Friday, 4 February 2022

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना श्रद्धांजली

            मुंबई, दि. 3 :- मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या सदाबहार अभिनयाची छाप उमटवणारा, मनस्वी असा अभिनेता आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

            शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचा परवाच वाढदिवस होता. शुभेच्छांचा ओघ सुरू असतानाच त्यांचे आपल्यातून जाणे दुःखदायक आहे. त्यांनी एक उत्तम कलावंत म्हणून आयुष्यभर कलाक्षेत्राची सेवा केली. रमेश देव यांनी मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली. दोन्हीकडे आपल्या अभिनयाची छाप उमटवली. त्यांचे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्नेहबंध होते. त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणातही संधी आजमावली होती. चित्रपट सृष्टीत त्यांना आदराचे स्थान होते. देव कुटुंबीयांकडून कला क्षेत्राची अविरत सेवा सुरू आहे. दिवंगत रमेश देव हे कला क्षेत्रात दोन पिढ्यांना जोडणारा महत्त्वाचा आणि मार्गदर्शक असा दुवा होते. त्यांनी सदाबहार आणि मनस्वी कलाकार अशी प्रतिमा आयुष्यभर जपली. त्यांचे चित्रपट क्षेत्रातील योगदान विसरता येणार नाही असे आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दिवंगत ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi