Wednesday, 1 December 2021

 ग्रामीण गृहनिर्माण योजने अंतर्गत गरजूंना गुणवत्तापुर्ण घरे उपलब्ध करावीत


- कृषि मंत्री दादाजी भुसे

          मुंबई दि 1 - आपले हक्काचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. गोरगरिब गरजूंचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘ग्रामीण गृहनिर्माण योजने’ अंतर्गत सन २०२२ पर्यंत सर्वांना आवास देण्याचे शासनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे. पालघर जिल्ह्यात वाडा प्रमाणे ‘आशियाना घरकुल प्रकल्प’ स्वयंसेवी संस्थेच्या सहाय्याने राबविल्यास राज्यातच नव्हे तर देशात पालघर जिल्हा मार्गदर्शक ठरेल असे कृषी मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

          स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत महा आवास अभियान ग्रामीण २०२१-२०२२ टप्पा- २ च्या जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन मंत्रालयात करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी कृषि मंत्री तथा पालघर जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे होते. यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा, पालघरच्या जिल्हा परिषद अध्यक्ष वैदेही वाढाण, मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्यासह उपाध्यक्ष, जिल्हा परिषद सभापती, सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, प्रकल्प अधिकारी तसेच इतर कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.

          पालकमंत्री श्री भुसे म्हणाले, सर्वांसाठी घरे २०२२ या संकल्पनेअंतर्गत महा आवास ग्रामीण अभियान राबविण्यात येत आहे. गरीब गरजूंची घरांची स्वप्ने पूर्ण करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. गतवर्षी पालघर जिल्ह्यात महाआवास अभियान अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी झाली असून, टप्पा २ अंतर्गतही उत्तम कामगिरी होणे अपेक्षित आहे. जेणेकरून राज्यातच नव्हे तर देशातही पालघर जिल्हा मार्गदर्शक ठरेल असेही पालकमंत्री श्री भुसे यांनी सांगितले.

          वाडा तालुक्यात आशियाना प्रकल्पाअंतर्गत घरे बांधण्यात आली. त्याचप्रमाणे पालघर येथेही गरजूंना घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत. या गृहनिर्माण योजनेमध्ये स्वयंसेवी संस्था, सहकारी संस्था, तंत्र शिक्षण संस्था यांचा सहभाग वाढवावा जेणेकरून घरांचे उद्दिष्ट पूर्ण होण्यास सहकार्य लाभेल असेही श्री भुसे यांनी सांगितले.

          गावपातळीवर एकत्र येऊन स्थानिक प्रदेशातील साहित्य घरबांधणीसाठी वापरल्यास चांगले घर तयार होऊ शकेल. ही घरे दीर्घकाळ टिकावी अशा गुणवत्तेची असावीत. ज्या गरजूंकडे जमिन नाही अशांना पंडीत दिनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत ५० हजारांचे अनुदान देण्यात येते. या अनुदानामध्ये वाढ करण्यासंदर्भात शासनस्तरावर सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील असेही मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले. याचबरोबर बहुमजली गृहसंकुले, नवनवीन बांधकाम तंत्रज्ञान, सँड बँक वापरण्यात यावेत अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. पहिल्या टप्प्यात उत्तम कामगिरी केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. ग्रामीण अभियंत्यांचे मानधन वाढविण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. या राज्यव्यापी गृहनिर्माण मोहिमेअंतर्गत पालघर जिल्हा अव्वल ठरेल अशा प्रकारचे काम होईल असा विश्वास पालकमंत्री श्री भुसे यांनी यावेळी व्यक्त केला.

 ओमिक्रोन व्हायरसच्या पार्श्वभूमीवर


विमानतळावर आणखी कडक निर्बंध        

            मुंबई, दि. 1 : दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडलेल्या कोविडच्या नव्या विषाणू ओमिक्रोनचा संकट घोंगावत असताना आंतरराष्ट्रीय विमानतळावर निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहे.

            या नवीन विषाणूच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने अनेक देशांना ‘कोरोना संक्रमणाचा सर्वाधिक धोका असलेले देश’ (at-risk) म्हणून घोषित केले आहे. सदर विषाणूचा प्रसार महाराष्ट्रामध्ये रोखण्यासाठी राज्यात हवाई वाहतूकीच्या यासंदर्भात तातडीने अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत.

            अ - 28 नोव्हेंबर 20 21 रोजी भारत सरकारने लावलेले निर्बंध आणि त्याच्याशी संबंधित जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे किमान निर्बंध म्हणून तत्कालिक प्रभावाने अमलात येतील.

            ब - इमिग्रेशनचे डीसीपी तसेच एफ आर आर ओ यांना असे निर्देशित करण्यात आले आहे की, त्यांनी विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमानाद्वारे येणाऱ्या सर्व प्रवाशांना त्यांनी मागील पंधरा दिवसात ज्या ज्या देशांना भेट दिलेली आहे, त्यांची सविस्तर माहिती देणे बंधनकारक करावे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (एम आय ए एल) ला ही असे निर्देशित करण्यात आले आहे की, त्यांनी मागील पंधरा दिवसात हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांची माहिती सर्व एअरलाइन्सना ही द्यावी जेणेकरून या प्रवाशांच्या यात्रेसंबंधी माहितीची पडताळणी करणे सोपे होईल. प्रवाशांनी जर चुकीची माहिती दिली तर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या विविध कलमांखाली त्यांच्याविरोधात कारवाई केली जाऊ शकते.

            क - भारत सरकारने घोषित केलेल्या ‘कोरोना संक्रमणाचा सर्वाधिक धोका असलेले देश’ या राष्ट्रातून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना प्राधान्य क्रमाने वेगळा काउंटर बनवून एम आय ए एल आणि विमानतळ प्राधिकरण यांनी त्यांची पडताळणी करावी. अशा सर्व प्रवाशांना सात दिवसांकरिता संस्थात्मक विलगीकरण करणे आवश्यक असेल. त्याच प्रमाणे दुसऱ्या, चौथ्या आणि सातव्या दिवशी त्यांचे आर टी पी सी आर चाचण्याही केल्या जातील. कोणत्याही चाचणीत ते पॉझिटिव आढळल्यास त्यांना इस्पितळात दाखल करण्यात येईल आणि जर चाचण्या निगेटीव्ह आल्या तर अशा प्रवाशांना सात दिवस गृह विलगीकरणात राहावे लागेल.

            ड - धोकादायक नसलेल्या इतर देशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी आर टी पी सी आर चाचणी विमानतळावर उतरल्यावर करणे बंधनकारक असेल आणि चाचणी अहवाल निगेटिव्ह असल्यासही त्यांना 14 दिवस गृह विलगीकरणात राहावे लागेल. जर या प्रवाशांपैकी कोणी पॉझिटिव्ह असेल तर त्यांना इस्पितळात भरती केले जाईल.

            आय - कंनेक्टींग फ्लाईट असलेल्या कोणत्याही आंतरराष्ट्रीय यात्रेकरूला भारतातल्या कोणत्याही विमानतळावर जायचं असेल तर त्यांना महाराष्ट्रामध्ये विमानतळावर पहिल्यांदा आल्या आल्या आर टी पी सी आर चाचणी करावी लागेल आणि निगेटिव्ह अहवाल आल्यास त्यांना कनेक्टिंग विमानांमध्ये बसण्याची परवानगी देण्यात येईल. अशा प्रवाशांची माहिती ते ज्या ठिकाणी उतरणार असतील तिथल्या गंतव्य विमानतळाला देण्यात येईल जेणेकरून येथील विमानतळ या यात्रेकरूंसाठी वेगळी व्यवस्था करू शकतील. जर असे यात्रेकरू महाराष्ट्रामध्ये विमानतळावर कनेक्टींग फ्लाईट घेत असतील तर आंतरराष्ट्रीय विमानाने थेट उतरणाऱ्या प्रवाशांना विलगीकरणासंबंधी उल्लेखित सर्व पथ्य पाळावे लागतील.

            फ- देशांतर्गत हवाई प्रवासासाठी राज्यामध्ये प्रवास करणाऱ्या सर्व यात्रेकरूंना पूर्णपणे लसीकरण असणे आवश्यक आहे. असे नसेल तर त्यांच्याजवळ आगमनाच्या 48 तासा अगोदर चे आर टी पी सी आर अहवाल असणे बंधनकारक असेल.

            ज- इतर राज्यातून येणारे हवाई यात्रेकरूंसाठी आगमनाच्या 48 तासाच्या आतील निगेटिव आर टी पी सी आर चाचणी अहवाल असणे आवश्यक आहे, यात कोणताही अपवाद नसेल.


0000



 मतदार नोंदणीसाठी 5 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ


                           - राज्य निवडणूक आयुक्त

            मुंबई, दि. 1 (रानिआ) : भारत निवडणूक आयोगातर्फे राबविण्यात येत असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा कालावधी वाढविण्यात आला असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या दृष्टीने आता पुन्हा 5 डिसेंबर 2021 पर्यंत पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी प्राप्त झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.

            श्री. मदान यांनी सांगितले की, भारत निवडणूक आयोगातर्फे 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. त्या आधारावर 5 जानेवारी 2022 रोजी विधानसभा मतदारसंघांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्याच मतदार याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहेत. त्याबाबत विविध माध्यमातून जनजागृतीही करण्यात आली आहे; परंतु या आगामी निवडणुकांची मोठी संख्या लक्षात घेवून संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमास मुदतवाढ देण्याची मागणी राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या मार्फत भारत निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानुसार या कार्यक्रमास 5 डिसेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

            संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमास मुदतवाढ मिळाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या दृष्टीने आता पुन्हा 1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र नागरिकांना 5 डिसेंबर 2021 पर्यंत मतदार यादीत नावे नोंदविण्याची संधी प्राप्त झाली आहे. ऑनलाईन पद्धतीनेदेखील www.nvsp.in या संकेतस्थळावर नाव नोंदविणे, नावाची पडताळणी करणे किंवा नावांतील, पत्त्यांतील तपशिलांत दुरुस्त्याही करता येतील. त्यासाठी विधानसभा मतदरसंघांच्या 1 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार याद्यांतील आपल्या नावांचीही खात्री करुन घ्यावी. नाव नसल्यास ते त्वरीत नोंदवून घ्यावे; तसेच विहित पद्धतीने मृत व्यक्तींची किंवा दुबार नावेदेखील वगळावित, असे आवाहनही श्री. मदान यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी चॅटबॉट

राज्य निवडणूक आयोग आणि गपशप संस्थेने मतदार नोंदणीची सुविधा आणि त्यांसदर्भातील संपूर्ण माहिती 'महाव्होटर चॅटबॉट'या अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी http://bit.ly/mahavoter या दुव्यावर (लिंक) क्लिक करून किंवा +917669300321 या व्हॉट्सॲप क्रमांकावर hi करून माहिती मिळवू शकतो अथवा https://mahavoter.in या संकेत स्थळालाही भेट देऊ शकता.

 *वृद्धत्व श्रावणबाळाचे !!*


काही महिन्यांपूर्वी अमिताभ बच्चन व ऋषी कपूर यांचा नितांत सुंदर अभिनय असलेला "नॉट आऊट १०२" हा चित्रपट बघण्यात आला. अमिताभ १०२ वर्षांचा व त्याचा मुलगा ऋषी कपूर ७५ वर्षाचा. ऋषी कपूरला सतत आपण म्हातारे झालेलो आहोत असे वाटत असते तर अमिताभला १०२ व्या वर्षी देखील आपण तरुण आहोत व जीवन मुक्तपणे अनुभवत मजेत जगले पाहिजे असे वाटत असते. ह्या दोघांच्या विरुद्ध मानसिकतेमधून जो गोंधळ निर्माण होता त्यामुळे चित्रपट खूप मनोवेधक बनला आहे. ह्यात अमिताभ आपल्या मुलासाठी वृद्धाश्रमाचा शोध घेत असतो.

 

असाच काहीसा एक वेगळा अनुभव मला स्नेहसावलीत आला. 


एक ७५ वर्षांचे आजोबा चौकशीकरता संस्थेत आले. त्यांना माझ्याशीच बोलायचे होते. किरकोळ देहयष्टी, शरीरावर जाणवणारा मानसिक थकवा, जाड भिंगाचा चष्मा, हातात काठी असे हे आजोबा अत्यंत चिंतातूर स्वरात विचारात होते 'डॉक्टर इथे अगदी व्यवस्थित काळजी घेतली जाईल ना हो?' मी म्हणालो आजोबा अजिबात काळजी करू नका इथे तुमची उत्तमरीत्या काळजी घेतली जाईल. त्यावर ते म्हणाले "नाही नाही डॉक्टर मला माझ्यासाठी नाही तर माझ्या आईला इथे ठेवायचे आहे जिचे वय आता ९८ वर्षे आहे. आम्ही घरी दोघेच असतो १० वर्षांपूर्वी माझी बायको कर्करोगाने गेली. माझा मुलगा परदेशात असतो. मी आणि आई दोघेच घरी असतो. आई अगदी ठणठणीत आहे कुठलाही आजार नाही तिला फक्त आताशा कमी ऐकायला येते." 


मी आश्चर्यचकित होऊन विचारले अहो मग आत्ताच तुम्हाला त्यांना इथे का ठेवावे वाटत आहे?" त्याचे काय आहे डॉक्टर मला मागच्या वर्षीपासून हार्टचा त्रास होत आहे, दमही लागतो आहे. मला जर काही झाले तर तिच्याकडे कोण पाहणार? माझ्या जन्मापासून आज ७५ वर्षे आम्ही एकत्र राहत आहोत. मला आईची खूप काळजी वाटते. आजकाल माझ्याच्याने तिची सेवा करणेही होत नाही. 


त्यांचा हा अनुभव ऐकून मी खूपच आश्यर्यचकित झालो. मी सहज आजोबांना म्हणालो मग तुम्ही आणि आई एकत्रच इथे स्नेहसावलीत का नाही राहत? त्यावर त्यांचं उत्तर खूपच मनाला भिडणारं होते "अहो माझ्या आईला जी माझी सतत सोबत असण्याची सवय आहे ती मोडायची आहे. उद्या मला काही झाले तर ह्या वयात ती हे दुःख सहन करू शकणार नाही. ती जशी आज ठणठणीत आहे तशीच शेवटपर्यंत असावी अशी माझी इच्छा आहे. मलाही तिला इथे सोडताना खूप दुःख होणार आहे पण तिला माझ्याशिवाय राहण्याची पण सवय झाली पाहिजे." हे ऐकून मी अगदी सुन्न झालो. मुलांकडून आईवडिलांकडे दुर्लक्ष केल्या जात असणाऱ्या ह्या काळात एक ७५ वर्षाचा मुलगा ९८ वर्षाच्या आईच्या मनाची एवढी काळजी घेताना बघून मानवी नात्यातील घट्ट वीण आणि ती धरून ठेवताना स्वतःला विसरून, प्रसंगी त्रास सहन करून देखील दुसऱ्यांचे मन जपण्याचा अट्टाहास करणारे लोक पहिले कि चांगुलपणाच्या पराकोटीत्वाची जाणीव होते...!!🌹🌹This post written by Dr Balaji Asegaonkar. It's about his experience at snehsawali care center.

 निवासी, आश्रमशाळा सुध्दा सुरू होणार 1 डिसेंबरपासून


- बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार

          मुंबई, दि. ३० : बहुजन कल्याण विभागांतर्गत संस्थामार्फत सुरु असलेल्या राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळा, विद्यानिकेतन व ऊसतोड कामगाराच्या मुला-मुलीसाठी चालविल्या जाणाऱ्या निवासी अनिवासी आश्रमशाळांमधील ग्रामीण भागातील इयत्ता ५ वी ते १२ वीचे वर्ग व शहरी भागातील इयत्ता ८ वी ते १२ वी चे वर्ग असलेल्या आश्रमशाळा १ डिसेंबर रोजी सुरु करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत अशी माहिती बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

            राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत असल्याने शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील ग्रामीण भागात इयत्ता १ ली ते इयत्ता ४ थी व शहरी भागातील महापालिका हदीतील इयत्ता चौथीचे वर्ग असलेल्या शाळा दि.०१ डिसेंबर, २०२१ पासून सुरु करण्यास शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मान्यता दिली आहे.

            त्यास अनुसरून या विभागाच्या अंतर्गत असलेल्या राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील आश्रमशाळा तसेच (वसतीगृहासह) सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार निवासी व अनिवासी आश्रमशाळांनी, कार्यवाही करावी, अशा सूचनाही मंत्री श्री.वडेट्टीवार यांनी केल्या आहेत.

 मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या


वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत


 


            मुंबई, दि. ३० : मराठा आरक्षण आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रूपयांची मदत देण्यात आली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एकूण ३४ कुटुंबियांसाठी मदतीची रक्कम संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना वर्ग करण्यात आली आहे.


            मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून २ कोटी ६५ लाख रूपयांचा निधी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना वर्ग करण्यात आला आहे. आजवर शासनाची मदत न मिळालेल्या १९ वारसांना प्रत्येकी १० लाख तर यापूर्वी ५ लाख रूपये मिळालेल्या १५ वारसांना प्रत्येकी आणखी ५ लाख रूपये या निधीतून दिले जातील. शासनाची आर्थिक मदत मिळणाऱ्या ३४ कुटुंबियांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ६, जालना ३, बीड ११, उस्मानाबाद २, नांदेड २, लातूर ४, पुणे ३, तर अहमदनगर, सोलापूर आणि परभणी जिल्ह्यातील प्रत्येकी एका कुटुंबाचा समावेश आहे.


            या कुटुंबाना १० लाख रूपये देण्याची घोषणा मागील शासनाच्या कालावधीत करण्यात आली होती. परंतु, प्रत्यक्षात केवळ १५ कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रूपये देण्यात आले होते. मागील शासनाचे हे आश्वासन हे शासन पूर्ण करेल, या कुटुंबियांना राज्य शासनाकडून प्रत्येकी १० लाख रूपये देण्यात येतील, असा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मराठा समन्वयकांना दिला होता. त्यानुसार मराठा समाजाच्या मागणीनुसार निधी निर्गमित केल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.


००००



 डिसेंबर रोजी समाज माध्यमांवर प्रसारण

 

            मुंबई, दि. 30 : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनीदि.६ डिसेंबर २०२१ रोजी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथया चित्रपटाचे  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या व्टिटरफेसबुक तसेच युट्यूब या समाजमाध्यमांवर सकाळी 11 वाजता प्रसारण होणार आहे. सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय,भारत सरकार  आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन यांनी या चित्रपटाची निर्मिती संयुक्तरित्या केली आहे.

              स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्रीभारतीय संविधानाचे शिल्पकार,महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य विविध क्षेत्रातील अतुलनीय आहे. प्रचंड बुद्धिमत्ता असणारे डॉ.बाबासाहेब यांनी समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. समाजामधील तळागाळातील व्यक्तींचा त्यांनी प्रामुख्याने विचार केला. शिक्षणासाठी,समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष केला. ‘शिकासंघटित व्हा आणि संघर्ष करा’असा मंत्र दिला. अशा असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य समजून घेण्यासाठी  'डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथहा चित्रपट नक्की पहायला हवा.

            'डॉ.बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथया चित्रपटाचे दिग्दर्शन जब्बार पटेल यांनी केले आहे. या चित्रपटात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रमुख भुमिका अभिनेता मामूट्टी यांनी तर रमाबाई आंबेडकर यांची भूमिका सोनाली कुलकर्णी यांनी साकारली आहे. मोहन गोखलेमृणाल कुलकर्णी यांच्या देखील या चित्रपटात भूमिका आहेत. निर्मिती सहाय्य राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) यांनी केले असून पटकथालेखन सोनी तारापोरेवालाअरूण साधूदया पवार यांनी केले आहे. चित्रपटाचे संशोधन डॉ. य. दि. फडके यांनी केले. सल्लागार श्याम बेनेगल आहेतचित्रपटाची वेशभूषा भानु अथैय्यासंगीत अमर हल्दीपुरफोटोदिग्दर्शन अशोक मेहता यांचे आहे.  

                    6 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या https://twitter.com/MahaDGIPR,

https://www.facebook.com/MahaDGIPR,

https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR 

            या समाजमाध्यमांवर 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ'  हा चित्रपट नक्की पहा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने करण्यात येत आहे.

***

Featured post

Lakshvedhi