Tuesday, 3 May 2022

 कृषी विद्यापीठांमधील संशोधन मातीत अवतरले पाहिजे ;

आर्थिक राजधानीसोबत कृषी राजधानी म्हणून महाराष्ट्राची व्हावी नवी ओळख


- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी.

शेतकऱ्यांचा सन्मान हा शासनाचा बहुमान;

कृषी पुरस्कारांच्या रकमेत करणार वाढ

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

· अर्थक्षेत्राला कृषीक्षेत्रामुळे लाभली स्थिरता - उपमुख्यमंत्री अजित पवार

· शेतकऱ्यांनी तारली अर्थव्यवस्था - महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

· कृषी ग्रामविकास समिती ठरणार मार्गदर्शक - कृषी मंत्री दादाजी भुसे

            नाशिक, दि. २ : एकीकडे अत्यंत प्रगत तर दुसरीकडे अत्यंत प्राथमिक अवस्थेत असणारी शेती आपल्याला दिसते. हे चित्र बदलायचे असेल तर कृषी विद्यापींठांमधील संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून ते मातीत अवतरायला हवे. तसेच देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्राची देशाच्या कृषी क्षेत्राची राजधानी म्हणून नवीन ओळख निर्माण करा, असे आवाहन आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले आहे. ते आज नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठात राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते.

            विद्यापीठाच्या धन्वंतरी सभागृह शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनी येथे आयोजित वर्ष सन 2017, 2018 व 2019 च्या या राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (दूरदृश्य प्रणालीद्वारे) उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादाजी भुसे, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, रोजगार हमी, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार सर्वश्री हिरामण खोसकर, दिलीप बनकर, माणिकराव कोकाटे, नितीन पवार, पद्मश्री पुरस्कार प्राप्त राहीबाई पोपेरे, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषि विभागाचे आयुक्त धीरज कुमार, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड व इतर अधिकारी उपस्थित होते.

            यावेळी बोलताना राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, हा देश अनादी काळापासून शेतीप्रधान आहे. इथल्या शेतकऱ्याची भारताचाच नाही तर देशाबाहेरही अन्नदाता म्हणून ओळख आहे. त्यामुळे हा देश सदैव शेतकऱ्यांच्या ऋणात आहे. महाराष्ट्रात शेतीचे नवनवीन प्रयोग होत आहेत. काही प्रयोगांना जी.आय. टॅगिंगही मिळाले आहे. सेंद्रिय शेती व बाजाराच्या मागणीप्रमाणे पीकपद्धतीचा अवलंब केल्याने चारपटीने उत्पन्नात वाढ झाल्याची, शेतीमाल अमेरिका, ब्रिटन सारख्या देशात प्रत्यक्ष निर्यात झाल्याची उदाहरणं मी पाहिली आहेत. एवढंच नाही तर हे प्रयोग पाहण्यासाठी उत्तराखंड येथील शेतकऱ्यांनाही आपण आमंत्रित केल्याचे यावेळी राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी सांगितले. उद्योगांनी इथल्या गरीब शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन करताना राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, ज्या शेतकऱ्यांना आज पुरस्कार मिळाले आहेत, त्यांनी आपल्यासोबतचे अनुभव, ज्ञान इतर शेतकरी बांधवांना द्यायला हवे. आपल्यासोबत इतरांनाही पुढे नेत घरात जसे नव्या जन्माचा आनंद आपण घेतो तसा आनंदोत्सव अनुभवावा, असे आवाहनही यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांना केले.

            यंत्रज्ञान आणि तंत्रज्ञान हा नव्या शेतीचा खरा मुलमंत्र असून ते आत्मसात करण्याबरोबरच शेजारी गुजरात व देशात काही ठिकाणी सुरू असलेल्या नैसर्गिक (प्राकृतिक) शेतीचे प्रयोगही आपण पहायला हवेत. तसेच नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी मधील कमीत कमी जमीनीत करता येण्यासारखा आत्याधुनिक व्हर्टीकल फार्मिंगचा प्रयोगही शेतकऱ्यांना मार्गदर्शक आहे.

            कोरोनाकाळात संपूर्ण देशाला वाचवण्याचं कार्य आमच्या अन्नदाता शेतकरी बांधवांनी केले आहे. साखर कारखान्यांसाठी इथेनॉल निर्मिती फायदेशीर व अधिक लाभाची असल्याचे सांगत शेतकऱ्यांसाठी राज्य शासन व केंद्र सरकार खूप योजना राबवत आहेत, त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी होते, राहील अशी ग्वाही यावेळी राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी दिली.


 



 बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षपदी सुशीबेन शाह

बालकांच्या विविध प्रश्नांना आता न्याय मिळेल


                                 - मंत्री ॲड. ठाकूर

        मुंबई, दि, ०२: महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षपदी मुंबईच्या श्रीमती सुशीबेन शाह यांची, तर त्यांच्यासोबत अन्य सहा जणांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे बालकांच्या विविध प्रश्नांना आता न्याय मिळेल, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.

            मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, गेली अनेक वर्षे विविध सामाजिक प्रश्नांसोबतच बालकांच्या मूलभूत हक्क आणि अधिकाराबाबत जागरूकतेचे कार्य श्रीमती सुशीबेन शाह करीत आहेत. यापूर्वी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांनी कार्य केले आहे. राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्यपदी ॲड. नीलिमा चव्हाण, ॲड. संजय सेंगर, ॲड. प्रज्ञा खोसरे, ॲड. जयश्री पालवे, सायली पालखेडकर आणि चैतन्य पुरंदरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पद धारण केल्यापासून पुढील तीन वर्षांसाठी आहे किंवा पद धारण केलेल्या दिनांकापासून अध्यक्षांच्या बाबतीत वयाची ६५ वर्षे पूर्ण होईपर्यंत आणि सदस्यांच्या बाबतीत वयाची ६० वर्षे पूर्ण होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत इतका कालावधी निश्चित करण्यात आला आहे. अध्यक्ष व सदस्य निवडीबाबतची अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात नुकतीच प्रसिध्द झाली आहे.

      महाविकास आघाडी सरकार बालकांना त्यांचे हक्क, अधिकार याबाबत संरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या माध्यमातून राज्यातील बालकांच्या हक्काबाबत जनजागृतीसह वंचित, उपेक्षित आणि अनाथ बालकांना न्याय मिळण्यासाठी आयोग अत्यंत जिव्हाळ्याने आणि कायद्याच्या चौकटीत राहून काम करील अशी मला आशा आहे, असे मत मंत्री ॲड.ठाकूर यांनी व्यक्त केले. राज्यातील अनाथ, एकल, रस्त्यावरील मुले, बालकामगार यांच्या न्याय हक्कांसाठी, शिक्षणासाठी आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी असलेल्या शासकीय योजनांचा पुरेपूर वापर करून हा आयोग त्यांना न्याय मिळवून देईल, असा विश्वास मंत्री ॲड.ठाकूर व्यक्त करून बालहक्क संरक्षण आयोगाच्या नवनियुक्त अध्यक्ष आणि नवनियुक्त सहा सदस्यांचे त्यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

0000



 

 


 



            अक्षय तृतीया

03 मे 2022, मंगळवार, सकाळी - 05/19 पासून

    बुधवार 04 मे 2022 सकाळी 07/33 पर्यंत

पन्नास वर्षानंतर येणारा विशेष योग

श्री महालक्ष्मी कृपा प्राप्तीसाठी उत्तम दिवस त्रेता युगाचा प्रारंभ दिन,

भगवान परशुरामांचा अवतार दिन.

माता महालक्ष्मीचा आशिर्वाद मिळवण्यासाठी खुप उत्तम दिवस.

कारण यंदाची अक्षय तृतीया : रोहिणी नक्षत्र, शोभन योग, तैतील करण आणि वृषभ राशींतील चंद्रा समवेत येत आहे. याबरोबरच पन्नास वर्षानंतर संपत्ती व समृद्धीकारक, ग्रह 'शुक्र ' कार्यसिद्धी देणारा ग्रह ' चंद्र '

आप- आपल्या उच्च राशीत असतील. तसेच तीन ' राजयोग ' सुद्धा तयार होत आहेत.

1) शुक्र स्वराशीत :- मालव्य राजयोग

2) गुरु मिन राशीत :- हंस राजयोग

3) शनी स्वराशीत :- शश राजयोग

   याशिवाय सुर्य देव आपल्या उच्च राशीत असेल दोन ग्रह स्वयंभू राशीत तर दोन ग्रह उच्च राशीत असणारी अक्षय तृतीया पन्नास वर्षानंतर येत आहे. हा दुर्मिळ योग अत्यंत शुभ असून इच्छित फल प्राप्ती करिता अनेक पटीनी शुभ परिणाम देणारा असेल. भाविकांनी अवश्य लाभ घ्यावा.

Monday, 2 May 2022

 





 रशियन हाऊस इन मुंबई'च्या संचालिका यांची विधान भवन, मुंबई येथे सदिच्छा भेट.

            डॉ.एलिना रेमिझोव्हा यांनी सभापती आणि उपसभापती यांची सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्र दिनानिमित्त आणि कामगार दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतांना त्यांनी मुंबई आणि सेंट पीटर्सबर्ग या प्रमुख दोन शहरांमध्ये झालेल्या सिस्टर सिटी कराराला या वर्षीं ५५ वर्षे पूर्ण होत असल्याचे सांगून त्यानिमित्त आजपर्यंतच्या वाटचालीला उजाळा दिला. महाराष्ट्र दिनानिमित्त दिलेल्या संदेशात सभापती महोदयांनी भारत-रशिया मैत्रीपूर्ण संबंधाच्या गौरवशाली परंपरेचा आवर्जून उल्लेख केला, त्याबद्दल त्यांनी या भेटीप्रसंगी अतिशय आनंद व्यक्त करीत 'रशियन हाऊस इन मुंबई' तर्फे आयोजित विविध उपक्रमांची माहिती दिली आणि या केंद्राला भेट द्यावी, असे निमंत्रण दिले. उप सभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आपल्या रशिया भेटीतील अनुभवांना यावेळी उजाळा देत मुंबई आणि सेंट पीटर्सबर्ग शहरांना लाभलेला समृध्द सांस्कृतीक वारसा, अनुभव, पर्यावरण संवर्धन आणि साहित्य अनुवाद याबाबत आणखी आदानप्रदान व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी पाहूण्यांना गौरवचिन्ह आणि पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले

Featured post

Lakshvedhi