राज्यात १९ ते २५ नोव्हेंबर दरम्यान "कौमी एकता सप्ताह"
मुंबई, दि. १८ : राज्यात १९ ते २५ नोव्हेंबर हा सप्ताह "कौमी एकता सप्ताह" म्हणून साजरा करण्यात येणार असून त्यामध्ये आयोजित करावयाच्या विविध कार्यक्रमात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अल्पसंख्याक विकास विभागामार्फत करण्यात आले आहे. हा सप्ताह साजरा करण्याबाबत सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. कोव्हीड - १९ विषाणूच्या संसर्गाची पार्श्वभूमी विचारात घेता लोकसहभागाबाबत योग्य खबरदारी घेऊन कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत, असे सूचीत करण्यात आले आहे.
शुक्रवार १९ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय एकात्मता दिवस साजरा करण्यात येईल. धर्मनिरपेक्षता, जातीयवादी विरोध व अहिंसा यांच्यावर भर देणारे सभा, चर्चासत्रे व परिसंवाद ऑनलाईन किंवा वेबिनार इत्यादी पध्दतीने आयोजित करावेत. शनिवार २० नोव्हेंबर रोजी अल्पसंख्याक कल्याण दिवस साजरा करण्यात येईल. अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी १५ कलमी कार्यक्रमांवर भर देण्यात यावा, असे सूचीत करण्यात आले आहे.
रविवार २१ नोव्हेंबर रोजी भाषिक सुसंवाद दिवस साजरा करण्यात येईल. भारताच्या अन्य भागातील लोकांच्या भाषेच्या वारश्याचा परिचय करून देण्याच्या दृष्टीने ऑनलाईन, वेबिनार इत्यादी पध्दतीने विशेष वाङमयीन कार्यक्रम व कवी संमेलने आयोजित करण्यात यावीत. सोमवार २२ नोव्हेंबर रोजी दुर्बल घटक दिवस साजरा करण्यात येईल. २० कलमी कार्यक्रमाअंतर्गत अनुसूचित जाती व जमातीमधील व्यक्ती व कमकुवत घटकातील व्यक्ती यांना मदत करण्यासाठी ठरवून दिलेले कार्यक्रम ठळकपणे निदर्शनास आणण्याच्या दृष्टीने कार्यक्रम आयोजित करावेत, असे सूचीत करण्यात आले आहे.
मंगळवार २३ नोव्हेंबर रोजी सांस्कृतिक एकता दिवस साजरा करण्यात येईल. भारतीयांच्या विविधतेतील एकतेवर भर देणारे आणि सांस्कृतिक संरक्षण व एकात्मता संबंधाची भारतीय परंपरा सादर करणारे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. बुधवार २४ नोव्हेंबर रोजी महिला दिन साजरा करण्यात येणार आहे. भारतीय समाजातील महिलांचे महत्व व राष्ट्र उभारणीच्या विकासामधील त्यांची भूमिका यावर भर देणारे कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. गुरुवार २५ नोव्हेंबर रोजी जोपासना दिवस साजरा करण्यात येईल. पर्यावरणाची जोपासना व त्याची जाणीव यासाठीच्या वाढत्या गरजेवर भर देणारे मेळावे व कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. हे सर्व कार्यक्रम आयोजित करताना केंद्र व राज्य शासनाच्या कोव्हीड - १९ च्या संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जाईल याची दक्षता घ्यावी, असे सूचीत करण्यात आले आहे.
यावर्षी 19 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घ्यावयाची आहे. या शपथेचा नमुना परिपत्रकाद्वारे सर्वांना उपलब्ध करुन देण्यात आला आहे. राज्यातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या सर्व कार्यालयातून ही शपथ घेण्याचा कार्यक्रम राबविण्यात यावा. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जागेवर उभे राहून, प्रांगणात सामाजिक अंतर ठेऊन राष्ट्रीय एकात्मकतेची शपथ घ्यावी. तसेच भित्तीपत्रके, फलक यांच्यावर ठसठशीत असे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिकचिन्ह प्रदर्शित करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. कोव्हीड १९ च्या पार्श्वभूमीवर विद्यापीठे, महाविद्यालये आणि शाळा बंद असल्याने तेथे यावर्षी कोणतेही कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीत. स्वयंसेवी संस्थांनी करावयाचे कार्यक्रम त्यांच्या सोयीने करण्याची त्यांना मोकळीक आहे.
राष्ट्रीय एकात्मतेवर नेत्यांची भाषणे, राष्ट्रीय एकात्मतेची शपथ सामूहिकरित्या घेणे, सांस्कृतिक कार्यक्रम करणे, राष्ट्रगीताचे सामूहिक गायन आदी कार्यक्रम आयोजित करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपआपल्या कार्यक्षेत्रात सर्व संबंधितांची मदत घेऊन हा कार्यक्रम त्यांच्या विविध माध्यमातून आखला जाईल व यशस्वी केला जाईल असे पहावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
राष्ट्रीय एकात्मता शपथ "मी गांभीर्यपूर्वक शपथ घेतो/ घेते की, देशाचे स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी व दृढ करण्यासाठी मी निष्ठापूर्वक काम करीन" मी अशीही प्रतिज्ञा करतो/ करते की, मी कधीही हिंसाचाराचा अवलंब करणार नाही. तसेच मी सर्व धार्मिक, भाषिक किंवा प्रादेशिक मतभेद व तंटे किंवा इतर राजकीय वा आर्थिक गाऱ्हाणी शांततामय आणि सांविधानिक मार्गाने सोडविण्याचा प्रयत्न चालू ठेवीन. |
००००
कौमी एकता सप्ताहाच्या कालावधीत
25 नोव्हेंबर रोजी साजरा होणार ध्वज दिन
मुंबई, दि. 18: केंद्रीय गृह मंत्रालयाने स्थापन केलेल्या राष्ट्रीय सांप्रदायिक सद्भावना प्रतिष्ठान, नवी दिल्ली यांच्यावतीने 19 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत पाळण्यात येणाऱ्या कौमी एकता सप्ताहामध्ये “सांप्रदायिक सद्भावना मोहीम निधी संकलन सप्ताह” साजरा होणार आहे. या सप्ताहाअंतर्गत 25 नोव्हेंबर रोजी “ध्वज दिन” साजरा करण्यात येणार असून ध्वजदिनाचा निधी संकलन करण्याकरिता व संकलित निधी सुपूर्द करण्याच्या कार्यपद्धतीसाठी शासन परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
25 नोव्हेंबर रोजी सर्व शासकीय कार्यालये, विद्यालये, महाविद्यालये, सार्वजनिक उपक्रम, महामंडळे, सार्वजनिक संस्था आणि देणगीदार यांच्याकडून स्वेच्छेने निधी संकलित करण्यात यावा. शासकीय कार्यालये, विद्यालये, महाविद्यालये, सार्वजनिक उपक्रम, महामंडळांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून हा निधी डब्यातून संकलित करण्यात यावा. खासगी संस्था वा देणगीदार अथवा करदाते यांच्याकडून ती रक्कम धनादेशाद्वारे स्वीकारावी. परिपत्रकासमवेतच्या पोच पावती नमुन्यावरच त्यांना पोच देण्यात यावी. खासगी संस्था वा देणगीदार अथवा करदाते यांच्याकडून “सचिव, राष्ट्रीय सांप्रदायिक सद्भावना प्रतिष्ठान, नवी दिल्ली” यांच्या नावे धनादेश घ्यावा. जिल्हाधिकारी व मंत्रालयीन विभागांनी माजी सैनिक कल्याण मंडळे, रेड क्रॉस सोसायटी अथवा तत्सम संघटनांकडून निधी संकलनासाठी डबे उपलब्ध करुन घ्यावेत. संकलित निधी कार्यालयातील जबाबदार अधिकाऱ्यांसमोर मोजून त्याचा डिमांड ड्राफ्ट तयार करुन व अन्य संस्था, देणगीदारांकडून आलेले धनादेश “सचिव, राष्ट्रीय सांप्रदायिक सद्भावना प्रतिष्ठान, सी विंग, 9 वा मजला, लोकनायक भवन, खान मार्केट, नवी दिल्ली – 110003” यांच्याकडे नोंदणी टपालाद्वारे परस्पर पाठवावा किंवा संकलित निधी पुढील बँक खात्यावर हस्तांतर करुन त्याचा अहवाल अल्पसंख्याक विकास विभाग, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई – 32 या कार्यालयास 15 डिसेंबर, 2021 पर्यंत न चुकता पाठवावा, अशा सूचना देण्यात आल्या आहे.
यासाठी पुढील बँकाची नियुक्ती केली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया, खान मार्केट, नवी दिल्ली, 110003, बँक खात्याचे नाव: नॅशनल फाऊंडेशन फॉर कम्युनल हार्मनी, खाते क्रमांक:. 1065439058, NEFT/IFSC/RTGS: CBIN0280310
स्टेट बँक ऑफ इंडिया, निर्माण भवन, मौलाना आझाद रोड, नवी दिल्ली, 110011, बँक खात्याचे नाव : नॅशनल फाऊंडेशन फॉर कम्युनल हार्मनी, खाते क्रमांक.: 10569548047, NEFT/IFSC/RTGS: SBIN0000583
बँक ऑफ इंडिया, खान मार्केट, नवी दिल्ली, 110003, बँक खात्याचे नाव : नॅशनल फाऊंडेशन फॉर कम्युनल हार्मनी, खाते क्रमांक.: 600710110006040, NEFT/IFSC/RTGS: BKID0006007
निधी संकलनासाठी महाराष्ट्र राज्य, नागरी सेवा (वर्तणूक) नियम 1979 च्या नियम 11 मधील तरतूद शिथिल करुन निधी संकलीत करण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांस मुभा देण्यात आली आहे.सर्व जिल्हाधिकारी आणि मंत्रालयीन विभागांचे सचिव यांनी या सूचनांप्रमाणे कार्यवाही करुन जास्तीत जास्त निधी संकलीत करण्याचा प्रयत्न करावा, अशी सूचना देण्यात आल्या आहेत.
००००
No comments:
Post a Comment