Friday, 4 February 2022

 व्याघ्रदर्शनासाठी ताडोबा जागतिकस्तरावर सर्वोत्तम ठिकाण व्हावे

यासाठी एकात्मिक पर्यटन आराखडा सादर करावा

                                             - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

            मुंबई, दि. 3 : ताडोबा हे व्याघ्रदर्शनासाठी जागतिक स्तरावरचे सर्वोत्तम स्थळ व्हावे यादृष्टीने पर्यावरणाचे रक्षण करत पर्यटन विकासाचा एकात्मिक आराखडा तयार करावा अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वन विभागास दिल्या. यासाठी आवश्यक असणारा निधीही टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिला जावा असेही ते यावेळी म्हणाले.

            मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन वाढीच्यादृष्टीने करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, अपर मुख्यसचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, वन‍ विभागाचे प्रधान सचिव वेणु गोपाल रेड्डी, प्रभारी वनबल प्रमुख वाय. एल. पी. राव, प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, यांच्यासह वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

            पर्यावरणाचे रक्षण करतांना नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून पर्यटन विकासाला कशी चालना देता येईल याचा विचार करावा असे सांगून मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की, चंद्रपूर शहरालगत व्याघ्रसफारी आणि वन्यजीव बचाव केंद्र निमिर्तीच्या प्रस्तावित करण्यात आलेल्या प्रकल्पाचे परिपूर्ण नियोजन करावे. येथे वनीकरण कार्यक्रमातून वृक्ष लागवड करण्यात यावी, जेणेकरून वन्यजीवांना नैसर्गिक अधिवास मिळू शकेल. वन अकादमीनजिक जे वन्यजीव रेस्क्यु सेंटर प्रस्तावित करण्यात आले आहे त्यास सेंट्रल झु ॲथॉरिटीची मंजूरी मिळालेली आहे. याला जोडूनच व्याघ्र सफारी करण्याचेही प्रस्तावित आहे. या दोन्ही प्रकल्पाचे परिपूर्ण नियोजन करण्यात येऊन अंमलबजावणीचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात यावा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

वैयक्तिक सोलर कुंपण

            मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी तसेच शेत पिकांचे नुकसान टाळण्यासाठी बफर क्षेत्रातील शेतकऱ्यांना वैयक्तिक सोलर कुंपण वितरीत करण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी लवकरात लवकर सादर करावा असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

ताडोबा भवन

            ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत असेलेली तीन कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी ताडोबा भवनाच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यासाठी एकूण १८ कोटी रुपयांची आवश्यकता असून या वित्तीय वर्षात ३ कोटी तर उर्वरित निधीची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात यावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

            ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील रानतळोधी, कोळसा या गावाचे पुनर्वसन करण्यासंदर्भातही बैठकीत चर्चा करण्यात आली. यासाठी एकूण ६४ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. चालू व येणाऱ्या आर्थिक वर्षात तरतूद करण्याच्या सूचना मुख्यमंत्री यांनी दिल्या

            राज्य वन्यजीव मंडळाच्या १७ व्या बैठकीत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील अंधारी अभयारण्याचा क्षेत्र विस्तार करण्यास व हे क्षेत्र गाभा क्षेत्रात समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. या विस्तारीकरणाचा प्रस्ताव राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे सादर करण्यात येणार असून या प्रस्तावास मंजूरी मिळाल्यानंतर कारवा गावाच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. यासाठी ७० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे अशी माहितीही बैठकीत देण्यात आली.

            ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोअर व बफर क्षेत्रातील बांबूला फुलोरा येण्यास सुरुवात झाली असून यासंबंधीचा नियोजन आराखडा तयार करण्यात आला आहे. यात बांबू कुपांची कामे, जाळरेषेचा विस्तार, अतिरिक्त अग्नि संरक्षक मजूर लावणे, बिनतारी संदेशन यंत्रणेचे बळकटीकरण करणे, बांबू बिया गोळा करून सीड बॉल तयार करणे अशा विविध कामांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठीही निधीची तरतूद करण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी दिले.



 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना श्रद्धांजली

            मुंबई, दि. 3 :- मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या सदाबहार अभिनयाची छाप उमटवणारा, मनस्वी असा अभिनेता आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

            शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचा परवाच वाढदिवस होता. शुभेच्छांचा ओघ सुरू असतानाच त्यांचे आपल्यातून जाणे दुःखदायक आहे. त्यांनी एक उत्तम कलावंत म्हणून आयुष्यभर कलाक्षेत्राची सेवा केली. रमेश देव यांनी मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली. दोन्हीकडे आपल्या अभिनयाची छाप उमटवली. त्यांचे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्नेहबंध होते. त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणातही संधी आजमावली होती. चित्रपट सृष्टीत त्यांना आदराचे स्थान होते. देव कुटुंबीयांकडून कला क्षेत्राची अविरत सेवा सुरू आहे. दिवंगत रमेश देव हे कला क्षेत्रात दोन पिढ्यांना जोडणारा महत्त्वाचा आणि मार्गदर्शक असा दुवा होते. त्यांनी सदाबहार आणि मनस्वी कलाकार अशी प्रतिमा आयुष्यभर जपली. त्यांचे चित्रपट क्षेत्रातील योगदान विसरता येणार नाही असे आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दिवंगत ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

 दिलखुलास' कार्यक्रमात पर्यटन संचालनालयाचे

सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर यांची मुलाखत

            मुंबई, दि. 2 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' या कार्यक्रमात पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर यांच्या मुलाखतीचे पुनः प्रसारण करण्यात येणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच 'न्यूज ऑन एआयआर' या ॲपवर गुरुवार दि. 3 आणि शुक्रवार दि. 4 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            पर्यटन संचालनालयाच्या स्थापनेमागचा उद्देश, भूमिका आणि रचना, राज्यात युनेस्कोने जाहीर केलेली पर्यटनस्थळे, पर्यटनाला चालना देण्यासाठी राबविण्यात येत असलेले उपक्रम आणि योजना, पर्यटन संचालनालयाची प्रसिद्धी मोहीम, कृषी पर्यटन धोरण, तीर्थक्षेत्र पर्यटनाला चालना देण्यासाठीच्या उपाययोजना आदी विषयांची माहिती डॉ. सावळकर यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे.

Thursday, 3 February 2022

Pension

 . पेन्शनर व फॅमिली पेन्शन घेणाऱ्या   सर्वांसाठी अत्यंत         महत्वाचे

भारत सरकार ने दिनांक १५-०५-२०२० रोजी पेन्शन देणाऱ्या सर्व बँकांना एक महत्वाची सूचना वजा ऑर्डर देणेसाठी एक पत्र प्रसिद्ध केले आहे या पत्राचे थोडक्यात मराठी रूपांतर

पेन्शनर व फॅमिली पेन्शन घेणाऱ्या सर्वांसाठी अत्यंत महत्वाचे. मित्रानो भारत सरकारने दिनांक १५-०५-२०२० रोजी पेन्शन देणाऱ्या सर्व बँकांना एक महत्वाची सूचना वजा ऑर्डर देणेसाठी एक पत्र प्रसिद्ध केले आहे. ते तुमच्या आमच्यासाठी अत्यंत महत्वाचे लेटर असून जरूर वाचा आणि उपयोग करून घ्या.

पत्राचा विषय-- पेन्शन व फॅमिली पेन्शन देणाऱ्या बँकांना सूचना

१) बँकेला पहिली पेन्शन खात्यावर जमा करून देण्यासाठी पेन्शनरला बँकेत बोलावता येणार नाही तशी सक्ती करता येणार नाही कारण जर खात्यावर जास्तीचे पैसे आलेतर वसूल करण्यासाठीची ऍथॉरिटी P P O बरोबर बँकेला दिली असते.

२) पेन्शन धारक मयत झाल्यावर त्याच्या पत्नीस किंवा नवऱ्यास ( वारासदारास) फॉर्म नुंबर १४ भरून देणेस बँकेत बोलावू नये. कारण वारसदारास फॅमिली पेन्शन देण्याची ऑर्डर आधीच P P O बरोबर बँकेला दिली असते.

बँकेनी फक्त मृत्यूचा दाखला मिळाल्यानंतर वारसदारची ओळख P P O वरून करून KYC फॉर्म भरून घेऊन फॅमिली पेन्शन सुरु करून देणेही आहे त्याचे कॅल्क्युलेशन बँकेनेच करायचे आहे. या कामासाठी वारसदार बँकेत आला पाहिजे असा आग्रह बँकेस करता येणार नाही.

३) बँकेस फॅमिली पेन्शनरला नवीन खाते उघडण्यास सक्ती करता येणार नाही जर पेन्शन खाते अगोदरच जॉईंट अकाउंट असेल तर

४ /५) ग्रुप A ऑफिसरला पेन्शन नंतर एक वर्षांनी "दुसरी नोकरी करत नसल्याचे प्रमाणपत्र" मागण्याची सक्ती करता येणार नाही. जर संबंधित ऑफिसरने बँकेला पत्र दिलेतरच बँक पेन्शन देण्याचे बंद करू शकेल.

६) ७) आणि ९) जर फॅमिली पेन्शन जर त्याच्या मुलास,मुलीस किंवा अपंग मुलं मुलीस मिळत असेल तर अश्या लोकांनी बँकेस "दुसरे कुठलेही उत्पन्न नाही" असे प्रमाणपत्र दर वर्षी नोव्हेंबर मध्ये देणायचे कारण नाही बँकेने ते मागू नये जर मुलीस पेन्शन मिळत असेल तर दर सह महिन्यास लग्न न झाले बद्दल जे प्रमाणपत्र द्यावे लागत होते ते आता देऊ नये कारण असे प्रमाण मागण्याची सक्ती बँकेस करता येणार नाही.

 जर अपंग व्यक्तीस पेन्शन मिळत असेल तर आणि अपंगत्व कायमचे असेल तर एकदाच तसे सर्टिफिकेट द्यायचे आहे दर वर्षी नाही.

८) व १०) हयातीचा दाखला म्हणून बँकेने "जीवन प्रमाणपत्राचा दाखला" स्वीकारायचा आहे. तो आपण मान्यता प्राप्त संस्थेकडून मिळून घेऊ शकता त्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही ८० वर्षे वरील लोक फॉर्म भरून देऊ शकतात 

हयातीचा दाखला बँक घरी येऊन सुद्धा घेण्याची सोय झाली आहे त्यासाठी बँकेने फक्त ६० रुपये आकरायचे आहेत तुमच्या मोबाइलला वर sms किंवा तुम्हाला ई-मेल येईल त्याला तुम्ही अशी सुविधा घेणार आहात काय असा मेसेज आल्यावर तुम्ही होकार कळवायचा आहे.

१०) कम्युटेशन जी पेन्शन मधून वजा झालेली असते ती १५ वर्षांनी रिस्टोर होते ती आता बँकेनेच करायची आहे. त्यासाठी पेन्शन धारकाने कोणताही अर्ज कोठेही करण्याची गरज नाही जर त्या संबंधी माहिती PPO मध्ये मिळत नसेल तर बँकेने संबंधित विभागाकडून ती मिळवायची आहे. तसेच बँकेने फॅमिली पेन्शन मधून कम्युटेशन पेन्शन वजा करु नये अशीही सूचना दिली आहे.

११) ८० वर्षे पूर्ण होतील त्या महिन्यापासून पेन्शन मध्ये २०% सरळ वाढ बँकेने काऊ पेन्शन द्याची आहे. हे काम आपोआप होईल कोणतेही लेटर देण्याचे कारण नाही. (८५ ते ९० वर्षे ३०% आणि ९० ते ९५ वर्षे ४०% व ९५ ते १०० वर्षे ५०% व १०० वर्ष्याच्या वर १००% पेन्शन वाढ होते)

              अत्यंत महत्वाचे पुढे पाठवा.

 


 सामाजिक कार्यात स्थानिकांचा सकारात्मक सहभाग आवश्यक

- पालकमंत्री कु.आदिती तटकरे

            मुंबई, दि. 2 : रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील मौजे तांबाटी येथे कॅन्सर हॉस्पीटल व रिसर्च सेंटर उभारण्यासाठी टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई यांच्याकडून मागणी प्राप्त झाली आहे. कॅन्सर या आजारावर सर्वसामान्यांसाठी होत असलेल्या आरोग्यसेवेसाठी व याप्रमाणे जिल्ह्यात होणाऱ्या प्रत्येक जनहितार्थ कार्यांचे नेहमीच स्वागत असल्याचे उद्योग राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी सांगितले.

            खालापूर तालुक्यातील मौजे डोणवत व मौजे तांबाटी येथील जागेची मागणी कॅन्सर हॉस्पीटल व रिसर्च सेंटरकरिता टाटा मेमोरियल सेंटर यांनी महसूल विभागाकडे केली आहे. याबाबत पुढील कार्यवाहीच्या अनुषंगाने आयोजित बैठकीमध्ये पालकमंत्री कु. तटकरे बोलत होत्या.   

            उद्योग राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे म्हणाल्या, ग्रामपंचायत हद्दीतील या जागेबाबत सविस्तर सर्वेक्षण अहवाल तयार करण्यात यावा. ग्रामस्थांना नागरी सुविधांसाठी आवश्यक असलेल्या जागेव्यतिरिक्त सविस्तर सर्वेक्षण अहवाल त्वरित सादर करावा. सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून होणाऱ्या प्रत्येक कार्यासाठी स्थानिकांचा सकारात्मक सहभाग असावा. त्याबाबत ग्रामपंचायत पातळीवर स्वागताची भूमिका कायम असावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

            यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य नरेश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, गटविकास अधिकारी बालाजी पुरी, कर्जतचे प्रांत अधिकारी अजित नैराळे, खालापूर तहसिलदार अयुब तांबोळी, तांबाटी गावचे सरपंच अनिल जाधव आदी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

            प्रस्तावित कॅन्सर रुग्णालयासंदर्भात माहिती देताना घनकचरा व्यवस्थापन, ओला-सेंद्रिय कचऱ्यातून बायोगॅस निर्मीती, सांडपाणी व्यवस्थापन आदीसाठी टाटा समूहामार्फत अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या उपाययोजना या परिसरात भविष्यात कार्यान्वित करण्यात येतील, असे टाटा मेमोरिअल कॅन्सर हॉस्पिटलचे प्रतिनिधी डॉ. बडवे यांनी सांगितले.

00000


 प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन

 

            मुंबईदि. 2 : महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयमुंबई शहर येथे सकाळी 11.00 वाजता आयोजित करण्यात येणार आहेअशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारीमुंबई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

            समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होवून न्याय मिळावा यादृष्टीने महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी. यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित केला जाणार आहे.

            या महिला लोकशाही दिनात तक्रार दाखल करण्याकरिता तक्रार अर्जाचा नमूना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय117 बी.डी.डी. चाळपहिला मजलावरळी मुंबई ४०००१८ येथे उपलब्ध आहे.

            अर्ज स्विकारण्यासाठी निकष अर्ज विहित नमुन्यात असावा तसेच तक्रार/ निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे. न्यायप्रविष्ठ प्रकरणेविहित नमुन्यात नसणारे व आवश्यक त्या कागदपत्राच्या न जोडलेला प्रतीचे अर्जसेवा विषयकआस्थापनाविषयक बाबी तसेच तक्रार/निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल तर अशा स्वरुपाचे अर्ज स्विकारले जाणार नाहीतअसे जिल्हा महिला व बालविकास अधिकारीमुंबई यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

0000

Featured post

Lakshvedhi