*🏮💥दिवाळी विशेष 🌟🪔*
*'लक्ष्मीची पाऊलं'*
~सचिन श. देशपांडे
देवधर आजोबा... गोरेपान, घारे डोळे, मराठी आठाच्या आकड्याचं नाक, वयाच्या मानाने अजूनही डोक्याशी प्रामाणिक राहिलेले केस, चुकूनही कधी दाढीचे खुंटं दिसणार नाहीत अशी केलेली रोजची गुळगुळीत दाढी आणि टेरीकाॅट पॅन्टवर घातलेला हाफ बुशशर्ट... शक्यतो प्लेन फिकट रंगाचा. अजिबात न सुटलेलं पोट आणि बघितल्यावर लगेच एकेकाळच्या, आपल्या रुंदीची कल्पना देणारे खांदे नी छाती. थोडक्यात मामला... 'खंडहर बता रहा है, के इमारत बुलंद थी'... असा.
तर असे हे देवधर आजोबा... घरी एकटेच रहात असत, चार टापटीप ठेवलेल्या खोल्यांच्या फ्लॅटमध्ये. रोज न चुकता माॅर्निंग वाॅक कम जाॅग. मग एका वरिष्ठ नागरीक संस्थेच्या हाॅलमध्ये योगा. कुठल्याही कट्ट्याच्या सहाणेवर... चार समदुःखी टाळक्यांच्या खोडाने, म्हातारपणाचं चंदन न उगाळत बसता, तडक घर गाठणं. घरी आल्यावर विदाऊट शुगरचा चहा पिणं, नी आदल्या रात्री त्यांनीच भिजत घातलेलं... वाटीभर मोड आलेलं, कुठलं ना कुठलं कडधान्य खाणं. आन्हिकं आटोपत असतांना, एकीकडे डाळ भाताचा कुकर चढवणं. आणि दुसरीकडे प्राणापलिकडे जपलेल्या ग्रामोफोनवर, हार्डकोअर क्लासिकल ऐकणं. अलिबाबाचा खजिना होता त्यांच्याकडे या गात्या तबकड्यांचा. "भिमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व, जितेन्द्र अभिषेकी हे माझे चार खांदे आहेत... तेच मला सोडून येणार"... असं म्हणत ते गमतीत. अंगाची योग्य ती साफसफाई झाली की... अजिबात अघळ पघळ न रेंगाळता, डोक्यावर कॅप चढवून तडक बाहेर पडत. मग बँकांची कामं, पोस्टाची कामं, आणि निरनिराळ्या गुंतवणुकींसदर्भात ट्रेडर्सच्या आॅफिसांतून चकरा. नंतर ठरलेल्या रसवंती गृहातून... एक फुल ग्लास 'विदाऊट बरफ' उसाचा रस, नी मग बॅक टू पॅव्हेलियन.
घरी आल्यावर... डाळ भात किंवा मुगाची खिचडी पैकी ज्या कोणाचा नंबर असेल, त्याने यज्ञकर्म समजून उदर भरण करणे. एकही शीत ताटात मागे न ठेवता, चार घास भूक पोटात ठेऊनच ताटावरुन उठणे. पोटाला तडस लागेपर्यंत तर त्यांनी, बायकोच्या हातचं गरम जेवणही कधी खाल्ल नव्हतं. जेवल्यानंतर मेन डोअर पासून सगळ्या खोल्यांतून फिरुन, किमान अर्धातास शतपावली करणे. मग पु. ल., व. पु., शं. ना. या त्रिकुटापैकी कोणा एकाला चाळता चाळता, छातीशी कवटाळुन झोपून जाणे. फक्त तासभरच. मग पुन्हा सळसळ सुरु... दुपारचा एखाद् तास शांत राहून, कंटाळलेल्या गुलमोहराच्या झाडासारखी. पुन्हा एक बीनसाखरेचा चहा, नी पुन्हा दोन चपला पायात सरकवून स्वारी उंबरठ्याबाहेर. लायब्ररी, रोटरी क्लब, लायन्स क्लब वगैरे करुन, 'सातच्या आत घरात'. रात्री फक्त फलाहार... आणि एक ग्लासभरुन कढत हळद दुध, त्यात सुंठ नी जेष्ठीमधाची केलेली पावडर घालून. रात्री नवाच्या सुमारास बंद करायच्या सगळ्या गोष्टी... उदा. दारं, पडदे, नळ, दिवे सगळं चोख बंद करुन... न चुकता गजराच्या घड्याळाचा पाचाचा अलार्म लाऊन, डोळेही बंद करुन झोपी जाणं. "गजराचं घड्याळ, बापासारखं कान चिमटीत पकडून उठवतं... मोबाईलचा गजर आईच्या उठवण्यासारखा असतो, प्रेमाने... थांब गsss असं ओरडलो आपण, की दहा मिनिटं चुप्प होणारा"... असं म्हणत ते. स्वतःपुरत्या शिस्तीच्या लावलेल्या कुंपणाआत, देवधर आजोबा राहायचे... ज्याचा इतरांना कधीच त्रास झाला नाही.
तर असे हे देवधर आजोबा... लक्ष्मीपुजनाच्या दिवशी त्यांच्याकडे असलेल्या तीन पावलांच्या ठशांना, खूप मनोभावे पुजत. बाकी मग... लक्ष्मीची मुर्ती / फ्रेम, चांदीचं काॅईन, नोटांचं बंडल वगैरे काहीही पुजत नसत ते. मी एकदा त्यांना विचारलं की... "आजोबा.. हे नक्की काय आहे? ही तीन पाऊलांच्या ठशांची 3D effect frame, इतर दिवशी तुमच्या पलंगाशेजारील काॅर्नरपीस वर असते. पण लक्ष्मीपुजनादिवशी, तुम्ही ह्याच फ्रेमची पुजा करता. असं का?". तेंडुलकरला जसा बाॅलर बाॅल सोडायच्याआधीच, त्याच्या ग्रीपवरुन तो कळायचा... तसा माझा प्रश्न तोंडातून फुटायच्याआधीच, माझ्या तोंडावर उमटलेल्या मोठाल्या चिन्हातून त्यांना कळला असावा... ते तयारच होते.
त्या पावलांकडे थरथरतं बोट (ज्याच्या टोकावर अजूनही त्यांनी मला चकवून, एका डोळ्यातून टिपलेला एक थेंब चमकत होता) नेऊन ते म्हणाले... "हे अनुक्रमे माझ्या आईच्या... बायकोच्या... नी एकुलत्या मुलीच्या पाऊलांचे ठसे आहेत. एकीने जन्म दिला... एकीने तिचा जन्म माझ्यावरुन ओवाळला... तर एकीने आयुष्यात येऊन, माझा जन्म सार्थकी लावला. माझ्या तिशीत आई गेली... आणि ती जायच्या आधी, मी तिच्या डाव्या पायाचा ठसा घेतला. त्या वर्षीपासून नित्याने लक्ष्मी पुजनादिवशी, मी तो ठसा पुजू लागलो. मी सत्तरीत असतांना, बायको गेली सोडून मला पाऊण वाटेवरच. मग मी तिच्या पायाचा ठसा घेतला, नी त्यावर्षीपासून एक पाऊल वाढलं पुजण्यासाठी. पाच वर्षांपुर्वी माझी मुलगी मला 'पुन्हा एकदा' सोडून गेली, पण यावेळी कायमची. मग कॅन्सर झालेली ती... हाॅस्पिटलमध्ये मरणाशी शेवटचा हात करत असतांना, मी तिच्याही पायाचा ठसा घेतला. तिला त्याही परिस्थितीत ते कळलं होतं, आणि तिने हात जोडले होते मला. धाय मोकलून रडलो होतो आम्ही दोघंही त्यादिवशी, शेवटचच. तर गेल्या पाच वर्षांपासून हे तिसरं पाऊलही आलं, या आधीच्या जोडीच्या जोडीला. माझ्या आयुष्यातल्या ह्या तीनच... पण खूप महत्वाच्या बायका, ज्यांचा एकही 'शब्द' मी कधीच पडू दिला नाही. आणि ह्या तीघींनी पडू दिला नाही, माझा 'मान' ही... कधीच. ह्याच तीन बायकांमुळे... माझ्या आयुष्यात सुख आलं, सुबत्ता आली. ह्या तीन पाऊलांतूनच... माझी एकट्याची, माझ्यापुरती लक्ष्मी वसलेली आहे अरे. त्यामुळेच कदाचित मला वेगळी कुठलीही मुर्ती, वा तत्सम काही पुजायची गरजच भासली नाही कधी. आणि आत्तापर्यंत तरी एकंदरीत... कधीच कुठल्याही गोष्टीची वानवा न पडलेली बघता, त्या खर्या लक्ष्मीपर्यंतही माझ्या भावना थेट पोहोचल्या असाव्यातसं दिसतंय".
एवढं बोलून, छानसं हसून... देवधर आजोबांनी, एक बत्तासा माझ्या हातावर टेकवला. माझं लक्ष माझ्याच तळहातावर पडलं. आम्ही सामान्य लोकं... 'कराग्रे वसते लक्ष्मी' म्हणत असतांना, एका आजोबांनी स्वतःची लक्ष्मी... फक्त स्वतःच्या माणसांच्या पाऊलांतून शोधली होती.
प्रत्येकाकडेच अशी लक्ष्मीची पाऊलं असतात. परंतू ती वेळीच ओळखून... त्यांची पुजा नाही, तर निदान जाण ठेवता येणंही... त्या प्रत्येकालाच जमू शकेल असं नाही. समाजात सामान्य तर्हेने राहूनही, जगायचं मात्र स्वतःपुरतं... असामान्य. हे देवधर आजोबांच्याच शब्दांत सांगायचं तर... "बाहेरुन देवळावर कितीही दिपमाळा सोडता येत असल्या, तरी लामण दिवा मात्र एखादाच ठेवता येतो तेवत... अंधार्या गाभार्यातून. भले लोकांना आपण त्या दिपमाळांतील एक वाटत असू, पण खुद्द देवाला माहित असतं की... आपण तो एक लामण दिवा आहोत, सतत त्याच्या सोबतीला असलेला".
🪔🪔🪔🪔🪔🪔
No comments:
Post a Comment