Monday, 4 November 2024

Sunday, 3 November 2024

स्टॅम्प पेपर ची मागणी बाबत न करणेबाबत

 



देवाकडे काय मागावं

 *👏🏻देवाकडे काय मागावं👏🏻*


तुकारामांचे वडील बोल्होबा हे पांडुरंगाचे निस्सिम भक्त होते...

ते दरवर्षी न चुकता पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असंत...

आणि दरवर्षी त्यांची पत्नी कणकाई माऊली त्यांच्या मागे लागत असे की मलाही पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला न्या...

पण बोल्होबा काही तिचे ऐकत नसंत...

अशी अकरा वर्षे गेली.

बाराव्या वर्षी जेव्हा ते पंढरपूरला जाण्यास निघाले तेव्हा कणकाई माऊली काही ऐकेचना.

ती आपल्या पतीला म्हणाली की...

"जरी यावेळी तुम्ही मला पांडुरंगाच्या दर्शनाला नेले नाहीत तरी मी तुमच्या मागून येणारच."

बोल्होबांचा नाईलाज झाला कारण स्रीहट्ट व बालहट्ट टाळता येत नाही ना..!!

ते म्हणाले...

" मी तुला माझ्या बरोबर नेईन पण एक अट तुला पाळावी लागेल ती म्हणजे मंदीरात गेल्यानंतर पांडुरंगाकडे काही म्हणजे काही मागायचे नाही"

कणकाई माऊली आनंदली तिने पतीला सांगीतले की मी काही मागणार नाही.

पती पत्नी पंढरपुरास निघाले.. 

तिथे पोहोचल्यानंतर कणकाई माऊली मनाशी विचार करीत चालली होती की आज आलोच आहोत तर पांडुरंगाचे दर्शन घेऊ आणि पंढरपूरही पाहू..!!

यात्रतेतली बांगड्याची, खेळण्यांची दुकाने हरखुन पहात पहात ती बोल्होंबांच्या मागून चालत असल्याने त्या दोघांत अंतर पडले...

बोल्होबा पुढे निघून गेले आणि कणकाई माऊली मागेच राहीली...


*इकडे बोल्होबा मंदीरात पोहोचल्या बरोबर पांडुरंगाची मान वर होती ती खाली झुकली...* 


रखुमाईने पांडुरंगाला विचारले की...

"सगळे भक्त दर्शनाला येतात तेव्हा तुमची मान वर असते आणि बोल्होबा आल्यानंतर तुमची मान खाली की झुकली??"

यावर पांडुरंगाने रखुमाईला उत्तर दिले कि...

"तो जो सावकार असतो ना..त्याचे आपण देणेकरी असतो आणि देणेकरी जेव्हा आपल्या घरी येतो तेव्हा आपली मान खाली झुकलेली असावी."

म्हणजे बघा, बोल्होबांनी पांडुरंगाची निस्वार्थपणे इतकी भक्ती केली...


*इतकी भक्ती केली की, प्रत्यक्ष देवच त्यांचा देणेकरी झाला...*


*बोल्होबा फक्त भक्तीचे डिपाँझिटच करीत राहीले मागणीचे विड्राँवल कधी केलेच नाही...*


*त्यांनी संपुर्ण आयुष्यभर देवाची भक्ति केली पण त्याच्याकडे कधीही काहीही मागितलेच नाही.*

*परमेश्वराची भक्ती करावी तर ही अशी ..!!!*

*(आम्ही दोनशे.पाचशे.रुपयाचे प्रसाद हार.नारळ चढवतो आणी लाक्खो रुपयांची मागणी करतो)*

इकडे बोल्होबा पांडूरंगाचे दर्शन घेऊन मागल्या दाराने बाहेर पडले आणि पुढल्या दाराने कणकाई माऊली देवळात आली...

तिने पांडुरंगासमोर हात जोडले आणि एकटक देवाकडे पहात राहीली.. 

तोच क्षण साधून पांडुरंगाने तिला विचारले...

*"बोल तुला काय पाहीजे..??"*

कणकाई माऊली विचारात पडली की आता काय करावे?? 

पतीची आज्ञा तर मोडता येत नाही... 

*पण मनुष्य मोठा हुषार प्राणी आहे बरं का...*

*चातुर्य कुठे व कसे वापरावे हे त्याला बरोबर कळते!!*

तिने मनाशी पुन्हा विचार केला की पतीने सांगीतलेय की देवाकडे काही मागू नकोस पण हे कुठे सांगीतलेय की देव जर स्वत:हून काही देत असेल तर घेऊ नकोस...!!

ती पाडुरंगाला म्हणाली "पोटी संतान नाही."

देव म्हणाला "जा निश्चिंतपणे घरी, तुला मुलगा होईल."

ती खुप आनंदली हवं ते मिळाल्यावर माणूस देवाला जरा जास्तीच प्रदक्षिणा घालतो नाही का? हिनेही बर्याच प्रदक्षिणा घातल्या...

इकडे बोल्होबा बाहेर वाट पहात होते. त्यांच्या मनात विचार आला की आपल्या पत्नीला बाहेर यायला इतका वेळ लागला म्हणजे नक्कीच तीने देवाकडे काहीतरी मागितले असणार...

असा विचार करीत असतानाच कणकाई माऊली समोरून येताना दिसली...

तिने त्यांना देवळातला सगळा वृत्तांत सांगीतला...

ते सारे ऐकताक्षणीच बोल्होबा तिला घेऊन पुन्हा देवळाकडे निघाले...

पांडुरंगाकडे बोट दाखवून म्हणाले...

"याने तुला आशिर्वाद दिला ना की मुलगा होईल मग त्याला सांग की पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा...!!!"

"जर मला तु पुत्र देणारच असशील तर तुझी भक्ती करणारा, श्वासागणिक तुझेच नाम जपणारा, अखंड निष्कामतेने व निस्वार्थीपणे तुझी सेवा करणारा आज्ञेचा पुत्र दे..!!!!"


*आणि नंतर तुकोबारायांचा जन्म झाला...*

ज्यांचा नावाचा डंका आजही वाजतोय...

*फळाची आशा धरून देवाची भक्ती कधीच करू नये आणि जर काही मागण्याची वेळ आलीच तर हि अशी असावी मागणी..!!!*

*🙏🏻राम कृष्ण हरी 🙏🏻*

'लक्ष्मीची पाऊलं'*

 *🏮💥दिवाळी विशेष 🌟🪔*


*'लक्ष्मीची पाऊलं'*

~सचिन श. देशपांडे


देवधर आजोबा... गोरेपान, घारे डोळे, मराठी आठाच्या आकड्याचं नाक,  वयाच्या मानाने अजूनही डोक्याशी प्रामाणिक राहिलेले केस, चुकूनही कधी दाढीचे खुंटं दिसणार नाहीत अशी केलेली रोजची गुळगुळीत दाढी आणि टेरीकाॅट पॅन्टवर घातलेला हाफ बुशशर्ट... शक्यतो प्लेन फिकट रंगाचा. अजिबात न सुटलेलं पोट आणि बघितल्यावर लगेच एकेकाळच्या, आपल्या रुंदीची कल्पना देणारे खांदे नी छाती. थोडक्यात मामला... 'खंडहर बता रहा है, के इमारत बुलंद थी'... असा. 

तर असे हे देवधर आजोबा... घरी एकटेच रहात असत, चार टापटीप ठेवलेल्या खोल्यांच्या फ्लॅटमध्ये. रोज न चुकता माॅर्निंग वाॅक कम जाॅग. मग एका वरिष्ठ नागरीक संस्थेच्या हाॅलमध्ये योगा. कुठल्याही कट्ट्याच्या सहाणेवर... चार समदुःखी टाळक्यांच्या खोडाने, म्हातारपणाचं चंदन न उगाळत बसता, तडक घर गाठणं. घरी आल्यावर विदाऊट शुगरचा चहा पिणं, नी आदल्या रात्री त्यांनीच भिजत घातलेलं... वाटीभर मोड आलेलं, कुठलं ना कुठलं कडधान्य खाणं. आन्हिकं आटोपत असतांना, एकीकडे डाळ भाताचा कुकर चढवणं. आणि दुसरीकडे प्राणापलिकडे जपलेल्या ग्रामोफोनवर, हार्डकोअर क्लासिकल ऐकणं. अलिबाबाचा खजिना होता त्यांच्याकडे या गात्या तबकड्यांचा. "भिमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व, जितेन्द्र अभिषेकी हे माझे चार खांदे आहेत... तेच मला सोडून येणार"... असं म्हणत ते गमतीत. अंगाची योग्य ती साफसफाई झाली की... अजिबात अघळ पघळ न रेंगाळता, डोक्यावर कॅप चढवून तडक बाहेर पडत. मग बँकांची कामं, पोस्टाची कामं, आणि निरनिराळ्या गुंतवणुकींसदर्भात ट्रेडर्सच्या आॅफिसांतून चकरा. नंतर ठरलेल्या रसवंती गृहातून... एक फुल ग्लास 'विदाऊट बरफ' उसाचा रस, नी मग बॅक टू पॅव्हेलियन. 

घरी आल्यावर... डाळ भात किंवा मुगाची खिचडी पैकी ज्या कोणाचा नंबर असेल, त्याने यज्ञकर्म समजून उदर भरण करणे. एकही शीत ताटात मागे न ठेवता, चार घास भूक पोटात ठेऊनच ताटावरुन उठणे. पोटाला तडस लागेपर्यंत तर त्यांनी, बायकोच्या हातचं गरम जेवणही कधी खाल्ल नव्हतं. जेवल्यानंतर मेन डोअर पासून सगळ्या खोल्यांतून फिरुन, किमान अर्धातास शतपावली करणे. मग पु. ल., व. पु., शं. ना. या त्रिकुटापैकी कोणा एकाला चाळता चाळता, छातीशी कवटाळुन झोपून जाणे. फक्त तासभरच. मग पुन्हा सळसळ सुरु... दुपारचा एखाद् तास शांत राहून, कंटाळलेल्या गुलमोहराच्या झाडासारखी. पुन्हा एक बीनसाखरेचा चहा, नी पुन्हा दोन चपला पायात सरकवून स्वारी उंबरठ्याबाहेर. लायब्ररी, रोटरी क्लब, लायन्स क्लब वगैरे करुन, 'सातच्या आत घरात'. रात्री फक्त फलाहार... आणि एक ग्लासभरुन कढत हळद दुध, त्यात सुंठ नी जेष्ठीमधाची केलेली पावडर घालून. रात्री नवाच्या सुमारास बंद करायच्या सगळ्या गोष्टी... उदा. दारं, पडदे, नळ, दिवे सगळं चोख बंद करुन... न चुकता गजराच्या घड्याळाचा पाचाचा अलार्म लाऊन, डोळेही बंद करुन झोपी जाणं. "गजराचं घड्याळ, बापासारखं कान चिमटीत पकडून उठवतं... मोबाईलचा गजर आईच्या उठवण्यासारखा असतो, प्रेमाने... थांब गsss असं ओरडलो आपण, की दहा मिनिटं चुप्प होणारा"... असं म्हणत ते. स्वतःपुरत्या शिस्तीच्या लावलेल्या कुंपणाआत, देवधर आजोबा राहायचे... ज्याचा इतरांना कधीच त्रास झाला नाही. 

तर असे हे देवधर आजोबा... लक्ष्मीपुजनाच्या दिवशी त्यांच्याकडे असलेल्या तीन पावलांच्या ठशांना, खूप मनोभावे पुजत. बाकी मग... लक्ष्मीची मुर्ती / फ्रेम, चांदीचं काॅईन, नोटांचं बंडल वगैरे काहीही पुजत नसत ते. मी एकदा त्यांना विचारलं की... "आजोबा.. हे नक्की काय आहे? ही तीन पाऊलांच्या ठशांची 3D effect frame, इतर दिवशी तुमच्या पलंगाशेजारील काॅर्नरपीस वर असते. पण लक्ष्मीपुजनादिवशी, तुम्ही ह्याच फ्रेमची पुजा करता. असं का?". तेंडुलकरला जसा बाॅलर बाॅल सोडायच्याआधीच, त्याच्या ग्रीपवरुन तो कळायचा... तसा माझा प्रश्न तोंडातून फुटायच्याआधीच, माझ्या तोंडावर उमटलेल्या मोठाल्या चिन्हातून त्यांना कळला असावा... ते तयारच होते. 

त्या पावलांकडे थरथरतं बोट (ज्याच्या टोकावर अजूनही त्यांनी मला चकवून, एका डोळ्यातून टिपलेला एक थेंब चमकत होता) नेऊन ते म्हणाले... "हे अनुक्रमे माझ्या आईच्या... बायकोच्या... नी एकुलत्या मुलीच्या पाऊलांचे ठसे आहेत. एकीने जन्म दिला... एकीने तिचा जन्म माझ्यावरुन ओवाळला... तर एकीने आयुष्यात येऊन, माझा जन्म सार्थकी लावला. माझ्या तिशीत आई गेली... आणि ती जायच्या आधी, मी तिच्या डाव्या पायाचा ठसा घेतला. त्या वर्षीपासून नित्याने लक्ष्मी पुजनादिवशी, मी तो ठसा पुजू लागलो. मी सत्तरीत असतांना, बायको गेली सोडून मला पाऊण वाटेवरच. मग मी तिच्या पायाचा ठसा घेतला, नी त्यावर्षीपासून एक पाऊल वाढलं पुजण्यासाठी. पाच वर्षांपुर्वी माझी मुलगी मला 'पुन्हा एकदा' सोडून गेली, पण यावेळी कायमची. मग कॅन्सर झालेली ती... हाॅस्पिटलमध्ये मरणाशी शेवटचा हात करत असतांना, मी तिच्याही पायाचा ठसा घेतला. तिला त्याही परिस्थितीत ते कळलं होतं, आणि तिने हात जोडले होते मला. धाय मोकलून रडलो होतो आम्ही दोघंही त्यादिवशी, शेवटचच. तर गेल्या पाच वर्षांपासून हे तिसरं पाऊलही आलं, या आधीच्या जोडीच्या जोडीला. माझ्या आयुष्यातल्या ह्या तीनच... पण खूप महत्वाच्या बायका, ज्यांचा एकही 'शब्द' मी कधीच पडू दिला नाही. आणि ह्या तीघींनी पडू दिला नाही, माझा 'मान' ही... कधीच. ह्याच तीन बायकांमुळे... माझ्या आयुष्यात सुख आलं, सुबत्ता आली. ह्या तीन पाऊलांतूनच... माझी एकट्याची, माझ्यापुरती लक्ष्मी वसलेली आहे अरे. त्यामुळेच कदाचित मला वेगळी कुठलीही मुर्ती, वा तत्सम काही पुजायची गरजच भासली नाही कधी. आणि आत्तापर्यंत तरी एकंदरीत... कधीच कुठल्याही गोष्टीची वानवा न पडलेली बघता, त्या खर्‍या लक्ष्मीपर्यंतही माझ्या भावना थेट पोहोचल्या असाव्यातसं दिसतंय".

एवढं बोलून, छानसं हसून... देवधर आजोबांनी, एक बत्तासा माझ्या हातावर टेकवला. माझं लक्ष माझ्याच तळहातावर पडलं. आम्ही सामान्य लोकं... 'कराग्रे वसते लक्ष्मी' म्हणत असतांना, एका आजोबांनी स्वतःची लक्ष्मी... फक्त स्वतःच्या माणसांच्या पाऊलांतून शोधली होती. 

प्रत्येकाकडेच अशी लक्ष्मीची पाऊलं असतात. परंतू ती वेळीच ओळखून... त्यांची पुजा नाही, तर निदान जाण ठेवता येणंही... त्या प्रत्येकालाच जमू शकेल असं नाही. समाजात सामान्य तर्‍हेने राहूनही, जगायचं मात्र स्वतःपुरतं... असामान्य. हे देवधर आजोबांच्याच शब्दांत सांगायचं तर... "बाहेरुन देवळावर कितीही दिपमाळा सोडता येत असल्या, तरी लामण दिवा मात्र एखादाच ठेवता येतो तेवत... अंधार्‍या गाभार्‍यातून. भले लोकांना आपण त्या दिपमाळांतील एक वाटत असू, पण खुद्द देवाला माहित असतं की... आपण तो एक लामण दिवा आहोत, सतत त्याच्या सोबतीला असलेला". 

🪔🪔🪔🪔🪔🪔

*खरी भाऊबीज.

 *खरी भाऊबीज.*


*परवा एका जागेच्या व्यवहारासाठी वकीलांकडे गेलो होतो. दिवाळी असल्यामुळे कार्यालयात स्टाफही नव्हता आणि ग्राहकही. त्यामुळे गप्पा रंगल्या. ते म्हणाले, "वाडवडीलर्जीत इस्टेटीची भांडणे म्हणजे डोक्याला ताप असतो. त्या भांडणातून फायदा कोणाचाच होत नाही. कारण एकाच्या बाजूने निकाल दिलाकी दुसरा पुढे अपील करतो, त्या निकालानंतर पराभूत होणारा आणखी वरच्या न्यायालयात जातो. पैशाचा आणि आयुष्यातील बहुमूल्य वर्षांचा अपव्यय ! पण भावंडाना शेवटपर्यंत लक्षात येत नाही. त्यापेक्षा एकदाच एकत्र बसून मार्ग काढा, ती संपत्ती तुम्हाला सुख देईल. पण नाही.....*


*प्रत्यक्ष न्यायाधीशासमोर मारामारी करणारी भावंडे पहिली आहेत.  अरे, पूर्वजांनी मिळवलेली संपत्ती आणि भांडताय तुम्ही ! जी संपत्ती मिळवण्यासाठी तुम्हाला एक पैसाही खर्च करावा लागला नाही, त्या संपत्तीचे वाटप करताना झाले थोडे इकडेतिकडे तर काय बिघडले ?*


*भावाबहिणीचे एकमेकांवर किती प्रेम आहे, हे रक्षाबंधन किंवा भाऊबीज या सणाला कळत नाही, तर रजिस्ट्रारच्या कार्यालयात कळते. पण लोक मूर्ख असतात त्यामुळे वर्षानुवर्षे खटले तुंबतात आणि आमची घरे चालतात....."*


*वकीलसाहेब प्रांजळपणे सांगत होते. पण त्यांनी सातारच्याच एका कुटुंबाचे उदाहरण दिले, आणि लक्षात आले की नाती अगदीच तकलादू उरलेली नाहीत.*


*सातारच्या एका कुटुंबात एक भाऊ आणि सात बहिणी. वडील अकाली निवर्तल्यानंतर भावाने सर्व बहिणींची जबाबदारी घेतली. स्वतःचा संसार सांभाळून त्यांची शिक्षणे केली आणि लग्नेही करून दिली. सर्व बहिणींनी त्याची जाणीव ठेवून राहता वाडा भावाच्या एकट्याच्या नावे करून दिला. कालांतराने सर्वजण म्हातारे झाले तसा वाडाही म्हातारा झाला. ती जागा बिल्डरला द्यायचे भावाने ठरवले. जागा आता त्याच्या मालकीची असल्यामुळे त्याला कोणाची परवानगी लागली नाही. पण भावाने येणा-या रकमेचे समान आठ भाग करून प्रत्येकाच्या नावे वेगळा चेक काढायला बिल्डरला सांगितला. त्याचे म्हणणे असे की, मी रहात होतो, म्हणून बहिणींनी जागा माझ्या नावावर केली. पण आता मला यातून प्राप्ती होतेय, मग त्यात बहिणींचा वाटा आहेच, तो मी देणार !*


*सात बहिणींपैकी चारजणी जिवंतही नव्हत्या. मग त्यांच्या वारसांच्या नावे चेक काढायला त्याने सांगितले. सर्वाना एकत्र बोलावल व ज्याचे त्याचे चेक ज्यालात्याला दिले.*


*पुढे काय घडावे ? सर्वांनी ते चेक त्याच्यासमोर फाडून टाकले आणि सांगितले की दादा, तुम्ही आमच्यासाठी इतके केलंय, की आता जर ही संपत्ती तुमच्याकडून घेतली तर बाबा स्वर्गातून आम्हाला रागावतील. आम्हाला फक्त तुम्ही हवे आहात, ती संपत्ती नको."*


*जगात अशीही भावंडे असतात म्हणजे ! ज्या दिवशी त्या लोकांनी चेक फाडले तोच दिवस खरा भाऊबीजेचा ! भेटायला हवे त्या कुटुंबाला एकदा !!*

कोण अगोदर जाणार ? कोण नंतर जाणार हे तर भगवंतालाच माहीत, अवघड परिक्षा

 ❤आई वडिलांचे आई वडील होता आलं पाहिजे❤

एक दिवस येतो आणि दोघांपैकी एकाला घेऊन जातो

जो जातो तो सुटतो , परीक्षा असते मागे राहणाऱ्याची 

कोण अगोदर जाणार ? कोण नंतर जाणार हे तर भगवंतालाच माहीत 

जो मागे रहातो त्याला आठवणी येणं , अश्रू येणं हे अगदी स्वाभाविक असतं !

आता प्रश्न असा असतो की ही आसवं हे रडणं थांबवायचं कुणी ? 

मागे राहिलेल्या आईला किंवा वडिलांना कुणी जवळ घ्यायचं ?

पाठीवरून हात कुणी फिरवायचा ?

निश्चितपणे ही जवाबदारी असते मुलांची , मुलींची , सुनांची ....

थोडक्यात काय तर

दोघांपैकी एकजण गेल्यानंतर

मुलामुलींनाच आपल्या आई वडिलांचे आईवडिल होता आलं पाहिजे !

लक्षात ठेवा लहानपणी आई वडिलांनी नेहमी अश्रू पुसलेले असतात

आजारपणात अनेक रात्री जागून काढलेल्या असतात

स्वतः उपाशी राहून , काहीबाही खाऊन आपल्याला आवडीचे घास भरवलेले असतात

परवडत नसलेली खेळणी आणि आवडीचे कपडे घेतलेले असतात

म्हणून आता ही आपली जवाबदारी असते , त्यांच्या सारखच निस्वार्थ प्रेम करण्याची

असं झालं तरच ते जगू शकतील 

नसता " तो माणूस म्हणजे वडील " किंवा " ती स्त्री म्हणजे आई " तुटून जाऊ शकते , कोलमडून पडू शकते !

आणि ही जवाबदारी फक्त मुलं , मुली आणि सुना यांचीच असते असे नाही 

तर ती जवाबदारी प्रत्येक नातेवाईकाची , परिचिताची , मित्र मैत्रिणींची .......सर्वांची असते !

फक्त छत , जेवणखाणं आणि सुविधा देऊन ही जबाबदारी संपत नाही तर अशा व्यक्तींना आपल्याला वेळ आणि प्रेम द्यावेच लागेल तरंच ही माणसं जगू शकतील !

आयुष्याचा जोडीदार गमावणं म्हणजे नेमकं काय ? हे दुःख शब्दांच्या आणि अश्रूंच्या खूप खूप पलीकडचं असतं ......म्हणून अशा व्यक्तींना समजून घ्या !

केवळ माया , प्रेम आणि आपुलकीचे दोन गोड शब्द एवढीच त्यांची अपेक्षा असते ती जरूर पूर्ण करा 

त्यांच्या जागी आपण आहोत अशी कल्पना करा आणि त्यांना वेळ द्या !

उद्या हा प्रसंग कोणावरही येऊ शकतो 

म्हणून नेहमी सर्वांशी प्रेमाने,मायेने आणि आपुलकीने वागा !

Saturday, 2 November 2024

ऑगस्ट 1983 मध्ये सावरकर प्रेमी लेखक ह. त्र्यं. देसाई यांनी स्वा.सावरकरांच्या विविध पैलूंवर प्रकाश पडेल

 🙏🙏🙏🙏नमस्कार🙏🙏🙏🙏

ऑगस्ट 1983 मध्ये सावरकर प्रेमी लेखक ह. त्र्यं. देसाई यांनी स्वा.सावरकरांच्या विविध पैलूंवर प्रकाश पडेल अशा पद्धतीने 'शतपैलू सावरकर ' या नावाचे पुस्तक प्रबोधन प्रकाशन, गोरेगाव मुंबई या मार्फत छापले.. त्या पुस्तकाला श्रीमान बाबासाहेब पुरंदरे यांची प्रस्तावना होती.

अल्पावधीत ते लोकप्रिय झाले व त्याला तत्कालीन शिवसेना प्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला...

तो ग्रंथ त्या काळात बहुतेक मराठी वाचकांच्या संग्रही असायचा.

80 च्या दशका नंतर हळू हळू तो मिळेनासा झाला...

त्या ग्रंथाचे महत्त्व व माहात्म्य जाणून पुणे येथील सावरकर प्रेमी मंडळाने तो ग्रंथ पुनर्मुद्रित करण्याचे काम हाती घेतले आहे...

या ग्रंथामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार होण्यास नक्कीच मदत होईल...

या ग्रंथाची किंमत Rs 500/- असून प्रकाशन पुर्व किंमत फक्त Rs.300/- ठरवलेली आहे.

सावरकर प्रेमी मंडळ,पुणे या संस्थेच्या उपाध्यक्ष या नात्याने मी प्रा. मोहन बेटावदकर आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त प्रति विकत घेऊन आपल्या आप्त स्वकियाना द्याव्यात व स्वातंत्र्यवीरसावरकरांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करण्यास मदत करावी.

ग्रंथाची प्रकाशन पूर्व नोंदणी कधीच सुरू झाली आहे...

आवृत्ती संपण्याच्या आत आपल्या प्रतीची नोंदणी करावी..

ग्रंथ पुढील महिन्याच्या सुरुवातीला उपलब्ध होईल.

नोंदणी साठी प्रत्येक प्रती मागे Rs.300/- जमा करावेत.

नाव:- प्रा. मोहन बेटावदकर 

Name on G-pay

Mohan Sir

G-Pay no.

8779447319


माझा पत्ता:-

Prof.Mohan Betawadkar

Soham Reveriya

Flat No.A-101, Behind Sun City 

Anand Nagar, Wadgaon Budruk,

PUNE 411051

Phone No. 8779447319

Featured post

Lakshvedhi