सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Thursday, 14 April 2022
सैनिकांच्या प्रलंबित कामांचा निपटारा करण्यासाठी
‘अमृत जवान अभियान’ राबविणार
- दादाजी भुसे.
मुंबई दि 13:- राज्यातील विविध शासकीय कार्यालयात शहीद जवान, माजी सैनिक, शहीदांच्या विधवा, कर्तव्यावर कार्यरत असणारे सैनिक यांचे कुटुंबिय यांची अनेक शासकीय कामे असतात. शासन दरबारी अशा प्रलंबित असणा-या कामांचा तात्काळ निपटारा करण्यासाठी देशाच्या 75 व्या स्वातंत्रदिनाच्या महोत्सवानिमित्त “अमृत जवान अभियान 2022” दि. 1 मे 2022 ते 15 जून 2022 या कालावधीत संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे, अशी माहिती माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.
यासंदर्भातील शासन निर्णय 13 एप्रिल रोजी निर्गमित करण्यात आला आहे. महसूल, भूसंपादन, पुनर्वसन, विविध प्रकारचे दाखले, पोलीस विभागाकडील तक्रारी, ग्रामविकास विभागाच्या विविध योजना, कृषि विभागाकडील विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठीचे प्रस्ताव, सहकार विभागाकडील कर्ज प्रकरणे इ., परिवहन विभागाचे परवाने अशा कामांसाठी विशेष मेळावे घेवून शहीद जवान,माजी सैनिक व सेवेत कार्यरत सैनिकांचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी अभियान राबविण्यात यावे, असे निर्देश श्री.भुसे यांनी दिले होते. त्यानुसार हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
विविध समस्यांचे निवारण करण्यासाठी तालुका व जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे. जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पोलीस अधीक्षक, महानगरपालिका आयुक्त, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, उपवनसंरक्षक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अधिक्षक अभियंता सा.बां.वि., अधिक्षक अभियंता जलसंपदा, अधिक्षक अभियंता महावितरण, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा अधिक्षक भूमीअभिलेख, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, माजी सैनिक जिल्हा संघटनेचा एक प्रतिनिधी, संरक्षण विभागातील एक प्रतिनिधी अशा सदस्यांची समिती असेल. तर निवासी उपजिल्हाधिकारी सदस्य सचिव असतील.
त्याचप्रमाणे तालुका स्तरावर उपविभागीय अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी, गटविकास अधिकारी पं.स., सहा. निबंधक सहकारी संस्था, तालुका कृषि अधिकारी, मुख्याधिकारी नगरपालिका/नगरपंचायत, उपअधिक्षक भूमी अभिलेख, तालुक्यातील माजी सैनिक संघटनेचा एक प्रतिनिधी, विशेष निमंत्रित हे या समितीचे सदस्य असतील. तहसिलदार समितीचे सदस्य सचिव असतील.
दर महिन्याच्या तिस-या सोमवारी लोकशाही दिनाच्या धर्तीवर “अमृत जवान सन्मान दिन” आयोजित करण्यात यावा असे निर्देश देण्यात आले आहेत.
हे अभियान राबविण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. प्रत्येक तहसिल कार्यालयात एक खिडकी कक्ष या तत्वाप्रमाणे सहायता कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. या कक्षासाठी स्वतंत्र कर्मचा-याची नेमणूक होणार असून दुपारी 12 ते 3 या कालावधीत विभागांकडील विविध तक्रार अर्ज स्विकारण्यात येतील व संबंधितांना प्राप्त झालेल्या अर्जाची पोहोच तात्काळ देवून अर्ज संबंधित विभागाकडे वर्ग होणार आहे. प्रलंबित तक्रारी निवारण्यासाठी प्रत्येक विभागाला ठराविक कालमर्यादा असेल व त्याचे सनियंत्रण जिल्हाधिकारी करतील. हा शासन निर्णय, महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्र. २०२२०४१३१५२८००५२०७ असा आहे.
0000
ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतांसमवेत
महिला सक्षमीकरणाच्या योजनांबाबत सकारात्मक चर्चा
- ॲड. यशोमती ठाकूर.
मुंबई, दि. 13 - महिला सक्षमीकरण व विकासाच्या विविध योजना व उपक्रम महिला व बालविकास विभागामार्फत राबविल्या जातात. या योजना व उपक्रमाबाबत ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतांसमवेत सकारात्मक चर्चा झाली असून त्यांचे यासाठी सहकार्य मिळणार आहे, असे महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावासाचे कॉन्सुलेट जनरल मायकल ब्राऊन यांनी महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली. यावेळी तसनिम वाहनवटी उपस्थित होत्या.
महिला व बालकांसाठी शासनाच्या विविध योजना असून त्याची माहिती यावेळी मंत्री ॲड. ठाकूर यांनी दिली. महिला सक्षमीकरणाच्या योजनांबाबत ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावास, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त व महिला व बालविकास आयुक्त यांच्या समवेत पुढील आठवड्यात बैठकीचे आयोजन करावे,असे निर्देश संबंधितांना दिले.
कॉन्सुलेट जनरल मायकल ब्राऊन म्हणाले, महिलांचे सक्षमीकरण तसेच महिलांचे विविध प्रश्न व अडचणी सोडवण्यासाठी ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावासाचे सहकार्य मिळेल. तसेच महिला सक्षमीकरणाच्या योजना राबविण्यासाठी सामाजिक संस्थांची मदतही घेतली जाईल.
००००
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०१९ परीक्षेच्याअंतिम निकाल जाहीर.
मुंबई दि.१३ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक ४ ऑक्टोबर, २०२१ ते २ फेब्रुवारी, २०२२ या कालावधीत महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०१९ करीता मुलाखती घेण्यात आलेल्या परीक्षेचा अंतिम निकाल दिनांक १३ एप्रिल, २०२२ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यानुसार एकूण आठ संवर्गातील ११४५ पदांपैकी ११४३ पदांवर उमेदवारांची शिफारस करण्यात येत आली आहे. परीक्षेच्या अंतिम निकालात एकूण ११४५ उमेदवारांपैकी अनाथांसाठी आरक्षित असलेल्या दोन पदांपैकी एक पद तसेच दिव्यांग श्रवण शक्तीतील दोष या प्रवर्गाकरीता आरक्षित असलेले एक पद पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने रिक्त ठेवण्यात आले आहे.
या परीक्षेमध्ये स्वप्नील सुनिल पाटील हे राज्यातून सर्वसाधारण तसेच मागास प्रवर्गातून प्रथम आले आहेत व श्रीमती अनुजा प्रभाकर फडतरे या महिलांमधून राज्यात प्रथम आल्या आहेत. उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरीता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण (cut off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
सर्वसाधारण गुणवत्ता यादी दिनांक १२ फेब्रुवारी, २०२२ रोजी प्रसिध्द करण्यात आली. त्यावेळी समान गुण धारण करणाऱ्या गुणवत्ताधारक उमेदवारांबाबत आयोगाच्या कार्यनियमावलीतील सुधारणेच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात आली होती. तथापि, अन्य एका परीक्षेच्या न्यायिक प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जाहीरातीच्या दिनांकास वैध असलेल्या तरतूदीनुसार कार्यवाही अनुसरणे क्रमप्राप्त ठरत असल्याने आयोगाच्या कार्यनियमावलीतील परिच्छेद १० (७) मधील तरतूदीनुसार समान गुण धारकांचा प्राधान्यक्रम व गुणवत्ता क्रम निश्चित करण्यात आला आहे.
या परीक्षेच्या निकालाधारे शिफारसपात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांच्या शिफारशी विषयांकित परीक्षेच्या आवेदनपत्रातील दाव्यांच्या पृष्ठ नियुक्तीच्यावेळी त्यांची पात्रता मूळ प्रमाणपत्रांवरून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून करण्यात येत आहेत. उमेदवारांनी आवेदनपत्रात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अथवा आवेदनपत्रातील दाव्यानुसार आवश्यक प्रमाणपत्रांची पूर्तता नियुक्तीच्यावेळी न केल्यास, शासनस्तरावर अधिसूचनेतील तरतूदीनुसार दावे तपासतांना व अन्य कारणांमुळे अपात्र ठरणाऱ्या संबंधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.
अंतिम निकालात अर्हताप्राप्त / शिफारसपात्र न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलवर पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत, आयोगाकडे Online पध्दतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे.
अशी माहिती प्रसिध्दी पत्राद्वारे उपसचिव, परीक्षोत्तर राजपत्रित परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांनी दिली आहे.
00000
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागातर्फमुंबईत भव्य कार्यक्रमाचे आयोजन.
मुंबई ,दि.13 - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यावर्षी राज्यभरात उत्साहात साजरी करण्यात येत असून, यानिमित्त सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून. 06 एप्रिल ते 16 एप्रिल दरम्यान राज्यभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम सुरू आहे. 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात सामाजिक न्याय विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आला आहे.
दुपारी 12 वाजता होणा-या या कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री, खा. शरदचंद्र पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, राज्यमंत्री विश्वजीत कदम, खासदार अरविंद सावंत, आमदार राहुल नार्वेकर यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन व अन्य उपक्रम होणार आहे.
यामध्ये मार्जिन मनी लाभार्थींना धनादेश वितरण, परदेश शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा गौरव, यूपीएससी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आदी कार्यक्रमांसह समान संधी केंद्रांचे प्रातिनिधिक उद्घाटन होणार आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस सकाळी दहा वाजता प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा भीमगीतांचा कार्यक्रम होणार आहे.
भारत देशाला संवैधानिक दिशा देणाऱ्या प्रज्ञासूर्य, ज्ञानाचा अखंड तेजपुंज, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक योगदानाचा परिपाक सामाजिक न्याय विभाग असून, आदरणीय बाबासाहेबांनी पाहिलेले व्यापक व सर्वसमावेशक सामाजिक न्यायाचे स्वप्न साकार करणे हेच आमचे ध्येय असल्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
कोविड निर्बंधांच्या दोन वर्षांच्या काळानंतर प्रथमच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती व्यापक स्वरूपात व सार्वजनिकरित्या साजरी होत असून, सन्मानाने जगण्यासह, समानता व न्यायाचा समान अधिकार देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र नमन करत सर्व जनतेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत, तसेच मुंबई येथे होत असलेल्या या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले आहे.
या कार्यक्रमाची तयारी सामाजिक न्याय विभागाच्यावतीने करण्यात आली असून, कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन विभागाचे सचिव सुमंत भांगे, आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टी महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनीही केले आहे.
0000
Featured post
-
सहा वेगवेगळ्या पर्यायातून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायावर सहमती सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर , एमएमआरडीएने सवि...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
-
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार मोक drill म्हणजे संकटकाळी बचाव प्रशिक्षण प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की , अश...