Tuesday, 22 February 2022


*रायगडकरांची स्वप्नपूर्ती…!*

*अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय प्रशासकीय इमारतीचा भूमीपूजन सोहळा होणार संपन्न*

     *अलिबाग,दि.21(जिमाका):-* अलिबाग तालुक्यातील मौजे उसर येथील नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या प्रशासकीय इमारतीचा भूमीपूजन सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते, खासदार शरदचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, दि.22 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता संपन्न होणार आहे. अखेर रायगडकरांची स्वप्नपूर्ती झाली.

     हा भूमीपूजन सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र शामगोंडा पाटील यड्रावकर, राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु.आदिती तटकरे, रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता जगन पारधी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

     तर खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनील तटकरे, आमदार जयंत पाटील, आमदार निरंजन डावखरे, आमदार बाळाराम पाटील, आमदार अनिकेत तटकरे, आमदार भरत गोगावले, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रवीशेठ पाटील, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेश बालदी, महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षण आयुक्त विरेंद्र सिंग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये महाराष्ट्र राज्य सचिव सौरभ विजय हे या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

     रायगड जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून कु.आदिती तटकरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर रायगडकरांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्वप्नपूर्ती झाली आहे.

     जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी अलिबाग येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित 500 खाटांचे रुग्णालय सुरु करण्यासाठी आवश्यक बांधकाम यंत्रसामुग्री व पद निर्मितीस शासनाने मान्यता प्रदान केली असून अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या इमारत बांधकामासाठी तब्बल 406 कोटी 96 लाख 68 हजार 336 रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकास शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.

     महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांच्या दि.31 जानेवारी 2012 च्या शासन निर्णयानुसार केंद्र शासनाच्या व भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मान्यतेच्या अधीन राहून अलिबाग येथे प्रत्येकी 100 विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व 500 खाटांचे संलग्नित रुग्णालय सुरु करण्यास मान्यता देण्यात आली.

     त्यानुषंगाने अलिबाग तालुक्यातील मौजे ऊसर येथील सर्व्हे नं. 75/1अ क्षेत्र 17-10-14 हेक्टर आर. मधील अनुक्रमे 6-00-00 हेक्टर आर व 3-50-00 हेक्टर आर या सरकारी गुरचरण ग्रुप ग्रामपंचायत खानाव यांच्या नावे असलेल्या जमिनी पुनर्ग्रहित करून संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांना नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न रुग्णालयाकरिता प्रदान करण्यात आल्या. तसेच मौजे ऊसर येथील सर्व्हे नं. 75 / 1क, क्षेत्र 07-50-40 हेक्टर आर. मधील 4-00-44 हेक्टर आर. या महाराष्ट्र शासन, औद्योगिक विकास महामंडळाच्या नावे असलेल्या जमिनी शासनजमा करून संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांना नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न रुग्णालयाकरिता अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग यांना प्रदान करण्यात आल्या आहेत.

     आतापर्यंत अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्याच्याशी संलग्नित 500 रुग्णखाटांच्या रुग्णालयाकरिता पुढील चार वर्षात एकूण 1 हजार 72 पदांची निर्मिती करण्यास तसेच त्याकरिता येणाऱ्या रु.61.68 कोटी इतक्या अंदाजित खर्चास वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने मंजूरी दिली आहे.

     या नियोजित नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी यापूर्वी शासनाने मंत्रीमंडळ बैठकीत देण्यात आलेल्या मान्यतेनुसार आवश्यक पदनिर्मिती करण्यास उच्चस्तरीय समितीच्या मान्यतेची अटही शिथील करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

     तरी नागरिकांनी, प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी या भूमीपूजन सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन पालकमंत्री कु.आदिती तटकरे, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.महेंद्र कुरा यांनी केले आहे.


00000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi