Saturday, 15 January 2022

 रायगड किल्ला व परिसर विकासाच्या कामासाठी

प्राधान्याने निधी उपलब्ध करून देणार

- उपमुख्यमंत्री अजित पवार

· रायगड किल्ला व परिसर विकास पर्यटन आराखडा प्राधिकरणाचा आढावा

            मुंबई, दि. 12 : रायगड किल्ला व परिसर विकास पर्यटन आराखडा प्राधिकरणाची कामे गतीने व्हावीत, कामांची गुणवत्ता, दर्जा कायम राखावा या विकासकामांना गती मिळण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग, पर्यटन विभाग, पुरातत्व विभाग, जिल्हा प्रशासन यांनी समन्वय राखून प्राधिकरणाला कामकाजात सहकार्य करावे, या प्राधिकरणाला मंजूर असलेला यंदाच्या आर्थिक वर्षातील नियतव्यय शंभर टक्के वितरीत करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. तसेच या प्राधिकरणाला प्राधान्याने निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. 

            मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रायगड किल्ला व परिसर विकास पर्यटन आराखडा प्राधिकरणाचा आढावा घेतला. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री कु.आदिती तटकरे, खासदार संभाजी राजे, खासदार सुनिल तटकरे, सांस्कृतिक कार्य व पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर, कोकणचे विभागीय आयुक्त विलास पाटील, रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर आदि वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या प्रेरणेतून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी घडविलेला इतिहास हा प्रेरणादायी आहे. या इतिहासात रायगड आणि परिसराला मोठे महत्व आहे. त्यामुळे रायगड किल्ल्याचा आणि परिसराचा विकास करण्यासाठी रायगड किल्ला व परिसर विकास पर्यटन आराखडा प्राधिकरणाला निधी कमी पडू देणार नाही. या प्राधिकरणाच्या कामकाजात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी रायगड जिल्हा नियोजन समितीला निधी उपलब्ध करून देण्यात येईल. या निधीचा विनियोग पालकमंत्री, जिल्हा प्रशासन आणि प्राधिकरणाने समन्वयाने करावा. राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा वाडा, समाधीचे संवर्धन, जतन करण्याचे काम, शिवसृष्टी उभारणी अशी नियोजित सर्व कामे शास्रोक्त पद्धतीने करावीत. ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या वास्तूंचे जतन आणि संवर्धन करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

            रायगड किल्ला आणि परिसर विकासाचे काम पूर्णत्वाला नेणार असून रायगड किल्ला परिसरातील 21 गावांचा विकास व्हावा, स्थानिकांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

******



 पैठण येथे मोसंबी फळपिकासाठी “सिट्रस इस्टेट”

                                               - संदिपान भुमरे

३६ कोटी ४४ लाख रुपयांची तरतूद

            मुंबई, दि. 13 : औरंगाबाद जिल्ह्यातील तालुका फळरोपवाटिका-पैठण प्रक्षेत्रावर मोसंबी फळपिकासाठी "सिट्रस इस्टेट" ही योजना राबविण्यास तसेच "सिट्रस इस्टेट" ची स्थापना करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याचे कार्यक्षेत्र पैठण केंद्रबिंदू मानून १०० किलो मीटर परिघात राहील. सदर "सिट्रस इस्टेट" साठी रुपये ३६ कोटी ४४ लाख ९९१ रुपये एवढी तरतूद टप्प्याटप्प्याने उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी दिली.

            श्री भुमरे म्हणाले, राज्यात लिंबूवर्गीय फळपिकांमध्ये संत्रा पाठोपाठ मोसंबी फळपिकाचे उत्पादन घेतले जाते. मोसंबी उत्पादनात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक लागतो. जागतिक हवामान बदलाच्या परिणामस्वरुप गत ७-८ वर्षांत फळपिकांखालील क्षेत्रात चढ-उतार होत आहेत. मराठवाड्यात मोसंबी पिकांसाठी अनुकूल हवामान पिक पद्धतीचा विचार करता मोसंबी हे फळपिक शेतकऱ्यांना अधिक लाभदायक ठरते. मराठवाड्यात सुमारे ३९ हजार ३७० हेक्टर क्षेत्रावर मोसंबी उत्पादन घेतले जाते. त्यापैकी औरंगाबाद जिल्हा २१ हजार ५२५ हेक्टर व जालना जिल्हा १४ हजार ३२५ हेक्टर हे प्रमुख मोसंबी उत्पादक जिल्हे आहेत. मराठवाड्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या मोसंबी फळपिकाचे शाश्वत उत्पादन, प्रक्रिया तसेच निर्यातीसाठीचे क्लस्टर निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यादृष्टीने औरंगाबाद जिल्ह्यातील तालुका फळरोपवाटिका - पैठण प्रक्षेत्रावर मोसंबी फळपिकासाठी “सिट्रस इस्टेट” स्थापन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

            मोसंबी फळपिकाची उच्च दर्जाची कलमे पुरेशा प्रमाणात निर्माण करण्यासाठी तालुका फळरोपवाटिका-पैठण, जि. औरंगाबाद या फळरोपवाटिका प्रक्षेत्रावर उच्च तंत्रज्ञानावर आधारित फळरोपवाटिका स्थापन करणे, सदर प्रक्षेत्रावर मोसंबीच्या जातीवंत मातृवृक्ष लागवड करणे, मोसंबी फळपिकाच्या शास्त्रोक्त लागवड पद्धतीच्या फळबागा विकसित करण्यासाठी शेतकऱ्यांना कीड-रोगमुक्त उच्च दर्जाची कलमे पुरेशा प्रमाणात किफायतशीर दराने उपलब्ध करुन देणे हे या योजनेचे उद्दिष्ट असल्याने मंत्री श्री.भुमरे यांनी सांगितले.

            मोसंबी फळपिकाच्या दर्जेदार उत्पादनासाठी तसेच शास्त्रोक्त लागवड पद्धतीच्या प्रचारासाठी शेतकरी प्रशिक्षणाच्या सुविधा निर्माण करणे. शेतकरी प्रशिक्षण व विस्तार यातून नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी “सिट्रस इस्टेट” लाभदायक ठरणार आहे.

            तसेच मोसंबी फळ प्रक्रिया, संकलन, ग्रेडिंग, वेस्टन, साठवण, विपणन, प्रक्रिया, वाहतूक व निर्यातीला चालना देण्यासाठी व देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय निर्यात विपणन साखळी निर्माण करणेही यामुळे शक्य होणार असल्याचे मंत्री श्री.भुमरे यांनी यावेळी सांगितले.

00000





 राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या

जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांचे अभिवादन !

            मुंबई दि 12- राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

            राष्ट्रासाठी त्यागाची आणि जगण्याची प्रेरणा असणा-या राजमाता जिजाऊ आणि जगभरातील युवकांना जगण्याचा आणि जिंकण्याचा मूलमंत्र देणारे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात आज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार संदीप क्षीरसागर, सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव (प्र.सु.र.का.) इंद्रा मालो यांनीही यावेळी पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव ज.जी.वळवी, अवर सचिव विठ्ठल भास्कर यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी यांनीही पुष्प अर्पण करून वंदन केले.

0000


 

 महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनने

राज्याच्या क्रीडा विभागाशी समन्वय ठेऊन काम करावे

- उपमुख्यमंत्री अजित पवार

· महाराष्ट्र दिनी ‘महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धे’चे आयोजन करणार

· उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिअसोसिएशनच्या कार्यकारणी मंडळाची सभा

           मुंबई, दि. 11 : राज्याच्या क्रीडा चळवळीला बळकटी देण्यासाठी तसेच आगामी ऑलिम्पिक स्पर्धा डोळ्यासमोर ठेऊन राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात येत्या महाराष्ट्र दिनापासून ‘महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा’ या नावाने मिनी ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्याचा ठराव उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यकारणी मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ऑलिम्पिक स्पर्धेत देशाला पदके जिंकून देण्यासाठी ऑलिम्पिक असोसिएशनने राज्याच्या क्रीडा विभागाशी समन्वय ठेऊन काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

            महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यकारणी मंडळच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार मंत्रालयातील त्यांच्या दालनातून ऑनलाईन सहभागी झाले होते. यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीप गंधे, उपाध्यक्ष अशोक पंडीत, उपाध्यक्ष जय कवळी, महासचिव नामदेव शिरगावकर, सदस्य दीपक मेजारी, अभय छाजेड यांच्यासह व्हिसीद्वारे बाळासाहेब लांडगे, धनंजय भोसले, प्रकाश तुळपुळे, प्रशांत देशपांडे, स्मिता यादव, सुंदर अय्यर, उदय डोंगरे, राजाराम राऊत, सोपान कटके, निलेश जगताप, संदीप चौधरी, गोविंद मुथुकुमार, खासगी सचिव अविनाश सोलवट, क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरीया उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, 2024, 2028, 2032 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी सर्व संघटनांनी ‘ऑलिम्पिक व्हिजन डॉक्यूमेंट’ लवकरात लवकर तयार करुन राज्याच्या क्रीडा विभागाला सादर करावे. गेल्या दोन वर्षापासून कोरोना संकटाशी आपण सामना करत आहोत. या कोविड संकटामुळे खेळाडूंचे मनोबल खचू नये, यासाठी ऑलिम्पिक असोसिएशनने काम केले पाहिजे. राज्याच्या क्रीडा विकासात भरीव योगदान देण्यासाठी असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या अनुभवाचा निश्चितच उपयोग होईल. कोरोना संकटात सर्व खेळाडूंची काळजी घ्यावी. कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. 

        ऑलिम्पिक संघटनेच्यावतीने खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस क्रीडा दिन म्हणून ऑनलाइन साजरा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.



 राज्य कला प्रदर्शनासाठी कलावंतांकडून कलाकृती

सादर करण्याचे आवाहन

            मुंबई दि, 14 : 61 वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन (व्यावसायिक कलाकार विभाग) मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात चित्रकला, शिल्पकला, उपयोजित कला, मुद्राचित्रण व दिव्यांग या विभागासाठी महाराष्ट्राचा रहिवाशी असलेल्या कलावंतांकडून कलाकृती मागविण्यात येत आहेत.

            या प्रदर्शनात पारितोषिकपात्र कलाकृतींना प्रत्येकी रु.५०,०००/- (अक्षरी रुपये पन्नास हजार फक्त) याप्रमाणे एकूण १५ पारितोषिके देण्यात येणार आहेत. इच्छुक कलावंतांनी अर्ज करण्यासाठी उद्या दि. १५ जानेवारी, २०२२ पर्यंत कला संचालनालयाच्या http://doaonline.in/doakalapradarshan/public/home या लिंकवर ऑनलाईन स्वरुपात कलाकृती सादर कराव्यात, असे आवाहन कला संचालक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

००००

 राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राचे घवघवीत यsh

8 ‘सुवर्ण’सह एकुण 30 पदकांची युवकांनी केली कमाई

· कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांच्याकडून युवक-युवतींचे अभिनंदन

            मुंबई, दि. 11 : केंद्र शासनामार्फत दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राने घवघवीत यश मिळविले आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून गेलेल्या युवक-युवतींनी 8 सुवर्ण, 4 रजत, 7 कांस्य आणि 11 उत्तेजनार्थ पदके अशा एकुण 30 पदकांची कमाई केली आहे. महाराष्ट्राने पदकसंख्येत देशात दुसरे स्थान पटकावले आहे. पुरस्कारविजेते तरुण-तरुणी आता शांघाय (चीन) येथे होणाऱ्या जागतिक स्किल्स चँपीयनशीपसाठी पात्र ठरले असून त्यांना आपले कौशल्य जागतिक स्तरावर प्रदर्शित करता येणार आहे. राष्ट्रीय स्पर्धेतील यशाबद्दल सर्व युवकांचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी अभिनंदन केले असून त्यांना जागतिक स्किल्स चँपीयनशीपसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

            कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह यांनीही विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. कौशल्य विकास सोसायटीमार्फत या विद्यार्थ्यांची जागतिक स्किल्स चँपीयनशीपसाठी तयारी करुन घेण्यात येत आहे.

            स्पर्धेमध्ये 10 सुवर्णपदकांसह एकूण 49 पदके पटकावून ओडीशा राज्याने प्रथम क्रमांक पटकावला, तर 8 सुवर्णपदकांसह एकुण 30 पदके पटकावून महाराष्ट्र राज्य द्वितीय क्रमांकावर आले. याशिवाय केरळ 24 पदके, कर्नाटक 23 पदके, तामिळनाडू 23 पदके, आंध्र प्रदेश 16 पदके, बिहार 13 पदके, हरयाणा, गुजरात, राजस्थान व चंदीगड यांना प्रत्येकी 11 पदके, पंजाब 8 पदके अशा पद्धतीने विविध राज्यांनी कामगिरी केली आहे.   

            राज्यातून एकुण 60 पेक्षा अधिक स्पर्धक दिल्ली येथे राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत सहभागी झाले होते. यापुर्वी गांधीनगर (गुजरात) येथे झालेल्या पश्चिम प्रादेशिक स्पर्धेत 45 पदके पटकावून 55 टक्के पदकांवर महाराष्ट्रातील युवक-युवतींनी आपले नाव कोरले होते.

            कौशल्य विकास मंत्री श्री. मलिक म्हणाले की, या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कल्पक तरुणांना जागतिक पातळीवर त्यांचे कौशल्य दाखविण्याची संधी प्राप्त झाली आहे. कौशल्य विकासात देशाला अग्रेसर बनविताना महाराष्ट्र त्यात महत्वपूर्ण योगदान देईल. राष्ट्रीय स्पर्धेत यश मिळविलेल्या तरुणांनी आता जिद्दीने शांघाय येथे होणाऱ्या जागतिक स्पर्धेत यश मिळविण्याचे ध्येय ठेवावे. २०२३ मध्ये फ्रान्स येथे होणाऱ्या स्पर्धेसाठीही आतापासूनच तयारी सुरु करावी. जागतिक पातळीवर कौशल्य क्षेत्रात देशाचे नाव उज्वल करताना त्यात महाराष्ट्रातील युवक-युवती महत्वपूर्ण योगदान देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या विद्यार्थ्यांना राज्य शासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. 

राज्यातील सुवर्ण पदक विजेते स्पर्धक

            पंकज सिताराम सिंह (३ डी डिजीटल गेम आर्ट), मोहम्मद सलमान अन्सारी (ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी), रिंकल करोत्रा (ब्युटी थेरपी), श्रीराम कुलकर्णी (फ्लोरीस्ट्री), कोपल अजय गांगर्डे (इंडस्ट्रीयल डिझाईन टेक्नॉलॉजी), अमित कुमार सिंह (प्लास्टरींग अँड ड्रायवॉल सिस्टीम्स), ओमकार गौतम कोकाटे (प्रिंट मिडीया टेक्नॉलॉजी), संजीव कुमार सबावथ (वॉल अँड फ्लोअर टायलिंग)

रजत पदक विजेते स्पर्धक

            देवेज्या (फॅशन टेक्नॉलॉजी), रितेश मारुती शिर्के (इंडस्ट्रीयल कंट्रोल), लवकेश पाल (प्लास्टरींग अँड ड्रायवॉल सिस्टीम्स), आदित्य दीपक हुगे (प्रिंट मिडीया टेक्नॉलॉजी)

कांस्य पदक विजेते स्पर्धक

            ज्ञानेश्वर बाबुराव पांचाळ (कारपेन्ट्री), स्टेनली सोलोमन (काँक्रीट कन्स्ट्रक्शन वर्क), योगेश दत्तात्रय राजदेव (इलेक्ट्रीकल इन्स्टॉलेशन्स), श्रीष्टी मित्रा (ग्राफीक डिझाईन टेक्नॉलॉजी) आदित्य बिरंगळ (मोबाईल ॲप्लीकेशन्स डेव्हलपमेंट), अश्लेषा भारत इंगवले (पेंटींग अँड डेकोरेटींग), सुमीत सुभाष काटे (प्लॅस्टीक डाय इंजिनिअरींग)

उत्तेजनार्थ पुरस्कार विजेते

            कृष्णा लोया (डिजीटल कन्स्ट्रक्शन), जुई संतोश सपके (हेअर ड्रेसिंग), यश दिनेश चव्हाण (हेअर ड्रेसिंग), कृष्णा गिल्डा (इंडस्ट्रीयल डिझाईन टेक्नॉलॉजी), दक्ष राहुल सावला (इंडस्ट्रीयल डिझाईन टेक्नॉलॉजी), अविनाश नवनाथ तौर (मेकॅट्रॉनिक्स), श्वेतांक भालेकर (मेकॅट्रॉनिक्स), मित्रा राव (पॅटीसरी अँड कॉन्फेक्शनरी), अर्जुन मोगरे (प्लंबिंग अँड हिटींग), शेख इब्राहीम अजीज (वेल्डींग), वेद इंगळे (सायबर सिक्युरिटी)

००००




 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून

‘भारतीय सैन्य दिना’च्या शुभेच्छा

            मुंबई, दि. 15 :- देशाच्या संरक्षणासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या भारतीय संरक्षण दलांतील अधिकारी, जवान बांधवांच्या अतुलनीय धैर्य, शौर्य, त्याग, बलिदान, देशभक्ती, कर्तव्यनिष्ठेचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना ‘भारतीय सैन्य दिना’च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

            ‘भारतीय सैन्य दिना’निमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, 15 जानेवारी 1949 रोजी तत्कालिन लेफ्टनंट जनरल के. एम. करिअप्पा यांनी देशाचे ‘कमांडर इन् चीफ’ म्हणून सूत्रे स्वीकारली. त्या ऐतिहासिक दिवसाच्या सन्मानार्थ साजरा होत असलेला भारतीय सैन्य दिवस हा भारतीय सैन्याबद्दलचा आदर, कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. देशाच्या संरक्षणासाठी रणरणत्या वाळवंटात, अंग गोठवणाऱ्या थंडीत आपले सैनिक कर्तव्य बजावत असतात. देशवासियांच्या संरक्षणासाठी स्वत:च्या प्राणांचं बलिदान देतात. त्यांच्या देशभक्ती, कर्तव्यनिष्ठेला तोड नाही. सैन्यदलातील अधिकारी व जवानांचा, त्यांच्या कुटुंबियांचा आम्हाला अभिमान असून देशवासीय सदैव त्यांचे कृतज्ञ राहतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी भारतीय सैन्य दलांचा गौरव करुन शहीद वीरांना अभिवादन केले.

०००


 


 



Featured post

Lakshvedhi