आदिवासी समाज शब्दाला पक्का ‘नाही’ म्हटले तर नाहीच – आमदार विलास तरे
# आपल्या आदिवासी समाजाची एकजुटीची गरज; जागतिक आदिवासी दिनानिमित्त प्रेरणादायी संदेश
डहाणू / पालघर. ( प्रतिनिधी ) – “आदिवासी समाज हा नेहमीच शब्दाला पक्का असतो. त्याने एकदा ‘नाही’ म्हटले तर तो निर्णय बदलत नाही. जंगल, पाणी आणि निसर्गावर जर कोणाचा खरा अधिकार असेल, तर तो केवळ आदिवासी समाजाचा आहे,” असे प्रतिपादन आमदार विलास तरे यांनी केले.
यावेळी आमदार तरे म्हणाले, “७ ऑगस्ट २०१४ रोजी आदिवासी समाजावर झालेल्या अतिक्रमणाच्या विरोधात आम्ही ५० हजार लोकांना एकत्र करून ऐतिहासिक आंदोलन उभारले होते. ही ताकद केवळ एकतेमुळेच येते. "आपला वारसा, आपले सण-उत्सव, आपली बोली, आपली परंपरा हीच आपली खरी ओळख आहे. त्यांचे जतन करणे म्हणजे आपल्या अस्तित्वाचे रक्षण करणे." "आपली संस्कृती म्हणजे आपली ताकद. आपला पोशाख, वाद्ये, गाणी, नृत्य ही जगाला प्रेरणा देणारी अमूल्य संपत्ती आहे. पण ती फक्त जतन करून चालणार नाही, तिला पुढील पिढीकडे अभिमानाने पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे." त्यांनी युवकांना शिक्षण, नोकरी आणि तंत्रज्ञान या माध्यमातून आत्मनिर्भर होण्याचे आवाहन केले. “आपण एकत्र आलो, तर आपल्या हक्कांवर कोणीही गदा आणू शकत नाही,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, आपल्या आदिवासी समाजाला एकजुटीची आवश्यकता आहे. असे आ. तरे यांनी नमूद केले.
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण म्हणाले की, आदिवासी समाजाच्या ज्या काही समस्या असतील त्या साठी आमचे मुख्य नेते तथा उप मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे आपल्या पाठीशी आहेत. आम्ही आपल्या समस्या सोडविण्याचा पूर्ण प्रयत्न करू. "आगामी पाच वर्षांत आदिवासी बहुल भागात रस्ते, वीज, पाणी, आरोग्य सुविधा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण या क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडवू. रोजगार निर्मितीसाठी स्थानिक उद्योगांना चालना देऊ." त्यांनी महिलांसाठी स्वयंरोजगार प्रकल्प, तरुणांसाठी कौशल्य विकास केंद्र उभारण्याची घोषणाही केली.
सरपंच रुपजी कोल म्हणाले की, आमचे ध्येय म्हणजे समाजाचा विकास आणि हक्कांचे रक्षण करणे आहे. आमच्या कार्यक्रमाची नक्कल काही लोक करतात. त्याची आम्हाला गय नाही. आणि मी शिवसेना पक्षात प्रवेश केल्यापासून आपण दिलेली ताकत व पाठिंबा त्यामुळे आम्हाला बळ प्राप्त झाले आहे. त्यामुळे आम्ही नक्कीच आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहोत. यावेळी पथनाट्ये द्वारे महामार्गावर होणारे अपघात वाहतूक नियमांची अंमलबजावणी करण्याची सूचना व दुचाकी स्वरांनी हल्मेट वापरावे असा संदेश देण्यात आला. तसेच, आदिवासी समाजात असलेल्या अशिक्षितेच्या प्रमाणामुळे होणारे बाल विवाह मग त्यातून होणारे गर्भधारणा व त्यामुळे महिलांना होणारा त्रास या बाबत पथनाट्य द्वारे जनजागृती करण्यात आली. पथनाट्याने उपस्थित प्रेक्षकांना भावनिक आणि विचारप्रवर्तक संदेश दिला.
यावेळी अनेक ठिकाणी असलेल्या विविध जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमास आमदार राजेंद्र गावित, आमदार विलास तरे, माजी आमदार अमित घोडा, पालघर जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण, आगवन ग्रामपंचायत सरपंच रुपजी कोल, विलास सपाटे, डॉ. आदित्य अहिरे आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मोठ्या प्रमाणावर आदिवासी बंधू - भगिनींना उपस्थित होते. जागतिक आदिवासी दिन हा केवळ उत्सव नसून, आपल्या ओळखीचे, परंपरेचे आणि हक्कांचे जतन करण्याचा संकल्प करण्याचा दिवस असल्याचे मत सर्व वक्त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचा शेवट एकतेच्या घोषणांनी आणि हक्कांच्या लढ्यात खंबीर राहण्याच्या निर्धाराने झाला.
No comments:
Post a Comment