*श्री बगलामुखीदेवी मंदिर.*संकलन - सुधीर लिमये पेण
दशमहाविद्यांमध्ये श्री बगलामुखी ही एक महाविद्या आहे. श्री बगलामुखीदेवीचे मंदिर कांगडा (हिमाचल प्रदेश) जिल्ह्यातील बनखंडी गावामध्ये आहे. पांडुलिपीमध्ये देवीचे जसे वर्णन आहे, त्याच स्वरूपात देवी येथे विराजमान आहे.
देवीचे हे मंदिर महाभारत काळातील आहे. द्वापरयुगामध्ये पांडवांनी अज्ञातवासात असतांना एका रात्रीत हे मंदिर बांधले आणि पूजाअर्चा केली. या मंदिरात प्रथम अर्जुन आणि भीम यांनी युद्धकलेत यशप्राप्ती होण्यासाठी देवीची उपासना केली होती.
शत्रूनाशिनी देवी बगलामुखी. मंदिरामध्ये विविध प्रकारच्या त्रासांच्या निवारणासाठी शत्रूनाश हवन करवून घेतले जाते. देवीच्या मंदिरामध्ये हवन केल्यानेे मनोवांच्छित फलप्राप्ती होते.
१. श्री बगलामुखीदेवीची उत्पत्ती.
एकदा दानवाने ब्रह्मदेवाचा ग्रंथ चोरून पाताळात लपवून ठेवला. ‘त्याला पाण्यामध्ये मनुष्य किंवा देवता मारू शकणार नाही’, असे वरदान होते. अशा वेळी ब्रह्मदेवाने देवी भगवतीची उपासना केली. यातून श्री बगलामुखीदेवी अवतरली. देवीने बगळ्याचे रूप धारण करून त्या दानवाचा वध केला आणि ब्रह्मदेवाला त्यांचा ग्रंथ परत केला.
सत्ययुगात एकदा सृष्टीत भयंकर वादळ आले. या वादळाला शांत करण्यासाठी भगवान श्रीविष्णूने तपश्चर्या करून श्री बगलामुखी देवीला प्रसन्न करून घेतले होते. लंकेवर विजय मिळवण्यासाठी श्रीरामाने शत्रूनाशिनी श्री बगलामुखीदेवीचे पूजन केले आणि त्याला विजय प्राप्त झाला.’
२. सत्वर प्रसन्न होऊन भक्तांची संकटे दूर करणारी श्री बगलामुखीदेवी आणि तिची उपासना यांची वैशिष्ट्ये.
अ. शिव आणि श्री महाकालीदेवी यांच्या खालोखाल ही देवी लवकर प्रसन्न होते, असे म्हणतात. साधना करून लगेच काही प्राप्त करण्यासाठी या देवीचे स्तवन प्रामुख्याने करतात.
आ. बगलामुखी-ब्रह्मास्त्र मंत्रजप अतिशय मारक स्वरूपात म्हणतात. मंत्रजप करतांना म्हणणार्याची झोप उडेलच; पण ऐकणार्यालाही विलक्षण शक्तीत वावरत असल्याची जाणीव होते. विशेषतः या चैतन्यात त्याचीही झोप उडालेली असते.’ डॉ. अजय जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
इ. बगलामुखी- ब्रह्मास्त्र मंत्रजपाने शत्रूचा संहार होतो.
ई. हा मंत्रजप विन्मुख होत नाही; म्हणजे जे साध्य करण्यासाठी साधना करतात, ते साध्य झाल्याखेरीज रहात नाही; म्हणूनच याला ‘ब्रह्मास्त्र मंत्र’ असे संबोधतात. याचा गैरवापर कुणीही करू नये; म्हणून धर्मशास्त्राने ही देवी अन् तिची साधना यांविषयीची माहिती गुप्त ठेवली आहे.’- श्री. प्रेमप्रकाश सिंह, बीरमित्रापूर, ओडिशा.
उ. ‘श्री बगलामुखीदेवीचा रंग सुवर्णासारखा पिवळा आहे. त्यामुळे देवीला ‘पितांबरी’ असेही म्हणतात. देवीचे वस्त्र, प्रसाद आणि आसन यांपासून प्रत्येक गोष्ट पिवळीच असते. देवीला पिवळा रंग प्रिय आहे; म्हणून देवीच्या पूजनामध्ये पिवळ्या रंगाच्या साहित्याचा उपयोेग होतो. देवीची उपासना करतांना साधकाने पिवळे वस्त्र परिधान केले पाहिजे.
ऊ. श्री बगलामुखीदेवीमध्ये संपूर्ण ब्रह्मांडाच्या शक्तीचा समावेश आहे.
ए. देवीचे अनेक स्वरूप आहेत. या महाविद्यादेवीची उपासना रात्रीच्या वेळी केल्याने विशेष सिद्धी प्राप्त होते.
ऐ. देवीचे भैरव महाकाल आहे. देवी बगलामुखी भक्तांचे भय दूर करून शत्रू आणि अनिष्ट शक्ती यांचा नाश करते.
स्रोत: आंतरजाल, सनातन (हिंदु ) धर्म