सालंकृत कन्यादान? थट्टेचा विषय नाही 😡
कन्यादान म्हंटल्यावर अनेक पुरोगाम्यांच्या भुवया उंचावल्या जातात ..हे काय फालतुगिरी? कन्या काय दान करायची वस्तू आहे का? ती एक स्त्री आहे ती काय मालकी हक्काची वस्तू आहे का ? ..छे छे हे अघोरी आहे असे म्हणून ते नाक मुरडतात ..पहा पहा कशा अघोरी प्रथा आहेत हिंदू धर्मात म्हणून समानता वादी ..मानवता वादी गळे काढतात ..या पैकी बहुतेकांनी कधीही ' कन्यादान ' हा विधी का करतात ..तो कसा असतो वगैरेची थोडीही माहिती घेण्याचे कष्ट घेतलेले नसतात हेच खरे ..
संतश्री तुकाराम महाराजांनी कन्यादाना बद्दल
साळंकृत कन्यादान |
पृथ्वीदानाच्या समान || १||
परी ते न कळे या मुढा |
येईल कळो भोग पुढां || ध्रृ ||
असे लिहुन ठेवलेय ..
मुढ किंवा मुर्ख हा शब्द हुंडा घेणाऱ्या, वधुच्या पित्याकडुन जास्तीत जास्त धनाची अपेक्षा करणाऱ्या लोभी लोकांसाठी वापरला आहे ..
लाडाने, प्रेमाने वाढवलेली कन्या आईवडिलांच्या काळजाचा तुकडा असते ..आपल्या गोड बोलांनी , मायेने, जी इतकी वर्षे घरात वावरली आहे , आईवडीलांच्या सुखदुःखात जीने त्यांना धीर दिला आहे अशी मुलगी ते वराच्या हवाली करत आहेत या पेक्षा मोठी गोष्ट कोणतीच नाही ..
सालंकृत या शब्दाचा अर्थ असा की पूर्वीच्या काळी कन्यांना पित्याच्या संपत्तीत अधिकार नव्हता म्हणून त्या कन्येला यथाशक्ति दागिने घालून सासरी पाठवले जाई ते स्त्रीधन असे.. संकटसमयी ते स्त्रीधन कामी येऊ शकेल हा हेतू असे ..तर दुसरा अर्थ असाही होतो की सालंकृत म्हणजे संस्कारांनी अलंकृत ..जी सासरच्या दुःखात मागे हटणार नाही ..सदैव साथ निभावेल समर्पित भावनेने संसार करेल असे संस्कार दिलेली ..ती कन्या वधुपिता वराच्या हवाली करतोय जी त्याचा संसार फुलवेल, सासरी आनंद देईल, आपल्या मधुर बोलांनी सर्वांना आपलेसे करेल ..
दान म्हणजे हक्क सोडलेली..दुस-याला दिलेली .. इथे आईवडिलांनी संबंध तोडलेली असा होत नाही तर या पुढे आईवडीलांनी तिच्या संसारात नको तेवढा हस्तक्षेप करु नये, तीला अनुभवातून शिकु द्यावे, अन खरोखर पूर्वीच्या काळात सहज भेटीगाठी अथवा संवाद होतच नसत त्यामुळे वारंवार भेटणे, बोलणे शक्यच नव्हते ..
अतिशय भावपूर्ण असा हा विधी असतो ..इतक्या वर्षे मायेने वाढवलेला काळजाचा तुकडा मातापिता बंधु या सर्वांपासुन दुर जाणार असतो ..पूर्वीच्या काळी मोबाईल नव्हते, संदेशवहनाची अन दळणवळणाची आधुनिक साधने देखिल नव्हती अशा वेळी प्रिय पुत्रीची पुन्हा कधी भेट होईल याची खात्री नसे ..म्हणून मुलगी अन आई वडिल दोघेही भावविभोर होत असत ..इतकेच काय विधीच्या वेळी आसपास बसलेल्या आप्तांच्याही डोळ्यात पाणी येत असे..माझेपण डोळे पाणावले होते या विधीच्या वेळी पत्नीचा हात हाती घेतांना आजच्या काळातही हा क्षण अतिशय ह्रद्य असतो ..सगळ्यांचेच डोळे भरून येतात ..
याच वेळी वधूपिता वराकडुन आपल्या मुलीचा नीट सांभाळ केला जाईल तीला दु:ख देणार नाही पत्नीचे सर्व अधिकार तीला देईल असे वचनही घेत असतो तर वधूची आई तीला सासरी सर्वांची मने कशी जिंकावी याची शिकवण देत असते ..
इतक्या भावपूर्ण विधीची चेष्टा करणे अथवा त्यावर खोचक टिप्पणी करुन टिका करणे हे महामुर्खाचेच काम म्हणायचे
तुषार नातू
No comments:
Post a Comment