Tuesday, 22 February 2022

 राज्यात 27 फेब्रुवारीरोजी पल्स पोलिओ मोहीम

एक कोटी पंधरा लाख बालकांना डोस देणार
        मुंबई दि. 22 : राज्यातील सर्व जिल्ह्यात येत्या रविवारी, 27 फेब्रुवारी 2022 रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबविली जाणार आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी योगदान द्यावे, असे आवाहन आरोग्य सेवा आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी केले.
        यंदाच्या वर्षीच्या मोहिमेत एक कोटी पंधरा लाख मुलांना पल्स पोलिओचा डोस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
        पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 27 फेब्रुवारीला राज्यातील सर्व जिल्ह्यात एकाचवेळी राबविण्यात येणार आहे. मोहिमेची पूर्वतयारी करण्यासाठी राज्य कृती दलाची बैठक गोकुळदास तेजपाल रुग्णालयातील मंथन सभागृहात झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.
        बैठकीस आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील, अवर सचिव मं.प. कुडतरकर, महिला बालकल्याण विभाग सहाय्यक आयुक्त नितीन मस्के, आदिवासी विकास विभागाचे कार्यासन अधिकारी सचिन खांडेकर, इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. धीरेन कलवाडीया, डॉ. हेमंत बंगोलिया आदी उपस्थित होते.
        डॉ. रामास्वामी यांनी सांगितले की, बालकांच्या सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी पल्स पोलिओ आणि मिशन इंद्रधनुष्य लसीकरण अतिशय महत्त्वाचे आहे. या दोन्ही लसीकरणाचे नियोजन करताना कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणावर परिणाम होऊ देऊ नका. पल्स पोलिओ आणि मिशन इंद्रधनुष्य लसीकरण मोहीमही मिशन मोडवरच राबविणे आवश्यक आहे.
        पल्स पोलिओ आणि मिशन इंद्रधनुष्य लसीकरण मोहीमेसाठी महसूल, पोलीस, सहकार, शिक्षण, महिला बालविकास आणि नगरविकास विभागाचे जिल्ह्यातील अधिकारी यांना सहभागी करुन घ्यावे. याबाबत लोकांत जागृती निर्माण व्हावी यासाठी जिल्हास्तरावर प्रचार-प्रसिद्धी करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
        डॉ. अर्चना पाटील यांनी लसीकरणाची गरज, मोहिमेची केली जाणारी तयारी याबाबत माहिती दिली. सहाय्यक संचालक डॉ. सचिन देसाई यांनी मोहिमेबाबतच्या तयारीची माहिती सादरीकरण व्दारे दिली.
बैठकीस शालेय शिक्षण विभाग, आदिवासी विकास विभाग, शालेय शिक्षण विभाग, पश्चिम रेल्वे, महिला बालकल्याण, ग्राम विकास विभाग, नगर विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेबाबत
राज्यातील सर्व जिल्ह्यात २७ फेब्रुवारीला राबविणार
 एक कोटी पंधरा लाखाहून अधिक बालकांना डोस देण्याचे नियोजन
राज्यासाठी १.५४ कोटी डोस उपलब्ध
राज्यात ९२९५३ बूथ उभारणार
आरोग्य विभागाची २६१२६९ पथके घरोघरी भेट देणार
ट्रान्झिट पथकांची संख्या २९१२१
मोबाईल पथकांची संख्या १५१८२
आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, एएनएम यांचा सहभाग घेणार
मिशन इंद्रधनुष्य लसीकरण
मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात लसीकरण केले जाणार
सात मार्च, चार एप्रिल आणि नऊ मे पासून सलग सात दिवस मोहिम राबविण्यात येणार.
नऊ जिल्हे आणि दहा महापालिका कार्य क्षेत्रात लसीकरण मोहीम राबविण्यात येणार
गर्भवती आणि दोन वर्षांखालील मुलांना लस देणार
****
वृत्त क्र

Holo re Holi

 


 राष्ट्रीय लोकअदालत 12 मार्च रोजी

·       राज्यात सर्व जिल्ह्यांत व तालुक्यात आयोजन
 
            मुंबई, दि. 22 : विधी सेवा प्राधिकरण अधिनियम, 1987 मधील तरतुदी अंतर्गत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात तालुका, जिल्हा व उच्च न्यायालयात एकाच दिवशी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले आहे. राष्ट्रीय लोकअदालत दि. 12 मार्च 2022 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे, असे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव यांनी कळविले आहे.
0000

 मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटन मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करावे व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या कार्यक्रमाला सन्मानाने बोलवावे


– आ. अतुल भातखळकर यांची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी

          मुंबई शहरातील अंधेरी पूर्व व दहिसर पूर्व तसेच अंधेरी पश्चिम व दहिसर पश्चिम या दोन्ही मेट्रो मार्गीकांचे उद्घाटन पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते करावे अशी मागणी मुंबई भाजपा प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.

          मुंबई शहराच्या एकात्मिक मेट्रो वाहिन्यांच्या प्रकल्पांमध्ये केंद्र सरकारचे मोठे योगदान आहे. त्याचबरोबर मुंबई शहरातील मेट्रो प्रकल्प चालू करण्यामध्ये माजी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचा सिंहाचा वाटा आहे, त्यामुळे या उद्घाटनाच्या कार्यक्रमात त्यांनाही प्रमुख अतिथी म्हणून सन्मानाने बोलवावे अशी मागणी ही आ. भातखळकर यांनी केली आहे. तसेच श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात सुरू झालेले अनेक मोठे प्रकल्प ज्यांची उद्घाटने गेल्या दोन वर्षात झाली, त्यावेळेस श्री. देवेंद्र फडणवीस यांना न बोलावून ठाकरे सरकारने आपल्या कोत्या मनोवृत्तीचे दर्शन घडवले असल्याची टीका ही आ. भातखळकर यांनी केली आहे.

          मेट्रो मार्गीकांचे उद्घाटन पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते करून आणि माजी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना या कार्यक्रमाला सन्मानाने बोलावून मुख्यमंत्र्यांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवावा असे ही आ. भातखळकर शेवटी म्हणाले.


*रायगडकरांची स्वप्नपूर्ती…!*

*अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय प्रशासकीय इमारतीचा भूमीपूजन सोहळा होणार संपन्न*

     *अलिबाग,दि.21(जिमाका):-* अलिबाग तालुक्यातील मौजे उसर येथील नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या प्रशासकीय इमारतीचा भूमीपूजन सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते, खासदार शरदचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, दि.22 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता संपन्न होणार आहे. अखेर रायगडकरांची स्वप्नपूर्ती झाली.

     हा भूमीपूजन सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र शामगोंडा पाटील यड्रावकर, राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु.आदिती तटकरे, रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता जगन पारधी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

     तर खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनील तटकरे, आमदार जयंत पाटील, आमदार निरंजन डावखरे, आमदार बाळाराम पाटील, आमदार अनिकेत तटकरे, आमदार भरत गोगावले, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रवीशेठ पाटील, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेश बालदी, महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षण आयुक्त विरेंद्र सिंग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये महाराष्ट्र राज्य सचिव सौरभ विजय हे या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

     रायगड जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून कु.आदिती तटकरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर रायगडकरांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्वप्नपूर्ती झाली आहे.

     जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी अलिबाग येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित 500 खाटांचे रुग्णालय सुरु करण्यासाठी आवश्यक बांधकाम यंत्रसामुग्री व पद निर्मितीस शासनाने मान्यता प्रदान केली असून अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या इमारत बांधकामासाठी तब्बल 406 कोटी 96 लाख 68 हजार 336 रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकास शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.

     महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांच्या दि.31 जानेवारी 2012 च्या शासन निर्णयानुसार केंद्र शासनाच्या व भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मान्यतेच्या अधीन राहून अलिबाग येथे प्रत्येकी 100 विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व 500 खाटांचे संलग्नित रुग्णालय सुरु करण्यास मान्यता देण्यात आली.

     त्यानुषंगाने अलिबाग तालुक्यातील मौजे ऊसर येथील सर्व्हे नं. 75/1अ क्षेत्र 17-10-14 हेक्टर आर. मधील अनुक्रमे 6-00-00 हेक्टर आर व 3-50-00 हेक्टर आर या सरकारी गुरचरण ग्रुप ग्रामपंचायत खानाव यांच्या नावे असलेल्या जमिनी पुनर्ग्रहित करून संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांना नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न रुग्णालयाकरिता प्रदान करण्यात आल्या. तसेच मौजे ऊसर येथील सर्व्हे नं. 75 / 1क, क्षेत्र 07-50-40 हेक्टर आर. मधील 4-00-44 हेक्टर आर. या महाराष्ट्र शासन, औद्योगिक विकास महामंडळाच्या नावे असलेल्या जमिनी शासनजमा करून संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांना नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न रुग्णालयाकरिता अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग यांना प्रदान करण्यात आल्या आहेत.

     आतापर्यंत अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्याच्याशी संलग्नित 500 रुग्णखाटांच्या रुग्णालयाकरिता पुढील चार वर्षात एकूण 1 हजार 72 पदांची निर्मिती करण्यास तसेच त्याकरिता येणाऱ्या रु.61.68 कोटी इतक्या अंदाजित खर्चास वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने मंजूरी दिली आहे.

     या नियोजित नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी यापूर्वी शासनाने मंत्रीमंडळ बैठकीत देण्यात आलेल्या मान्यतेनुसार आवश्यक पदनिर्मिती करण्यास उच्चस्तरीय समितीच्या मान्यतेची अटही शिथील करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

     तरी नागरिकांनी, प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी या भूमीपूजन सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन पालकमंत्री कु.आदिती तटकरे, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.महेंद्र कुरा यांनी केले आहे.


00000

 पहिल्या राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे

· मुंबई उपनगर जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांचे आवाहन

            मुंबई, दि. 21 : भारत निवडणूक आयोगाने 2022 च्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त "माझे मत माझे भविष्य एका मताचे सामर्थ्य’ ही राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेसाठी 15 मार्च, 2022 पर्यंत प्रवेशिका स्वीकारण्यात येणार आहेत.

            भारत निवडणूक आयोगामार्फत मतदार जनजागृती होण्याच्या दृष्टीकोनातून राष्ट्रीय मतदारजागृती स्पर्धेत ( National Voters Awareness Contest), जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदविण्याचे आवाहन श्रीमती निधी चौधरी, जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांनी केले आहे.   

            स्वीप कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा आयोजित करुन भारत निवडणूक आयोग सामान्य लोकांच्या प्रतिभा आणि सर्जनशीलतेचा वापर लोकशाही बळकट करण्यासाठी करीत आहे. यामध्ये सर्व वयोगटांना सहभागी होता येणार आहे. सामूहिक सहभागातून लोकशाहीतील प्रत्येक मताचे महत्व विषद करण्याच्या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित कल्पना व मजकुरांचा गौरव करणे, असा यामागील उद्देश आहे

            "माझे मत माझे भविष्य एका मताचे सामर्थ्य" या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत 5 प्रकारच्या स्पर्धा होत आहेत. यामध्ये प्रश्नमंजुषा, घोषवाक्य, गीत गायन, व्हिडिओ मेकिंग, आणि भित्तीचित्र स्पर्धा यांचा समावेश आहे. प्रश्नमंजुषा स्पर्धेद्वारे निवडणूकीबाबतची जागरुकता पातळी जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. स्पर्धकांनी तपशिलवार मार्गदर्शन तत्वे, नियम आणि अटी यांच्या माहितीसाठी स्पर्धेचे संकेतस्थळ https://ecisveep.nic.in/contest/ येथे भेट द्यावी. प्रवेशिका सर्व तपशिलासह voter-contest@eci.gov.in येथे ई-मेल करावी. ई-मेल करतांना स्पर्धेचे नांव आणि श्रेणी याचा विषयात उल्लेख करावा. प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी, स्पर्धकांनी स्पर्धा संकेतस्थळावर नोंदणी करावी. सर्व प्रवेशिका 15 मार्च 2022 पर्यंत सहभागी स्पर्धकांच्या तपशिलासह voter-contest@eci.gov.in या ई-मेलवर पाठविण्यांत याव्यात असे मा. भारत निवडणूक आयोगाच्या वतीने कळविण्यांत आले आहे. 

0000


 



 

Featured post

Lakshvedhi