Thursday, 25 November 2021

 राज्यात 1 डिसेंबरपासून शाळा सुरू होणार


- प्रा.वर्षा एकनाथ गायकवाड


            मुंबई, दि. 25 : कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील बंद असलेल्या शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहेत. त्यानुसार सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्रिमंडळ आणि पीडियाट्रिक टास्क फोर्स यांच्याशी चर्चा केल्यानंतर आता 1 डिसेंबरपासून ग्रामीण भागातील पहिली ते चौथी तसेच शहरी भागातील पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती, शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा एकनाथ गायकवाड यांनी दिली.


            कोविड-19 च्या प्रादूर्भावामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य विचारात घेऊन ऑनलाईन शिक्षणाला प्राधान्य देण्यात आले होते. कोविड-19 चा प्रादूर्भाव कमी झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी ग्रामीण भागात पाचवीपासून तर शहरी भागात आठवीपासून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांचे आरोग्य विचारात घेऊन सुरक्षितपणे शाळा सुरू करण्यास आम्ही वचनबद्ध असल्याचे प्रा.गायकवाड यांनी म्हटले आहे.


            टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यातील हा तिसरा टप्पा आहे. या कालावधीत सुरक्षित वातावरणात शिक्षण सुरू राहण्यासाठी परिश्रम घेतलेल्या शाळा आणि शिक्षकांचे शिक्षण मंत्र्यांनी कौतुक केले आहे. त्याचबरोबर यापुढेही कोविड-19 संदर्भातील दक्षता घेण्याची सूचना त्यांनी केली आहे. काही विद्यार्थी पहिल्यांदाच प्रत्यक्ष शाळेत येतील, त्यांचे आणि इतर विद्यार्थ्यांचे आरोग्य जपणे ही आपली प्राथमिकता असेल, असे त्या म्हणाल्या. याबाबत सातत्याने मार्गदर्शक सूचना करणाऱ्या टास्क फोर्सचेही शिक्षण मंत्री प्रा.गायकवाड यांनी आभार व्यक्त केले आहेत.


०००००

 



No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi