Friday, 11 February 2022

Samarth

 एक व्यक्ती नेहमी 'श्री स्वामी समर्थ' नामाचा जप करीत असे. हळूहळू तो फार म्हातारा झालेला त्यामुळे तो एका खोलीत पडून असायचा. जेव्हा कधी त्यास शौच, स्नानासाठी जावे लागे तेव्हा तो आपल्या मुलाला मदतीसाठी आवाज देत असे आणि मुलगा त्यास घेऊन जात असे.

हळूहळू काही दिवसानंतर मुलाला आवाज देऊन ही मुलगा येत नसे जर आला तर फार उशीरा. त्यामुळे कधी कधी अंथरुन घाण होई, त्यावरच दिवस घालवावा लागत असे. आणि आता जास्त म्हातारपण आल्यामुळे फार कमी दिसू लागले होते. 

एके दिवशी सकाळी असाच तो आवाज देत असताना पटकन मुलगा आला आणि आपल्या कोमल स्पर्शाने त्यांना शौच-स्नानाला घेऊन गेला. नंतर अंथरूणावर आणून झोपवले. असा आता त्या मुलाचा रोजचा दिनक्रम चालू झाला होता. मग म्हाताऱ्यास संशय येतो की, आधी जेव्हा मी अनेकवेळा आवाज द्यायचो तेव्हा मुलगा येत नव्हता. पण आता एका अावाजात मुलगा कसा येतो.? आणि मला शौच-स्नानास घेऊन जातो. म्हणून एकदा तो म्हातारा त्या मुलाचा हात पकडतो आणि विचारतो की, "खरे सांग तु कोण आहेस ? कारण माझा मुलगा तर असा एवढा नम्र विनयी नाही." तेव्हा खोलीत एकदम प्रकाश प्रकट झाला त्या मुलाच्या रूपातील श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपले रुप दाखवले. तेंव्हा ती म्हातारी व्यक्ती रडत म्हणाली, "हे स्वामीराया, तुम्ही स्वतः माझ्या या कार्यासाठी रोज येत होता.... स्वामीराया तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर मला यातून मुक्ती द्या.!"

तेव्हा स्वामी महाराज म्हणतात की, "तू जे भोगत आहे ते तुझे प्रारब्ध आहे. तू माझा खरा भक्त आहेस. नित्य माझे नाम जपत असतो, म्हणून तुझ्या भक्तीच्या प्रेमापोटी तुझे प्रारब्ध मी स्वतः भोगून संपवत आहे." 

स्वामीराया स्वतः म्हणतात, "माझी कृपा सर्वोपरि आहे त्यामुळे तुझे प्रारब्ध संपवता येते. नाहीतर प्रारब्ध भोगण्यासाठी परत जन्माला यावे लागेल. हाच कर्माचा नियम आहे. म्हणून मी स्वतः तुझे प्रारब्ध संपविण्याचा प्रयत्न करत आहे व जन्म-मरणातून तुला मुक्ती द्यायची आहे."

स्वामी महाराज म्हणतात, "प्रारब्ध तीन प्रकारचे आहेत...

१)मंद

२)तीव्र

३)तीव्रतम

* 'मंद प्रारब्ध' माझे नाम जपल्याने संपवता येते.

* 'तीव्र प्रारब्ध' हे खऱ्या संताच्या सान्निध्यात राहून श्रद्धा

आणि विश्वासाने माझे नामाचा जप करुन संपवता येते.

* 'तीव्रतम प्रारब्ध' मात्र भोगावेच लागते.

पण जो नित्य श्रद्धा आणि विश्वासाने माझे नाम सतत जपत असतो त्याच्या प्रारब्धात मी स्वतः बरोबर राहून त्याचे प्रारब्ध मी संपवतो, त्याला याचा त्रास होऊ देत नाही. प्रारब्ध आधी रचले काय नंतर रचले काय ? मी कशाला चिंता करु, फक्त 'श्री स्वामी समर्थ' नाम जपत राहायचे.....

🙏।। अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू अवधूत चिंतन भक्त वत्सल्य भक्ताभिमानी श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय ।।🙏

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi