❄️❄️❄️❄️❄️🏵️❄️❄️❄️❄️❄️
*🔸माघी गणेश जयंती-१🔸*
*---------------------------------------------*
*🔸संकलन: सदानंद पाटील, रत्नागिरी.*
*---------------------------------------------*
*🟣०१/०२/२०२५- माघी गणेश जयंती...🙏*
*गणपतीचे एकूण तीन अवतार मानले गेले आहेत... या तीन अवतारांचे तीन जन्मदिवस आपण साजरे करीत असतो. पहिला अवतार वैशाख पौर्णिमेच्या दिवशी ‘ पुष्टिपती विनायक जयंती ‘ म्हणून आपण साजरा करीत असतो. दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला ‘ श्रीगणेश चतुर्थी ‘ म्हणून पार्थिव गणेश पूजन करून आपण साजरा करीत असतो. तिसरा अवतार हा माघ शुक्ल चतुर्थीला ‘ गणेश जयंती ‘ म्हणून आपण साजरा करीत असतो.....*
*माघ महिन्यातील पूजावयाची मूर्ती ही मातीची किंवा धातूचीही चालते. तसेच भाद्रपद महिन्यातील गणेशचतुर्थीला जशी घरोघरी मातीची गणेशमूर्तीची पूजा केली जाते, तशी माघातील गणेशजयंतीला प्रत्येक घरी पूजा केली जात नाही. तशी परंपरा किंवा प्रथाही नाही. गणेशमूर्तीची नेमकी किती दिवस पूजा करून मूर्तीचे विसर्जन करावयाचे तेही कोणत्याही मान्यवर धर्मशास्त्रग्रंथात सांगितलेले नाही. काही ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरे केले जातात. काही कुटुंबात गणेशजयंतीला परंपरेप्रमाणे व्रत केले जाते.....*
*गणेश जयंतीच्या दिवशी नक्तव्रत आचरून ढुंढिराजाचे पूजन करावे आणि तिळसाखरेचे किंवा तिळगुळाचे मोदक अर्पण करावेत असे सांगण्यात आले आहे. दिवसभर उपवास करून सूर्यास्तानंतर भोजन करण्याचीही प्रथा आहे.....*
*गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला म्हणून ही विनायकी चतुर्थी जास्त प्रसिद्ध आहे. या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी म्हणतात. षोडशोपचार गणेशपूजन करून तिळमिश्रित गुळाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करतात. कुंदफुलांनी गणेशाची आणि सदाशिवाची पूजा करून रात्री जागरण करतात म्हणून या चतुर्थीला ‘ तिलकुंद चतुर्थी ‘ असेही म्हणतात.....*
*या तिथीला स्नान, दान,जप व होम कर्म केल्यास गणेशकृपा राहते अशीही उपासकांची श्रद्धा असते.....*
*माघ महिन्यातील या गणेश जयंतीच्या दिवशी करावयाचे गणेशपूजन भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीच्या गणेशपूजनासारखेच असते. या दिवशी पाण्यात तीळ घालून त्या पाण्याने स्नान करावयाचे असते. तसेच उपवास करावयाचा असतो. भाद्रपदातील गणेशचतुर्थीच्या दिवशी ‘ पार्थिव गणेश पूजन ‘ करण्यास सांगितले आहे. त्यामुळे त्या गणेशपूजनातीलल गणेशमूर्ती ही मातीचीच असावी लागते. याला तसे कारणही आहे, कारण या दिवसात शेतात धान्य तयार होत असते, म्हणून पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ती एकप्रकारे पृथ्वीचीच पूजा असते. म्हणून मातीच्याच गणेशमूर्तीचे पूजन करावयाचे असते.....*
*माघ महिन्यातील गणेशजयंतीला धातूच्या, पाषाणाच्या किंवा मातीच्या गणेशमूर्तीची पूजा करावयाची असते. प्रथम प्राणप्रतिष्ठा करून मंत्रांनी मूर्तीमध्ये देवत्त्व आणले जाते. आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, यज्ञोपवीत , गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, मंत्रपुष्प, प्रदक्षिणा आणि नमस्कार या सोळा उपचारांनी पूजन करावयाचे असते. माघ महिन्यातील या गणेशपूजनात पत्री अर्पण न करता दूर्वा अर्पण करतात. तसेच पुरणाच्या मोदकांऐवजी तिळसाखरेच्या मोदकांचा प्रसाद अर्पण करावयाचा असतो. मूर्ती विसर्जनापूर्वी उत्तरपूजा करून देवत्त्व काढून घेतले जाते. एक गोष्ट मात्र खूप महत्त्वाची ती म्हणजे गणेशमूर्ती लहान असावी.....*
*देवाला न विसरता संसार करा...*
*ईश्वरपूजा करूनही जर आपण आपल्यात चांगला बदल केला नाही तर पूजा व्यर्थ ठरते. तसेच उत्सव साजरा करीत असतांना प्रदूषण होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावयास हवी आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबरच उत्सव साजरे करणार्यांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे जलप्रदूषण, वायूप्रदूषण आणि ध्वनीप्रदूषण होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावयास हवी आहे. माघी गणेशोत्सवाचा काळात विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू असतात. म्हणून या उत्सवाच्या काळात ध्वनीवर्धकाचा वापर संयमाने व्हावयास हवा. श्रीगणेशाने प्रत्येक अवतारात अनेक दुष्ट राक्षसांचा नाश केला, आपणही गणेश उपासना करून आपल्यातील आळस, अज्ञान, अंधश्रद्धा, अनीती, दुराचार, अस्वच्छता इत्यादी वाईट गोष्टींचा नाश करण्याचा प्रयत्न करायला हवा. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या षड् रिपूंवर नियंत्रण ठेवण्याची आत्मशक्ती प्राप्त करून घ्यावयास हवी. आधुनिक कालात टी.व्ही., मोबाईल, व्हाटस्अप, फेसबुक इत्यादींचा वापरही संयमाने करावयास हवा.....*
*स्रोत: आंतरजाल, दा. कृ. सोमण, esakal.com*
❄️❄️❄️❄️❄️🏵️❄️❄️❄️❄️❄️