अलिबाग
शिक्षण, नोकरी, लग्न वा कोणत्याही कारणांनी कुणी कुठेही गेला तरी "Once an Alibagkar..Always an Alibagkar".
-- माधुरी घाटे
अलिबाग
नोकरी किंवा लग्नानंतर आपलं झालेलं गाव कितीही आधुनिक आणि सुखद असलं तरी प्रत्येकीला आपलं स्वतःचं माहेरचं गाव अतिशय प्रिय असतं. मग ते तळकोकणातलं खेडं असो, दुष्काळी गाव असो किंवा माझ्यासारखीला लाभलेलं नारळी-पोफळीचं, ऊबदार समुद्राचं आणि ताज्या फडफडीत माशांचं अलिबाग असो. आपलं गाव ते आपलंच.
अलिबागने मला उत्तम शिक्षण, मैत्रिणी, आप्त मंडळी आणि त्याच्या निसर्गदत्त समृद्धीचा अभिमान दिला. रोज संध्याकाळी मग अगदी कोकणातला 'खासा' पाऊस असो किंवा वार्षिक परीक्षेचा आदला दिवस असो.. समुद्रदर्शन झालंच पाहिजे. अगदी तान्ही असल्यापासून आई बाबा मला समुद्रावर नेत, जणू काही ती ओली वाळू पायाला लागली नाही तर अनर्थ ओढवेल, इतकं त्या समुद्राचं वेड !
समुद्रकिनारा लाभलेलं गाव नेहेमीच इतर गावांपेक्षा जास्त भाव खाऊन जातं. आमच्या सोयीसाठी आम्ही किनाऱ्यांचं नामकरण केलेलं. मोठ्या पायऱ्यांकडचा समुद्र, कोर्टामागचा समुद्र, वर्सोलीचा समुद्र..कुठे जाऊ आणि कुठे नको व्हायचं. भेळ खायला अनंताकडे मोठ्या पायऱ्यांजवळ, मित्रमंडळींना भेटायला ग्राऊंडचा समुद्र आणि निवांत बसून गाज ऐकायला वरसोली गाठायची. (पूर्वीची वरसोली. आताची नाही)
माझी दुसरी (अजूनही ) अतिप्रिय जागा म्हणजे मासळी बाजार. आता पुण्यात मी सर्वात जास्त हेच miss करते. तर आमच्या मासळी बाजाराचा देखावा काय वर्णावा ! चकचकीत, चमचमणारी 'सागरातली चांदी'... साऱ्या षड्रसांची नांदी ! त्या माशांचे प्रकार तरी किती सांगावे.. पापलेट, हलवा, सुरमई, बांगडे, कुर्ल्या, कोलंबी, तिसऱ्या, पाला, झिंगे, सुकट, रावस, मांदेली... अहाहा नुसती नावं घेतानाही तोंडाला पाणी सुटतंय. तर अशा नयनरम्य बाजारात, कोळणींच्या गोंगाटात, ताज्या माशांच्या सुवासात, भरपूर खरेदीने हातात जड झालेली पिशवी सावरत, टोपल्यांमधून वाट काढत अजून खाडीतली जिरेसाळ कोलंबी दिसते का पाहात फिरणं यासारखा आनंद नाही हो !
आमच्याकडे मासे वाट्यावर मिळतात. पण इथे पुण्यात चक्क किलोवर ! पुण्यात प्रथमच मासे घ्यायला गेले, वाटलं वा चला किलोभर पापलेट घेऊ ! पहाते तर काय, जेमतेम दोन तीही थंडगार बर्फातली, शिळी आणि मरगळलेली. वाटलं अरेरे कुठे येऊन पडलो आपण.. इथे त्या कोळणी नाहीत, चार कोलंब्या अजून टाक म्हंटल्यावर लटक्या रागाने जास्तीच्या कोलंब्या देणारी ती 'हसरी मावशी' नाही. माझी आई अलिबागहून माझ्याकडे पुण्याला यायला निघाली की "उद्या सकाळीच तुला म्हावरा आणते, ने पोरीसाठी, बेबीला सांग विचारलंय" म्हणणारी जिवाभावाची कोळीण पुण्यात नाही.
ताजी फडफडीत मासळी घरी आणून, ती स्वछ करून द्यायची आणि मग आईचा स्वयंपाक होत आला की माझ्या स्वयंपाकघरातल्या फेऱ्या वाढायला लागायच्या. घरात दरवळणारा तो सुवास, त्यात कोकणातल्या भाताचा परिमळ आणि पोटात ओरडणारे कावळे यांचं वर्णन करायला माझे शब्द अपुरे आहेत. माश्यांवर यथेच्छ ताव मारून, आईला मनसोक्त पावती देऊन मग कविवर्य बा. भ. बोरकरकरांची ओळ गायची..." मासळीचा सेवीत स्वाद दुणा..इतुक्या लवकर येईना मरणा..मज अनुभवू दे ह्या सुखक्षणा" !!!
अलिबागच्या आजूबाजूचा परिसरही त्याला किती समृद्ध बनवतो.थळ, नागाव, किहीम, रेवदंडा, मांडवा, मुरुड, काशीद, कनकेश्वर ! समुद्रातला कुलाबा, त्यातलं प्रशस्त आवार असलेलं गणपती मंदिर, दीपमाळ, समुद्रात असूनही किल्ल्याच्या आतली गोड्या पाण्याची विहीर, भरती ओहोटीची चढाओढ हे सारं आठवलं की मन अलिबागकडे ओढ घेऊ लागतं. सूर्यास्ताच्या वेळी ऊबदार वाळूत बसून आकाशातले रंग पाहात, दूरवर हेलकावणारी गलबतं, परतणारी पाखरं आणि ह्या साऱ्याला दृष्ट लागू नये म्हणून की काय, संधिप्रकाशामुळे काळाभोर होत जाणारा काजळासारखा रेखीव कुलाबा...हे सारं रेखाटायला एखादा दर्दी चित्रकार अक्षरशः जीव टाकेल !
पावसाळ्यात येणाऱ्या निरनिराळ्या रानटी भाज्या, अमाप आणि उत्तम प्रतीचे आंबे, कडवे वाल, कलिंगडं, तोंडल्यांचे मांडव, जांब या साऱ्याचा साज ल्यालेलं अलिबाग किती लोभस दिसतं.
लोकांच्या उत्साहाला खरं उधाण येतं ते गणपतीत. साधी आरास आणि प्रचंड उत्साह. एकमेकांचे, अनोळखी लोकांकडचे गणपती पहाताना तिथे कधी जात, धर्म, औपचारिकता आड येत नाही. किनाऱ्यावर विसर्जनाच्या दिवशी एक एक करून गणपती येत असतात. पाण्याजवळ येऊन थांबतात. शेवटची आरती होते आणि जड पावलांनी लोकं घरी परततात.
पण आता अलिबागकार आपल्याच गावात नवखा होत चाललाय. पर्यटकांची प्रचंड गर्दी, बेपर्वाई, मद्यधुंद तरुण, गाड्यांचे आवाज ह्यांचं पेव फुटलेलं असतं. वाडे, वाड्या जातातच आहेत. निरर्थक, कुरूप इमारती त्यांची जागा घेतायत. गेल्या 25-30 वर्षात मला एवढे बदल दिसतायत तर माझ्या आई बाबांनी किंवा त्यांच्या आधीच्या पिढ्यांनी किती स्थित्यंतरं पाहिली असतील.
तरीही अजूनही अलिबागमध्ये जुनी कौलारू घरं, नारळी पोफळीच्या आंब्याच्या बागा, कान्होजी आंग्र्यांची समाधी, जुनी देवळं, पुष्करण्या, तळी, हिराकोट, दगडी तुरुंग, कोर्टाची इमारत, आमच्या शाळा, कॉलेज काही मोजके व गरजेचे बदल सोडल्यास जसंच्या तसं आहे. लहानपणी धमाल केलेल्या त्या जत्रा अजूनही भरतात.
अशा समृद्ध, देखण्या पण आता बदललेल्या अलिबागला माझा जन्म झाला ह्याचा मला अभिमान आहे. ह्या अभिमानात भर टाकणारी जागतिक कीर्तीची वास्तू म्हणजे 'वेधशाळा' !
शिक्षण, नोकरी, लग्न वा कोणत्याही कारणांनी कुणी कुठेही गेला तरी "Once an Alibagkar..Always an Alibagkar".
-- माधुरी घाटे
अलिबाग
No comments:
Post a Comment