🥀जय श्रीराम.....
सत्यकथा....
अयोध्येतील गोष्ट. एक संत अयोध्येत श्री रामायण कथा करीत होते. दररोज एक तास असं यांचं प्रवचन होत असे. यासाठी मोठी गर्दी जमत असे. लोकं अगदी आनंदाने तल्लीन होत ही रामकथा ऐकत असत.
या संत महोदयांचा एक नियम होता. दररोज कथा सुरू करण्याआधी ते, "या हनुमंत जी स्थानापन्न व्हा" असं म्हणून हनुमानाचं आवाहन करीत आणि मग एक तास प्रवचन करीत असत.
ही श्री रामकथा ऐकण्यासाठी दररोज एक वकील यायचा. हे प्रवचन ऐकताना त्याच्याही मनातील भक्तिभाव उचंबळून येत असे पण एकदा या भक्तिभावावर तर्कसंगती शिरजोर झाली. त्याला वाटलं की हे महाराज रोज "या हनुमानजी स्थानापन्न व्हा" असं म्हणतात खरं पण काय खरंच हनुमानजी येत असतील ! हा असा विचार करता करता या वकिलाने त्या संताला शेवटी विचारलंच, "महाराज, तुम्ही रामायण खूप सुंदर सांगता. तुमच्या प्रवचनामुळे मनाला खूप आनंद मिळतो पण तुम्ही दररोज एक आसन हनुमानजींसाठी ठेवता आणि त्यावर त्यांना बसायला सांगता. मला एक सांगा, त्यावर खरंच हनुमानजी येऊन बसतात का ?"
यावर ते साधुमहाराज म्हणाले, नक्कीच. मला पूर्ण खात्री आहे की रामकथा सुरू आहे म्हणजे हनुमानजी इथे नक्कीच येत असणार.
यावर तो वकील म्हणाला, महाराज, हे असं नुसतंच म्हणून चालणार नाही. हनुमानजी इथे येतात, याचं कुठलंतरी प्रमाण द्या. तुम्ही लोकांना प्रवचन सांगत आहात, चांगली गोष्ट आहे पण तुम्ही तुमच्यासमोर स्वतः हनुमानजी उपस्थित आहेत हे सांगून लोकांना चुकीच्या पद्धतीने प्रभावित करीत आहात. तुम्हाला हे सिद्ध करावेच लागेल की हनुमानजी तुमची कथा ऐकायला येतात.
वकिलाला या महाराजांनी खूप समजावलं. *आस्था हा वैयक्तिक श्रद्धेचा विषय आहे. हा भक्त आणि भगवान यातील प्रेमरस आहे. यात साक्ष, प्रमाण देणे या गोष्टी आणणं चुकीचं आहे*. यावर ते महाराज हे ही म्हणाले की, जर तुम्ही म्हणत असाल तर मी प्रवचन बंद करतो किंवा तुम्ही कथेसाठी येणं बंद करा.
महाराज समजावत राहिले पण वकिलाने त्यांचं काहीच ऐकलं नाही. तो म्हणाला की बरेच दिवस झाले तुम्ही हनुमानजी येत असल्याचा दावा करीत आहात. तुम्ही हीच गोष्ट बाकी ठिकाणी पण करीत असणार. त्यामुळे हनुमानजी कथा ऐकायला येतात हे तुम्हाला सिद्ध करून दाखवावेच लागेल.
दोघांमधला हा वाद खूप वाढला, अगदी विकोपाला गेला. शेवटी त्या साधू महाराजांनी माघार घेतली आणि म्हणाले, हनुमानजी इथे येतात की नाही, हे उद्या मी सिद्ध करून दाखवीन. उद्या जेव्हा कथा सुरू होईल तेव्हा एक प्रयोग करीन. ज्या आसनावर मी हनुमानजींना बसण्यास सांगतो, ती गादी तुम्ही आज तुमच्या घरी घेऊन जा. उद्या येताना गादी बरोबर घेऊन या. मग मी तुमच्यासमोरच गादी आसनावर ठेवीन आणि कथा सुरू करण्यापूर्वी हनुमानजींना बोलावीन. मग तुम्ही ही गादी उचलून वर धरा. जर ही गादी तुम्हाला उचलून वर धरता आली, तर समजा की हनुमानजी इथे नाहीयेत.
यासाठी वकील तयार झाला. महाराज पुढे म्हणाले की, दोघांपैकी जो पराजित होईल तो काय करणार ? हे ही ठरवा. कारण ही शेवटी सत्याची परीक्षा आहे.
यावर वकील म्हणाला की मी जर गादी उंचावू शकलो नाही तर मी माझी वकिली सोडून देईन आणि तुमच्याकडून दीक्षा घेईन.
पण जर तुम्ही पराजित झालात तर तुम्ही काय कराल ?
यावर तो साधू म्हणाला, मी कथावाचन सोडून तुझ्या कार्यालयाचा शिपाई होईन.
दुसर्या दिवशी कथेसाठी खूप मोठी गर्दी जमली. जे लोक दररोज कथा ऐकायला अजिबात येत नव्हते ते ही भगवंताची भक्ती, विश्वास, प्रेम याची परीक्षा बघायला तिथे आले. प्रवचनाची जागा तुडुंब भरली. साधू महाराज आणि वकील दोघेही श्री रामकथेच्या ठिकाणी आले. वकिलाने आपल्याबरोबर गादी आणली होती. ती आसनावर ठेवली गेली. त्या महात्म्याने भरल्या डोळ्यांनी मंगलाचरण म्हटले आणि मग म्हणाले, "या हनुमंत जी स्थानापन्न व्हा." हे असं म्हणताच साधू महाराजांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. ते मनातल्या मनात म्हणाले, प्रभू, हा माझा नाही तर रघुकुलाच्या रितीचा, परंपरेचा प्रश्न आहे. मी एक अतिशय साधारण व्यक्ती आहे, माझ्या भक्तीची, आस्थेची लाज राखा.
मग त्यांनी वकिलाला बोलावलं आणि म्हणाले की तुम्ही पुढे या आणि गादी उचलून वर धरा. तिथे जमलेले सगळे लोक श्वास रोखून आता पुढे काय घडणार याकडे बघू लागले.
वकील महोदय उभे राहिले आणि पुढे येत त्यांनी गादी उचलण्यासाठी म्हणून हात पुढे केला पण वकिलाला गादीला हातही लावता आला नाही. त्याने तीन वेळा प्रयत्नपूर्वक हात पुढे केला पण तिन्ही वेळा त्याला अपयश आलं.
हे दृश्य ते महात्मा बघत होते. वकिलाला गादी धरणं तर दूरची गोष्ट पण ते गादीला स्पर्शही करू शकत नाहीयेत.
वकिलाने तीन वेळा प्रयत्न केला आणि तिन्ही वेळा त्याला भयंकर थकवा आला. तो घामाने भिजला आणि शेवटी त्या वकिलाने साधू महाराजांच्या चरणांवर लोटांगण घातलं. वकील म्हणाला, महाराज, गादी उचलणं तर दूरची गोष्ट, कसं काय ते माहीत नाही, प्रयत्न करूनही साधा माझा हातही गादीपर्यंत पोहोचू शकत नाहीये. तेव्हा मी माझा पराभव मान्य करीत आहे.
*त्या दिवशी तिथे श्रद्धा आणि भक्ती, आणि त्याबरोबरच केलेल्या साधनेत किती शक्ती असते हे सिद्ध झालं. देवाची मूर्ती ही पाषाणाचीच असते पण भक्ताचे भाव त्या मूर्तीत प्राणप्रतिष्ठा करतात आणि प्रत्यक्ष देव त्या मूर्तीत वास करायला येतात. भक्तीची ही शक्ती आहे आणि ही सामान्य बुद्धीच्या पलिकडची गोष्ट आहे.*
जय श्रीराम
जय हनुमान
🙏🏻🙏🙏🙏🙏🙏
No comments:
Post a Comment