डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागातर्फमुंबईत भव्य कार्यक्रमाचे आयोजन.
मुंबई ,दि.13 - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यावर्षी राज्यभरात उत्साहात साजरी करण्यात येत असून, यानिमित्त सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून. 06 एप्रिल ते 16 एप्रिल दरम्यान राज्यभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम सुरू आहे. 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात सामाजिक न्याय विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आला आहे.
दुपारी 12 वाजता होणा-या या कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री, खा. शरदचंद्र पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, राज्यमंत्री विश्वजीत कदम, खासदार अरविंद सावंत, आमदार राहुल नार्वेकर यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन व अन्य उपक्रम होणार आहे.
यामध्ये मार्जिन मनी लाभार्थींना धनादेश वितरण, परदेश शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा गौरव, यूपीएससी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आदी कार्यक्रमांसह समान संधी केंद्रांचे प्रातिनिधिक उद्घाटन होणार आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस सकाळी दहा वाजता प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा भीमगीतांचा कार्यक्रम होणार आहे.
भारत देशाला संवैधानिक दिशा देणाऱ्या प्रज्ञासूर्य, ज्ञानाचा अखंड तेजपुंज, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक योगदानाचा परिपाक सामाजिक न्याय विभाग असून, आदरणीय बाबासाहेबांनी पाहिलेले व्यापक व सर्वसमावेशक सामाजिक न्यायाचे स्वप्न साकार करणे हेच आमचे ध्येय असल्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
कोविड निर्बंधांच्या दोन वर्षांच्या काळानंतर प्रथमच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती व्यापक स्वरूपात व सार्वजनिकरित्या साजरी होत असून, सन्मानाने जगण्यासह, समानता व न्यायाचा समान अधिकार देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र नमन करत सर्व जनतेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत, तसेच मुंबई येथे होत असलेल्या या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले आहे.
या कार्यक्रमाची तयारी सामाजिक न्याय विभागाच्यावतीने करण्यात आली असून, कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन विभागाचे सचिव सुमंत भांगे, आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टी महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनीही केले आहे.
0000
No comments:
Post a Comment