सर्व कामे दर्जेदार व्हावीत- चंद्रशेखर बावनकुळे
कामठी येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत व्यावसायिक पद्धतीने बांधकाम करण्यात येणार आहे. येथे 7 हजार कंत्राटी कामगारांसाठी घरे बांधण्यात येणार असून महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने हे काम हाती घेऊन हा प्रकल्प तातडीने सुरू करावा, असे निर्देश पालकमंत्री श्री.बावनकुळे यांनी दिले. शासकीय मुद्रणालयाच्या जागेचाही पुनर्विकास करण्यात येणार असून तेथे मुद्रणालयासह अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या कार्यालयासाठी जागा देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. नागपूर शहराच्या विकासाची सर्वच कामे दर्जेदार व्हावीत, असे निर्देश पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी यावेळी दिले.
नागपूर शहरातील ऑरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्प येथे परफॉर्मन्स गॅलरी तयार करण्यात येणार आहे. येथे अकॅडमी ऑफ परफॉर्मन्स आर्ट तयार करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. 20 हजार चौ.मीटरच्या या जागेत 6.2 लाख चौ.फुट जागेच्या विकासाला परवानगी मिळाली असून यातील 1.2 लाख चौ.फुट जागेत सभागृह बांधण्यात येईल, तसेच उर्वरित जागेत इतर सोयी सुविधा तयार करण्यात येतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
नागपूर शहराचे कारागृह कामठी तालुक्यातील बाबुलखेडाजवळ 81.6 एकर जागेत तयार करण्यास आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या कामासाठी पालघर, तळोजा व दिल्ली येथे बांधलेल्या कारागृहाच्या आर्किटेक्टशी सल्लामसलत करुन जेल मॅन्युअलनुसार कार्यवाही करण्यात यावी, तसेच जेल सदनिका बांधण्यात याव्यात असे आदेश मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी दिले.
शहरातील मोरभवन आणि गणेशपेठ येथील बसस्टँडच्या पुनर्विकासाबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. मोरभवन येथे शहर बससेवा आणि खासगी बस यांच्यासाठी तर गणेशपेठ येथे एसटी महामंडळाच्या बस आणि शहर बस यांच्यासाठी सुविधा निर्माण करुन पुनर्विकास करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. याचबरोबर डिक दवाखाना, कॉटन मार्केट, दहीबाजार, इतवारी बाजार, नेताजी मार्केट, संत्रा मार्केट आदी परिसरांचा विकास करण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.