Thursday, 3 March 2022

 विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा निर्माण कराव्यात


- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

· मुंबई विद्यापीठातील ग्रंथ संपदा जतन करण्याचे निर्देश

            मुंबई, दि. 2 : बदलत्या काळानुसार विद्यार्थी हित लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा देणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.

            उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मुंबई विद्यापीठातील नवीन ग्रंथालय इमारत, नवीन परीक्षा भवन, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतीगृह, मुलींचे वसतीगृह या इमारतींच्या कामकाजाबाबत आढावा घेतला.

            मुंबई विद्यापीठाच्या विविध अडचणीसंदर्भात कलिना कॅम्पसमध्ये आढावा बैठक झाली. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अजित बाविस्कर, मुंबई विभागाचे सह संचालक सोनाली रोडे, प्र.कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, कुलसचिव सुधीर पुराणिक मुंबई महानगरपालिका, एमएमआरडीएचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. सामंत म्हणाले, मुंबई विद्यापीठ आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले आहे. या विद्यापीठाची गुणवत्ता अधिक वाढवून विद्यार्थ्यांना उत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांसाठी राज्य शासन सहकार्य करेल. मुंबई विद्यापीठ, मुंबई महानगरपालिका, एमएमआरडीए यांनी यासंदर्भात समन्वयाने काम करावे. त्यासाठी तातडीने नोडल ऑफिसर नियुक्त करावे त्यामुळे या कामांना गती येईल.

            मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालयासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाने गांभीर्याने काम करावे, खूप जुने ग्रंथ येथे उपलब्ध आहेत त्यांचे जतन आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. या इमारतीमध्ये विद्यार्थी अभ्यासासाठी बसतात. येथे काही दुर्घटना होऊ नये याकडे विशेष लक्ष देऊन तातडीने नवीन ग्रंथालयामध्ये ग्रंथसंपदा स्थलांतर करावी, यासाठी आवश्यक त्या परवानग्या तातडीने संबंधितांनी द्याव्यात, असे निर्देशही श्री. सामंत यांनी यावेळी दिले.

            कंत्राटी कामगारांना नियमाप्रमाणे वेतन वेळेवर दिले पाहिजे. अनेक कामगारांना वेतन नियमानुसार मिळत नसल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त होत आहेत त्यावर विद्यपीठाने तातडीने कार्यवाही करावी आणि कामगारांना वेतन द्यावे, असे निर्देश मंत्री श्री.सामंत यांनी दिले.

            मुंबई विद्यापीठ नवीन ग्रंथालय इमारत, नवीन परीक्षा भवन, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतीगृह, मुलींचे वसतीगृह या इमारतीचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत लवकर उद्घाटन करण्याचा निर्णय ही बैठकीत घेण्यात आला.

            एमएमआरडीएनी विद्यापीठाचा बृहतआराखडा लवकर सादर करावा. मुंबई विद्यापीठात लवकर जनता दरबारचे आयोजन करण्यात येणार असून यामध्ये विद्यार्थी, शिक्षक शिक्षेकतर कर्मचारी, विविध प्राध्यापक संघटना यांच्या तक्रारी, पेंशन विषय, प्रलंबित मेडिकल बिल, अनुकंपा भरती याबाबत निर्णय घेण्यात येईल. या जनता दरबारमध्ये सहभागी होण्याचे आवाहनही यावेळी श्री. सामंत यांनी केलं.

            मराठी भाषेला 'अभिजात' दर्जा मिळावा यासाठी राज्य सरकारकडून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पोस्ट कार्डस पाठविण्यात येत आहेत या मोहिमेत विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही श्री. सामंत यांनी यावेळी केले.

 वंदे मातरम्‌'ने अर्थसंकल्पिय अधिवेशनास सुरुवात

          मुंबई, दि. 3 : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरू झाले असून, विधानसभा आणि विधान परिषदेत 'वंदे मातरम्‌'ने सकाळी कामकाजास सुरुवात झाली.

          विधान परिषदेमध्ये सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, संसदीय कार्य मंत्री ॲङ अनिल परब, गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, यांच्यासह विधान परिषदेचे सदस्य उपस्थित होते.

          विधानसभेत उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, यांच्यासह मंत्री-राज्यमंत्री आणि विधानसभेचे सदस्य उपस्थित होते.

००००


वृत्त क्र. 684

विधानपरिषद तालिका सभापतींची नावे जाहीर

          मुंबई, दि. 3 : महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशन कामकाजासाठी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी तालिका सभापतींच्या नावांची घोषणा केली.

          सदस्य श्रीमती मनीषा कायंदे, सर्वश्री विक्रम काळे, रामदास आंबटकर आणि अमरनाथ राजूरकर यांची तालिका सभापती म्हणून निवड करण्यात आली आहे.

००००

वृत्त क्र. 683

विधानसभा तालिका अध्यक्षांची नावे जाहीर

          मुंबई, दि. 3 : महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशन कामकाजासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी तालिका अध्यक्षांची नावे जाहीर केली.

          सदस्य सर्वश्री भास्करराव जाधव, संजय शिरसाट, दीपक चव्हाण, कुणाल पाटील, कालिदास कोळंबकर यांची विधानसभा तालिका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.

००००



 जीवन में मिलने वाले निम्न तीन उपहारों

का हमेशा सम्मान करें:-

-"जीवन-साथी" (भगवान द्वारा दिया गया उपहार) 

-"माता-पिता" (उपहार में मिले ख़ुद भगवान)

-"मित्र" (भगवान को भी आसानी से न मिलने वाला उपहार)

         *🙏सुप्रभात🙏*

 पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

यांनी घेतला मेट्रो मार्गाच्या कामाचा आढावा

· मेट्रो 7 च्या पहिल्या टप्प्यादरम्यान मेट्रोची ट्रायल रन यशस्वी

· केंद्राकडून परवानगीची प्रक्रिया पूर्ण करून मेट्रो 7 चा पहिला टप्पा मुंबईकरांच्या सेवेत दाखल करण्याचा प्रयत्न

· मुंबईतील दुसरा मेट्रोमार्ग मार्चमध्ये कार्यान्वित करण्याची आदित्य ठाकरे यांची ग्वाही.

            मुंबई दि. २ :- केंद्राकडून परवानगीची प्रक्रिया पूर्ण करून मुंबईतील दुसरा मेट्रो मार्ग मार्चमध्ये कार्यान्वित करू, अशी ग्वाही राज्याचे पर्यावरण तथा राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. एमएमआरडीएच्या माध्यमातून तयार होत असलेल्या अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व यादरम्यानच्या तयार मुंबई मेट्रो 7 च्या पहिल्या टप्प्याची ट्रायल रन आज पार पडली. आरे, दिंडोशी आणि कुरार या मेट्रो स्थानकदरम्यानच्या कामाची पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली.

            मुंबईकरांची वाहतूक कोंडीतुन मुक्तता करण्यासाठी मुंबईसह एमएमआर क्षेत्रात मेट्रोचे जाळे तयार केले जात आहे. यामधील वर्सोवा ते घाटकोपर हा पहिला मेट्रो मार्ग मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाल्यानंतर मुंबईत सर्वत्र मेट्रोमार्गाचे जाळे तयार करण्याचे काम सुरू झाले. त्यानंतर मुंबई मेट्रोच्या दुसऱ्या मार्गाची प्रतीक्षा लवकरच संपुष्टात येणार असून मेट्रो मार्ग 7 चा पहिला टप्पा येत्या मार्च महिन्यात मुंबईकरांच्या सेवेत दाखल करण्यात येणार असल्याची घोषणा आदित्य ठाकरे यांनी आज केली.

            अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व यादरम्यान तयार करण्यात येत असलेल्या मेट्रो 7 चा पहिल्या टप्याची ट्रायल रन आज घेण्यात आली. हा पहिला टप्पा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारच्या परवानगीची गरज असून ती प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली आहे. मार्च महिन्यापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करून आरे ते डहाणूकरवाडी असा मेट्रोचा 20 किलोमीटर लांबीचा टप्पा मुंबईकरांच्या सेवेत दाखल करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.

            आज आदित्य ठाकरे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आरे, दिंडोशी, कुरार अशा तीन स्थानकांदरम्यान ट्रायल रन घेऊन यावरील कामाची पाहणी केली. या मेट्रोमार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले असून यादरम्यान सेवा सुरू करता येणे शक्य असल्याबाबत त्यांचे एकमत झाले. एमएमआरडीएचे आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी झालेल्या कामांची माहिती त्यांना दिली. या ट्रायल रन नंतर बोलताना त्यांनी झालेली कामे समाधानकारक असून आता फक्त परवानगीची प्रक्रिया पूर्ण करणे बाकी असल्याचे सांगितले. ती प्रक्रिया येत्या काही दिवसात पूर्ण करून मुंबईतील दुसऱ्या मेट्रो मार्गाचा एक टप्पा सुरू करणे आपल्याला शक्य होईल असे मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.

            आज झालेल्या या ट्रायल रनच्या वेळी राज्याचे पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, माजी मंत्री आणि आमदार रवींद्र वायकर, एमएमआरडीएचे आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास आणि एमएमआरडीएचे सर्व अधिकारी, अभियंते आणि मेट्रो मार्गावर काम करणारे कर्मचारी उपस्थित होते.

00000



 राज्यात निर्बंधांत शिथीलता, ‘अ’सूचीत १४ जिल्ह्यांचा समावेश.

            मुंबई, दि. 2 :- राज्यातील १४ जिल्ह्यांना पूर्ण लसीकरणाच्या टक्केवारीच्या आधारे ‘अ’ यादीत समाविष्ट करण्यात आले असून आणखी काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.

            राज्याच्या आरोग्य विभाग तसेच कोविड कृती दल(टास्क फोर्से) यांच्यामार्फत राज्यातल्या कोविड स्थितीबाबत प्राप्त माहितीच्या आधारावर राज्यातल्या निर्बंधांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. यासाठी प्रशासकीय घटक ‘अ’ आणि प्रशासकीय घटक ‘ब’ अशी विभागणी करण्यात आली आहे.

            वेगवेगळ्या भागतील कोविडची सद्यस्थिती, त्या भागात असलेली जोखीम, तिथली लसीकरणाची स्थिती, पॉझिटिव्हिटी दर आणि रुग्णांनी व्यापलेली बेडची संख्या या आधारावर हे वर्गीकरण करण्यात आले आहे.

            राज्य कार्यकारी समितीची 25 फेब्रुवारी रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यात निर्देश देण्यात आले आहे. यांची अंमलबजावणी राज्यात शुक्रवार 4 मार्च 2022 मध्यरात्री 12.00 पासून केली जाणार आहे. हे निर्देश पुढील आदेशांपर्यंत अमलात राहणार आहे.

            व्यक्तीचे “पूर्ण लसीकरण” याची व्याख्या पूर्वीप्रमाणेच असेल आणि कोविड अनुषंगिक व्यवहार (सी ए बी) करणे बंधनकारक असेल. जर या आदेशामध्ये एखाद्या कार्यक्रमाचा उल्लेख नसेल तर अशा स्थितीत त्या कार्यक्रमासाठी भारत सरकारने जारी केलेले सगळी मार्गदर्शक निर्देश लागू पडतील. जर एखाद्या बाबतीत राज्य तसेच केंद्र सरकार, असे दोन्हींचे ही मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या असतील, तर अशा स्थितीत जो निर्बंध जास्त कठोर असेल, त्याची अंमलबजावणी केली जाईल.

अ प्रशासकीय घटक

१-महानगरपालिकांना एक वेगळे प्रशासकीय घटक आणि जिल्ह्यातील इतर क्षेत्राला दुसरे एकल प्रशासकीय घटक म्हणून गृहीत धरले जाईल.

२- जे प्रशासकीय घटक खालील अटी पूर्ण करतील त्यांचा ‘अ’ सुचित समावेश असेल

अ- पहिली लस घेतलेल्यांची संख्या 90 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असेल;

ब- दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या 70 टक्केपेक्षा जास्त असेल;

क- पॉझिटिव्हिटी दर दहा टक्क्यांपेक्षा कमी असेल;

ड- ज्या ठिकाणी प्राणवायू आधारित बेडची संख्या किंवा आयसीयूमधील ४० टक्क्यांपेक्षा कमी बेड रुग्णांनी भरलेले असतील.

ब- वेग वेगळी स्थिती

            सर्व ठिकाणी एक सारखी परिस्थिती नसेल आणि यामुळे जिल्ह्याचे आपत्ती व्यवस्थापन प्रशासन या मापदंडांचा आकलन करून आपल्या क्षेत्रातील ‘अ’ किंवा ‘ब’ प्रशासकीय घटक सामान्य लोकांसाठी माहिती देतील आणि चालू स्थितीच्या आधारे एखाद्या प्रशासकीय घटकाला यादीमधुन वगळायचे की त्यात सामील करायचे, हे ठरवले जाईल. हा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासन हे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाच्या संमतीने घेतील. एकदा एखाद्या प्रशासकीय घटकाचा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आला किंवा यादीतून वगळण्यात आले, तर त्या ठिकाणी निर्बंध/ शिथिलतेचे मापदंड तत्काळ बदलतील.

क- पूर्ण लसीकरणासाठी आवश्यकता

            १-सार्वजनिक क्षेत्राशी निगडीत असलेले सर्व आस्थापनांच्या संपूर्ण स्टाफला पूर्णपणे लसीकरण असणे आवश्यक असेल;

            २-होम डिलिव्हरी करणाऱ्या संपूर्ण स्टाफला पूर्णपणे लसीकृत असणे अनिवार्य असेल;

            ३-सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग करणाऱ्या सर्वांसाठी पूर्ण लसीकरण आवश्यक असेल;

            4 -सर्वसामान्य लोक जमा होतात अशा सर्व ठिकाणी म्हणजेच मॉल, थेटर, नाट्यगृह, पर्यटन स्थळ, उपहारगृह, क्रीडा सामने, धार्मिक स्थळ अशा ठिकाणी भेटी देणाऱ्या सर्व अभ्यागतांना पूर्णपणे लसीकरण असणे आवश्यक असेल;

            5- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासन अश्या सर्व ठिकाणी पूर्णपणे लसीकरण झालेल्या लोकांना भेट देण्याची परवानगी देतील की जेथे जास्त लोकांचा संपर्क येतो आणि कोविड-१९ चा प्रसार होण्याची शक्यता आहे किंवा कोविड सुयोग्य व्यवहार करणे अत्यावश्यक आहे.

            ६-लोकांशी संपर्क येत असलेल्या कोणत्याही खाजगी, सार्वजनिक किंवा शासकीय कार्यालयांमध्ये किंवा आस्थापनेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पूर्णपणे लसीकरण आवश्यक असेल.

            ७-औद्योगिक कार्यकलापात असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना पूर्ण लसीकृत असणे अनिवार्य असेल.

            ड ‘अ’ यादीतील प्रशासकीय घटकांमध्ये ज्या सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय, सणासुदीशी संबंधित कार्यक्रम, विवाह समारोह, अंतिम यात्रा किंवा इतर गर्दीच्या ठिकाणी क्षमतेच्या पन्नास टक्‍क्‍यांपर्यंत उपस्थिती मुभा देण्यात आली आहे परंतु एखाद्या ठिकाणी जर एक हजारापेक्षा जास्त लोक जमणार असेल तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनास त्याची माहिती द्यावी लागेल आणि ते यावर निर्बंध घालू शकतील. ज्या प्रशासकीय घटकांचा ‘अ’ यादीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही, त्या ठिकाणी वरील प्रमाणे कोणत्याही कार्यक्रमासाठी क्षमतेच्या 50 टक्के पर्यंत उपस्थितीस परवानगी असेल किंवा 200 जणांची उपस्थितीचे (जी कोणती कमी असेल) मुभा असेल.

            ई- सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या प्रशासकीय विभागाच्या आदेशाच्या अधीन राहून ऑफलाइन वर्ग घेण्यास परवानगी असेल. अशा सर्व शैक्षणिक संस्थांच्या प्रशासकांना ऑफलाइन सहित ऑनलाईन वर्ग घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. सर्व अंगणवाड्या व प्री-शाळांना वर्ग घेण्याची परवानगी देण्यात आली आहे, परंतु अशा सर्व संस्था आणि आस्थापनांना कोविड सुयोग्य व्यवहाराचे अनुपालन करावे लागतील.

            फ- सर्व प्रशासकीय घटकांसाठी सर्व प्रकारचे होम डिलिव्हरी सेवांसाठी मुभा असेल.

            ग- ‘अ’ यादीत सामील असलेल्या प्रशासकीय घटकातील सर्व शॉपिंग कॉम्प्लेक्स, चित्रपटगृह, उपहारगृह, बार, क्रीडा संकुल, व्यायामशाळा, स्पा, जलतरण तलाव, धार्मिक स्थळ, नाट्यगृह, पर्यटन स्थळ, मनोरंजन पार्क इत्यादींना शंभर टक्के क्षमतेने संचलन करण्यास परवानगी असेल. इतर प्रशासकीय घटकांना क्षमतेच्या 50 टक्के उपस्थिती ने संचलनास परवानगी देण्यात आली आहे.

            ह- पूर्णपणे लसीकरण झालेल्या व्यक्तींना आंतरराज्य तसेच राज्य अंतर्गत प्रवास करण्यास परवानगी असेल. इतर राज्यांमध्ये ये- जा करणाऱ्या पूर्णपणे लसीकृत नसलेल्या लोकांना 72 तासाच्या आत मध्ये चाचणी करून आणलेले आर टी पी सी आर अहवाल दाखवणे बंधनकारक असेल. आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाची हरकत नसल्यास, अशा प्रकारच्या प्रवासासाठी कोणतेही ना हरकत प्रमाणपत्राची गरज नसेल.

            आय- शासकीय व खाजगी कार्यालयांना पूर्ण क्षमतेने कार्य करण्याची परवानगी असेल.

            जे- सर्व उद्योग आणि वैज्ञानिक संस्था पूर्ण क्षमतेसह काम करू शकतील.

            के- या आदेशात सामील नसलेल्या कोणत्याही कार्यक्रमासाठी फक्त ‘अ’ यादी मध्ये समावेश असेल तरच शंभर टक्के क्षमतेने संचलनाची परवानगी असेल आणि यादी ‘ब’ मध्ये समाविष्ट असलेल्या ठिकाणी 50 टक्के क्षमतेची अट लागू असेल. अन्वयार्थ लावण्यात वाद असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासन अंतिम निर्णय घेतील.

            एल- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनास राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाच्या परवानगीने आणखी जास्त कठोर निर्बंध लादण्याची अनुमती असेल. जिल्हास्तरावर या प्रशासनाने वारंवार बैठका, किमान आठवड्यातून एक बैठक, घेऊन संपूर्ण परिस्थितीचा आढावा घ्यावा.

            एम- जिल्ह्यांना सुचित करण्यात येते की, त्यांनी 100 टक्के लसीकरण करण्यासाठी प्रवृत्त करावे आणि लसीकरणाची गती वाढवावी. ‘अ’ यादी मध्ये समाविष्ट नसलेल्या प्रशासकीय घटकांतर्गत घरोघरी जाऊन लसीकरण मोहीम राबवावी. सध्या अठरा वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांसाठी लसीकरण आवश्यक नसले तरी निकट भविष्यात त्यांनाही लस घेणे आवश्यक ठरू शकते. पात्र वयस्क लोकांनीही सावधगिरीचा उपाय म्हणून डोस घ्यावे. सर्व शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लस घेतलेली आहे की नाही याची जिल्हा प्रशासनाने सहनिशा करून घ्यावी. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन करावे.

            एन- चालू कोविड परिस्थितीबद्दल सार्वजनिक आरोग्य विभागाने माहिती द्यावी. त्याचप्रमाणे चाचणीसाठीची मूलभूत सुविधा याबाबतची लोकांना माहिती द्यावी. त्यामुळे चुकीची माहिती प्रसारित होणार नाही आणि लोक घाबरणार नाही. त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये लोकांना या कार्यात समाविष्ट करून घ्यावे आणि कोविड नियमांचे सुयोग्य वर्तन होत असल्याची खात्री करावी. समाजाला पुरावे आधारित माहिती वेळोवेळी द्यावी.

            ओ- कोविड-१९ च्या परिस्थितीत कधीही बदल होऊ शकते. म्हणून जिल्हा प्रशासन तसेच राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सजग रहावे आणि दररोजच्या स्थितीबाबत माहिती द्यावी. पुढील आदेशापर्यंत हा आदेश लागू असेल.

            ‘अ’सूचीतील यादीमध्ये 14 जिल्ह्यांचा समावेश असून यात मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, वर्धा, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.

*****



 मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे

जागतिक महिला दिनानिमित्त अनुभव लेखन उपक्रमाचे आयोजन

‘कशासाठी? - लिंगभाव (Gender) समतेसाठी’ विषयावर अनुभव लेखन पाठविण्याचे आवाहन

            मुंबई, दि. 2 : समता हे आपल्या संविधानातील एक महत्त्वाचे मूल्य आहे. या दृष्टीने यंदाच्या जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने अनुभव लेखन हा उपक्रम आयोजित केला असून, त्याचा विषय ‘कशासाठी?- लिंगभाव समतेसाठी’ आहे. यात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे.


            स्त्री जन्माला येत नाही, तर ती घडवली जाते. या सीमॉन द बोव्हारच्या वाक्यातील मर्म आपण सारे जाणतो; आणि म्हणून पुरुषही जन्माला येत नाही, तर तोही घडवला जातो, याची जाणीवही सीमॉनचे हे वाक्य आपल्याला करून देते. स्त्रियांनी आणि पुरुषांनी कसे वागावे, याविषयी आपल्या पुरुषप्रधान समाजाच्या पारंपरिक चौकटी ठरलेल्या आहेत आणि त्यानुसार सर्वांना लहानपणापासून वाढवले जाते. या चौकटी जाचक ठरायला लागल्यावर काही व्यक्तींनी त्या नाकारायला सुरुवात करून सांविधानिक समतेची कास धरलेली दिसते. या उपक्रमासाठी स्त्री-पुरुष, तृतीयपंथी यांनी आपल्या जगण्यात लिंगभाव समता आणण्यासाठी केलेले प्रयत्न, संघर्ष, अनुभव लिहून ते 25 मार्चपर्यंत पाठवायचे आहेत. आपले हे अनुभव इतरांनाही लिंगभाव समता आणण्यासाठी प्रेरणादायी ठरतील, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.


            अनेक समाजसुधारकांच्या प्रयत्नामुळे आज स्त्रिया मोठ्या प्रमाणात शिक्षण घेऊ लागल्या असल्या, तरी आजही घराबाहेर पडून नोकरी-व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांची संख्या तुलनेत अल्प आहे. त्यासाठीही अनेकींना त्यांच्या-त्यांच्या पातळीवर लहान मोठे संघर्ष करावे लागत आहेत. हे संघर्ष कधी कौटुंबिक पातळीवरील असतात, तर कधी नोकरी-व्यवसायातील, प्रत्येकीने कधी ना कधी लिंगभाव असमानतेला तोंड दिलेले असते आणि सावकाश का होईना, काही प्रमाणात का असेना ती असमानता समानतेकडे झुकवण्यात ती यशस्वीही झालेली असते. असे संघर्ष कधी कौटुंबिक पातळीवर सातच्या आत घरात येण्याचे असतील किंवा घरकाम, शिक्षण, नोकरी, करिअर, लग्न, मुलाचे संगोपन इ. साठीचे असतील, तर कधी नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी मिळालेल्या भेदभावाचे असतील. पुरुषप्रधानता केवळ स्त्रियांच्या विकासालाच मारक आहे असे नव्हे, तर माणूस म्हणून जगण्यासाठी पुरुष आणि तृतीयपंथी यांचाही ही पुरुषप्रधानता तितकाच कोंडमारा करते, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

            अनुभव लेखन उपक्रम सर्वांसाठी खुले असून संबंधितांनी आपले अनुभव मराठीत लिहावेत. लिखाणाची शब्दमर्यादा 700 ते 1200 शब्द असावी तसेच लेखन हे अनुभवाधारित असावे, काल्पनिक नसावे. या उपक्रमांतर्गत आलेल्या निवडक लेखाचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून पुस्तक प्रकाशित करण्यात येईल. तसेच ‘पुन्हा स्त्री उवाच' या संकेतस्थळावर प्रसिद्धी देण्यात येईल. उपक्रमाची अधिक माहिती https://ceo.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे किंवा 8669058325 (प्रणव सलगरकर) या क्रमांकावर संपर्क साधावा.

 बोगस क्रीडा प्रमाणपत्र धारक उमेदवारांना प्रमाणपत्र समर्पणाबाबत आवाहन

            मुंबई, दि. 2 : खेळाडूंना शासकीय निमशासकीय सेवेत ५% आरक्षण ठेवलेले असून काहींनी बोगस क्रीडा प्रमाणपत्र धारण करून क्रीडा विभागाकडून क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी केलेली आहे. तसेच कांही उमेदवारांनी शासकीय सेवेचा लाभ घेतला आहे ,अशा युवा उमेदवारांना भविष्यात अडचण निर्माण होऊ नये यासाठी एक संधी म्हणून "बोगस क्रीडा प्रमाणपत्र , बोगस क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल समर्पण योजना" हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

            ज्या उमेदवारांनी क्रीडा संचालनालय व विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा यांचेकडून बोगस क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी करून घेतली असेल, अशा उमेदवारांना तसेच त्या आधारे शासकीय, निमशासकीय व इतर कार्यालयामध्ये नोकरी धारण केली आहे अशा उमेदवारांनी मुळ क्रीडा प्रमाणपत्र व मुळ क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडे व्यक्तीश: अथवा पत्राद्वारे दि. ३१ मे २०२२ पूर्वी समर्पीत करण्यात यावीत अशा उमेदवारांची नावे गोपनीय ठेवण्यात येतील.

            मुदतीत बोगस क्रीडा प्रमाणपत्रे व मुळ क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल जमा न केल्यास संबंधीत उमेदवार व संबंधीत क्रीडा संघटना यांचे विरूद्ध फौजदारी कारवाई करण्यात येईल. बोगस क्रीडा प्रमाणपत्रधारक उमेदवारांनी दि. ३१ मे २०२२ पर्यंत आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, शिवछत्रपती क्रीडापीठ, म्हाळूंगे बालेवाडी, पुणे येथे आपला अहवाल सादर करावा. असे आवाहन आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, पुणे श्री ओम प्रकाश बकोरिया, यांनी केले आहे.

००००



Featured post

Lakshvedhi