तिला काय??..ती मोकळीच आहे.!!
सख्यांनो,
तुम्ही असलं काहीतरी बऱ्याचदा ऐकलं असणार...कधी एखादी बहीण बहिणीला तर कधी एखादी नणंद वहिनीला...कधी एखादी सखी आपल्याच एखाद्या सखीला, तर कधी एखादी सासू सुनेला असं बोलत असते...कधी तुम्ही बोलू लागत असणार तर कधी ऐकत असाल...एकूणच काय तर एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीची शत्रू असते या विधानाला आपणच असं बोलून दुजोराचं देत असतो...माझ्याबद्दल किंवा इतर कुणाबद्दल असं कुणी काही बोललं तर बोलणाऱ्याचा राग यावा की त्याच्या अल्प बुद्धीची कीव करावी??...विचारशक्तीच्या पलीकडचा विचार..!!
पण मुळात आपण विचारचं का करायचा या सगळ्याचा??...
मुलं मोठी झाली, शिक्षणासाठी बाहेर पडली, मुलीचं लग्न झालं की तिला काय ती मोकळीच आहे म्हणायचं...एखादीचा नवरा अर्ध्यातून तिची साथ सोडून गेला की तिला मोकळी सुटली म्हणायचं...पोटापाण्याचा प्रश्न भागवण्यासाठी घर सोडून बाहेर पडली की मोकळी झाली म्हणायचं...नवीन सून घरात आली की आता काय मोकळी झाली म्हणायचं...एखाद्या दुःखातून, संकटातून सावरून न डगमगता खंबीरपणे उभी राहिली की तीच डोळ्यात खुपणारं सुखं बघून तिला मोकळी झाली म्हणायचं...सख्यांनो हे कितपत योग्य आहे ग??..."उचलली जीभ लावली टाळ्याला"...असं नसतं गं...प्रत्येकीचं प्रारब्ध वेगळं...प्रत्येकीचं जगणं वेगळं...!!
आणि
मोकळी म्हणजे काय ग??...चाळिशीनंतर थोडी निवांत होऊन स्वतःसाठी जगते म्हणजे ती मोकळी सुटते का??...मुळात एखादी स्त्री आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर मोकळी असते असं म्हणणंच मला मान्य नाही...आयुष्याच्या आणि वयाच्या प्रत्येक वळणावर ती वेगवेगळी जबाबदारी घेऊन जगत असते...हा, जबाबदारीचं ओझं कधी कमी जास्त असू शकतं पण ते ती कधीच झटकत नाही...तीच जगणं सगळं निभावून नेणं हे तिचं कौशल्य आहे त्याची कदर कर...तू नाही तर कोण करणार? एक स्त्री म्हणून तुझ्याइतकं कोणाला हे सगळं समजणार??...एखाद्या सखीला आपण आपल्या मनातील हेवा, मत्सर, द्वेष यापाई 'मोकळी' म्हणणाऱ्यांनी विचार करावा...बाई ग आज तू जात्यात आहेस काल ती होती...आज ती सुपात आहे उद्या तू असशील...जबाबदारीचं ओझं कमी झालं की जगशील की स्वतःसाठी...तोपर्यंत कर मोठ्या मनाने तीच कौतुक...देऊन तिला प्रेरणा वाढवं तिचं बळ...तिच्या जगण्याचा आदर कर...बघ कर प्रयत्न, नक्की जमेल 🙏🏻🙏🏻