सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Sunday, 2 October 2022
तो मी नव्हेच" नाटकाच्या हीरक महोत्सव सोहलां
आचार्य अत्रे लिखित "तो मी नव्हेच" नाटकाच्या हीरक महोत्सव सोहळ्याचे8 ऑक्टोबर रोजी आयोजन . -- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 1: राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने आणि नाट्यसंपदा प्रतिष्ठान निर्मित आचार्य अत्रे लिखित "तो मी नव्हेच" या नाटकाच्या हीरक महोत्सवा निमित्ताने दिनांक 8 ऑक्टोबर, 2022 रोजी सायंकाळी 6.30 वाजता रवींद्र नाट्य मंदिर, मुंबई येथे एका विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यातआल्याचीमाहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
आचार्य अत्रे लिखित "तो मी नव्हेच" या नाटकाचा 8 ऑक्टोबर, 1962 रोजी दिल्ली येथील आयफेंक्स थिएटर मध्ये पहिला प्रयोग झाला होता. अनेक विक्रम, अनेक उच्चांक मोडत या नाटकाने तब्बल 2800 प्रयोगांची मजल मारली. प्रभाकर पणशीकरांच्या लखोबाने आणि त्यांच्या पंचरंगी भूमिकांनी उभ्या महाराष्ट्राला झपाटून टाकले. असे हे अजरामर इतिहास घडवणारे नाटक 2022 वर्षात हीरक महोत्सवात पदार्पण करत आहे.
प्रबोधन आणि मनोरंजन असा दुहेरी परिणाम साधणाऱ्या "तो मी नव्हेच" या नाटकाचे नाव घेतल्याशिवाय मराठी रंगभूमीचा आलेख पूर्णच होऊ शकत नाही. इतके हे नाटक मराठी रंगसृष्टीसाठी अविभाज्य आहे. आज लेखक आचार्य अत्रे, दिग्दर्शक मो. ग. रांगणेकर व नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर या "तो मी नव्हेच" च्या शिल्पकारांपैकी कोणीही हयात नसले तरी, त्यांच्या या कलाकृतीला मानवंदना देणे हे सर्व मराठी रंगकर्मी व महाराष्ट्रातील रसिकांसाठी अगत्याचे आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने नाट्यसंपदा प्रतिष्ठान निर्मित एका विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
मराठी रंगभूमीवरचे नामवंत कलाकार या कार्यक्रमात सहभागी होणार असून "तो मी नव्हेच" नाटकातील महत्त्वाचे प्रवेश तसेच निवेदनाच्या माध्यमातून उलगडत जाणारा नाटकाचा रंजक इतिहास आणि मुख्य म्हणजे नटवर्य प्रभाकर पणशीकर यांच्या काही दुर्मिळ चित्रफितींचा यात समावेश असेल. या कार्यक्रमाची संकल्पना नाट्यसंपदा प्रतिष्ठान संस्थेच्या जान्हवी सिंह आणि सौ. तरंगिणी खोत यांची आहे. या कार्यक्रमाचे निवेदन आणि दृकश्राव्य सादरीकरण नरेंद्र बेडेकर करणार आहेत. लखोबाची प्रमुख भूमिका डॉ. गिरीश ओक हे करणार असून विशाखा सुभेदार, सागर कारंडे, प्रभाकर मोरे, विघ्नेश जोशी, दिनेश कोडे, गोट्या (प्रभाकर) सावंत, पं. रघुनन्दन पणशीकर यांचा या कार्यक्रमात विशेष सहभाग आहे.
हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी विनामूल्य असून प्रवेशिका कार्यक्रम स्थळी उपलब्ध असतील. या कार्यक्रमाचा जास्तीत-जास्त प्रेक्षकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केले आहे.
वंदे मातरम्’ अभियानाचा शुभारंभ
आज होणार ‘वंदे मातरम्’ अभियानाचा शुभारंभ
- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
सामान्य प्रशासन विभागाद्वारे यासाठीचे परिपत्रक जारी
मुंबई, दि.1 : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात "हॅलो नव्हे - वंदे मातरम्" या अभियानाचा शुभारंभ होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ गांधी जयंतीच्या दिवशी २ ऑक्टोबर रोजी वर्धा येथून होत आहे. यासाठी जनतेला आवाहन करणारे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने आज प्रसिद्ध केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यभरात हे अभियान यशस्वी करण्याचा निर्धार सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना स्वातंत्र्य लढ्यातील दिशादर्शक आणि क्रांतीचे निदर्शक असणाऱ्या या गीताच्या सुरुवातीच्या दोन शब्दांनी म्हणजेच "वंदे मातरम्"नी शासकीय कार्यालयातील दूरध्वनी संभाषणाची सुरुवात व्हावी, अशी जनसामान्यांची इच्छा होती. त्यास अनुसरून हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.
‘जनगणमन‘ हे आपले राष्ट्रगीत आणि ‘वंदे मातरम्‘ हे राष्ट्रीय गाणं हे सर्वमान्य झालेले आहे. आजही अनेक शासकीय कार्यालयांत संपर्क साधल्यास अधिकारी व कर्मचारी यांच्या संवादास हॅलो या शब्दाने सुरुवात होते. काही ठिकाणी जय हिंद तर काही ठिकाणी नमस्ते असेही संबोधले जाते. शासकीय कार्यालयातील दूरध्वनीवरून होणारे संवाद व समोरासमोरून आल्यानंतर होणारे संवाद यामध्ये जर "वंदे मातरम्" हा शब्द वापरला तर त्याला एक प्रकारचे राष्ट्रीय स्वरूप येऊ शकते, असेही श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.
"वंदे मातरम्" हा फक्त नारा किंवा संबोधन नसून राष्ट्रभक्तीचा जाज्वल्य इतिहास आहे. "वंदे मातरम्"बाबत प्रचार-प्रसार व जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी या गीताचा इतिहास व त्याच्याशी निगडित घटना यांचा प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे. लघु चित्रपटाच्या माध्यमातून "वंदे मातरम्"बाबत जाणीव जागृती करण्यात येणार आहे. “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव"अंतर्गत सर्व शासकीय कार्यालयांबरोबर निमशासकीय कार्यालये, शासकीय अनुदानित व विना अनुदानित कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, विद्यापीठे, शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था तसेच शासन अंगीकृत उपक्रम व आस्थापना यांना कार्यालयात दूरध्वनी अथवा भ्रमणध्वनीवर अभ्यागत व सहकारी यांना संवाद साधण्याच्या सुरुवातीस हॅलो असे न म्हणता "वंदे मातरम्" असे अभिवादन करावे, असे आवाहन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने केले असून, यासाठीची काही मार्गदर्शक तत्त्वे पुढीलप्रमाणे नमूद केली आहेत.
1. सर्व शासकीय कार्यालयांत दूरध्वनीवर / भ्रमणध्वनीवर अभ्यागत किंवा अधिकारी / कर्मचारी यांनी संवाद साधल्यास सुरुवातीचे अभिवादन म्हणून "हॅलो" संबोधन न वापरता, "वंदे मातरम्" म्हणावे.
2. शासकीय कार्यालयांबरोबरच निमशासकीय कार्यालये, शासन सहाय्यित/ अनुदानित / अर्थसहाय्यित व इतर स्वरूपाचे साहाय्य असणारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा/ महाविद्यालये व शैक्षणिक संस्था तसेच शासन अंगीकृत सर्व प्रकल्प/ उपक्रम/आस्थापना येथील कार्यालयांतही दूरध्वनीवर किंवा भ्रमणध्वनीवर अभ्यागत किंवा सहकारी यांनी संवाद साधल्यास, सुरुवातीला "हॅलो" असे न म्हणता "वंदे मातरम्" असे संबोधन करावे. तसेच त्यांनी त्यांच्या वैयक्तिक भ्रमणध्वनीवरही संवाद साधतांना "वंदे मातरम्" असे संबोधन करावे.
3. कार्यालय/संस्था येथे दूरध्वनीवरून होणाऱ्या संवादात सुरुवातीस "वंदे मातरम्" हे संबोधन वापरले जाईल यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी सर्व अधिकारी/कर्मचारी यांना प्रोत्साहित करावे.
4. कार्यालयात/संस्थांमध्ये येणाऱ्या अभ्यागतांनाही सार्वजनिक जीवनात "वंदे मातरम्" ने संबोधन करण्याबाबत जाणीव जागृती करावी.
5. ज्या ठिकाणी स्वयंचलित दूरध्वनी यंत्रणा अस्तित्वात आहे त्या ठिकाणीही हा बदल करण्यात यावा.
6. विविध बैठका/सभांमध्ये वक्त्यांनी सुरुवात करतांना ती "वंदे मातरम्" या शब्दांनी करावी.
वंदे मातरम् अभियानाची प्रचार आणि प्रसिद्धीसुद्धा करण्यात येणार आहे. "वंदे मातरम्" हे संबोधनात्मक व अभिवादनात्मक स्वरुपात, प्रत्येकाने उच्चारावे यासाठी जाणीव जागृतीही व प्रचार-प्रसार प्रसिद्धीसाठी स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. तरी या अभियानात उत्स्फुर्त सहभाग नोंदवून अभियान यशस्वी करण्याचे आवाहन या परिपत्रकाद्वारे सामान्य प्रशासन विभागाने केले आहे.
5G तंत्रज्ञानाच्या शुभारंभ
अन् विद्यार्थ्यांसोबत मुख्यमंत्रीही झाले विद्यार्थीफाईव्ह-जी तंत्रज्ञानाच्या शुभारंभ प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संवाद
फाईव्ह-जी तंत्रज्ञानाने शिक्षणासह सर्वच क्षेत्रात होणार क्रांती
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 1: फाईव्ह-जी नेटवर्कच्या राष्ट्रव्यापी शुभारंभ कार्यक्रमासाठी निवडलेल्या पनवेलमधील शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: विद्यार्थी बनले. खुर्ची ऐवजी त्यांनी बेंचवर बसणे पसंत केले आणि विद्यार्थ्यांशी गप्पा मारताना मुख्यमंत्र्यांनी फाईव्ह-जीचे महत्व सांगितले. क्रांतीकारक क्षणाचे आपण साक्षीदार असल्याचे सांगत शिक्षण, कृषी, आरोग्य, बॅंकींग यासह सर्वच क्षेत्रात फाईव्ह-जी तंत्रज्ञानाने क्रांती होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज देशव्यापी फाईव्ह-जी तंत्रज्ञानाचा शुभारंभ झाला. यामध्ये व्हर्च्युअल क्लासरुमसाठी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पनवेल महापालिकेच्या सावित्रीबाई फुले शाळा क्रमांक आठ मधील विद्यार्थ्यांची निवड झाली होती. या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे उपस्थित होते.
प्रधानमंत्र्यांच्या संवाद कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी खुर्चीऐवजी बेंचमध्ये बसणे पसंत केले. मी ही तुमच्या सोबत आज विद्यार्थी झाल्याचे मुख्यंत्र्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. राष्ट्रीय शुभारंभ कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी पनवेल राज्यातील काही शाळांमधील विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधला.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, या तंत्रज्ञानामुळे इंटरनेटचा स्पीड वाढणार आहे. त्याचा फायदा सर्वाधिक शिक्षण क्षेत्राला होणार असून, विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. इंटरनेटला मिळणाऱ्या स्पीडचा फायदा अभ्यासासाठी करा, गेम आणि सिनेमे डाऊनलोड करण्यासाठी नाही, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.
राष्ट्रव्यापी शुभारंभ कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून पनवेलच्या शाळेची निवड झाली त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतानाच प्रधानमंत्र्यांचे देखील आभार मानले. या नविन तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांना डिजीटल दृष्यांच्या माध्यमातून विषय समजण्यास अधिक सोपे होईल आणि शाळेचे वर्ग सामान्य वर्गवारीत न राहता ते स्मार्ट क्लास होतील, असा विश्वास व्यक्त करीत त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी गृहरक्षक दल-नागरी संरक्षणाचे अपर पोलिस महासंचालक ब्रिजेश सिंग यांनी फाईव्ह-जी तंत्रज्ञानाबाबत विद्यार्थ्यांना सहज सोप्या शब्दात समजेल अशी माहिती दिली. यावेळी सादरीकरण करताना श्री. सिंग यांनी टेलीकॉम तंत्रज्ञानाचा वन-जी ते फाईव्ह-जी असा प्रवास चित्रांच्या माध्यमातून समजावून सांगितला. मोबाईलचा वापर स्वत:च्या सुरक्षेसाठी करा, या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा देशाच्या आणि स्वत:च्या चांगल्यासाठी करा, असे आवाहनही श्री. सिंग यांनी यावेळी केले.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख आदी उपस्थित होते.
Saturday, 1 October 2022
जेष्ठ नागरिक
ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानजनक आयुष्यासाठी शासन कृतीशील
-विधानसभा अध्यक्ष ॲड्. राहुल नार्वेकर
मुबई, दि.1 - ज्येष्ठ नागरिक समाजाचा महत्त्वाचा भाग असून, प्रत्येक दिवस हा ज्येष्ठांच्या सन्मानार्थ असला पाहिजे. याच जाणिवेतून शासन ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानजनक आयुष्यासाठी कृतीशील असल्याचे विधानसभा अध्यक्ष ॲड्. राहुल नार्वेकर यांनी आज येथे सांगितले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिना’निमित्त आज कार्यक्रमाचे वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बोलत होते. व्यासपीठावर उद्योग मंत्री उदय सामंत, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, अतिरिक्त पोलिस महानिरीक्षक मधुकर पांडे उपस्थित होते.
विधानसभा अध्यक्ष श्री.नार्वेकर म्हणाले, “शासन ज्येष्ठांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवित असून आर्थिक सहाय्यासोबतच भावनिक आधार देण्यासाठी सीएसआर मधला ठराविक निधी ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी वापरला जावा, यासाठी केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार करणार असल्याचे सांगून महाराष्ट्र विधानसभेकडून ज्येष्ठ नागरिकांच्या अपेक्षा निश्चितच पूर्ण होतील.”
उद्योग मंत्री श्री. सामंत म्हणाले, “शासन ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कृतीशील असून नुकतीच राज्य शासनाने पंच्याहत्तर वर्षांवरील नागरिकांना मोफत एसटी प्रवास सवलत सुरू केली आहे. येत्या काळात प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांचा , आपल्या पालकांचा योग्य सन्मान, काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. शासन ज्येष्ठ नागरिकांसाठी कर्तव्य भावनेने कार्यतत्पर असून ज्येष्ठांना व्यापक आरोग्य सुविधा देण्यासाठीही शासन प्रयत्नशील आहे.”
श्री. भांगे यांनी राज्य शासनामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती यावेळी दिली. एक
समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी प्रास्ताविक केले. मान्यवरांच्या हस्ते पंच्याहत्तर, ऐंशी वर्षांवरिल ज्येष्ठ नागरिकांचा तसेच ज्येष्ठ नागरिक स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनीचा आणि लग्नाची पन्नास वर्षे पूर्ण केलेल्या जोडप्यांचा सत्कार करण्यात आला. सामाजिक न्याय विभागाच्या नाविन्यपूर्ण योजनांच्या पुस्तकाचे तसेच सेवा पंधरवडा पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दृकश्राव्य माध्यमातून दिल्या शुभेच्छा...
नागपूर येथून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दृकश्राव्य माध्यमातून ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. राज्य शासनामार्फत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पंचाहत्तरी पूर्ण केलेल्या ज्येष्ठांना मोफत एसटी प्रवास सवलत देण्यात आली आहे. याच पद्धतीने ज्येष्ठांना त्यांच्या उर्वरित आयुष्यात एक सन्मानित, सुरक्षित, आरोग्य सुविधायुक्त वातावरण देण्यासाठी शासन कायम त्यांच्या पाठीशी आहे. सामाजिक न्याय विभागाच्यावतीने त्यासोबतच इतर विविध योजनांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणार्थ येत्या काळात विविध योजना राबविल्या जातील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संदेशात नमूद केले.
000
Featured post
-
सहा वेगवेगळ्या पर्यायातून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायावर सहमती सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर , एमएमआरडीएने सवि...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
-
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार मोक drill म्हणजे संकटकाळी बचाव प्रशिक्षण प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की , अश...