Wednesday, 8 May 2019

झाशीच्या राणीचे माहेरघर अतिक्रमणाच्या विळख्यात

ऐतिहासिक वास्तू जतन करण्यासाठी गावकरी घेणार पुढाकार चंद्रपूरच्या इको-प्रोची महाराष्ट्र परिक्रमा पारोळ्यात
जळगाव : पारोळा किल्ला म्हणजे झाशीच्या राणीचे माहेऱ पुरातत्व खात्याने केलेल्या डागडूजीमुळे किल्ला सुस्थितीत असलातरी या भुईकोटला बाहेरच्या बाजूने अतिक्रमणाचा विळखा आहे़ येथील एका भव्य बुरुजाच्या आतील भाग झाडामुळे ढासळला आहे. सध्या या तलावाच्या काठावर अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे किल्ल्याबाहेरून खंदक दिसत नाही. आतील भागात बाटल्या व इतर प्लास्टिकचा कचरा तरंगताना दिसतात़ ही ऐतिहासिक वास्तू जतन करण्यासाठी गावक-यांनी पुढाकार घेण्याची ग्वाही इको-प्रोला दिली. ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारसा संवर्धनाच्या जनजागृतीसाठी महाराष्ट्रभर परिक्रमा करीत असलेल्या इको-प्रोच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि़ ७) जळगाव जिल्ह्यातील पारोळा भेट दिली. गावाच्या प्रारंभी झाशीची राणी लक्ष्मीबाई व शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. येथून जवळच विचखेडे नावाचे छोटेसे शहर आहे. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात पारोळा भुईकोट बांधण्यात आला. हा जळगाव जिल्ह्यातील सर्वात सुंदर व मोठा भुईकोट आहे. हा किल्ला १७२७ मध्ये जहागीरदार हरी सदाशिव दामोदर यांनी बांधला. किल्ल्याभोवती चारही बाजूला खोल खंदक आणि पूर्वेकडे विस्तीर्ण तलाव बांधला आहे. पावणेतीन शतके उलटूनही या तलावाची स्थिती चांगली आहे. सपाट मैदानावर बांधलेल्या या भुईकोट किल्ल्याची लांबी ५२५ फूट; तर रुंदी ४३५ फूट आहे. वास्तुशास्त्राचा एक सुंदर नमुना म्हणून या किल्ल्याकडे पाहिले जाते. पारोळा शहरालाही चारही बाजूंनी तटबंदी आहे. एकूण सात दरवाजे असून, दिल्ली दरवाजा हा पूर्वेकडील मुख्य दरवाजा आहे. धरणगाव दरवाजा, वंजारी दरवाजा, अमळनेर दरवाजा, पीर दरवाजा अशी अन्य प्रवेशद्वारांची नावे आहेत. जवळपास तीनशे वर्षांपूर्वी किल्ल्याची उभारणी करताना पारोळा गावाची निर्मिती झाल्याची नोंद इतिहासात आहे. या परिसरात त्या काळात पेंढाºयांची जवळपास ५० घरे होती. त्यांची ओळख म्हणून आजही या गावातील एका भागाची ओळख 'पेंढारपुरा' म्हणून आहे. सध्या किल्ल्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे खंदकावरून जाणाºया मार्गावरील मुख्य दरवाजा नवीन बसविण्यात आला आहे. किल्ल्यामध्ये दगडी बांधकामाचा मजबूत भाग आहे. त्याला बालेकिल्ला असे म्हणतात बालेकिल्ल्याला चार गोलाकार भव्य बुरूज आहेत. त्यांची उंची साधारणत: पंचवीस फूट असावी. इंग्रजांनी या ठिकाणी काही संपत्ती सापडेल, या लालसेने खोदकाम केले होते. म्हणून या बुरुजांचे आतील बाजूचे सौंदर्य नष्ट झाले आहे.


किल्ल्यामध्ये महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. त्याला सध्या रंगरंगोटी करण्यात आली आहे. येथे एका भुयाराचे तोंड आहे. हे भुयार येथून आठ किलोमीटर दूर असलेल्या नागेश्वर मंदिराजवळ निघते, असे सांगितले जाते. हे भुयार घोडेस्वार जाऊ शकेल एवढ्या उंचीचे आहे. याच भुयाराचा वापर राणी लक्ष्मीबाईने पारोळ्यातून बाहेर पडण्यासाठी केला होता, असे म्हटले जाते; परंतु त्याबद्दल अधिकृत अशी माहिती मिळत नाही. राणीच्या माहेरचे वंशच म्हणजेच तांबे घराणे आजही पारोळा गावात राहतात. स्थानिकांनी केलेल्या अतिक्रमणाने त्याचे सौंदर्य धोक्यात आले आहे. पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील यांच्या माध्यमातून किल्ल्याची जपणूक व सौंदर्यात भर टाकण्यासाठी निधी मिळविण्यात आला आहे. त्या माध्यमातून या परिसरात जॉगिंग ट्रॅक, बगिचा आणि नाट्यगृह उभारण्याचे काम सुरू आहे. दरम्यान विदर्भातून मराठवाडा मार्गे खान्देशात आलेल्या इको-प्रोच्या टीमने जळगाव भेटीनंतर मंगळवारी सकाळी पारोळा गावाला भेट दिली. अध्यक्ष बंडू धोतरे यांनी स्थानिक नागरिकांच्या भेटी घेऊन किल्ल्याची पाहणी केली. लोकसहभागातून अधिक चांगल्या पध्दतीने स्वच्छता कशी करता येईल, यावर मार्गदर्शन केले. चंद्रपूर येथील गोंडकालीन किल्ला सफाईच्या सलग ७०० दिवसांच्या उपक्रमाची माहिती दिली. ध्वनीचित्रफित बघून प्रेरीत झालेल्या स्थानिक नागरिकांनी या ऐतिहासिक किल्ल्याची निगा राखण्यासाठी सहभाग देण्यासाठी होकार दिला.

Tuesday, 7 May 2019

अक्षयतृतीयाच्या शुभेच्छा

आज अक्षय्य तृतीया आहे. या पवित्र दिवशी आपण देवघरात जे काही ठेवू ते कैक पटीने वाढत जाते असे मानलं जातं. आज सोनं चांदी ई. पेक्षा पाण्याची नितांत आवश्यकता आहे. जर पाणीच राहील नाही तर संपत्तीचा उपयोग काय
म्हणून पाण्याने भरलेला एक कलश देवघरात ठेवून मुबलक पाऊस या देशात पडू दे अशी प्रार्थना करू या !
ही माझी श्रद्धा आहे .आपण नक्कीच प्रयत्न करू शकतो . अक्षयतृतीयाच्या शुभ दिनी आपल्याला आणि आपल्या परिवाराला लक्षवेधी मास मिडीया कडून हार्दिक शुभेच्छा !!
आशा आहे या मंगलदिनी आपल्या जीवनात नवचैतन्य येवो.
येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद आणि सुख समाधान घेवून येवोत

महाभारत

पत्नी-: माझ्या सोबत माहेरी येणारच आहात तर तेथे भांडण वगैरे करु नका...
ते माझ्या वडिलांचे घर आहे...
.
.पती-: मग माझ्या बापाचं घर काय "कुरुक्षेत्र" आहे का...???
उठसूट "महाभारत" करत असतेस...???

याला जीवन ऐसे नाव

येत्या दहा-पंधरा वर्षांमधे एक आधीची पिढी हे जग सोडणार आहे. कटू असलं तरी सत्य आहे, कारण जगरहाटी कोणी थांबवू शकत नाही. या पिढीतले लोक थोडे वेगळेच आहेत.

सकाळी लवकर उठणारे, रात्री वेळेवर झोपणारे,

पाणी वाया न घालवता झाडाला घालणारे,

फुलं देवासाठी तोडणारे,

रोज पूजा करणारे,

मंदिरात एखादी फेरी मारणारे,

रस्त्यातून भेटणाऱ्याची आस्थेने चौकशी करणारे,

दोन्ही हात छातीशी नेऊन नमस्कार करणारे,

अन्न धान्य वाया जाऊ नये म्हणून बेतानेच स्वयंपाक करणारे आणि उरले तर गरीबाला देणारे किंवा दुसरे दिवशी त्याला नटवून मिटक्या मारत खाणारे,

पाहूणे-रावळ्यांची स्वतःची गैरसोय असूनही पाहूणाचार करणारे,

पर्यटनाबरोबरच तीर्थयात्रा करणेही न विसरणारे,

आपापले सण लक्षात ठेवून साधेपणे साजरे करणारे,

अमावस्या, एकादशी, अधिक महिना लक्षात ठेवणारे,

भगवंतावर श्रद्धा ठेवून काळजी त्याच्यावर सोडणारे (आणि त्यामुळे कठीण परिस्थितीतही मनःस्वास्थ्य टिकवणारे),

व्यसन करताना लाजणारे आणि समाजाच्या नजरेची भीड बाळगणारे,

जूना झालेला चष्मा, तुटला तर चिकटवून, जुनी चप्पल फाटली तर शिवून आणि जुना बनियन गलितगात्र होईपर्यंत वापरणारे,

उन्हाळ्यात पापड वाळवणारे, हात दुखेपर्यंत कुटून मसाला घरी बनवणारे,

फक्त बाहेर घालायच्या कपड्यांनाच इस्त्री करणारे,

खिशातला पैसा जपून वापरणारे आणि गरजेपुरतेच अन्न खाणारे.

असे लोक आता हळूहळू हे जग सोडून चालले आहेत. आपल्या आजूबाजूला किंवा घरात असे कोणी असतील तर त्याची चौकशी करा, काळजी घ्या. कारण ते जातील तेव्हा एक महत्वाची शिकवण त्यांचेबरोबर जाईल.

समाधानी, साधे, अर्थपूर्ण , दुसऱ्यांना प्रेरणा देणारं आणि समोरच्याची काळजी करणारं जीवन जगायचं असतं ही शिकवण जगातून नाहीशी होईल.
त्यानंतर फक्त राहील स्वार्थ, अविश्वास, चैन, असंवेदनशील मने, भकास कोडगेपणा आणि मोबाईलवरचे कृत्रीम अगत्य !!!!!

अधिसूचना

महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
फेब्रुवारी २३, २०१८/फाल्गुन ४, शके १९३९
विधी व न्याय विभाग
मादामा कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,
दिनांक : २३ फेब्रुवारी, २०१८

अधिसूचना

महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम क्रमांक बीपीटी-१११७/प्र.क्र. ३४/का-१५-महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम (१९५० चा २९) याच्या कलम ४१ अअ च्या पोट-कलम (४) च्या खंड (ब) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, आणि याबाबतीत काढलेल्या मागील सर्व अधिसूचनांचे अधिक्रमण करुन, महाराष्ट्र शासन, उक्त अधिनियमांच्या कलम ४२अअ प्रयोजनार्थ, ज्या व्यक्तीचे एकूण वार्षिक उत्पन्न हे रु. १, ६०, ०००/- (रु. एक लाख साठ हजार मात्र) रुपयांपेक्षा अधिक नसेल, अशी व्यक्ती “समाजातील दुर्बल घटकातील व्यक्ती असेल अशी मर्यादा याद्वारे विनिर्दिष्ट करीत आहे.
     महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


                                                नि.ज. जमादार
                                     शासनाचे प्रधान सचिव व विधी परामर्शी

अधिसूचना


महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
असाधारण क्रमांक ६८
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यामध्ये प्रसिध्द्‌ केलेले नियम व आदेश याव्यतिरिक्त) नियम व आदेश
विधी व न्याय विभाग
मादामा कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२, दिनांक : २३ फेब्रुवारी, २०१८

अधिसूचना

महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम क्रमांक बीपीटी-१११७/प्र.क्र. ३४/का-१५-महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम (१९५० चा २९) याच्या कलम ४१ अअ च्या पोट-कलम (४) च्या खंड (ब) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, आणि याबाबतीत काढलेल्या मागील सर्व अधिसूचनांचे अधिक्रमण करुन, महाराष्ट्र शासन, उक्त अधिनियमांच्या कलम ४२अअ प्रयोजनार्थ, ज्या व्यक्तीचे एकूण वार्षिक उत्पन्न हे ८५,०००/- (अक्षरी रु. पंच्याऐंशी हजार मात्र) रुपयांपेक्षा अधिक नसेल, अशी व्यक्ती “निर्धन व्यक्ती असेल अशी मर्यादा याद्वारे विनिर्दिष्ट करीत आहे.
     महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

                                                 नि.ज. जमादार
                                     शासनाचे प्रधान सचिव व विधी परामर्शी

आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शालांत परीक्षोत्तर गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेकरिता पालकांची उत्पन्न मर्यादा रु. ८ लाखापर्यंत


आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शालांत परीक्षोत्तर गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेकरिता पालकांची उत्पन्न मर्यादा रु. ८ लाखापर्यंत वाढविणेबाबत.

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन निर्णय कमांक : ईबीसी-२०१८/प्र.क्र. ६८/एसडी-५
मंत्रालय विस्तार भवन, मुंबई ४०० ०३२,
दिनांक : ९ जानेवारी, २०१९

वाचा :
१)   शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. एससीएच-१०९५/(८६/९५)/माशि-८, दि. १५ ऑक्टोबर, १९९६.
२)   शासन निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभाग क्र. टीईएम-२०८१/प्र.क्र. ३५/तांशि-४, दि. ३१ मार्च, २०१८
३)   शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्रमांक -शिष्यवृत्ती-२२४/१२५१/आ.मा.शि./अंमलबजवणी/३९६९, दि. ४ जून, २०१८.
प्रस्तावना :
     शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत राज्य शासन पुरस्कृत आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शालांत परीक्षोतत्तर शिष्यवृत्ती योजना सन १९७८-७९ पासून राबविण्यांत येते. शासनाच्या संदर्भाधीन अ.क्र. १ च्या दिनांक १५ ऑक्टोबर, १९९६ च्या शासन निर्णयानुसार सदर शिष्यवृत्तीस पात्र होण्याकरिता माध्यमिक शालान्त परिक्षेत (इ. १० वी) विद्यार्थ्यांची गुण मर्यादा ५० टक्के करण्यात आली आहे तसेच, योजनेचे शिष्यवृत्ती संच ३२०० करण्यांत आले आहेत. त्यानुसार एकूण ३२०० मुलांना शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो. पात्र विद्यार्थ्यांमधून जास्तीत जास्त गुण असणा­या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते. या योजनेचा लाभ घेण्याकरिता पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये ३०,०००/- आहे. सद्य:स्थितीत सदर उत्पन्न मर्यादा खूप कमी असल्याने असंख्य विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र असूनही त्यांना शिष्यवृत्ती लाभापासून वंचित रहावे लागते त्यामुळे योजनेचे उद्दीष्ट साध्य होत नाही.
     उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या दि. ३१ मार्च, २०१८ च्या शासन निर्णयान्वये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. ६ लाखावरुन रु. ८ लाख इतकी करण्यांत आली आहे.  त्याच धर्तीवर प्रस्तृत योजनेची पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा वाढविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.
शासन निर्णय :
     शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत राज्य शासन पुरस्कृत आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयच्या विद्यार्थ्यांच्या पालकांची एकत्रित वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. ३०,०००/- वरुन रु. ८,००,०००/- लाख करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
२.   या योजनेतील बदलाचा लाभ शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून लागू राहील. सदर योजनेच्या अटी व शर्ती पूर्वीप्रमाणेच राहतील.
३.   उपरोक्त योजनेच्या सुधारित उत्पन्न मर्यादेबाबत शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माघ्यमिक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षण अधिकारी यांना सूचना निर्गमित कराव्यात. तसेच पालकांना/विद्यार्थ्यांना सुधारित माहिती देण्यांत यावी जेणेकरुन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रस्तृत शिष्यवृत्तींना लाभ घेता येईल.
४.   सदर शासन निर्णय महाराष्ट्र  शासनाच्या www.maharashatra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आला असून त्याचा संकेतांक २०१९०१०९११४२३९१७२१ असा आहे.  हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यांत येत आहे.
     महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
                                           (नेहा हुमरसकर)
                                  कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

Featured post

Lakshvedhi