सर्वांसाठी घरे योजनाबाबत शासन कटीबद्ध
· मुख्यमंत्र्यांनी स्विकारली तब्बल 1 हजार 51 नागरिकांकडून निवेदने
· हैद्राबाद हाऊस येथे आयोजित जनता दरबारात प्रातिनिधीक स्वरूपात पट्टे वाटप
· जनता दरबाराला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद
नागपूर, दि. 17 : नागपूर महानगरामध्ये अनेक वर्षांपासून स्वत:च्या मालकी हक्काचे घर व्हावे अशी ईच्छा हजारो झोपडपट्टीधारकांची आहे. या पासून वंचित असलेल्या लोकांना पट्टे वाटपाच्या माध्यमातून हक्काचे घर मिळत आहेत. निकषाची पुर्तता करणारा एकही व्यक्ती हक्काच्या घरांपासून वंचित राहणार नाही. जे झोपडपट्टीधारक शासनाच्या निकषात मोडतात त्यांनी आपल्या हक्काच्या घरासाठी महानगरपालिका, नझूल विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. हैदराबाद हाऊस येथे आयोजित जनता दरबाराचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 7 वेगवेगळया झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या 21 झोपडपट्टी धारकांना प्राथमिक स्वरुपात पट्टे वाटप करून झाला. यानंतर त्यांनी जनतेची निवेदने स्विकारली. यावेळी विधान परिषद सदस्य संदिप जोशी, आमदार प्रवीण दटके, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मीणा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, प्रभारी जिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, महामेट्रोचे महाव्यवस्थापक अनिल कोकाटे, आदी यावेळी उपस्थित होते.
सर्वासाठी घरे योजना-2022 या धोरणाची प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने नागपुर शहरामधील नझुलच्या जागेवरील 33 झोपडपट्टीच्या प्रस्तावातील 3 हजार 714 झोपडपट्टी धारकांचे अतिक्रमण नियमानुकुल करण्यात आले आहे. आजवर मंजुर पट्टेपैकी 2157 पी.टी.एस झोपडपट्टी धारकांना चलान देण्यात आलेले आहेत. पंरतु सदर अकृषीक आकारणीची रक्कम चलानव्दारे भरणा केलेली नसल्याने वाटप करण्यास शिल्लक आहे. याबाबत शिबीर घेवून कार्यवाही केली जात आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय (महसुल विभाग) नागपूर कडुन 18 झोपडपट्टी पैकी तुकडोजी नगर, कामगार कॉलनी, भांडेवाडी या 3 झोपडपट्टयामध्ये एकुण 160 झोपडपट्टी धारकांना पट्टे वाटप करण्यात आले आहेत. 474 संबधित पट्टेधारकांनी चलानाची रक्कम शासन जमा केल्यानंतर पट्टा वाटप करण्यात येईल. याबाबत दिनांक 20.5.2025 रोजी शिबीर आयोजीत करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.
उर्वरित चिंचभुवन, शामनगर, गिट्टीखदान, पन्नालाल देशराज नगर, आदिवासी नगर, पुनापुर, वाठोडा, भरतवाडा, हुडकेश्वर, कुराडपुरा, शोभाखेत, बिनाकी, कोष्टीपुरा, ठक्करग्राम व नारागाव या 15 झोपडपट्टीमध्ये 1121 पट्टे वाटप करणे शिल्लक आहे. त्यापैकी 2 झोपडपट्टी मध्ये पट्टे वाटपासाठी दिनांक 19 मे 2025 रोजी जिल्हास्तरीय समितीची बैठक आयोजीत करण्यात आलेली आहे.