जिल्हास्तरीय निवडणूक यंत्रणाकडूनही मतदार जनजागृतीसाठी उपक्रम
राज्यात प्रत्येक जिल्ह्याची निवडणूक यंत्रणाही स्वीप कार्यक्रमाअंतर्गत स्वतंत्रपणे मतदार जनजागृतीचे उपक्रम राबवते आहे. घरोघरी भेटी, रांगोळ्या, मानवी साखळ्या, प्रभात फेऱ्या, पथनाट्य, सायकल - बाईक रॅली, मॅरेथॉन, मतदारांना शपथ, संकल्पपत्र, विविध स्पर्धा, सण साजरे करण्याच्या निमित्तानं मतदारजागृतीपर उपक्रम सुरु आहेत. बुलडाणा जिल्ह्यात मतदारांना मतदान प्रक्रियेची ओळख करून देण्यासाठी जिल्हा परिषद शाळांमार्फत अभिरुप मतदान केंद्रांची तालीम आयोजित करण्यात आली. यामुळे लोकांना प्रत्यक्ष मतदानाच्या प्रक्रियेचा अनुभव मिळाला.
लातूर जिल्ह्यात मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अभंग, गवळणी, भारुड, गोंधळगीत, पोवाडा अशा पारंपरिक कलाप्रकारांचा अभिनव वापर केला जातोय. तिथे १२१ शाळांच्या विद्यार्थ्यांमार्फत १ लाख ३ हजारापेक्षा जास्त पालकांपर्यंत पोहचत मतदानाचं संकल्पपत्र भरून घेण्यात आलंय. सांगलीत शासकीय रुग्णालयांच्या ओपीडी दस्तऐवजांवर, बँकांच्या व्यवहार पावत्यांवर मदानाच्या तारखेचं स्मरण करून देणारा शिक्का वापरून मतदार जनजागृती केली जातेय. जळगाव जिल्ह्यात, एकाच वेळी तब्बल १३३३ ग्रामपंचायतींमध्ये मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. सव्वा लाखापेक्षा अधिक मतदारांनी मतदानाची प्रतिज्ञा घेतली तर दोन लाखांपेक्षा अधिक मतदारांनी संकल्पपत्र भरले.
No comments:
Post a Comment