Friday, 30 December 2022

पिंपरी चिंचवड शहरातील समस्यांबाबत लोकप्रतिनिधींसमवेत बैठक घेणार

 पिंपरी चिंचवड शहरातील समस्यांबाबत लोकप्रतिनिधींसमवेत बैठक घेणार


- मंत्री उदय सामंत.

            नागपूर, दि. २९ : पिंपरी चिंचवड शहरात नव्याने निर्माण होणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना पाणीपुरवठा, पार्किंग व्यवस्था, मैला शुद्धीकरण प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन, वाहतूक, सीसीटीव्ही, बांधकाम परवानगी इत्यादी मुलभूत सुविधांबाबत महानगरपालिकेकडे मागणी होत आहे. त्याअनुषंगाने सर्व लोकप्रतिनिधीसह नगरविकास विभागातील अधिकारी, परिवहन विभागाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्यात येईल, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली.


            याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य महेश लांडे यांनी उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना श्री. सामंत बोलत होते.


            मंत्री श्री. सामंत म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहरात आयटी क्षेत्र तसेच औद्योगिक आस्थापनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने पिंपरी चिंचवड शहरामध्ये रहिवासी लोकसंख्येमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे महानगरपालिका क्षेत्रात रहिवासी इमारतीच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात सध्या दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. तथापि, आंध्रा धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी १०० दशलक्ष लिटर प्रतीदिन इतका साठा मंजूर असून निघोज बंधाऱ्यातून पाणी उचलण्यात येणार आहे. या पाणीपुरवठा योजनेची सर्व कामे पूर्ण झाली असून लवकरच पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे.


            ते म्हणाले, महानगरपालिका क्षेत्रात घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ अन्वये मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या (१०० किलो पेक्षा जास्त) गृहनिर्माण संस्थानी ओल्या कचऱ्यावर गृहनिर्माण संस्थेच्या आवारातच प्रक्रिया करणे आवश्यक आहे. एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०२० मधील नियम १३.४ नुसार चार हजार चौ.मी. पेक्षा जास्त बांधकाम क्षेत्रासाठी OWC बंधनकारक असल्याने त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.


            या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत विरोधी पक्षनेते अजित पवार, राहुल कुल यांनी सहभाग घेतला.


0000

उपमुख्यमंत्री महोदयांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे :

 उपमुख्यमंत्री महोदयांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे :


• अमरावतीच्या टेक्स्टाईल पार्क मध्ये आता मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत. या पार्कला विस्तारासाठी नवीन ठिकाणी जागा देण्यात येईल. नवीन एकात्मिक टेक्सटाईल पार्क आणणार.


• दूध व्यवसायाला चालना दिली. मदर डेअरी प्रकल्प सुरू केला. त्यामुळे दूध संकलनात वाढ. तीन वर्षात दोन लाख 10 हजार लीटर संकलन. शेतकऱ्यांना दुधाला 48 रुपयांचा भाव.


• मराठवाडा - विदर्भात मोठ्या प्रमाणात वीज सवलत दिली. नवीन धोरण तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. महावितरण वीज बील थकबाकी कमी करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. गेल्या सहा महिन्यात 49 हजार कोटी पर्यंत वसुली केली आहे.


• भूमीधारी शेतकऱ्यांना भूमीस्वामी करण्याचा निर्णय घेतला. नजराणा न घेता वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक केल्या. 8588 गावातील क्षेत्राला त्याचा लाभ झाला.


• अनुशेष टाळण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. सेवाग्राम विकास आराखडा तयार करत आहोत. त्या माध्यमातून विकासाला वेग मिळेल.


• पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत. अर्थसंकल्पाची पद्धत बदलली. आता मूळ अर्थसंकल्पाच्या तुलनेत पुरवणी मागण्यांचे प्रमाण केवळ 14 टक्के एवढे आहे. यात आपण कृषी उद्योग, यंत्रमाग यांना अनुदान, नैसर्गिक आपत्ती, रस्ते विकास यासह वेतन आणि पेन्शन वरील निधीसाठीची तरतूद करत आहोत.


• भांडवली गुंतवणूक वाढवत आहोत.


• विदर्भातील जिल्हा बँकांच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न.


• शेतकऱ्यांना कर्जासाठी सिबील लागू नाही. तसे कोणी केले तर कारवाई केली जाईल.


• गेल्या तीन वर्षाच्या तुलनेत यावर्षी सर्वाधिक भांडवली खर्च आपण करू.


• ओबीसी विद्यार्थ्यांसाठी किमान पाच तरी वसतिगृहे सुरू व्हावीत यासाठी आवश्यक ती कार्यवाही करू. केंद्र सरकारच्या विविध योजना राबविणार.


• ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना राबविण्यात येईल. ज्यांना वसतिगृह मिळाले नाही त्यांच्यासाठी ही योजना असेल. निवास, भोजनासाठी त्यांना हे अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.


• महा ज्योतीच्या माध्यमातून पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना 35 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. आदिवासी विद्यार्थ्यांनाही अशाच प्रकारची सवलत उपलब्ध करून देणार.


• उच्च शिक्षणासाठी निश्चित मदत केली जाईल.


• केंद्र शासनाने RRDS योजनेच्या 49602 कोटी रुपयांच्या संपूर्ण योजनेला मान्यता दिली आहे. त्यामुळे वीज वाहिनी पृथ्थकरण, फिडर आणि इतर बाबींचा समावेश आहे.


• विदर्भासाठी 9842 कोटींची कामे प्रस्तावित. त्याचा लाभ येत्या काळात होईल. महापारेषनच्या माध्यमातून 4405 कोटी रुपये निधी देऊन 25 नवीन उपकेंद्रे आणि उच्च दाब वाहिन्यांची निर्मिती. 1980 मेगावॉटचे तीन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. 15625 रुपयांची गुंतवणूक याठिकाणी होईल.


• सौर कृषी वाहिनी योजनेत कृषी फिडर सोलरवर आणणार. चार वर्षात सगळे फिडर सोलरवर आणण्याचा प्रयत्न करणार. ज्याठिकाणी सरकारी जागा नसेल तिथे खाजगी जमिनी भाडेतत्त्वावर घेऊन अशी कार्यवाही करणार.


• विविध प्रकल्पांना गतिशीलता देण्याचा प्रयत्न. त्यातील महत्वाचा तापी मेगा रिचार्ज प्रकल्प हा विदर्भ आणि खानदेश साठी महत्वाचा आहे. हा आंतरराज्य प्रकल्प असल्याने केंद्र सरकारची मदत घेणार.


• मिहानच्या माध्यमातून अनेक मोठे उद्योग येथे आले आहेत. त्यात 35 हजार थेट आणि 49 हजाराहून अधिक रोजगार अप्रत्यक्षपणे निर्माण झाला आहे.


• राज्यातील गड किल्ले, ऐतिहासिक स्मारक, संरक्षित स्मारक यांच्या विकासासाठी सन 2023-24 पासून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तीन टक्के निधी देण्याचा निर्णय.


• छत्रपती संभाजी महाराज यांच्या तुळापूर आणि वढू येथील स्मारकासाठी निधी कमी पडू दिला जाणा

मुंबई शहरातील प्रदूषण नियंत्रणासाठी १४ ठिकाणी हवा तपासणी केंद्र

 मुंबई शहरातील प्रदूषण नियंत्रणासाठी १४ ठिकाणी हवा तपासणी केंद्र

- मंत्री दीपक केसरकर.

            नागपूर, दि. २९ : मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता सुधारली पाहिजे व मुंबईकरांना स्वच्छ हवा मिळाली पाहिजे ही शासनाची भूमिका आहे. यासाठी मुंबईत १४ ठिकाणी हवा तपासणी केंद्रे उभारण्यात आली असून त्यातील तीन तपासणी केंद्रे कार्यान्वित होण्याच्या मार्गावर आहेत. याबाबत आराखडा तयार करण्यात आला असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता वेळोवेळी तपासण्यात येते, अशी माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत दिली.


            मुंबई शहरातील हवेचा दर्जा अतिशय वाईट असल्याची केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोंद केल्या बाबत लक्षवेधी सूचना सदस्य अतुल भातकळकर यांनी उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना मंत्री श्री. केसरकर बोलत होते.


            मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, मुंबईतील हवेचे प्रदूषण कमी झाले पाहिजे. यावर तोडगा काढण्यासाठी 15 दिवसात सर्व लोकप्रतिनिधींसमवेत बैठक घेऊन त्यांच्या सूचना व हरकती यांचा विचार करून त्याबाबत निर्णय घेण्यात येईल. मुंबई वायू प्रदूषण नियंत्रण कृती आराखड्यातील मार्गदर्शक सुचनांनुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी सौर उर्जेचे विविध स्रोत तयार करणे, इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणे, वाहतूक सिग्नलमध्ये सुसूत्रता आणणे, स्मशानभूमीत पाईप्ड नॅचरल गॅसचा (PNG) वापर करणे, स्वयंचलित वातावरणीय वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्रे (CAAQMS) प्रस्थापित करणे, कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्पाची स्थापना करणे, रस्त्यांची साफसफाई करण्याकरीता यांत्रिक झाडूचा वापर करणे तसेच मियावाकी संकल्पनेवर आधारीत जैव विविधतेच्या दृष्टिने उद्याने विकसित करणे इत्यादी उपाययोजनांवर भर देण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत हवेतील प्रदूषण कमी करण्याकरिता पाच वाहतूक नाक्यांजवळ धुळ क्षमन संयंत्रे बसविण्याकरिता निविदा मागविण्यात आल्या असून पुढील कार्यवाही सुरू आहे.


            हवा प्रदूषण नियंत्रण करण्याकरिता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत हवेची गुणवत्ता चाचणी, पर्यावरण दक्षता केंद्राची स्थापना, वाहतूक कोंडीच्या ठिकाणी वायु संयंत्रणेची उभारणी, हवा प्रदूषण कमी करण्यासंदर्भात सर्व संबंधितांना निर्देश देणे, इ. कार्यवाही करण्यात येते. हिवाळ्यात हवेच्या कमी तापमानामुळे व वेगवान वाऱ्याच्या अभावाने जमिनीलगतची प्रदूषके ही उंचीवरील हवेत मिसळण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे सततच्या तयार होणाऱ्या प्रदूषकांचा निचरा न झाल्याने हवेतील त्याचे प्रमाण वाढत जाते. शहरीकरणामुळे मुंबईतील बहुतांशी उद्योग नजिकच्या ठाणे व रायगड जिल्ह्यात स्थलांतरीत झाले आहेत. मुंबईतील जागेच्या वाढत्या किंमती व औद्योगिक प्रक्रियेतील रसायनांचा वापर इ. बाबींमुळे बहुतांशी उद्योजकांनी त्यांचे उद्योग मुंबई परिसरात बंद करुन पर्याप्त जागी स्थलांतरीत करण्यात आले आहेत. आक्टोबर २०२२ मध्ये करण्यात आलेल्या वायु सर्वेक्षणाच्या अहवालानुसार तरंगणाऱ्या धुलिकनांची संख्या वाढल्याने हवेची गुणवत्ता खराब होते. हवेतील हे धूलिकन खाली राहावे यासाठी नवीन यंत्रणेचा प्रायोगिक तत्वावर वापर करणार असल्याचे मंत्री श्री.केसरकर यांनी सांगितले.


             यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री आदित्य ठाकरे, योगेश सागर यांनी सहभाग घेतला.


00000



नागपूर आयटीआयमधील एव्हीएशन अभ्यासक्रमाला

 नागपूर आयटीआयमधील एव्हीएशन अभ्यासक्रमाला

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची भेट


नाशिक, पुणे आयटीआयमध्येही एव्हिएशन अभ्यासक्रम सुरु करण्याच्या सूचना

आयटीआय विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीसोबतच जर्मन, फ्रेंच, जपानी भाषेचे प्रशिक्षण

नागपूर, दि. २९ : राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला (आयटीआय) भेट देऊन त्याची पाहणी केली. द सॉल्ट एव्हिएशन व कौशल्य विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने येथे सुरू असलेल्या एरॉनॉटिकल स्ट्रक्चर अॅण्ड इक्युपमेन्ट फिटर या व्यवसायाला त्यांनी भेट दिली. फ्रान्स येथील प्रशिक्षक तसेच आयटीआय विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांनी बदलत्या काळाला अनुषंगिक असलेला हा अनोखा अभ्यासक्रम आयटीआयमध्ये सुरु करण्यात आल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. सध्या एव्हिएशन क्षेत्रात प्रचंड रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याने हा अभ्यासक्रम नाशिक व पुणे येथेही सुरु करण्याबाबत मंत्री श्री. लोढा यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.


मंत्री श्री. लोढा म्हणाले की, एव्हिएशन क्षेत्रात अल्पमुदतीचे अभ्यासक्रम जास्तीत-जास्त राबविण्याबाबत व त्यातून रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पाऊले उचलणे आवश्यक आहे. त्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असे अल्प मुदतीचे अभ्यासक्रम संपूर्ण राज्यातील आयटीआयमध्ये सुरू करावेत, जेणेकरुन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्थानिक रोजगार मिळाल्यास त्यांना शहरामध्ये रोजगारासाठी येण्याची गरज भासणार नाही. त्याद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सशक्त भारताचे स्वप्न साकार होईल, असेही श्री. लोढा म्हणाले.

इंग्रजीसोबतच जर्मन, फ्रेंच, जपानी भाषेचे प्रशिक्षण

देशाबाहेरील रोजगाराच्या संधी मिळण्यासाठी

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर, शिक्षक मतदार संघ द्वैवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर

 महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर,शिक्षक मतदार संघ द्वैवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर


            मुंबई, दि. 29 : भारत निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्र विधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघ आणि तीन शिक्षक मतदारसंघ अशा एकूण पाच मतदार संघांसाठी द्वैवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. नाशिक व अमरावती विभाग पदवीधर तसेच कोकण, औरंगाबाद आणि नागपूर विभाग शिक्षक मतदार संघासाठी 30 जानेवारी 2023 रोजी निवडणुक होणार आहे. आजपासून या निवडणूकीची आचारसंहिता संबंधित पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात लागू करण्यात आली आहे.


निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे :


 


             गुरुवार दि. 5 जानेवारी 2023 रोजी या निवडणूकीची अधिसूचना जारी करण्यात येईल. गुरुवार दि. 12 जानेवारी 2023 ही नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख असेल. शुक्रवार दि. 13 जानेवारी 2023 रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी होईल्, सोमवार दि. 16 जानेवारी 2023 ही नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अतिम तारीख असेल. सोमवार दि. 30 जानेवारी 2023 रोजी सकाळी 08:00 ते दुपारी 04:00 वाजेपर्यंत मतदान होणार असून गुरुवार दि. 2 फेब्रुवारी 2023 रोजी मतमोजणी होईल.


            सर्वश्री डॉ. सुधीर तांबे (नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ), डॉ. रणजित पाटील (अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ), श्री.विक्रम काळे (औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ), श्री.नागोराव गाणार (नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ), श्री. बाळाराम पाटील (कोकण विभाग शिक्षक मतदार संघ) हे विधानपरिषद सदस्य 7 फेब्रुवारी 2023 रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे रिक्त होणाऱ्या या पाच जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.

विदर्भ, मराठवाड्यासह उर्वरित मागास भागाचा राज्य शासन विकास करणार

 विदर्भ, मराठवाड्यासह उर्वरित मागास भागाचा राज्य शासन विकास करणार


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानपरिषदेत ग्वाही.

            नागपूर, दि. २९ : विदर्भ, मराठवाड्यासह उर्वरित मागास भागाचा विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. या भागातील उद्योगांचा अनुशेष दूर करण्यासाठी एक स्वतंत्र समिती नेमण्यात येणार आहे. तसेच विशेष वीज पॅकेज आणि नवीन वस्त्रोद्योग धोरणाच्या माध्यमातून विदर्भाच्या विकासाला चालना देण्यात येईल. या भागाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही देत, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाप्रमाणे नागपूर ते गोवा नवा इकॉनॉमिक कॉरिडॉर करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत केली.


            विधानपरिषदेत विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी उपस्थित केलेल्या २९३ अन्वये प्रस्तावाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी विदर्भातील 11 सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता, समतोल प्रादेशिक विकासासाठी नवीन समिती, वैधानिक विकास महामंडळांचे पुनरूज्जीवन, क्रांतीसिंह नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी अशा विविध घोषणा केल्या. यासोबतच कृषी, जलसंपदा, उद्योग, वस्त्रोद्योग, पर्यटन अशा विविध क्षेत्रात भरीव तरतूद करण्यात येत असल्याचे श्री. फडणवीस यांनी जाहीर केले.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, 1953 मध्ये नागपूर करार झाला आणि दरवर्षी नागपूरला एक अधिवेशन होईल असे ठरले. केवळ नागपूर शहराला नाही तर संपूर्ण विदर्भाला एक दिलासा मिळावा, येथील जनतेच्या प्रश्नांवर चर्चा व्हावी, त्यांच्या समस्या सुटाव्यात यासाठी हे अधिवेशन भरविण्याचे ठरले. विदर्भाला मुंबई जवळ करण्यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग सुरु करण्यात आला असून हा महामार्ग विदर्भ आणि मराठवाड्यासाठी जीवनवाहिनी ठरणार आहे. या महामार्गामुळे पुढील चार वर्षात विदर्भाचा कायापालट झालेला दिसेल. हा इकॉनॉमिक कॉरिडॉर असून यामुळे विदर्भ व मराठवाड्याचा विकास होणार आहे. या महामार्गाच्या माध्यमातून 50 हजार कोटी रूपये उभे करण्याची रचना तयार केली आहे. राज्यातील सर्व घटकांना दिलासा देण्यासाठी केवळ सहा महिन्यामध्ये 70 हजार कोटींची औद्योगिक गुंतवणूक राज्यात आली आहे. यापैकी 44 हजार कोटी हे विदर्भ आणि नक्षल भागात गुंतवणूक आली.


वैधानिक विकास महामंडळांचे पुनरूज्जीवन


            राज्य सरकारने विदर्भ-मराठवाड्यासाठी सहा महिन्यात अनेक मोठे निर्णय घेतले. मागील काळात बंद केलेल्या विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरीत महाराष्ट्र हे तीनही वैधानिक महामंडळे सुरू करून त्यांचे पुनर्गठन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून राज्यपालांकडे शिफारस केली आहे. राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. 


अमरावतीत नवीन एमआयडीसी, पीएम-मित्र अंतर्गत वस्त्रोद्योग पार्क


            अमरावतीमध्ये मागच्या काळात मोठे वस्त्रोद्योग उभे केले. वस्त्रोद्योग झोन केल्यामुळे विविध नामांकित कंपन्यांनी मिल सुरू केल्या आहेत. याठिकाणी जागा कमी पडत असल्याने नवीन एमआयडीसी तयार करीत आहोत. तसेच पीएम मित्र अंतर्गत नवीन वस्त्रोद्योग पार्क उभारण्यासाठी केंद्र सरकारची मंजुरी मिळणार आहे.


‘कापूस ते कापड’ या तत्वावर नवीन वस्त्रोद्योग धोरण


            वस्त्रोद्योग वाढीसाठी ‘कापूस ते कापड’ या तत्वावर राज्याचे नवीन वस्त्रोद्योग धोरण तयार करणार आहे. या धोरणांतर्गत वीज दरामुळे बंद पडलेल्या राज्यातील सूतगिरण्यांना वीज दरात सवलत देण्यासाठी विशेष वीज पॅकेज देण्यात येणार आहे. या नव्या धोरणात रोजगार निर्मिती, राज्यातील कापसावर राज्यातच प्रक्रिया हे तत्व अंमलात आणले जातील. तसेच वस्त्रोद्योगात सौर ऊर्जेच्या वापरावर भर देण्यात येईल.


वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प गेम चेंजर ठरणार


            वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प हा विदर्भ, मराठवाड्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. या प्रकल्पाला 83 हजार 468 कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. पुढील तीन महिन्यात सर्व परवानग्या घेण्याचा प्रयत्न राज्य शासन करणार असून त्यानंतर निविदा काढणार आहे. हा नदीजोड प्रकल्पांतर्गत 469 किमीचा बोगदा तयार करून बुलढाणा-हिंगोलीपर्यंत पाणी पोहोचविणार आहे, असेही त्यांनी सांगितले.


नवे खनिज धोरण आणणार


            विदर्भासाठी नवीन खनिज धोरण आणणार असून यामधील खनिज प्रकल्पांना वीज सवलत देण्यात येणार आहे. या माध्यमातून खनिज उद्योगांना चालना मिळेल. राज्यातील 70 टक्के खनिज संपत्ती विदर्भात आहे. विशेषतः गडचिरोली जिल्ह्यामध्ये देशातील सर्वोत्तम लोह खनिजाचा साठा मुबलक प्रमाणात आहे. सुरजागड लोह प्रकल्पासोबत 18 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक होणार आहे. जूनमध्ये पहिला लोह उद्योग सुरू होईल. यामध्ये स्थानिकांना रोजगार देण्यात येणार असून याबाबतचा सामंजस्य करार लवकरच करणार आहे. पाच जिल्ह्यामध्ये मोठी अर्थ व्यवस्था निर्माण होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.


नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी


            शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा पहिला टप्पा यशस्वी ठरला. त्यासाठी जागतिक बँकेने चार हजार कोटी रूपये दिले असून आता दुसऱ्या टप्प्याला मंजुरी दिली आहे. त्यासाठी जागतिक बँक सहा हजार कोटी रूपये देणार आहे. या योजनेंतर्गत 5220 गावात ही योजना राबविली जाणार आहे.


सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी केंद्राकडून 25 हजार कोटींची मदत


            विदर्भ आणि मराठवाड्यातील सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत राज्याला 25 हजार कोटी रूपयांची मदत मिळत आहे. बळीराजा कृषी संजीवनी योजनेंतर्गत राज्यातील 91 सिंचन प्रकल्पांसाठी 100 टक्के अनुदान मिळणार आहे. यातून 40502 हेक्टर जमिनीची सिंचन क्षमता वाढणार आहे. हे प्रकल्प 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येतील, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.


मिहानमध्ये नवीन विमानतळ लवकरच


            मिहानमध्ये 75 कंपन्यांना जमीन देण्यात आली. यामध्ये 25 कंपन्यांचे काम सुरू आहे. यातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष 80 हजार जणांना रोजगार मिळाला आहे. समृद्धी महामार्गामुळे मिहान प्रकल्पाला चालना मिळेल. मिहान विमानतळाचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असून हे प्रकरण अंतिम टप्प्यात आहे. मिहानमध्ये लवकरच दोन लेनचे कार्गो नवीन विमानतळ सुरू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील मुद्दे :


•सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी 755 कोटी रुपये निधी वितरित


•अमरावती, नागपूर पुणे विभागातील १४ जिल्ह्यांतील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना २२२ कोटी ३२ लाख रुपये वितरित.


•सोयाबीनवर शंखी गोगलगाईमुळे ५ जिल्ह्यात ७३ हजार हेक्टर क्षेत्र बाधित. ९८.५८ कोटी इतका निधी.


•भंडारा जिल्ह्यातील सुरेवाडा उपसा सिंचन योजनेस गती देण्यासाठी ३३६ कोटी २२ लाख सुधारित खर्चास मान्यता.


•बुलडाणा जिल्ह्यातील अरकचेरी आणि आलेवाडी बृहत लघु पाटबंधारे प्रकल्पांना सुधारित मान्यता, यामुळे सुमारे 1918 हेक्टर जमिनीला सिंचनाचा फायदा होईल.


•लोणार सरोवराच्या पर्यटनाच्यादृष्टीने विकास करण्यासाठी ३६९ कोटी ७८ लाख रुपयांच्या विकास आराखड्यास मंजुरी.


•राज्यातील जैवविविधता प्रशिक्षण केंद्र चंद्रपूर येथे सुरु करण्यात येणार विदर्भाचं म्हणून एक वेगळेपण आहे. खनिज, उर्जा, पाणी, वन, शेती ही विदर्भाची बलस्थानं आहेत. येणाऱ्या काळात उद्योग आणि पर्यटन क्षेत्रात विदर्भात क्रांती झालेली आपण पाहाल, आणि याची सुरुवात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून झाली आहे.


•विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी कापूस आणि सोयाबीन यांच्या व्हॅल्यु चेन्स (मुल्य साखळी) विकसित करण्यात येतील.


•कापूस आणि सोयाबीन व्हॅल्यु चेन्स विकसित करण्यासाठी तीन हजार कोटी रुपयांपर्यंत भरीव अशी वाढीव तरतूद करण्यात येईल. ही योजना 2025 पर्यंत राबवण्यात येईल. 


•अतिवृष्टीमुळे अमरावती जिल्हयात 72 हजार 469 हेक्टर संत्र्यांचे नुकसान झाले असून, नुकसान भरपाई म्हणून 562 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. संत्र्यावरील कोळशी रोगाचा प्रादुर्भाव दूर करण्यासाठी कृषी विभाग जनजागृती करत आहे.


•प्रधानमंत्री पिक विम्याच्या बाबतीत 2 हजार 352 कोटी नुकसान भरपाई निश्चित झाली असून, त्यापैकी 2 हजार 25 कोटी रुपयांची रक्कम 45 लाख 83 हजार 883 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे.


•निती आयोगाच्या धर्तीवर आपण राज्यात 1 जानेवारी 2023 पासून मित्र – महाराष्ट्र इन्स्ट्यिट्यूशन फॅार ट्रान्सफार्मेशन या संस्थेचे काम सूरू करणार. ही एक थिंक टॅंक आहे, आणि 2047 पर्यंत राज्याचे विकासाचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी समन्वय साधेल.


•राज्याचा समतोल आणि सर्वंसमावेशक विकास होण्यासाठी मित्र संस्थेचा मोठा उपयोग होणार आहे. अर्थातच याचा फायदा देखील विदर्भातील विकासासाठी होणार आहे.


•त्याचप्रमाणे राज्याची आर्थिक सल्लागार परिषद स्थापन करण्यात येईल. ही परिषद राज्याची अर्थव्यवस्था वन ट्रीलीयन डॅालर ची बनविण्यासाठी महत्वाची भूमिका बजावेल.


•या परिषदेतर्फे विविध क्षेत्रातील महत्वाचे पॅरामीटर्स निश्चित केले जातील व धोरणही ठरवण्यात येईल. या परिषदेचे अध्यक्ष टाटा सन्सचे चेअरमन श्री. एन. चंद्रशेखरन असतील व उद्योग, ऊर्जा, बँकिंग, सामाजिक क्षेत्र, नियोजन, अभियांत्रिकी, शिक्षण, कृषी, वस्त्रोद्योग अशा विविध क्षेत्रातील मान्यवर या समितीत राहतील.


            राज्यामध्ये विविध प्रदेशातील असंतुलन शोधणे आणि समतोल प्रादेशिक विकासासाठी नव्याने समिती गठीत करण्यात येईल.


0000


गेट वे ऑफ इंडिया येथून उद्या सकाळी क्रीडा ज्योत रॅलीस प्रारंभ

 गेट वे ऑफ इंडिया येथून उद्या सकाळी क्रीडा ज्योत रॅलीस प्रारंभ

मुंबईत होणाऱ्या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा.

            मुंबई, दि. 29 : महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांना 2 जानेवारी 2023 पासून शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे येथून प्रारंभ होणार आहे. उद्या 30 डिसेंबर रोजी गेट वे ऑफ इंडिया येथून क्रीडा ज्योत रॅलीस प्रारंभ होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी दिली.


            39 क्रीडा प्रकारांमध्ये होणाऱ्या या स्पर्धा राज्यातील निवडक शहरांच्या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई शहरातील स्पर्धा आयोजनाचा आढावा बैठक जिल्हाधिकारी श्री. निवतकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. 


            या बैठकीत मुंबईत होणाऱ्या स्पर्धांसाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येईल असे सांगून खेळाडूंना उत्तम मूलभूत सोयी-सुविधा पुरविणे, आरोग्य सुविधा, तसेच स्पर्धा कालावधी दरम्यान मुंबई शहरातील वाहतूक व्यवस्थेचे संबंधित यंत्रणांमार्फत नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. 


            मुंबई शहरातील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरावर आपले क्रीडा नैपुण्य दाखवित असलेल्या खेळाडूंना स्पर्धेत अधिकाधिक संधी प्राप्त व्हावी, स्पर्धेच्या दृष्टीने खेळाडूंची तयारी व्हावी, उद्योन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, यासाठी जिल्ह्याचा वार्षिक क्रीडा आराखडा तयार करुन नियोजन करावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले.


            मुंबई शहरात दि. 4 ते 8 जानेवारी 2023 या कालावधीत इंडियन जिमखाना, डॉन बॉस्को स्कूल किंग्ज सर्कल, माटुंगा येथे बास्केटबॉल स्पर्धा होईल. दि.10 ते 14 जानेवारी या कालावधीत गिरगांव चौपाटी येथे याटिंग क्रीडास्पर्धा होईल. 


            उद्या 30 डिसेंबर रोजी गेट वे ऑफ इंडिया येथून सकाळी 7.30 वा. क्रीडा ज्योत रॅलीस प्रारंभ होणार आहे. या रॅलीमध्ये मुंबई शहर जिल्ह्यातील क्रीडा पुरस्कारप्राप्त नामांकित खेळाडू, एनसीसी कॅडेटस्, आर्मी याटिंग नोडचे क्रीडापटू, क्रीडा अधिकारी, नेहरु युवा केंद्राचे खेळाडू, विविध शाळांतील उद्योन्मुख खेळाडू अशा सुमारे 500 क्रीडापटूंचा सहभाग असेल.  


            या स्पर्धा मुंबईसह राज्यातील नाशिक, नागपूर, जळगांव, अमरावती, औरगांबाद या जिल्ह्यांमध्ये होणार आहेत. या स्पर्धांमुळे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांकरिता खेळाडूंना उत्तम कामगिरी करण्याची संधी मिळणार आहे.


            या बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी जी. बी. सुपेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी अभय चव्हाण, सर जे. जे. रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. संजय सुरासे, वैद्यकीय अधिकारी डॉ. चित्रा सर्वराज, डॉ. दिलीप गवारी, बास्केटबॉल शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त मुकुंद धस, महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेचे सचिव गोविंद मुथ्थुकुमार, महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक असोशिएशनचे उपाध्यक्ष प्रदीप गंधे, संजय शेटे, महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष जय कवळी आदी उपस्थित होते. 


000

Featured post

Lakshvedhi