Saturday, 15 January 2022

 सर्वच दुकानांचे नामफलक मराठीत लावणे बंधनकारक

            राज्यातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये असावेत असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून या संदर्भात महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, 2017 मध्ये सुधारणा करण्यात येईल.

            कामगार संख्या 10 पेक्षा कमी असलेल्या आस्थापना तसेच 10 पेक्षा अधिक असलेल्या आस्थापना, अशा सर्व आस्थापना, देवनागरी लिपीत मराठी भाषेमध्ये नामफलक प्रदर्शित करतील. मालक आस्थापनेचा नामफलक हा मराठी देवनागरी लिपी बरोबरच इतर भाषेतही लिहू शकतो. परंतु, मराठी भाषेतील नामफलक प्रारंभी लिहिणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेतील नामफलकावरील अक्षरांचा आकार इतर भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असू नये. ज्या आस्थापनेत कोणत्याही प्रकारे मद्य विक्री किंवा मद्यपान सेवा दिली जात असेल अशा आस्थापनेस महापुरुष/महनीय महिला यांची किंवा गड किल्ल्यांची नावे देण्यात येऊ नयेत असाही निर्णय घेण्यात आला.

-----०-----


  


 

 


 18 जानेवारी रोजी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी

मतदारांना सावर्जनिक सुट्टी जाहीर

               मुंबई, दि. 14 : दिनांक 18 जानेवारी 2022 रोजी राज्यातील 95 नगरपंचायत, 2 जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत प्रत्येकी 7 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका तसेच सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका पोट निवडणुकांसाठी या क्षेत्रातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी संबंधित मतदारसंघात सामान्य प्रशासन विभागाने सावर्जनिक सुट्टी जाहीर केली आहे.

               मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी ही सावर्जनिक सुट्टी खाली नमूद करण्यात आलेल्या मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदार संघांच्या बाहेर असतील त्यांना देखील लागू राहणार आहे. त्याचप्रमाणे केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निम शासकीय कार्यालये, सावर्जनिक उपक्रम, बॅंका इत्यादींना ही सावर्जनिक सुट्टी लागू राहणार आहे.

               राज्यातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, धुळे, अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील 95 नगरपंचायतींकरिता तसेच भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेच्या प्रत्येकी 7 पंचायत समित्‍या आणि सांगली-मिरज-कुपवाड या एका महानगरपालिकेच्या पोट निवडणुकीकरिता ही सावर्जनिक सुट्टी असेल.

000



 

Friday, 14 January 2022

 तंत्रज्ञानाद्वारे नागरिकांना सुविधा विनासायास मिळतील

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

· बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट-बॉट’ सुविधेचे लोकार्पण

· मोबाईलवर मिळणार 80 पेक्षा अधिक सेवा सुविधा

         मुंबई, दि 14 : नागरिकांसाठीच्या तब्बल 80 सुविधा त्यांच्या मोबाईलवर ‘व्हॉट्सअप चॅट-बॉट’ द्वारे सहजपणे उपलब्ध करून देणारी बृहन्मुंबई महानगरपालिका ही देशातील पहिली पालिका असून माहिती तंत्रज्ञानाचा नागरिकांना अधिकाधिक उपयोग कसा करून देता येईल याचे हे उत्तम उदाहरण आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महानगरपालिकेचे कौतुक केले. नवीन तंत्रज्ञानानुसार सुविधा अपडेट करणे मोठे काम आहे महापालिकेने त्याकडे लक्ष द्यावे असेही ते म्हणाले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट-बॉट’ या तंत्रज्ञानस्नेही व लोकाभिमुख उपक्रमाचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले.

            याप्रसंगी विविध समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, ‘व्हॉट्सअप चॅट-बॉट’द्वारे जनतेला ८० हून अधिक सुविधा घरबसल्या उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. ‘आपली मुंबई, माझी मुंबई’ साठी सातत्याने कार्यरत असणा-या देशातील क्रमांक एकच्या महानगरपालिकेद्वारे ही सुविधा ८९९९-२२-८९९९ या क्रमांकाद्वारे नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी घोषित करत या सुविधेचा स्वतः वापर करत लोकार्पण केले.

            मुख्यमंत्री श्री. ठाकरे यावेळी म्हणाले की, गोडव्यासाठी तिळगुळाची वाट न पहाता लोकांसाठी काम करावे. महापालिका असो किंवा शासन, या यंत्रणांशी थेट व सुलभपणे संवाद झाला पाहिजे असे नागरिकांना नेहमी वाटते, ती सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देणारा हा उपक्रम आहे. वर्क फ्रॉम होमची सुविधा या उपक्रमाने अधिक सक्षम केली आहे. महापालिका रोज काय काम करते ? या सगळ्याची माहिती नागरिकांना द्यावी अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

तंत्रज्ञानस्नेही संक्रमण

            मुंबई उपनगरचे पालकमंत्री तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, येणाऱ्या काळात इज ऑफ लिविंगमध्ये मुंबई जगात सर्वात पुढे राहील असा विश्वास आहे. ऑनलाईन, पारदर्शक आणि अकाऊंटेबल महापालिकेचे मॉडेल आज आपण लोकांना दिले आहे. माय बीएमसी टिव्टर हॅन्डलवर तक्रार दाखल करण्यात येत असून चॅट-बॉट हे पुढचे पाऊल आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी होत असलेले तंत्रज्ञानस्नेही संक्रमण हे अत्यंत चांगल्या दिशेने होत आहे. मुंबईकरांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिका सातत्याने करित असलेल्या लोकाभिमुख प्रयत्नांचा त्यांनी याप्रसंगी आवर्जून उल्लेख केला. 

            मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले की,उत्तम जागतिक सुविधा मुंबईकरांना उपलब्ध करून देण्याच्या पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या परिवर्तनशील पाऊलांचे नेहमीच खूप कौतुक वाटते. त्यांच्या प्रयत्नांमुळे आज महानगरपालिकेच्या विविध सेवा-सुविधांशी संबंधीत बाबी मुंबईकरांना घरबसल्या उपलब्ध होणार आहेत. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबई शहर अतिशय वेगाने आणि चांगल्या पद्धतीने बदलत आहे. कोविड काळात मुंबई पालिकेने केलले काम खूप कौतुकास्पद आहे, ज्याची दखल जागतिक आरोग्य संघटना व वर्ल्ड बँक यांनीही घेतली आहे.

            महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर म्हणाल्या, मुंबईकरांना विविध नागरी सेवा-सुविधा तत्परतेने उपलब्ध करुन देण्यात महानगरपालिका नेहमीच अग्रेसर असते. याच शृंखलेत आता ८९९९-२२-८९९९ या क्रमांकावर केवळ एक व्हॉट्सअप संदेश पाठवून नागरिकांना विविध सेवा-सुविधा व माहिती उपलब्ध होणार आहे, ही निश्चितच कौतुकास्पद व अभिनंदनीय बाब आहे.

            महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी नमूद केले की, नागरिकांना घरबसल्या गणेशोत्सव मंडप परवानग्या, आपल्या विभागाची माहिती, संबंधीत संपर्क क्रमांक यासारखी विविध माहिती सहजपणे उपलब्ध होणार आहे.

            व्हॉट्सअप कंपनीचे संचालक (सार्वजनिक धोरण) शिवनाथ ठुकराल यांनी नागरिकांना सेवा-सुविधा देण्यात सदैव अग्रेसर असणा-या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तंत्रज्ञानस्नेही व लोकाभिमुख उपक्रमांचे कौतुक करीत अभिनंदन केले. ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेद्वारे नागरिकांना तब्बल ८० पेक्षा अधिक सेवा-सुविधा उपलब्ध करुन देणारी बृहन्मुंबई महानगरपालिका ही देशातील पहिलीच महानगरपालिका असल्याचाही श्री. ठुकराल यांनी आवर्जून उल्लेख केला.

            अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, परिवहन मंत्री ॲङ अनिल परब, सहाय्यक आयुक्त (माहिती तंत्रज्ञान) शरद उघडे, यांच्यासह महानगरपालिकेतील विविध खात्यांचे संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेची ठळक वैशिष्ट्ये

१. बृहन्मुंबई महानगरपालिकेची ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ ही सुविधा ८९९९-२२-८९९९ या क्रमांकावर उपलब्ध आहे.

२. ८९९९-२२-८९९९ या क्रमांकावर मराठीमध्ये ‘नमस्कार’ आणि इंग्रजीमध्ये ‘Namaste किंवा Hi’ असा संदेश पाठविल्यानंतर महानगरपालिकेच्या बोधचिन्हासहीत अधिकृत उत्तर प्राप्त होते. याच उत्तरानंतर मराठी वा इंग्रजी असे २ पर्याय उपलब्ध होतात. यापैकी एका पर्यायावर ‘क्लिक’ केल्यानंतर नागरिक, व्यवसाय अथवा पर्यटक असे ३ पर्याय उपलब्ध होतात. यापैकी कोणत्याही एका पर्यायावर क्लिक केल्यानंतर त्या पर्यायानुसार महानगरपालिकेच्या सेवा-सुविधांशी संबंधीत पर्याय नागरिकांना उपलब्ध होतात.

३. वरीलनुसार आपल्या आवश्यकतेनुसार नागरिकांद्वारे जे-जे पर्याय निवडले जातील, त्या-त्या पर्यायानुसार तब्बल ८० सेवा-सुविधांविषयीची माहिती नागरिकांना तात्काळ उपलब्ध होते. यामध्ये संबंधीत पत्ते, संपर्क क्रमांक, संक्षिप्त माहिती यासारख्या बाबींचा समावेश आहे.

४. या सुविधे अंतर्गत उपलब्ध होणा-या ८० सेवा-सुविधांविषयीची माहिती ही ‘लोकेशन’ आधारित पद्धतीने उपलब्ध होत असल्याने एखादी व्यक्ती ज्या ठिकाणी आहे, ते ठिकाण महानगरपालिकेच्या २४ विभाग कार्यालयांपैकी कोणत्या विभागात आहे, याची माहिती अत्यंत सहजपणे व तात्काळ स्वरुपात उपलब्ध होत आहे.

५. वरीलनुसार लोकेशन आधारित पद्धतीने ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ द्वारे माहिती उपलब्ध होत असल्यामुळे एखाद्या व्यक्तिच्या ठिकाणाजवळ असणारे महानगरपालिका दवाखाने – रुग्णालये, कोविड केअर सेंटर, मनपा शाळा, उद्याने, पर्यटन स्थळे, अग्निशमन केंद्रे इत्यादी बाबींची माहिती तात्काळ उपलब्ध होत आहे.

६. या सुविधेद्वारे तक्रार वा सूचना करण्याची सेवा उपलब्ध आहे.

७. महानगरपालिकेच्या विविध ऑनलाईन सेवा-सुविधांशी संबंधीत अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध.

८. महानगरपालिकेशी संबंधीत विविध शुल्क, आकार इत्यादींचा भरणा करण्यासाठी युपीआय आधारित ऑनलाईन सेवा उपलब्ध.

९. महानगरपालिकेशी व महानगरपालिका क्षेत्राशी संबंधीत विविध घडामोडींची अद्ययावत माहिती उपलब्ध.

१०. महानगरपालिकेच्या विविध सेवा-सुविधांशी संबंधीत प्रमाणपत्रे, परवानग्या इत्यादी विषयीची माहिती.

११. ही सुविधा दिवसाचे चोवीसही तास व आठवड्याचे सातही दिवस (24 x 7) पद्धतीने व भ्रमणध्वनी ऍपद्वारे सहजपणे उपलब्ध होणार असल्याने नागरिकांना घरबसल्या व अत्यंत सहजपणे माहिती उपलब्ध होणार आहे.

१२. या सुविधेसाठी कोणत्याही प्रकारची नोंदणी आवश्यक नसून केवळ व्हॉट्सअपद्वारे ८९९९-२२-८९९९ या क्रमांकावर एक संदेश पाठवून या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

0000



 

 वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील मुलीच्या गर्भपात प्रकरणी

दोषींवर कडक कारवाई व्हावी

· उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून निवेदन

            मुंबई, दि. १४ : वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याप्रकरणी तक्रारीवरून पोलिसांकडून संबंधित डॉक्टर व आरोपींना अटक करण्यात आली आहे. घटनेच्या अनुषंगाने शहानिशा करुन गृहमंत्री तसेच गृह राज्यमंत्री यांना पत्राद्वारे या घटनेबद्दल माहिती दिली, असल्याचे उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सांगितले आहे.

             या प्रकरणात आर्वी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणातील मदत करणारे, त्यांचे साथीदार यांचा शोध घेवून त्यांना त्वरीत अटक करण्यात यावी. कायदेशीर गर्भपात करण्यासंदर्भात जिल्हास्तरीय समिती असते. या समितीची बैठक प्रत्यक्ष किंवा दूरदृश्य प्रणालीमार्फत नियमित होणे गरजेचे आहे.महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, पंचायत अख्यात्यारित येणाऱ्या सर्व खासगी रुग्णालयातील ‘जैव वैद्यकीय कचरा’ किती होतो, किती प्रमाणात गोळा केला जातो याबाबतचा तपशील, अहवाल सर्व हॉस्पिटल यांनी संबंधित प्रशासनाला द्यावा. पिडितेला मनोधैर्य योजनेतून तात्काळ मदत मिळवून देण्यात यावी, अशा मागण्या उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी निवेदनाद्वारे केल्या आहेत.

0000



 *संक्रांत*


*आजपासून 261 वर्षांपूर्वी हरयाणातील पानिपतावर लाख सव्वालाख माणसं उपाशी बसलेली होती.* 

*महिन्याभरापासून त्यांची आबाळ सुरू होती. खायला पुरेसं अन्न नव्हतं की थंडीत ल्यायला पुरेसे कपडे नव्हते. तरीही अशा ह्या अर्धपोटी लोकांनी दुसऱ्या दिवशी सकाळीच एका प्रखर लढाईला सुरवात केली. त्यांच्या समोर उभ्या ठाकलेल्या एका बलाढ्य शत्रूवर त्यांनी प्राणपणाने हल्ला चढवला.*

*कोण होती ही लोकं ?*

*त्यांना मराठे म्हणायचे,*

*मराठे, अनेक जातीचे मराठे होते त्यांच्यात. पाटील होते, देशमुख होते, चित्पावन होते, धनगर होते, देशस्थ, कऱ्हाडे, कुणबी,  महार, माळी, तेली, कोळी, वंजारी सगळे होते.  त्यांनाही मराठेच म्हणायचे. त्या संक्रांतीला महाराष्ट्र एकजूट होऊन मराठा म्हणून लढला. बरोबर मध्यप्रांतालाही घेतलं. बुरंडी घाटावर पडलेल्या दत्ताजी शिंद्याचा अपमान पुण्यात बसलेल्या नानासाहेब पेशव्याच्या मनाला झोम्बला. पेशव्याच्या नैतृत्वाखाली लढायला मल्हारबा होळकरांना वाईट वाटलं नाही. जरीपटक्याखाली जमलेल्या सैन्यात जाती पाळल्या जात नसतीलच असं नाही पण तरी त्या सैन्यात जातींच्या भिंती नव्हत्या.*

*आयुष्य फार साधं आणि सरळ होतं. युद्ध करणे हा पोटापाण्याचा व्यवसाय होता, त्याला अजून अस्मितेची भरजरी किनार लाभली नव्हती.*

*14 जानेवारी 1761 च्या संध्याकाळी ज्यांची कत्तल झाली, ती मराठे म्हणून झाली. जे कैदी पकडून नेले गेले, त्यांना आजही मराठा बुगती आणि मराठा मारी म्हणतात. त्यांच्या जाती विरघळून गेल्यात, इतकंच काय धर्मही विरघळून गेलाय पण मराठा ही ओळख अजूनही कायम आहे.*

*पानपतच्या युद्धाला Third battle of Panipat म्हणतात, ती एक लढाई होती जी मराठे हरले. पण मराठे युद्ध मात्र जिंकले. अब्दालीने या लढाईचा इतका धसका घेतला की तो परत कधीच भारतात आला नाही. अफगाण सैन्याच इतकं नुकसान झालं की त्यांना भारतात राज्य करणे हा फायद्याचा व्यवहार वाटलाच नाही.*

*पानिपतानंतर अवघ्या दहा पंधरा  वर्षात महादजी शिंद्यांनी नजीबखानाची कबर खोदून काढली. दिल्लीत पुन्हा मराठयांच्या शिक्याने बादशहा राज्य करू लागला. पानिपतानंतर कमीत कमी 30 35 वर्ष, मराठे मराठे म्हणूनच लढले.*

*कोणतेही युद्ध हे खरेतर फसलेले राजकारण असते. युद्ध म्हणजे आपापल्या हितासाठी झगडणाऱ्या दोन विचारांचा संघर्ष. "मराठा" हा एक  विचार होता, छत्रपतींनी दिलेला. ह्या विचारातूनच महाराष्ट्र घडला. अब्दालीलाही अफगाण राष्ट्राचे जनक मानले जाते. वंश आणि धर्म यांच्या अतिरेकी अस्मितेच्या आहारी गेलेल्या अफगाण राष्ट्राचे काय झाले ते आपल्या समोर आहे, मग त्याच दगडावर आपण पुन्हा पाय का मारून घेतोय ?*

*आज महाराष्ट्रात विचित्र परिस्थिती आहे, राष्ट्र म्हणून आपण अफगाणंच्या प्रचंड पुढे निघून गेलोय, पण दुर्दैवाने आपण आपली मराठा ही ओळख विसरून जातोय.  जर आपण आपली ओळख, एका अजून मोठ्या संकल्पनेत विसर्जित करत असू तर ती ओळख विसरायलाही हरकत नाही, पण गंगा उलटी वाहायला लागलीय. आज आपण ब्राम्हण, मराठे, दलित आणि अजून फलाने ढिकाने होण्यात आपली अस्मिता शोधतोय.*

*या संक्रांतीला जेंव्हा आपण एकमेकांना तिळगुळ देऊ, गोड गोड बोला असं म्हणू, तेंव्हा 258 वर्षांपूर्वी त्या थंड मैदानावर खंदकात काकडून बसलेल्या, आणि दुसऱ्या दिवशी रक्ताळून तिथेच धारातीर्थी पडलेल्या तुमच्या नि माझ्या पूर्वजाची आठवण नक्की ठेवा. तो तिथे मराठा म्हणून गेला होता आणि मराठा म्हणूनच मेला होता.*

*आपल्यातील वाढत चाललेली दरी त्याच्या रक्तानेही भरली, तरी त्याला आनंदच होईल.*

Featured post

Lakshvedhi