Sunday, 3 November 2024

*खरी भाऊबीज.

 *खरी भाऊबीज.*


*परवा एका जागेच्या व्यवहारासाठी वकीलांकडे गेलो होतो. दिवाळी असल्यामुळे कार्यालयात स्टाफही नव्हता आणि ग्राहकही. त्यामुळे गप्पा रंगल्या. ते म्हणाले, "वाडवडीलर्जीत इस्टेटीची भांडणे म्हणजे डोक्याला ताप असतो. त्या भांडणातून फायदा कोणाचाच होत नाही. कारण एकाच्या बाजूने निकाल दिलाकी दुसरा पुढे अपील करतो, त्या निकालानंतर पराभूत होणारा आणखी वरच्या न्यायालयात जातो. पैशाचा आणि आयुष्यातील बहुमूल्य वर्षांचा अपव्यय ! पण भावंडाना शेवटपर्यंत लक्षात येत नाही. त्यापेक्षा एकदाच एकत्र बसून मार्ग काढा, ती संपत्ती तुम्हाला सुख देईल. पण नाही.....*


*प्रत्यक्ष न्यायाधीशासमोर मारामारी करणारी भावंडे पहिली आहेत.  अरे, पूर्वजांनी मिळवलेली संपत्ती आणि भांडताय तुम्ही ! जी संपत्ती मिळवण्यासाठी तुम्हाला एक पैसाही खर्च करावा लागला नाही, त्या संपत्तीचे वाटप करताना झाले थोडे इकडेतिकडे तर काय बिघडले ?*


*भावाबहिणीचे एकमेकांवर किती प्रेम आहे, हे रक्षाबंधन किंवा भाऊबीज या सणाला कळत नाही, तर रजिस्ट्रारच्या कार्यालयात कळते. पण लोक मूर्ख असतात त्यामुळे वर्षानुवर्षे खटले तुंबतात आणि आमची घरे चालतात....."*


*वकीलसाहेब प्रांजळपणे सांगत होते. पण त्यांनी सातारच्याच एका कुटुंबाचे उदाहरण दिले, आणि लक्षात आले की नाती अगदीच तकलादू उरलेली नाहीत.*


*सातारच्या एका कुटुंबात एक भाऊ आणि सात बहिणी. वडील अकाली निवर्तल्यानंतर भावाने सर्व बहिणींची जबाबदारी घेतली. स्वतःचा संसार सांभाळून त्यांची शिक्षणे केली आणि लग्नेही करून दिली. सर्व बहिणींनी त्याची जाणीव ठेवून राहता वाडा भावाच्या एकट्याच्या नावे करून दिला. कालांतराने सर्वजण म्हातारे झाले तसा वाडाही म्हातारा झाला. ती जागा बिल्डरला द्यायचे भावाने ठरवले. जागा आता त्याच्या मालकीची असल्यामुळे त्याला कोणाची परवानगी लागली नाही. पण भावाने येणा-या रकमेचे समान आठ भाग करून प्रत्येकाच्या नावे वेगळा चेक काढायला बिल्डरला सांगितला. त्याचे म्हणणे असे की, मी रहात होतो, म्हणून बहिणींनी जागा माझ्या नावावर केली. पण आता मला यातून प्राप्ती होतेय, मग त्यात बहिणींचा वाटा आहेच, तो मी देणार !*


*सात बहिणींपैकी चारजणी जिवंतही नव्हत्या. मग त्यांच्या वारसांच्या नावे चेक काढायला त्याने सांगितले. सर्वाना एकत्र बोलावल व ज्याचे त्याचे चेक ज्यालात्याला दिले.*


*पुढे काय घडावे ? सर्वांनी ते चेक त्याच्यासमोर फाडून टाकले आणि सांगितले की दादा, तुम्ही आमच्यासाठी इतके केलंय, की आता जर ही संपत्ती तुमच्याकडून घेतली तर बाबा स्वर्गातून आम्हाला रागावतील. आम्हाला फक्त तुम्ही हवे आहात, ती संपत्ती नको."*


*जगात अशीही भावंडे असतात म्हणजे ! ज्या दिवशी त्या लोकांनी चेक फाडले तोच दिवस खरा भाऊबीजेचा ! भेटायला हवे त्या कुटुंबाला एकदा !!*

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi