेहरू युवा केंद्राच्या मुंबई शाखेद्वारे आयोजित 'एकता दौड' कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. मुंबई विद्यापीठ परिसरात आयोजित या कार्यक्रमाला मुंबईच्या पोस्ट मास्तर जनरल स्वाती पांडेय, मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉक्टर सुधीर पुराणिक, नेहरू युवा केंद्राचे महाराष्ट्र व गोवा राज्याचे क्षेत्रीय संचालक डॉक्टर कार्तिकीयन, मुंबई विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाच्या प्राध्यापिका वासंती कांदीवरन, राष्ट्रीय सेवा योजनेचे डॉक्टर प्रकाश कुमार वनन्जे, नेहरू युवा केंद्राच्या मुंबई शाखेचे उपसंचालक श्री.यशवंत मानखेडकर आणि संबंधित मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीमती चौधरी यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. तसेच सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सर्वांनी 'एकता शपथ' घेऊन दौडीला प्रारंभ केला.
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४८ व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारच्या युवक आणि क्रीडा मंत्रालय यांच्या अखत्यारितील नेहरू युवा केंद्राद्वारे देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये 'रन फॉर युनिटी' अर्थात 'एकता दौड' कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
०००
Featured post
-
सहा वेगवेगळ्या पर्यायातून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायावर सहमती सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर , एमएमआरडीएने सवि...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
-
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार मोक drill म्हणजे संकटकाळी बचाव प्रशिक्षण प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की , अश...